Menu

किशोरवयीन मुळांच्या मासिकातील काटक - शपथ

image By Wayam Magazine 11 November 2022

सूर्यप्रभा कॉलनीतील आठ-दहा मुले कॉलनी जवळच्या मैदानांत खेळून परत येत होती.

“ए, रजत, नार्वेकर काका स्वाक्षरी देतील का रे?”- साहिलने विचारले. “त्यांच्यासमोर जाऊन स्वाक्षरी मागायची तुला हिंमत तर झाली पाहिजे !”- रजत म्हणाला.

मैदानाच्या समोर रस्त्यापलीकडे श्रीमंती थाटाचे श्रीरंग अपार्टमेंट नुकतेच झाले होते. सध्या टी.व्ही. वर गाजत असलेल्या ‘कानून’ या हिंदी मालिकेचे नायक इन्स्पेक्टर चंद्रकांत म्हणजेच अभिनेते सुहास नार्वेकर फार लोकप्रिय झाले होते. उंच, धिप्पाड, चपळ इन्स्पे. चंद्रकांत कडक, गंभीर असूनही प्रेमळ, सहृदय होते. नार्वेकरांची बहीण या श्रीरंग अपार्टमेंटमध्ये राहात होती. नार्वेकर वरचेवर तिच्या घरी येतात, अशी बातमी होती.

“दुकानांच्या बाजूनं जाऊ या, मला टोमॅटो घ्यायचे आहेत,” शिरीष म्हणाला.

“मला पण आईनं मेथी आणायला सांगितलंय,” असीम म्हणाला. एका दोन मजली इमारतीत नेहमी लागणा-या भाज्या, फळे, दूध, ब्रेड वगैरेसाठी दुकानांचे गल्ले होते. आसपासच्या वसाहतीतील लोकांना तेथेच सामान घ्यावे लागे. सुरवातीलाच गणपतकाकांचे भाजीचे दुकान होते. काका सर्वांशी हसतखेळत बोलायचे. त्यांची बायको, मुले एका खेडेगावात होती. ते एकटेच येथे राहात होते. सध्या सुट्टी असल्यामुळे त्यांचा मुलगा महेश इथे आला होता. कधी कधी त्यांचा तोही दुकानात दिसायचा.

आज महेश दुकानांत होता. काका कुठे दिसत नव्हते. मुलांनी सांगितल्याप्रमाणे महेशने टोमॅटो, मिरच्या तोलून, टोपलींत ठेवल्या. “ए कॅरीबॅग दे.” –शिरीष म्हणाला.

“नाही मिळणार,” महेश कपाळाला आठ्या घालून म्हणाला. “मग ठेव तुझी भाजी तुझ्याजवळच. गणपतकाका नेहमी देतात.” “चला रे”- असीम म्हणाला. तेवढ्यात समोरच्या दुकानातून गणपतकाका बाहेर आले. रागारागाने त्यांनी महेशचा कान जोरात पिळला. गठ्ठ्यातून दोन पिशव्या काढून त्यांत टोमॅटो, मिरच्या, मेथी भरून देता देता ते म्हणाले, “नेहमीची गि-हाइकं घालवतंय कार्ट. लोक काय पिशव्या घेऊन हिंडतात? पैसे घे, आलोच मी.”- ते पुन्हा समोरच्या दुकानात गेले. मुले ओशाळली होती.

पैसे देता देता शिरीष पुटपुटला, “सॉरी, महेश.” “माझ्या बाबाला पैशाची गरज आहे. पण तुम्हाला कळत नाही प्लॅस्टीकच्या पिशव्या वापरू नयेत म्हणून?” महेश उसळून म्हणाला... “आमच्या गावच्या शाळेत सगळ्या मुलांनी शपथ घेतलीय, प्लॅस्टीकच्या पिशव्या वापरणार नाही, दुस-यांना वापरू देणार नाही.” “म्हटलं शहरात शिकलेली माणसं. स्वत: होऊनच शहर स्वच्छ ठेवत असतील, तर उलटंच. स्कूटर गाड्या थांबवून सामान मागतात, दुकानदार देतात प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून. गटारात पिशव्या, रस्त्याकडेला पिशव्या, झुडूपांवर पिशव्या...” मुले महेशचा आवेश बघून थक्क झाली. मग शरमिंदा झाली. खालच्या मानेने चालू लागली. प्लॅस्टीकच्या पिशव्यांमुळे शहराला येणारी कुरूपता त्यांना दिसत होती. त्यांचा पर्यावरणावर होणा-या दुष्परिणामाबद्द्ल ती वाचत होती, ऐकत होती. पण पिशव्यांचा उपयोग थांबण्यासाठी करत काहीच नव्हती.

“यापुढं पिशव्या घेऊन येत जाऊ आपण,” शिरीष म्हणाला. “तेवढ्यानं काय होणार आहे? बिचारा महेश! त्याचा पेच पाहिलात ना? पिशव्या दिल्या तर शपथ मोडते. नाही दिल्या तर गि-हाइकं दुसरीकडं जातात. सगळ्यांनीच कॅरीबॅग मागू नयेत असं काहीतरी केलं पाहिजे,” परेश तावातावाने म्हणाला.

“शॉपिंग सेंटरमध्ये ठळक अक्षरांत आपण प्लॅस्टीकच्या पिशव्यांच्या भयंकर परिणामाबद्दल लिहून ठेवू.”- रजत उत्साहाने म्हणाला. “कोण वाचत बसणार? आमच्या ताईला विचारतो मी. ती सुचवेल काहीतरी.” – असीम म्हणाला. सगळ्यांनीच मोठ्यांचा सल्ला घेण्याचे ठरवले.

