२७ फेब्रुवारी ह्या ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘वयम्’च्या फेब्रुवारी २०१८ च्या अंकात प्रवीण दवणे यांचा प्रसिद्ध झालेला हा लेख आहे.
इंट्रो- वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे मराठीतील महान साहित्यिक. (जन्म १९१२, निधन १९९९) ज्ञानपीठ आणि पद्मविभूषण अशा सन्मानांनी गौरवल्या गेलेल्या या साहित्यिकाचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ''मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांची थोरवी समजावून सांगणारा हा, ज्येष्ठ साहित्यिकांचा लेख वाचा. कुसुमाग्रजांच्या कविता, ललित लेख, कथा, नाटके असे त्यांचे विपुल साहित्य आहे. तुम्ही जसजसे मोठे व्हाल, तसतसे त्यांचे साहित्य टप्याटप्प्याने वाचा. ते समजून घ्या.
ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब!
कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.
२७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. त्यांचा जन्मदिवस अतिशय कृतज्ञतापूर्वक ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. इतका मोठा सन्मान त्यांना दिला जातो, कारण त्यांनी मराठी साहित्यात नुसतीच मोलाची भर घातली म्हणून नव्हे, तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केलं. उपेक्षित वनवासी बांधवांची प्रत्यक्ष सेवा केली आणि असंख्य अनाम वंचितांचा ते आधार झाले.
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
तिच्या संगाने जागल्या
द-याखो-यातील शिळा
अशा शब्दांत कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचा गौरव केला. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. परंतु अवघ्या मराठी रसिकांनी त्यांना मानाने अभिवादन केले ते ‘विशाखा’ या संग्रहापासून. १९४२ साली म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ‘चले जाव!’ सारख्या स्वातंत्र्य-चळवळीच्या झंझावाताच्या प्रहरात ‘विशाखा’ एखाद्या पलित्यासारखी हाती आली. अवघ्या समाजावर या कवितांनी अक्षरशः गारुड केले. युवकांच्या धमन्यांतून राष्ट्रप्रेमाचे रसायन जागृत करण्याचे सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या शब्दांत होते.
‘गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार’ ‘अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!’ असे आवाहन करीत या कवितेने अक्षरशः रान जागे केले. स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सज्ज असलेल्या क्रांतिकारकांचा स्वर कुसुमाग्रजांच्या प्रत्येक शब्दातून पलित्यासारखा धगधगत होता. मराठी भाषेचे तेज या शब्दांत होतेच; पण त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्यास सज्ज असलेल्या योद्ध्यांचे तेजही या कवितेत होते. ‘विशाखा’मधील ‘क्रांतीचा जयजयकार’ कवितेतील अनेक ओळी ह्या जगण्याची सुभाषिते झाल्या. आधुनिक मराठीत जणू क्रांतिसूक्त ठरणा-या या ओळी पाहा:
‘मृत्युंजय आम्ही! आम्हांला कसले कारागार?’
किंवा
‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार..’
किंवा
‘कशास आई, भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल,
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!’
आता वाचतानाही स्फूर्तीचे रोमांच उभे राहतात, अशा त्यांच्या अनेक कविता याच वयात वाचायला हव्यात. त्यातला आवेग, गती, तेजोमय शब्दकळा जाणकारांकडून समजून घ्यायला हवी. आयुष्य शिखराकडे नेण्याचे अभूतपूर्व सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांत आहे. त्या संपूर्ण मिळवून पुन्हापुन्हा वाचणं, पाठ करणं हाही एक व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम होऊ शकेल.
तुम्ही नक्की वाचाव्या, अशा काही कवितांचा उल्लेख करतो नि मग पुढे जाऊ या.
‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘अहि-नकूल’, ‘आगगाडी व जमीन’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘सात’, ‘टिळकांच्या पुतळ्याजवळ’, ‘निळा पक्षी’, ‘मातीचे गायन’, ‘समिधाच सख्या या’, अशा अनेक कविता ग्रंथालयांतून मिळवून वाचा. मोठ्याने वाचा. उच्चारातून त्या शब्दांचे हुंकार समजून घ्या!
मित्रांनो, असं समजू नका, की कुसुमाग्रजांच्या सर्वच कविता अशा वादळी, प्रखर विषयावरील आहेत. तप्त सूर्याप्रमाणे दिपवून टाकणा-या कवितांप्रमाणे शीतल चंद्रकोरीप्रमाणे शांत-कोवळ्या खूप कविता आपल्या ह्या तात्याआजोबांनी लिहिल्या आहेत. इतक्या हळुवार; की वाटतं तळहातावर पहाटेचं दवच! उदाहरण म्हणून फक्त काही ओळी देत आहे. आपल्यासारख्या उत्सुक बालमित्रांना जाणवेल, अरे, ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ लिहिणारी हीच का ती तरल लेखणी?
