Menu

रात्री उडणारे ‘पतंग’

image By Wayam Magazine 16 November 2022

By Makrand Joshi,  On 21st July 2020, Children Magazine

रात्री उडणारे ‘पतंग’

दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये ''वयम्'' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात ''पतंगां''वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय ''पतंग'' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय-


निसर्गाच्या अफाट पसाऱ्यामध्ये एक संगती आहे. वर वर पाहता विखुरलेले वाटणारे यातले घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे एक विशिष्ठ स्थान ठरलेलं आहे, कारण त्या स्थानावर त्याला एक ठराविक भूमिका बजावायची असते. यातूनच निसर्गातल्या बहुविधतेचा जन्म झाला. याचं एक नेहमी दिसणारं उदाहरण म्हणजे, फुलझाडांमधील काही झाडे रात्री फुलतात. आता या रात्री फुलणाऱ्या झाडांचे परागीभवन म्हणजे बीज प्रसार कोण करणार? त्यासाठी निसर्गात रात्री उडणारी फुलपाखरे अस्तित्वात आली. या रात्री उडणाऱ्या फुलपाखरांना आपण ‘पतंग’ म्हणून ओळखतो. या पतंगांची शरीर रचना काही सूक्ष्म फरक सोडले तर फुलपाखरांशी अगदी मिळती जुळती असते, त्यामुळे अनेकदा गफलतीने यांना फुलपाखरू समजण्यात येते.पण बहुसंख्य फुलपाखरं दिवसा उडतात. अर्थात नियमाला अपवाद असतातच.

आपल्या तडक भडक रंगांनी आणि पंखांवरील चित्रविचित्र नक्षिने लक्ष वेधून घेणाऱ्या या पतंगांची दुनिया आहे तरी कशी ते जाणून घेऊ या -
जीवशास्त्रीय दृष्ट्या आपल्या पृथ्वीवरील प्राण्यांचे वर्गिकरण कणा असलेले आणि कणा नसलेले प्राणी या दोन मुख्य गटांमध्ये केले आहे. यातील कणा नसलेल्या प्राण्यांचे जे वर्गिकरण केले आहे, त्यात ऑर्थोपोडा अर्थात संधिपाद हा एक मोठा गट आहे. या गटात क्रस्टेशिया म्हणजे कवचधारी जसे खेकडे, शेवंड हे प्राणी येतात तसेच कीटक म्हणजे इन्सेक्टस येतात. यांत टोळ, ढालकिडे, फुलपाखरे, पतंग यांचा समावेश होतो. हा कीटकांचा गट प्राणिसृष्टीतला सर्वात मोठा गट मानला जातो.

या गटात जातींच्या संख्येवरुन पहिला क्रमांक लागतो ढालकिडे म्हणजे बिटल्सचा. त्यापाठोपाठ फुलपाखरे आणि पतंगांच्या संयुक्त गटाचा क्रमांक येतो. आपल्या पृथ्वीवर सगळी जीवसृष्टी अवतरली ती उत्क्रांतीच्या अविरत पण हळूहळू फिरणाऱ्या चक्रामधून. याच उतक्रांतीच्या चक्रात कीटकांचा उदय सुमारे ३६० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला आणि किटकांच्या गटात फुलपाखरे व पतंगांचा उदय सर्वात शेवटी म्हणजे सुमारे १६० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला.


फुलपाखरे आणि पतंग यांचा उदय तेव्हाच का झाला ? तर त्याच काळात वनस्पतींना फुलं यायला सुरवात झाली होती, म्हणजे सपुष्प वनस्पतींच्या बीजप्रसारासाठी फुलपाखरे आणी पतंग अस्तित्वात आले. कीटकांमधल्या लेपिडोप्टेरा या गटात फुलपाखरे आणि पतंगांचा समावेश केला जातो. या गटाच्या नावाचा अर्थच मुळी लेपिस म्हणजे खवले आणि प्टेरॉन म्हणजे पंख अर्थात खवल्यांचे पंख असा होतो.आज जगभरात फुलपाखरांच्या २५,००० जाती नोंदवण्यात आलेल्या आहेत, तर पतंगांच्या नोंदवलेल्या जातींची संख्या आहे १,२०,०००.

