Menu

सदाशिव सैनिक होतो - छत्रपती शिवाजी महाराज च्या काळातली लहान मुलांसाठी गोष्ट

image By Wayam Magazine 07 November 2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही गोष्ट आहे. सदाशिव नावाचा एक खेड्यात रहाणारा मुलगा मामा-मामीच्या जाचाला कंटाळून घर सोडून निघाला. आई-वडील बिचारे कधीच मरून गेले होते. मामीच्या तोंडच्या शिव्यांची आणि शिळ्या चटणीभाकरीची फार लहानपणापासूनच सवय होती सदाशिवला. पण तो तरी किती सहन करणार? एके दिवशी आपल्या छोट्या मैत्रिणीला, सोनीला सांगून त्याने शिवाजीच्या सैन्यात दाखल व्हायचं ठरवलं आणि तिने लपवून- छपवून आणलेली शिदोरी खाकोटीला मारून सदाशिवराव गावच्या पाटलाचं मरतुकडं घोडं घेऊन (अर्थातच गुपचूप) सैन्यात भरती व्हायला निघाला.

शिवाजीच्या सैन्यात जायचं खरं पण रस्ता कुठे ठाऊक होता? आणि महाराष्ट्रातल्या एवढया डोंगरद-या त्या मरतुकड्या घोड्याच्या मदतीनं ओलांडायची, ते सुद्धा मोगल सैन्याच्या तावडीत न सापडता, हे सर्व करायला काही कमी जिद्ध लागते का? सदाशिवचं वय जेमतेम सोळा, पण मनाची जिद्द आणि न बघतच शिवाजीवर अपार श्रद्धा. केवळ हया दोनच जिनसा पोतडीत घालून बेटा निघाला घर सोडून वा-यावर ! रानावनातून दगडा-डोंगरातून घोडं चाललंय. मधेच कुठेतरी पाण्याचं तळं दिसलं की घोड्याला पाणी पाजवून, स्वत: पिऊन ताजतवाना व्हायचं आणि एखाद्या झाडावर चढून लांबवर कुठे एखादा किल्ला दिसतो का ते न्याहाळायचं. विश्रांती घ्यायची; शिदोरीतली थोडीशी भाकरी खाऊन बाकीची उद्याला ठेवायची अशी मजलदरमजल वाटचाल करीत सदाशिव एका खो-यात येऊन पोचला. तळं दिसताच घोड्याने त्या बाजूला चालायला सुरुवात केली आणि सदाशिवही पाय मोकळे करायला निघाला. घरातून निघाल्यापासून सदाशिवने विश्रांती अशी घेतलीच नव्हती, त्यामुळे जवळच एक जरा उंच असं चांगलं भरभक्कम झाड निवडून त्यावर चढून त्याने शिदोरी सोडली. घास घेता घेता गावच्या आठवणी काढत होता आणि नकळत त्याचा डोळा लागला.

भर मध्यरात्री कुणाच्या तरी बोलण्याने तो जागा झाला आणि सावधपणे कान देऊन ऐकू लागला. “ए मिया, ह्या झाडाखालीच खड्डा खणू या का?”

“अरे पण, ह्याच झाडाखाली रे का?”

“अरे शहाण्या, हे झाड खूण मानायला सोपं आहे म्हणून. ठेव नक्की कुठे ठेवली? तर त्या उंच अन् भरभक्कम झाडाखाली. म्हणजे पुन्हा शोधायला येऊ त्यावेळी जागा नक्की लक्षात राहील. हो की नाही?” सदाशिवनं हळूच वाकून पाह्यलं, दोन मुसलमानी पोशाख केलेले सैनिक होते ते, पण त्यांच्या बोलण्यावरून तर ते मराठीच वाटत होते, म्हणजे विजापूरकरांच्या दरबारातले सैनिक दिसतात हे! शिवाजीसंबंधी काही ऐकायला मिळतंय का म्हणून सदाशिव कान टवकारून ऐकू लागला, तेव्हा त्याला समजलं ते असं – विजापुरकरांचे दोन मेणे सोनंमोहरांनी भरून इकडच्या किल्ल्यावरून दुसरीकडे नेण्यात येत होते. २०-२५ सैनिक फार देत होते. वाटेत चोर-लुटारूंची भीती असल्याने दिवसाउजेडीच प्रवास संपवायचा अशा मनसुब्याने मंडळी चालली होती. पण वाटेतच दरोडेखोरांनी गाठलं आणि एक मेणा पुरता लुटला. दुस-या मेण्यात सगळ्या मोहरा होत्या. तो मेणा लुटणार तेव्हा लुटारूंची टोळी व विजापूरकर सैनिकांची चांगलीच लढाई जुंपली. विजापुरकरांचे बरेच सैनिक मारले गेले. पण इतक्यात लुटारुंच्या टोळीतला – बहुतेक तो प्रमुखच असावा- एकजण अतिशय जखमी झाला. त्यामुळे त्यांनी दुसरा मेणा न लुटताच माघार घेतली. विजापूरकर सैनिक, जे पाच-सहा उरले होते, त्यांनी विचार केला की सगळ्या मोहरा आपसात वाटून घ्याव्या आणि दरबारी जाऊन दोन्ही मेणे लुटल्याची वार्ता द्यावी, यासारखे सुख नाही. कोणी इकडे कोणी तिकडे मोहरा घेऊन गेले आणि सदाशिव होता त्या झाडाखाली दोघे सैनिक आले. ते पुढे काय करतात ते बघत सदाशिव बसून राहिला.