दुसरया दिवशी सकाळी खेळ सोडून मुलांनी याच गोष्टीवर चर्चा केली. मग जय्यत तयारी सुरू झाली. लहान-मोठी भावंडे, शेजारच्या मित्रमैत्रिणीही मदतीला आल्या. पैसे गोळा झाले, सामान आणले गेले. तिसरया दिवशी सकाळी बाजारासाठी येणा-यांनी पाहिले, इमारतीच्या पाय-यांच्या दोन्ही बाजूला काठ्यांच्या स्टँडवर चित्रांचे फलक लावलेलं होते. पहिल्या चित्रात दोन गाई केराच्या ढिगांतील प्लॅस्टीकच्या पिशव्यां खात होत्या. दुसरे चित्र पिशव्यांच्या बोळ्यांनी तुंबलेल्या गटाराचे होते. तिस-या चित्रात तळ्यावर प्लॅस्टीकच्या पिशव्या तरंगत होत्या. चौथ्या चित्रात एक माणूस पिशव्या जाळत होता, त्यांतून धूर येत होता. गणपतकाकांच्या समोरच्या स्टेशनरीच्या दुकानाच्या भिंतीवर एक तक्ता लावलेला होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते- “आम्ही घेतली आहे शपथ प्लॅस्टीकच्या पिशव्या न वापरण्याची. आपणसुद्धा घ्या.”

दुकानाच्या काऊंटरवर एक लांब वही ठेवली होती. त्यांत २७ मुलांनी शपथ लिहून खाली सही केळी होती- “मी, प्लॅस्टीकच्या पिशव्या वापरणार नाही. इतरांनीही वापरू नये म्हणून आग्रह धरणार.” गणपतकाकांच्या भाजीच्या काऊंटरपाशी परेशच्या चित्राताईने टेबल मांडले होते. त्यावर कागदाच्या, कापडांच्या लहानमोठ्या स्वस्त-मस्त पिशव्या, तसेच चांगल्या कापडाच्या, तरटाच्या सुरेख टिकाऊ पिशव्या मांडलेल्या होत्या.

चारपाच मुले येणा-याजाणा-यांना वहीत शपथ लिहून सही करण्याची विनंती करत होती. बहुतेक लोक हसून, मुलांचे कौतुक म्हणून लेखी शपथ घेतही होते. चित्राच्या टेबलावरील कागदी, कापडी पिशव्याही खरेदी करत होते. चार दिवस झाले. आळीपाळीने शॉपिंग सेंटरमध्ये थांबून मुलांनी प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा नायनाट करण्याची मोहीम चालू ठेवली.

पाचव्या दिवशी दुपारी गणपतकाकांच्या दुकानासमोर पॅसेजमध्ये आठ-दहा मुले, काही ज्येष्ठ नागरिक, काही बायका उभ्या होत्या. द्रविडमावशी म्हणाल्या, ”मुलांनी मेहनत केलीय खरी. पण कापडी पिशव्या वापरण्याचा हा निर्धार किती दिवस टिकेल लोकांचा? घाईघाईत विसरायला होतं..’’ बोलता बोलता त्या थांबल्या. त्या पुढील प्रवेशद्वाराकडे बघत होत्या. सर्वांनीच तिकडे पाहिले. पांढरी पँट, पांढरा टी-शर्ट घातलेले सुहास नार्वेकर ऐटबाज पावले टाकत येत होते. पाय-या चढून ते आत आले. स्टेशनरीच्या दुकानावरून पुढे गेलेसुद्धा. त्यांना शपथ घेण्याची विनंती करण्याचा धीर एकाही मुलाला झाला नाही. तेवढ्यात महेशची धाकटी बहीण शपथ लिहिलेल्या तक्त्याकडे बोट दाखवून म्हणाली, “काका, तुम्ही पण घ्या ना शपथ.”

नार्वेकर मागे वळले. म्हणाले, “काय रे पोरांनो, तुम्ही अंघोळ करण्याची, घरातला केर काढण्याची शपथ घेता?” “नाही.” सगळी मुले एका सुरात म्हणाली. “मग आपली वस्ती, आपला देश, आपली पृथ्वी प्रदूषणरहित, स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी शपथ का घ्यावी लागते? प्लॅस्टीकचा वापर टाळावा, वाहनांचा वापर कमी करावा. वीज-पाणी वाचवावे या गोष्टी आपण होऊनच केल्या पाहिजेत.”

मुलांचे चेहरे उतरले होते. इन्स्पेक्टर चंद्रकांत खळखळून हसले. खिशांतून कापडाची पिशवी काढून मुलांना दाखवत ते म्हणाले, “ही पहा मी आणलीय पिशवी. पण तुमच्यासाठी घेतो मी शपथ.” दुकानाच्या भिंतीवर लावलेल्या शपथेच्या फलकाकडे हात दाखवून महाजन आजोबा म्हणाले, ”याच्याखाली करा सही. सर्वांना दिसू दे.” नार्वेकरांनी शपथेखाली मोठ्या अक्षरात सही केली. “काका, स्वाक्षरी द्या ना प्लीज.” साहिल आपली स्वाक्षरीची वही पुढे करून म्हणाला. “मी स्वाक्षरी देतो, तुम्ही मला एक सेल्फी द्या. मोठी शहाणी आहेत मुलं.”- नार्वेकर म्हणाले. शपथेच्या फलकाजवळ मुलांना उभे करून त्यांनी एक छानपैकी सेल्फी घेतली.

-कमल राजाज्ञा
C/o एअर कमोडर पी.जी.देशपांडे
‘केदार’ १९/१ ब,
‘निर्झर’ स्टे.बँक कॉलनीसमोर,
कोथरूड, पुणे-४११०२९
My Cart
Empty Cart

Loading...