फुलपाखरू आणि पतंग यात काय फरक आहे ?
या प्रश्नाचं उत्तर तसं बघितलं तर `काही नाही’ असं देता येतं. कारण फुलपाखरांप्रमाणेच पतंगांना पंखांच्या दोन जोड्या असतात. सहा पाय असतात. मध शोषून घेण्यासाठी प्रोबोस्किस म्हणजे सोंड असते. शरीराची विभागणी मस्तक, धड आणि पोट अशी तीन भागांमध्ये झालेली असते. इतकंच नव्हे तर त्यांचा जीवनक्रमही अगदी सारखा म्हणजे पूर्ण अवस्थांतर या प्रकारातला असतो. मात्र तरीही फुलपाखरे आणि पतंग एकच म्हणता येत नाहीत, कारण त्यांच्यात काही अगदी सूक्ष्म तर काही वरवरचे फरक नक्कीच आहेत. सगळ्यात मोठा फरक म्हणजे फुलपाखरे दिवसा उडतात, तर पतंग निशाचर आहेत. म्हणजे रात्री उडतात. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की फुलपाखरे बसताना शक्यतो पंख मिटून बसतात, तर पतंग नेहमी आपले पंख पसरून बसतात. भिंतीवर पंख पसरुन बसलेल्या पतंगाकडे पाहिल्यावर चटकन आकार आठवतो तो संक्रातीला उडवल्या जाणाऱ्या कागदी पतंगाचा (बहुदा हा कागदी पतंग करायची कल्पना, निसर्गातल्या पतंगावरुनच सुचली असावी).

फुलपाखरांच्या ॲन्टेना म्हणजे मिशा किंवा चाचपण्या या सरळ आणि टोकाकडे जाडसर असतात, तर पतंगांच्या चाचपण्या या केसाळ आणि निमुळत्या होत गेलेल्या असतात. फुलपाखरांमध्ये डोळे मोठे असतात,तर पतंगांच्या डोळ्याचा आकार त्यांच्या डोक्याच्या मानाने लहान असतो. फुलपाखरांचे मागचे आणि पुढचे पंख सुटे, स्वतंत्र असतात, तर पतंगांमध्ये हे पंख एका लहानशा हुकने जोडलेले असतात.

पतंगांचा जीवनक्रम हा फुलपाखरांप्रमाणेच अंडी, अळी, कोश, पतंग असा असतो. पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे मादीच्या पोटात जन्मापासूनच अंडी असतात, कोशातून बाहेर आल्यानंतर नराशी मिलन झाले की ही अंडी ‘जिवंत’ होतात. पतंगांच्या माद्या फुलपाखरांप्रमाणेच आपली अंडी शक्यतो ज्या झाडाच्या पानांवर अळ्या वाढू शकतात, त्या झाडांवर घालतात. अंडी कधी सुटी सुटी, तर कधी एकत्र घातली जातात. हॉक मॉथ सुटी सुटी अंडी घालतो, तर टसर सिल्क मॉथ एकत्र अंडी घालतो. स्विफ्ट मॉथची मादी तर उडताउडताच पन्नास हजारांपर्यंत अंडी घालते. या अंड्यांची संख्या भरमसाठ असते, कारण वेगवेगळ्या संकटांमधून त्यातली थोडी तरी वाचून, काही शे अळ्यातरी बाहेर याव्यात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर अळी आधी त्या अंड्याचे टरफल खाते आणि मग फक्त खाते, खाते आणि खाते. सरपटत चालताना समोर दिसेल ते म्हणजे पान, कळी, फूल, झाडाचे मूळ असं काहीही अळी खात सुटते. तिला कोशासाठी नंतर धागा तयार करायचा असतो, त्यासाठी तिचं हे चरणं सुरू असतं.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पतंगांना सोंड नसते. त्यामुळे कोशातून बाहेर आल्यानंतर ते काहीही खात नाहीत. अर्थात त्यांचे आयुष्य काही दिवसांचे असते, पण त्यासाठीची बेगमी अळी अवस्थेत केली जाते. मात्र अळी अवस्थेत असताना पतंगांना सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे कधी रंगांच्या माध्यमातून परिसरामध्ये मिसळून जाऊन, तर कधी दिवसा पानाखाली लपून आणि रात्रीच बाहेर पडून या अळ्या स्वतःचा बचाव करतात. सतत खात असल्याने अळीची वाढ जलद होत असते आणि त्यामुळे ती वारंवार कात टाकते. नंतर एका क्षणी अळीला जाणीव होते की आता कोश विणायची वेळ आली आहे, तेंव्हा ती खाणं थांबवते.