पाहा –
जमू लागलेले दव
गवताच्या पातीवर
भासते भू तारकांच्या
आसवांनी ओलसर
काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे
उभे दिवसाचे दूत
(विशाखा कवितासंग्रह)
किंवा
सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार
आता जीवनमय संसार !
(किनारा)
‘उष:कालचे प्रकाशमंडळ येता प्राचीवर
निळे पाखरू त्यांतून कोणी अवतरले सुंदर’
(किनारा)-(निळा पक्षी)
‘शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली,
म्हणाली, जाळीत लपू का?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली...’
(मौन-मुक्तायन)
अशी अनेक उदाहरणे देता येतील. एक कविता शोधताना आणखीही चार वाचता येतील. कुसुमाग्रजांचे साहित्य वाचणे हा समृद्ध करणारा अनुभव आहे आणि तो व्रतस्थ निष्ठेने प्यायला हवा.
कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून समाज जागृत करणा-या व समर्पणाने आयुष्य शोषितांसाठी, उपेक्षित रुग्णांसाठी वेचणा-या महापुरुषांचे दर्शन घडवले. काही महामानवांचा नामोल्लेख करतो, ज्यांचे तपस्वी व्यक्तिमत्त्व कुसुमाग्रजांनी कवितेतून व्यक्त केले. नुसतेच व्यक्तिदर्शन घडवले नाही, तर आजच्या सामाजिक सुख-दु:खांविषयी, वाढत्या विषमतेविषयी, शोषणाच्या पाशवी वृत्तीविषयी त्यांनी थेट संवादी लिहिले.
महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य साने गुरुजी, समाजयोगी बाबा आमटे असे महामानव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितेतून साकारले गेले; आणि त्यातून मराठी कवितेला व्यक्तिपर असूनही समाजपर झालेल्या कवितांचे परिमाण लाभले. ‘रसयात्रा’ ‘मुक्तायन’, ‘प्रवासी पक्षी’ असे काही त्यांचे कवितासंग्रह मिळवून वाचा. यातल्या अनेक कविता तुम्हांला तेथे मिळतील.
वि.वा.शिरवाडकरांची लेखणी कवितेप्रमाणेच नाट्यलेखनातही मनापासून रमली. त्यांनी आपल्या नाटकांतून मानवी मनाच्या अतर्क्यतेचे, अथांगतेचे दर्शन घडवले. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे ‘माझ्या नाटकात माणसाचं मन हाच मुख्य विषय असतो.’ असं मानवी मन उलगडणारी- ‘दूरचे दिवे’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’ ही आणि अनेक नाटके. शेक्सपिअरच्या नाटकांचे त्यांनी केलेले अनुवाद, स्वतंत्र निर्मितीइतकेच प्रभावी ठरले. राजमुकुटम (मॅक्वेथ), ऑथेल्लो - अशी काही अनुवादित नाटके भाषेचा डौल आणि अनुवादातील परिणामकारकता यासाठी जरूर वाचायला हवीत. परंतु त्यांच्या लेखणीने सोन्याचा कळस चढवला तो -‘नटसम्राट’ या नाटकाने. डॉ. श्रीराम लागू आणि दत्ता भट ह्या दोन थोर नटवर्यांप्रमाणे अनेक नामवंत अभिनेत्यांनी ‘गणपतराव बेलवलकर’ ही केंद्रस्थानी असणारी व्यक्तिरेखा साकार केली. तुमच्या पिढीला ‘नटसम्राट’ या शिरवाडकरांच्या नाटकाची ओळख झाली ती चित्रपटामुळे. नाना पाटेकर यांच्यासारख्या कसदार अभिनेत्याने-गणपतराव बेलवलकर-अर्थात नटसम्राट –प्रभावी उभा करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले. एका अतिशय यशस्वी नटाची त्याच्या घरातच, त्याच्या उतारवयात जी उपेक्षा होते, दोन पिढ्यांचा-सामाजिक-भावनिक जो संघर्ष निर्माण होतो, तो ‘नटसम्राट’मधून अनेक नाट्यमय घटनांतून साकार झाला आहे. ‘नटाचे’ नाटक असल्याने अनेक स्वगते, मुक्तकाव्ये यातून ‘कुसुमाग्रजांचे’ दर्शन ओघानेच घडते. एक नाटककार आणि एक श्रेष्ठ कवी यांच्यातील प्रतिभासंगम अभ्यासक आणि आस्वादक म्हणून आपण अनुभवायला हवा. अगदी काही वाक्यांचे नमुने पाहा:
१.
जगावं कि मरावं
हा एकच सवाल आहे
या दुनियेच्या उकिरड्यावर
खरकटया पत्रावळीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम, लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?
