Menu

सरोवरात पुन्हा ‘जीवन’!

image By Wayam Magazine 21 March 2023

२२ मार्च जागतिक जल दिन... त्यानिमित्ताने एका तलावाच्या पुनर्जीवनाची ही खरीखुरी गोष्ट!

चेन्नईमधील वंदालूर प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील सुमारे १८ एकरात पसरलेले सरोवर... पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगरांतून येणारे पाणी म्हणजे या सरोवराच्या पाण्याचा स्रोत. हे सरोवर म्हणजे प्राणीसंग्रहातील प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांचा जीवनदाता. या तळ्याच्या बाजूने फेरफटका मारण्यासाठी फरशांचा बांधीव रस्ता होता. 

परंतु २०१६ मध्ये वरदा नावाचे भयानक चक्रीवादळ आले आणि आजूबाजूची झाडं उन्मळून पडली. सरोवराभोवतीच्या फारशा उचकटून गेल्या. पुढे २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षं तिथे भयानक दुष्काळ पडला. ऊन मी म्हणत असायचं! हे सरोवर बघता बघता सुकून गेलं. एरवी हिवाळ्यात दूरदूरचे पक्षी स्थलांतर करून इथे येत. सारा परिसर या पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाने फुलून जाई. परंतु त्यांची संख्या एकाच वर्षात कमालीची घटली. पाणीच नाही, तर पक्षी आणि कुठले जीव कशाला येतील?  प्राणीसंग्रहातील अधिकाऱ्यांनी प्राण्यांसाठी बाहेरून टंकरने पाणी मागवायला सुरुवात केली. परिस्थिती अवघड होती.

संकटं माणसाची परीक्षाच बघतात. याचवेळी सुधा रामन या तरुण पर्यावरणप्रेमी वनअधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यांनी ही हलाखीची परिस्थिती नीट पाहिली. ‘इच्छा तिथे मार्ग असतोच, या विचाराच्या सुधा रामन यांनी या सरोवराचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या कामाला लागल्या. आधी सरोवरातला गाळ खोदून त्याची खोली वाढवली. उकरलेल्या गाळाचे छोटे छोटे ढिगारे सरोवरातच ठिकठिकाणी घातले. त्यात अर्जुन, जांभूळ अशा जलद वाढणाऱ्या आणि पक्ष्यांना आकर्षित करून घेणाऱ्या देशी झाडांच्या बिया मान्सूनच्या सुरुवातीलाच पुरून ठेवल्या. पावसाळ्यात पाणी वाहून जाऊ नये म्हणून चहूबाजूंनी  बांध घातले. पावसाचे पाणी साठून राहावे, भूजलपातळी टिकून राहावी म्हणून सरोवराभोवतीने पाझर तलाव खणले गेले. हे काम सुधा आणि त्यांच्या पूर्ण टीमने फार कष्टाने, उन्हाची पर्वा न करता केले. आता सगळ्यांना प्रतीक्षा होती ती पावसाची! गेले दोन वर्षं पाऊस नव्हताच, २०१९ मध्ये तरी पडेल का? सगळेच आतुर होते.

मागच्या वर्षी मनसोक्त पाऊस पडला आणि गाळ उपसून स्वच्छ केलेलं तळं पाण्याने तुडुंब भरून गेलं. गाळाच्या ढिगाऱ्याभोवतीने पाणी खेळू लागलं. बघताबघता तिथे लावलेल्या बिया रुजल्या, झपाट्याने झाडं वाढू लागली. परिसर हिरवागार दिसू लागला. प्राणी, पक्षी पोटभर चरू लागले, पाणी पिऊन समाधानी होऊ लागले. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे, सुमारे ३०० प्रकारचे परदेशी पाहुणेपक्षी परत सरोवरावर दिसू लागले.

सरोवराभोवतीच्या झाडांवर पक्ष्यांसाठी घरे लावली होती. थोड्याच दिवसांत तिथे पक्षी लगबग करताना दिसू लागले. आणि हो! सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिथे निरनिराळ्या प्रकारची असंख्य फुलपाखरं आपले रंगीबेरंगी पंख फडफडवत बागडू लागले. सगळा परिसर परत जिवंत झाला.

सरोवराभोवती जी बांधीव वाट होती, ती परत बांधून काढण्यात आली. पक्षी-निरीक्षकांची, पर्यटकांची छान सोय झाली. मुसळधार पावसात अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पाट काढले. 

असे व्यवस्थित प्रयत्न जर संपूर्ण देशभरात केले गेले तर कितीतरी मृत नद्या, सरोवरे, विहिरी, तलाव पाण्याने पुन्हा ओसंडून वाहू लागतील, असे सुद्धा रामन म्हणतात. 

मुलांनो, तुमच्या गावात, शहरात, आजूबाजूला अशा बुजून गेलेल्या विहिरी, नद्या, तलाव तुम्हांला माहीत आहेत का? त्याबद्दल तुम्ही तुमच्या शिक्षकांशी, मित्रमैत्रिणींशी, पालकांशी, मोठ्या भावंडांशी बोलू शकता. त्यांच्या साहाय्याने जमेल तसे प्रयत्न करू शकता.

तुम्हांला हवामानबदलासाठी आंदोलन करणारी स्वीडनची ग्रेटा माहीत आहेच, आता आपणही तिच्या पावलावर पाऊल ठेवून जमेल ती कृती करायला काय हरकत आहे?

                              -शिवकन्या शशी

My Cart
Empty Cart

Loading...