एखाद्या काटकीचा आधार घेउन ती कोश विणू लागते. सर्वसाधारणपणे दोन दिवसात कोश विणायचं काम पूर्ण होतं. सर्वसाधारण आकाराच्या कोशासाठी तयार केलेला धागा १.८ कि.मी.इतक्या लांबीचा असतो. काही पतंगांच्या अळ्या स्वतःला पानामध्ये गुंडाळून कोश करतात, तर डेथ हेड हॉक मॉथची अळी स्वतःला जमिनीत गाडून मग कोश तयार करते. समजा एखाद्या अळीने अनुकूल हंगामाच्या शेवटी कोश केला, तर त्यातील पतंग थेट पुढच्या वर्षी बाहेर येतो. कोशात असतानाही अळीवरचा धोका टळलेला नसतो. काही वेळा पॅरासाइट वास्प म्हणजे परोपजिवी माश्या या कोशाला छिद्र पाडून, त्यात आपली अंडी घालतात. मग या अंड्यातून बाहेर आलेली माश्यांची पिल्ले कोशातल्या अळीवर आपल पोट भरतात, तर कधी कधी या माश्या अळीबाहेर असतानाच, तिच्या शरीरात आपली अंडी घालून ठेवतात. त्यामुळे अशा प्रकारे परोपजिवी माशांमुळे, काही वेळा कोशातून पतंग बाहेर यायच्या ऐवजी या माशा बाहेर येतात.

सर्वसाधारणपणे कोशातून सात ते पंधरा दिवसांत पतंग बाहेर येतो. बाहेर पडण्यासाठी शक्यतो संध्याकाळी काळोख पडल्यानंतरची किंवा पहाटे सूर्य उगवण्याआधीची वेळ निवडली जाते. कोशात असताना पतंग गुंडाळलेल्या अवस्थेत असतो. बाहेर आल्यानंतर त्याला आपले पंख सरळ करायला काही क्षण लागतात. त्याच्या पंखांमध्ये रक्तप्रवाह खेळून ते उडण्यासाठी योग्य झाले की पतंग हवेत उडू लागतात. प्रजोत्पादन हेच पतंगांचे प्रमुख जीवन कार्य असते. त्यामुळे कोशातून बाहेर आल्यानंतर पतंगांचे नर, माद्यांचा शोध घेऊ लागतात. त्यासाठी त्यांना आपल्या चाचपण्यांचा म्हणजेच ॲन्टेनांचा उपयोग होतो. या चाचपण्यांमुळे नरांना काही किलोमीटर अंतरावरच्या माद्यांचा गंध जाणवतो. पूर्ण वाढ झालेल्या पतंगांचा धोका संपलेला नसतो. सरडे, पक्षी, कोळी, बेडूक, वटवाघूळ असे शिकारी त्यांना भक्ष्य बनवायला टपलेले असतात. अर्थात स्वतःचा बचाव करायचे काही खास उपाय पतंगांकडे असतात. अमेरिकेतल्या टायगर मॉथना सर्वात जास्त धोका वटवाघळांपासून असतो, म्हणून हे पतंग आपल्या पंखांची उघडझाप करुन अल्ट्रा सॉनिक ध्वनी निर्माण करतात आणि वटवाघुळांना तरंग सोडून शोधता येणार नाही, अशी आडकाठी निर्माण करता. आउल मॉथ या पतंगाच्या पुढच्या दोन्ही पंखांवर डोळ्य़ा मोठा आकार तयार झालेला असतो. पानांमागे दडलेल्या या मॉथचा हा ‘डोळा’न पाहून भक्षक गोंधळतात, घाबरतात आणि आउल मॉथचा बचाव होतो.


पतंगाचा अवतार जरी रात्री उमलणाऱ्या फुलांचे परागीभवन करण्यासाठी झाला असला, तरी पतंग केवळ फुलांवरच बसत नाहीत. पतंगाच्य़ा आवडीतही वैविध्य आहे. चिखल, शेण, झाडाचा डिंक, जास्त पिकलेली फळे, इतकंच काय, पण माणसांचा घाम याकडेही पतंग आकर्षित होतात. तुम्हाला पतंगांचे जवळून निरीक्षण करायचे असेल तर घराच्या गॅलरीत, अंगणात जास्त पिकलेली केळी, पेरू, अननस ही फळे ठेवून बघा, संध्याकाळी या फळांच्या ‘बुफे’वर निरनिराळ्या प्रकारचे पतंग झेपावताना दिसतील.