त्या दोघांनी खड्डा खणून आपापल्या जवळच्या थैल्या त्यात पुरल्या व वरून माती ढकलून सारखी केली आणि त्या ठेवीचा केव्हा व कसा वापर करायचा ह्याचा बेत करीत करीत ते दोघे निघून गेले.

ते दृष्टीआड झाल्याची खात्री करून घेऊन सदाशिव खाली उतरला आणि माती उकरून पुरलेल्या थैल्या त्याने वर काढल्या. मोहरांचा ढीग पाहून सदाशिवचे डोळे फिरले. आश्चर्यचकित होऊन तो बघतच राहिला. इतक्यात घोड्यांच्या टापा त्याला ऐकू आल्या. लुटारूच असतील कदाचित असा तर्क करून मोहरा कनवटीला खोचल्या आणि बाकीच्या पुन्हा जागच्या जागी पुरून तो झाडावर चढून बसला.

“अरे हे घोडं कुणाचं ?” हा प्रश्न कानावर येताच सदाशिव सावध झाला. आपलं घोडंच जर त्यांनी पळवलं तर आपण शिवाजीपर्यंत पोचणार तरी कसे? म्हणून मग त्यानं खाली उतरून त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. “कोण हो तुम्ही? हे माझं घोडं आहे, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी?” “अरे, हा एवढासा चिमुरडा झाडावरून कुठून आला? कोण रे बाळा तू ?” त्या टोळीतल्या एकाने विचारलं.

“मी बाळ नाही. माझं नाव सदाशिव, मला तुमच्या सरदाराशीच बोलायचंय; कुठाय तो ?”

“काय रे नाव तुझं? मीच तो सरदार. काय काम आहे तुझं?” हे शब्द ऐकताच सदाशिवने नीट निरखून पाह्यलं तर एकवीस-बावीस वर्षांचा कोवळा तरुण एका जखमी माणसाला आपल्या घोड्यावर सांभाळून त्याच्याशी बोलतोय.

“मला शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हायचंय. त्यांच्याकडे जाऊन पोचायला किती दिवस लागतील माहीत नाही. तुमचे लोक माझं घोडं घेतायत, मग मी काय करायचं?” सदाशिवने विचारलं.

“अरे, हा आमचा साथीदार जखमी झालाय ना, त्याच्यासाठी हवं होतं आम्हांला तुझं घोडं; आणि आम्ही शिवाजीचेच लोक आहोत. तुला घेऊन जाऊ की. माझ्यासमोर बैस तू आणि तुझं घोडं त्याला घेऊन येऊ दे हळूहळू, चल.” सरदाराचे हे शब्द ऐकताच सदाशिवाने त्याच्याकडे निरखून पाह्यलं. एवढा छोटा हा सरदार; पण बोलणं कसं छान ! तो पटकन त्याच्या घोड्यावर बसला आणि शिवाजीच्या साथीदारांसोबत निघाला. चालता चालता त्यानं न्याहाळून पाह्यलं तर सरदाराखेरीज सर्व साथीदारांच्या घोड्यांवर दोन्ही बाजूंना पिशव्या लादलेल्या दिसत होत्या. मघाच्या लोकांनी वर्णन केलेले लुटारू ते हेच असले पाहिजेत. त्याने तर्क केला. सरदाराने त्याला विचारलं, “तू घर सोडून का आलास?” “काय करणार? गावात दुष्काळ, मोगल सैन्य पिकांची नासाडी, लुटालूट करून जात; मामा तरी बिचारे कुठवर पोसणार? दिलं हाकलून मला. शिवाजी सगळ्यांचं भलं करतो असं ऐकलं म्हणून तिकडेच जायचं ठरवलं. पण तुम्ही कुठून आलात? आणि चाललात तरी कुठे?”

