Menu

जागतिक सर्प दिन

image By Wayam Magazine 16 July 2023

सर्वसामान्यांना ज्याची भीती वाटते त्या सरपटणाऱ्या, वळवळणाऱ्या सापांविषयी आणि एकंदर प्राणी-जगताविषयी कुतूहल, आस्था निर्माण करणारा प्राणी-शास्त्रज्ञ म्हणून डॉ. रेमण्ड ली. डिटमार्स यांना ओळखले जाते. डॉ. रेमण्ड ली. डिटमार्स (जन्म जून २२, १८७६- मृत्यू मे १२, १९४२) या अमेरिकन सर्पतज्ज्ञाने सर्पांवर विशेष संशोधन केले. पशू-पक्षी-कीटक यांवर विविध पुस्तके लिहिली. माहितीपट तयार केले. व्याख्याने दिली. लहानपणापासून बेडूक, सरडे यांच्याशी खेळणारा रेमण्ड पुढे त्यांच्यावरचा मोठा संशोधक झाला. 


छोटा रेमण्ड आपल्या पॅण्टच्या दोन्ही खिशांवर घट्ट हात धरून घरात हळूच शिरताना आजीनं पाहिलं. खिसे चांगले फुगीर दिसत होते. आजीला संशय आलाच. तिनं त्याला हटकलंच. “काय रे रेमण्ड, आज काय आणलंयस नवीन?”

“काही नाही गं आजी... आपलं ते हे...”

“ते हे काय?... काढ हात खिशांवरचे, दाखव,” आजीनं दरडावलं.

“अगं पण त्यांनी उड्या मारल्या तर तू घाबरून ओरडशील ना? म्हणून.”

“काय आणलं आहेस ते तर सांगशील!”

“आजी, एका खिशात बेडूक आहे.. छान रंगीतसा अन् दुसऱ्यात छोटा सरडा...”

“काSSय?” आजी किंचाळलीच. “जा आधी घराबाहेर- त्यांना सोडून ये.”

बिचारा रेमण्ड! निमूटपणे बाहेर गेला. आपल्या खिशातल्या दोस्तांना हिरवळीवर सोडून आला. आपल्या या मित्रांचा घरातल्या मोठ्यांना का राग येतो ते त्या छोट्या सहा वर्षांच्या रेमण्डला समजत नसे. “कसले ते घाणेरडे सरडे आणि बेडूक आणलेस घरात. त्यांना घेऊन खुशाल खेळत बसतोस... धुतलेली स्वच्छ फरशी खराब करतोस.” म्हणून आजी रागवायची. त्या प्राण्यांची किळस करायची. रेमण्डला मात्र तसं काही वाटत नसे. पाली-सरडे-बेडूक-टोळ-फुलपाखरं-कसले ना कसले कीटक पकडून त्यांच्याशी तो खेळे. त्यांच्या हालचाली पाहात बसे. आताशी तर त्याला जवळच्या झाडीत छोटे साप, नानेट्या भेटल्या होत्या. त्यांचा माग काढण्यात त्याची संध्याकाळ जाई.

असेच दिवस जात होते. आता तो १२ वर्षांचा झाला. सापांच्या वेगवेगळ्या जाती त्याच्या लक्षात आल्या. शाळेच्या अभ्यासात त्याला विशेष रस नव्हता आणि गतीही नव्हती. आपल्या या एकुलत्या एका मुलाचं कसं होणार म्हणून रेमण्डच्या आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याची शाळा बदलली. लष्करी शिक्षण देणाऱ्या शाळेत त्याला घातलं. त्यांना वाटलं नाही इंजिनिअर, डॉक्टर झाला तर निदान लष्करात तरी नोकरी मिळेल.

