मित्रांनो, आपल्या सार्या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून. भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील ''इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स'' या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन ''रामन परिणाम'' म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ''राष्ट्रीय विज्ञान दिन'' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन'' (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आणि भारत सरकारनं ती मान्य केली. तेव्हापासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.
रामन यांच्या कार्यापासून नव्या पिढीला मूलभूत संशोधनाकडं वळण्याची प्रेरणा मिळावी, हा एक उद्देश हा दिवस साजरा करण्यामागं आहेच, पण त्याशिवाय पाच उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत. ती म्हणजे –
१. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या विविध वैज्ञानिक गोष्टींचं महत्त्व उलगडून सांगणं आणि त्या आपल्या जीवनात किती अर्थपूर्ण ठरत आहेत, याची जाणीव करून देणं.
२. सकल मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत केले जाणारे प्रयत्न आणि त्यात आलेलं यश उलगडून सांगणं.
३. विज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणं आणि विज्ञानाच्या विकासाशी संबंधित सर्व प्रश्नांची चर्चा करणं.
४. देशातल्या ज्या नागरिकांचा कल विज्ञानाकडं झुकलेला आहे, अशा लोकांना आवश्यक त्या संधी उपलब्ध करून देणं.
५. लोकांना विज्ञानाभिमुख बनण्यासाठी उत्तेजन देणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान समाजात लोकप्रिय करणं.
ही उद्दिष्टं साध्य करण्यास मदत करतील असेच कार्यक्रम त्या दिवशी आखले जातात आणि ते केलेही जातात. त्यामध्ये विविध विषयांवरची व्याख्यानं, विज्ञानविषयक चित्रपट, विज्ञानाशी संबंधित प्रदर्शनं, रात्रीच्या वेळेस आकाशदर्शन, विज्ञानविषयाशी संबंधित वादविवाद स्पर्धा आणि सामान्यज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा असे अनेकविध कार्यक्रम होतात. शिवाय ज्या संस्था समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करतात आणि समाजाच्या सर्व थरांमध्ये विज्ञानाचा प्रसार करतात, अशा संस्थांना या दिवशी पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो.
आपला भारत देश सर्वार्थानं संपन्न आणि बलवान व्हायचा असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकानं विज्ञानाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात जगातल्या सर्व लोकांना एकत्र आणू शकेल अशी एकच शक्ती आहे आणि ती विज्ञानामध्ये आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला कायम भान हवं, ते वर्तमानातल्या वैज्ञानिक घडामोडींचं आणि नजर हवी भविष्याच्या पोटात दडलेल्या संभाव्य वैज्ञानिक घडामोडींकडे! आताचं युग हे ज्ञाननिष्ठेचं आहे, याचंही भान आपण ठेवणं गरजेचं आहे. ज्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, ते सी. व्ही. रामन स्वतः तसेच होते. त्यांच्या आयुष्याकडे अगदी धावती नजर टाकली तरीसुद्धा ही गोष्ट आपल्या लक्षात येते. विज्ञानाच्या संदर्भात रामन यांनी आपल्याला फार मोलाचं असं सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात, ''विज्ञान म्हणजे दुसरं, तिसरं काही नसून तो एक सत्याचा घेतला जाणारा शोध आहे. हे सत्य केवळ भौतिक जगातलंच नाही, तर तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या गोष्टींतलाही आहे. त्यातील सत्य हुडकणं म्हणजे विज्ञान. जे असत्य आहे, खोटं आहे, ते नाकारण्याची तयारी असणं, ती शक्ती असणं हेच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य आहे. असत्याला कवटाळून बसणं साफ चूक आहे, हेच विज्ञाननिष्ठ दृष्टी आपल्याला सांगते.''
विज्ञानाचं महत्त्व असं साध्या सोप्या भाषेत सांगणार्या रामन यांचे पूर्वज शेती करणारे होते. तंजावर जिल्ह्यातल्या पारासगुडी आणि मानसगुडी या खेड्यांजवळ त्यांची शेती होती. अशा शेतकरी कुटुंबात रामन यांचा जन्म दि. ७ नोव्हेंबर १८८८ या दिवशी झाला. ते चार वर्षांचे झाले असताना त्यांचे वडील भौतिकशास्त्राचे व्याख्याते म्हणून श्रीमती ए. व्ही. नरसिंहराव महाविद्यालयात काम करू लागले होते. लहानपणापासून तेज बु्द्धी असलेला मुलगा अशीच कीर्ती रामन यांनी मिळवली होती. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले, त्यावेळी त्यांचं वय होतं, १५ वर्षांचं! १९०४ सालात रामन बी.ए.च्या परीक्षेत पहिले आले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९०६ मध्ये यांचा पहिला संशोधन निबंध लंडन येथील फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ते एम.ए. झालेच, पण त्यांनी फिनान्शियल सर्व्हिस परीक्षेतही पहिला नंबर पटकावला. त्यानंतर त्यांची नेमणूक कलकत्ता येथे साहाय्यक लेखापाल म्हणून झाली. त्याच काळात त्यांचं लग्न झालं. मात्र वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर रामन त्यातच अडकून पडले नाहीत, तर त्यांनी कलकत्त्यामधल्याच ''इंडियन असोसिएशन फॉर कल्ल्टिव्हेशन ऑफ सायन्स'' या संस्थेमध्ये संशोधन करणं सुरू केलं. त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. विज्ञानातील संशोधनास पोषक असं वातावरण अजिबातच नव्हतं. परंतु रामन यांनी मोठ्या चिकाटीनं आपलं संशोधन सुरूच ठेवलं आणि २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी, ते ज्या संस्थेत संशोधन करत होते तिथंच, त्यांनी आपल्या ''रामन परिणाम'' या संशोधनाची घोषणा केली. पुढच्याच वर्षी त्यांना ''सर'' हा किताब मिळाला आणि १९३० सालामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या या तेजस्वी कार्याचं स्मरणं करावं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीनंसुद्धा मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडं वळावं, असाच उद्देश ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यामागं आहे. आपणही त्यातून प्रेरणा घ्याल, असा विश्वास वाटतो.
श्रीराम शिधये