Menu

तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

image By Wayam Magazine 04 October 2022

तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

By Wayam Magazine,  On 12th April 2021, Children Magazine

१० मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. त्यांच्या अपार कष्टामुळे आणि जिद्दीमुळे स्त्री-शिक्षणाला सुरुवात झाली. आज महिला साक्षर होऊन अनेक उच्च पद भूषवत आहेत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांचीच ही एक छोटीशी गोष्ट-

सावित्रीबाई फुले यांचे नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणे कठीण आहे. त्या तेव्हा होत्या म्हणून आज आपण आहोत हा विचार केलात ना प्रिय मुलींनो, तर विचारांच्या साऱ्या दिशा लख्ख उजळतील.

‘तू ज्योत क्रांतिची शिक्षणक्षेत्री तुझाच लख्ख प्रकाश स्त्री-शिक्षण केले सुरू, सुकर मग झाला आमुचा प्रवास’ असं विनम्रपणे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून म्हणावसं वाटतं.

महात्मा ज्योतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांचे स्त्रीशिक्षण ह्या क्षेत्रातले कार्य असाधारण, असामान्य आणि अद्वितीय असेच होते. ज्ञानापासून स्त्रियांना ज्या काळात वंचित ठेवले गेले त्या काळात पुण्यात सर्वप्रथम मुलींची शाळा काढणे सोपे होते काय? पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हे काम मोठ्या धैर्याने केले. अठराशे १८५४-५५ मध्ये साक्षरता अभियानाची सुरुवात करणारे हे जोडपे वंदनीय आहे.

सावित्रीबाई फुले अत्यंत अत्यंत खुल्या मनाच्या होत्या. जात-पात, अस्पृश्यता या गोष्टींना त्यांच्या मनात इवलीशीही जागा नव्हती. स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद त्या काळात अस्पृश्यांना खुला करून देण्याची हिंमत त्यांच्यात होती. फसविल्या गेलेल्या विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीला ‘बाई गं ह्यात तुझा काही दोष नाही. तुझे बाळंतपण माझ्या घरी मी आईच्या मायेने करीन.’ असे सांगण्याचे धैर्य आणि औदार्य दोन्ही त्यांच्याजवळ होते. हुंडापांडा घेऊन वधूपित्याला नागवणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात राग होता. अगदी कमी खर्चातली आणि लग्ने सत्यशोधक समाजातर्फे लावण्याचे एक अतिशय उत्तम कार्य त्यांनी केले.

स्त्रीला माणूस म्हणून जगण्यास सिद्ध करणार्‍या सावित्रीबाईंना त्याकाळात किती विरोध सहन करावा लागला ह्याची कल्पना येणेही कठीण आहे प्रिय मुलींनो!

पण ज्यांनी स्त्रियांच्या, मुलींच्या उद्धाराचा वसा जीवनभर घेतला होता आणि लोक जागराचा यज्ञ आयुष्यभर मांडला होता त्यांना या विरोधाची काय तमा? त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्योतिबा फुले बाहेरच्या खोलीत कारभाऱ्यांसमवेत बसले होते. सावित्रीबाई तेथे आल्या आणि म्हणाल्या,“मला तिसरं लुगडं घ्यावं म्हणते.”

ज्योतिबांना मोठं आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आपली पत्नी असून सावित्रीबाई तिसरं लुगडं मागते? आपले विचार तिला ठाऊक का नाहीत?ते म्हणाले, “आपणाला गरजेपुरतेच अन्न आणि वस्त्र वापरावे. एक वस्त्र अंगावर नि एक धुवायला. दोन लुगडी असताना...”पण कारभारी मधे पडले. त्यांना राहवलेच नाही.

ते म्हणाले, “आपणाला गरजेपुरतेच अन्न आणि वस्त्र वापरावे. एक वस्त्र अंगावर नि एक धुवायला.दोन लुगडी असताना...”

पण कारभारी मधे पडले. त्यांना राहवलेच नाही.

“ज्योतिराव, वहिनीसाहेब मुलींच्या शाळेत शिकवायला जातात; तेव्हा रस्त्याने जाताना लोक त्यांच्या अंगावर थुकतात. घाण होते लुगडे. शाळेत शिकवताना स्वच्छ वस्त्र अंगावर नको काय?”

ज्योतिराव शब्द संपल्यासारखे उठले.

आपल्या प्रिय पत्नीने आपल्याला होणाऱ्या त्रासाची तसूभरही कल्पना आपल्याला देऊ नये? सारे धैर्याने अबोलपणे सहन करावे? मुलींना शिकवण्याचा घेतला वसा टाकू नये?

अभिमान आणि करुणा ह्यांनी ज्योतिरावांच्या हृदयाचा ताबा घेतला. ते बाहेर पडले ते तिसरं लुगडं घ्यायलाच!

मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भिडे वाड्यात मुलींची शाळा काढणारी ही क्रांतिज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोद्गार आहे. त्यांना विसर कधीच पडू नये.

“तुला लावियेले रोप शिक्षणाचे त्याचा वेलू भिडे आभाळाला थेट तुझ्या प्रयत्नांनी शिकतात पोरी सामर्थ्याची दिली तूच मोठी भेट.”
असेच सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते. प्रिय मुलींनो, खूप शिका. सामर्थ्यशाली व्हा. धैर्यशील व्हा आणि तरीही साधेपणा सोडू नका. ‘सावित्री’चा जन्म प्रत्येक हृदयात होणे हाच स्त्रीचा भाग्योदय आहे.

-(हा लेख त्या होत्या म्हणून पुस्तकातून साभार)
My Cart
Empty Cart

Loading...