त्या नव्या शाळेत जाऊ लागल्यावरही रेमण्डचे उद्योग चालूच राहिले. आता तर त्यानं नानेट्या घरी आणून पाळायच्या असं ठरवलं. आईला, आजीला हे पटवणं कठीणंच होतं. खूप विनवण्या, मिन्नतवाऱ्या करून त्यानं त्यांची परवानगी मिळवलीच. पण एका अटीवर. ते साप बिनविषारी असले तरी त्यांना घरात मोकाट सोडायचं नाही. त्यांना बंद पेटीतच ठेवायचं. रेमण्डने ती अट मान्य केली. घरात वडलांचं सुतारकामाचं साहित्य होतंच. रेमण्डने काचा, लाकडी फळ्या वापरून सरकत्या दाराची पेटी बनवली. तिला हवेसाठी भोकंही ठेवली.  नानेट्यांची जोडी त्या काचेच्या पेटीत नांदू लागली.

हे सगळं चालू असताना रेमण्ड गावातल्या प्राणी-संग्रहालयातही जात असे. तिथल्या सर्पउद्यानात सर्पांच्या हालचाली, त्यांच्या खाण्याच्या सवयी वगैरे तो मन लावून पाहात बसे. साप आपली जुनी कात कशी टाकतात, तेही त्याला एकदा दिसलं होतं. त्याने पाळलेल्या नानेट्यांच्या डोळ्यांवरती टोपीसारखा फुगा दिसू लागला. त्याच्या लक्षात आलं की आता सात-आठ दिवसांत ही मंडळी कात टाकतील. त्या सापांना आपली कात उतरवणं सोपं व्हावं म्हणून त्यानं त्या पेटीत एका लाकडी ढलप्याची सोय करून ठेवलेली होतीच.

रेमण्डची निरीक्षणं त्याच्या कमी आलीच. डोळ्यांभोवती धुरकट टोपीसारखा फुगा आल्यानं सापाला नीट दिसत नाही. त्याची कातडी मलूल होते. तो सुस्त होतो. कात उतरवण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधी दोन दिवस त्याच्या कातीखाली पातळ ओलसर पापुद्रा तयार होतो. मग त्यांचे डोळे स्वच्छ दिसू लागतात. सैल झालेल्या कातीतून साप स्वत:ला मोकळं करून घेतो. प्रत्यक्ष कात टाकताना साप एखाद्या दगडाला किंवा फांदीला डोकं घासून कात किंचित फाडतो. त्यातून डोकं आधी बाहेर काढून मग शरीर बाहेर काढतो. एका सापाच्या बाबतीत सगळं अस्संच घडलं. अगदी शिकवल्याप्रमाणे. पण दुसऱ्याला ते काही जमेना.

रेमण्ड विचारात पडला, आता काय करावं? या दुसऱ्याला वेळीच कात उतरवणं जमलं नाही तर मधला पापुद्रा सुकणार. जुनी कात सुकून कडक होणार. ती त्याच्या शरीराभोवती घट्ट बसणार. तो अशा प्रसंगी मरूनही जाईल. रेमण्डनं त्याला मदत करायचं ठरवलं. एका बोथट चिमट्यानं त्यानं त्या सापाच्या डोळ्यांवरची कात हलकेच उचलली. ती हळूहळू त्याच्या डोक्यावरून शेपटीच्या दिशेनं सरकवली. मग त्याच्या जबड्याच्या खालच्या बाजूकडूनही कात सैल करून सुटी केली. मग खालच्या आणि वरच्या जबड्याकडची जुनी कात बोटांच्या चिमटीत धरून फाकवली. तो साप हळूहळू सरकत बाहेर आला. त्याच्या अंगावरची ती नवी तजेलदार कात रेमण्डला फारच आवडली.

शालेय पाठ्यपुस्तकांकडे त्याचा ओढा नव्हता. मात्र तो अवांतर वाचन करत असे. त्यातून तो पशू-पक्षी-कीटक-वनं वगैरेंची माहिती मिळवी.

फार लहानपणापासून तो फुलपाखरे, पतंग, पाकोळ्या पकडत आला होता. त्याने त्यांचे नमुने पुठ्ठ्यावर सुईदोऱ्यानं टाचून त्यांच्या फ्रेम्स बनवून जतन करून ठेवले होते. तो आपला हा संग्रह घेऊन स्थानिक प्राणिसंग्रहालयाच्या कीटकतज्ज्ञांकडे गेला. तो संग्रह पाहून त्या कीटकतज्ज्ञाला आश्चर्यच वाटलं. जेमतेम 17 वर्षांच्या मुलानं एवढा संग्रह केला असेल यावर त्यांचा विश्वासच बसेना. बराच वेळ तो संग्रह ते पारखत होते. शेवटी म्हणाले, “माझ्याकडेही मी असे विविध प्रकारचे कीटक जमवलेले आहेत. त्यांची नीट वर्गवारी करायचीय. त्यांना असं नीट फ्रेम्समध्ये बसवायचंय. तूच कर न ते काम.”