खरं सांगतो बाबांनो
तुफानाला तुफानपणच
नडतं आहे.
कुणी घर देता का घर !
तुफानाला महाल नको
राजवाड्याचा सेट नको
पदवी नको, हार नको
थैलीमधली भेट नको
एक हवं लहान घर,
पंख मिटून पडण्यासाठी
एक हवी आरामखुर्ची,
तुफानाला बसण्यासाठी!
आणि विसरू नका बाबांनो,
एक तुळशी वृंदावन हवं
मागच्या अंगणात..
सरकारसाठी!
कुसुमाग्रजांच्या
अशा अनेक आशयघन शब्दावलींची उदाहरणे देता येतील. एकदा नव्हे, पुन्हा पुन्हा वाचून त्यातला विचार समजून घेणं ही सुद्धा एक जीवन समृद्ध करण्याची साधना आहे.
अशा थोर कवीला, साहित्यिकाला जवळून बघण्याची, सहवासाची संधी मला मिळाली. अतिशय साधी व सात्विक रहाणी, स्वभावातील लीनता, समाजातील सर्वच घटकांवर मनापासून प्रेम करणारी त्यांच्यातील करुणा यांचा अनुभव घेतला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या गुणांमुळे त्यांची थोरवी अधिकच जाणवली. समाजातील तरुण पिढीवर त्यांची विशेष माया होती. मराठी भाषेची त्यांना गोडी लागावी म्हणून त्यांच्या अखेरच्या काळात जोडाक्षरविरहीत सुबोध काव्यरचना त्यांनी केल्या. स्वत:च्या निवासातील काही भाग त्यांनी बालवाचनालयासाठी दिला. चित्रकलेपासून अनेक कलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले. ‘वयम्’ पिढी घडावी म्हणून त्यांनी वेळोवेळी शासनाकडेही काही मतांचा आग्रह धरला.
आडनावाने शिरवाडकर असलेले तात्यासाहेब सर्वार्थाने नाशिककर होते. महाराष्ट्राने त्यांना प्रेम दिलेच; पण नाशिकने त्यांच्यावर अपार माया केली. ते म्हणतात - ‘मी जन्मानं पुणेकर, नावानं शिरवाडकर- पण वास्तव्यानं आणि अंत:करणानं सर्वस्वी नाशिककर.’!
नाशिकला जेव्हा नवे नाट्यगृह बांधून झाले तेव्हा नाशिककर जनतेने आग्रह धरला की, या वास्तूला शिरवाडकरांचे नाव द्यावे. पण या संतवृत्तीच्या विनम्र साहित्यिकाने या प्रस्तावाला नकार देत म्हटले – “मी अधिक योग्य नाव सुचवतो; महाकवी कालीदास नाट्यगृह असे नाव द्या !”
खरंच, असा थोर माणूस होणं कठीण. आपले आवडते पु.ल. म्हणायचे, “महाराष्ट्रात वाकून नमस्कार करण्यासारखे दोनच पाय आहेत. ते म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे.”
त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी. हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हा मराठी भाषेचा गौरव म्हणता येईल. अवघ्या जगाने त्यांना मानाचा मुजरा म्हणून अवकाशातील एका ता-याचे ‘कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले. त्यांचे साहित्य वाचणे, मातृभाषेवर नि:स्सीम प्रेम करणे व समृद्ध, सुशील माणूस होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. ‘आम्हा घरी आहे शब्दांचेच धन, शब्द देता घेता झाले आहे आता शब्दांचेच मन’ या ओळीतच त्यांचे शब्दरूप अस्तित्व जाणवत राहाते. ‘प्रेम हाच संस्कृतीचा सारांश’ असं मानणा-या व जगणा-या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यासारखी युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कार्यातून अजरामर असतात -
तेच म्हणतात ना -
तुम्ही जेव्हा
माझ्या कवितेशी बोलता
तेव्हा माझ्याशी बोलू नका,
कारण माझ्या कवितेत
मी असेन बराचसा
बहुधा,
पण माझ्या बोलण्यात मात्र
तुम्हीच असाल
पुष्कळदा.
अशा वाचक रसिकांशी, मराठी भाषेशी एकरूप झालेल्या महाकवीला हा मानाचा मुजरा !
‘कणा’सारख्या संवादी कवितेतून जगण्याच्या संघर्षाचेच पंख करणा-या आजच्या तरुणाईचे कणेदार मन त्यांनी मांडले. महापुरात नवा संसार वाहून गेला, भिंत खचली... चूल विझली, पण मन खचले नाही, जिद्धीची मशाल विझली नाही अशा गरुडपंखी वृत्तीचा तरुण आपल्या गुरुजींना म्हणतो -
खिशाकडे हात जाताच; हसत हसत उठला.
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून ‘नुसतं लढ म्हणा!’
-प्रवीण दवणे