सरदार म्हणाला, “तू शिवाजीकडेच निघालायस् तेव्हा सांगायला हरकत नाही तुला. विजापूरकरांचा खजिना लुटून तोरणा गडावर जातोय महाराजांकडे.”

“महाराज खूप धाडसी आहेत ना हो?”

“हो तर, तू आता त्यांचा साथीदार होणार ना? मग तुला पण धाडसी बनायला हवं.” सरदार आणि सदाशिवच्या गप्पा चालल्या होत्या आणि गडाच्या दिशेनं गुप्त रस्त्यानं त्यांची पावलं पडत होती.

पहाटेच्या वेळेला सगळेजण गडावर पोचले. सरदाराने सदाशिवला उतरवलं आणि स्नान, न्याहारी आटोपून दरबारात यायला सांगितलं. छोट्याशा खेड्यातला गावंढळ पोरगा गडावरचं वातावरण पाहून बावरला. तेवढ्यात एका पहारेक-याने त्याला हाक मारून सोबतीने यायला सांगितलं. एका मोठया दालनात भोवताली दगडी भिंती, खिडक्यातून पर्वत दिसत आहेत आणि मधोमध आपला शिवाजी उभा! “ये सदाशिव,” राजाने हाक मारताच सदाशिव आ वासून पाहातच राहिला. ज्याच्या बरोबर बसून तो आला तो सरदार म्हणजेच शिवाजी होता तर!

शिवाजीने सदाशिवला गदगदा हलवलं. “अरे, एवढं आश्चर्य कसलं वाटलं तुला? मीच शिवाजी.”

“तुम्ही स्वत: लुटीत भाग घेतलात, का बरं?” “मग काल तो जखमी माणूस मांडीवर घेतला होता तो कोण?” “तो येसाजी कंक. तो जखमी झाला नसता तर दोन्ही मेणे लुटले असते. बरं असो. तुझं काय वय आहे?”

“सोळा”

“अरे वा, मग तुला लढाई येतच असेल. हत्यारं कुठली कुठली चालवतोस?” “हत्यारं? बापरे मला तर काहीच नाही येत. मग मला परत पाठवणार का तुम्ही?” सदाशिवचा गळा दाटून आला.

“शिवाजी महाराज , हत्यार नसलं तरी हे बघा, माझ्याजवळ काय आहे ते! तुम्हाला भेट.” कनवटीच्या मोहरा काढून सदाशिवाने शिवाजीच्या हाती दिल्या. “आता तरी घ्याल ना मला तुमच्या सैन्यात?”

आश्चर्यचकित होऊन शिवाजीने सगळी माहिती त्याला विचारली. हत्यार नसतानाही आणि कुठलीही मदत नसली तरी केवळ बुद्धीच्या जोरावर सदाशिवने हस्तगत केलेली संपत्ती पाहून त्यांना आनंद झाला. “सदाशिव, आम्ही रुप्याची नाणी लुटली पण तू एकट्यानं सोन्याच्या मोहरा शत्रूकडून एकट्याने मिळवल्यास, शाब्बास. खरोखर, तुझ्यासारखी मुलं मला हवी आहेत. हे बघ, मला सगळ्या मोहरा नकोत. तू दिलेल्या मोहरा मी खजिन्यात जमा करतो आणि तुझ्या पहिल्या पराक्रमाची आठवण म्हणून एक मोहर तुझ्याजवळ ठेवून दे. तलवार चालवण्याचं शिक्षण आम्ही तुला देऊ.”

कुठला कोण सदाशिव, पण श्रद्धा, चिकाटी आणि थोडीशी चतुराई याच्या जोरावर शिवाजीच्या जवळच्या लोकात स्थान मिळवून बसला. शिवाजी महाराज असे गुणग्राही होते.

-सदाशिव सैनिक होतो- शरदिन्दू बंदोपाध्याय, अनुवाद- वसुधा पंडित
My Cart
Empty Cart

Loading...