रेमण्ड एका पायावर तयार झाला. पण आईबाबा परवानगी देईनात. सुट्टीत थोडे दिवस असं काम करणं वेगळं. पण शाळा सोडून त्यानं प्राणिसंग्रहालयात नोकरी करावी हे त्यांना पटेना. “आधी शिक्षण पूर्ण कर” म्हणाले.

शाळा सुरू होतीच. एक दिवस आईला रेमण्ड डाव्या हातानं चित्र काढत बसलेला दिसला. तिनं त्याला असं का करतोयस म्हणून विचारलं. “आमच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी सांगितलंय. शिपाई गड्याला दोन्ही हातांनी काम करता आलं पाहिजे. लढाईत एक हात कामी आला किंवा निकामी झाला तर अडून राहता कामा नये म्हणून मी डाव्या हातानं सराव करतोय.”

आई-बाबांनी रात्रभर यावर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी एकमुखानं सांगितलं- “रेमण्ड, तुझी इच्छा असेल तर तू त्या प्राणिसंग्रहालयात नोकरी कर. धोका नाही कुठे? लष्करात आहे, लढाईत आहे तसा तो सापांच्या-प्राण्यांच्या सहवासात राहण्यातही आहे. तुला आवडेल त्या मार्गाने तू जा.”

आणि रेमण्डनं आपला मार्ग निवडला.

रेमण्ड प्राणिसंग्रहालयात नोकरीवर रुजू झाला. तिथे कीटकतज्ज्ञ, सर्पतज्ज्ञ, पक्षीतज्ज्ञ यांच्या हाताखाली काम करत स्वत:चा अभ्यास वाढवत राहिला. आपल्या घराच्या वरच्या मजल्याचा ताबा आईबाबांनी रेमण्डकडे दिला. तिथे विविध प्रकारच्या लाकडी पेट्यांतून अनेक जातीचे साप त्याने ठेवले. नंतर आईबाबांनी त्याला ते घरच बक्षीस दिलं आणि ते दुसरीकडे राहायला गेले. रेमण्डनं आपल्या घराचं सर्पालयच करून टाकलं. ठिकठिकाणचे साप त्याच्या सर्पालयात जमा झाले.

लवकरच तो विषदोहन करायलाही शिकला. सर्पविषावर अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळांना तो सर्पविष पुरवे. तो आपल्या हातात साप खेळवत मुलांसमोर कार्यक्रम करी. सापांविषयी माहिती देई. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या नामांकित वृत्तपत्रांत सर्प-पशु-पक्षी यावर लेख लिही. प्रात्यक्षिकांवर व्याखानं देई. त्याचं सर्पगृह पाहायला लोकांच्या रांगा लागत.

रेमण्डच्या सर्पज्ञानाचा, सर्पप्रेमाचा लौकिक वाढत गेला. त्याचा अभ्यासही वाढत गेला. त्यानं त्यावर अनेक पुस्तकं लिहिली. माहितीपट, चित्रपट काढले. त्यातून त्याला पैसा आणि प्रसिद्धी दोन्हींचा लाभ झाला. आणि विशेष म्हणजे तोवर फारशा खिजगणतीत नसलेल्या सापासारख्या प्राण्याच्या अभ्यासाला रेमण्डमुळे प्रतिष्ठा मिळाली. नंतर अनेक जण या अभ्यासाकडे वळले.

पुढे एका संशोधकांनी शोधलेल्या एका दुर्मीळ जातीच्या सरड्याला रेमण्ड डिटमार्स यांच्या नावे P.ditmarsi (Phrynosoma ditmarsi) म्हणून ओळखलं जातं.

-वीणा गवाणकर


                                  ***


My Cart
Empty Cart

Loading...