ॲटलास मॉथ, मून मॉथ, टसर मॉथ या पतंगांना अजिबात प्रोबोस्किस म्हणजे सोंड हा अवयवच नसतो, तर सगळ्यात वेगाने उडणाऱ्या हॉक मॉथला तेरा सेंटीमीटर लांबीची सॊंड असते. आपल्या गतीमान उडण्यामुळे हॉक मॉथ लांब पल्ल्याचे स्थलांतर करतात. पतंग निशाचर असल्याने आजही पतंगबाबतच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित नाहीत. त्यातल्या त्यात ज्या पतंगांपासून रेशमाचे धागे मिळतात, त्यांचीच ओळख माणसाला जास्त आहे. सध्या भारतात ज्या मलबेरी सिल्क मॉथपासून रेशीम मिळवले जाते, ती पतंगाची जात चीनमधून भारतात आणण्यात आली. प्राचीन काळात भारतात टसर, मुगा आणि एरी या तीन जातींच्या पतंगांपासून रेशीम मिळवले जात असे. मात्र मलबेरी सिल्क मॉथचा उपयोग सेरीकल्चर म्हणजे रेशमाची शेती करण्यासाठी करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. या रेशमाच्या पतंगांची अळी जो कोश विणते, त्याच्या आतल्या भागात रेशमाचे तंतू असतात, पतंगाची वाढ पूर्ण होऊ लागली की पतंग एक प्रकारचा स्राव सोडून ते धागे विरघळवून टाकतो. त्यामुळे या पतंगांपासून रेशीम मिळवण्यासाठी कोश गरम पाण्यात टाकून आतला पतंग मारावा लागतो. अपवाद फक्त एरी मॉथचा, कारण एरी मॉथ हे रेशमाचे तंतू विरघळवत नाही. जगातला आकाराने सर्वात मोठा पतंग म्हणजे ॲटलास मॉथ. याच्या दोन पंखांच्या टोकांमधले अंतर सुमारे ३३ सेंटीमिटर इतके असते. पंखाच्य़ा टोकांवरील रंगसंगती आणि नक्षी एखाद्या सापाच्या डोक्याचा भास निर्माण करणारी असते. मुंबई-पुण्याच्या परिसरात हा पतंग अनेकदा पाहायला मिळतो. याच्या एंटेना नारळाच्या झावळीसारख्या असतात.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने आणि रंगाने लक्ष वेधून घेणारा आणखी एक पतंग म्हणजे मून मॉथ. फिकट पिस्ता रंगात न्हाउन निघालेल्या या पतंगाच्या मागच्या पंखाचा आकार झिरमिळ्यांसारखा होत गेलेला असतो. शिवाय याच्या चारही पंखांवर अर्धपारदर्शक वर्तुळाकार असतात.


पतंग बचावासाठी अनेकदा इतर किटकांची नक्कल करताना दिसतात. हँड मेडन मॉथ हा दिवसा उडणारा पतंग एखाद्या धोकादायक माशीसारखा (वास्प) दिसतो. अनेकदा त्याला माशी समजून हूसकावून लावलं जात. डेथ हेड हॉक मॉथच्या अंगावरीरल नक्षीमधून मानवी कवटीचं भितीदायक चित्र निर्माण होतं.

परागी भवनाचे काम करणारे आणि रेशीम देणारे पतंग उपद्रवी सुध्दा आहेत. आपल्या घरातल्या डाळी, पिठं, धान्य यावर गुजराण करणारे काही पतंग ( म्हणजे त्यांच्या अळ्या) आहेत. तसेच क्लोथ्स मॉथची अळी लोकर, लोकरी कपडे, ब्लँकेट्स यांचा फडशा पाडते.

भाज्यांवर जगणारे काही पतंग आहेत. त्यांना अडवायला रासायनिक किटक नाशकांचा वापर करणे योग्य ठरणार नाही. निसर्गातच या पतंगाचे जे शत्रू आहेत, त्यांचा उपयोग करुन उपद्रवी पतंगांच्य संख्येवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. सृष्टीतील इतर सर्व घटकांप्रमाणेच पतंगांचे या निसर्गचक्रात एक विशिष्ट स्थान आहे आणि त्या स्थानावरुन ते कायमचे ढळणार नाहीत, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.

-मकरंद जोशी
makarandvj@gmail.com


जुलै २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...