Menu

अर्चनाचा पत्ता

image By Wayam Magazine 29 June 2023

‘नंबर्स’ प्रेमी मैत्रिणींची गुंग करणारी गोष्ट!

ऑफिसची मीटिंग आटपून घरी पोचायला उशीर झाला. शेजारच्या लिसाआंटीला फोनवर बोलून ठेवलं होतं तसं. अनिका शाळेतून आल्यावर तिने दरवाजा उघडून दिला असणार. मी पोचते तो अनिका काहीतरी गहन प्रश्नात बुडून गेलेली दिसत होती.

“खाल्लंयस ना?” मी बॅग सोफ्यावर ठेवत विचारलं. 

“हो, आई. थोडं खाल्लं.”

“गुड. अभ्यास जास्त आहे की काय?” मी तिच्या टेबलासमोर बसत म्हटलं. 

“छे गं!अर्चनाचा पत्ता शोधत्येय!”

“अर्चना? कोण अर्चना?”

“आज शाळेत नवीन आली.माझ्या बाजूला बसवलं तिला आमच्या बाईंनी.खूप छान आहे ती,आई. आम्ही आता बेस्ट फ्रेंडस झालो!”

मला हसू आवरेना.“एका दिवसात बेस्ट फ्रेंडस?”

“हो. कारण आई, तिला ना माझ्यासारखे नंबर्स खूप आवडतात. आज ती हातावर पेनने काय काढून आली असेल सांग?

“संख्या असेल कोणती तरी!”

“करेक्ट! पायचं चिन्ह काढलं तिने. मी पण हा बघ हातावर इन्फीनिटी म्हणजे अनंत हे चिन्ह काढलंय.”

“मस्त!” ते लाल रंगातलं रेखीव चिन्ह बघताच मी दाद देऊन टाकली. 

“पण लिसाआंटी रागावल्या. त्या म्हणतात की, हातावर पेनाने काही नाही लिहायचं.”

“तुला माहीत आहे ना, आंटी आधी शाळेत मुख्याध्यापिका होत्या. शिस्त आहेच कडक त्यांची.”

“हूं.” गाल लगेच फुगले माझ्या गोंडस बारा वर्षांच्या मुलीचे. 

“बरं, पण अर्चनाचा पत्ता शोधायला ही आकडेमोड कशाला?” तिच्या वहीत अंक आणि अक्षरांची छानपैकी मिसळ झालेली दिसत होती.

“आई, पहिल्यांदा मी सांगितलं की मी कुठे राहते ते. अर्चनाला विचारलं, तर म्हणाली की ती पण जवळच राहते. उद्या शनिवार म्हणून तिने मला सकाळी खेळायला बोलावलंय. जाऊ ना मी?”

”जा की.पण कुठे? कुठच्या सोसायटीत?”

“गंमत आहे.पत्ता न देता तिने सांगितलं की तिच्या फ्लॅटचा नंबर आहे तो प्राइम नंबर आहे. मूळ संख्या. म्हणजे कळलं ना? ज्या संख्यांना दुसर्‍या कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्या.”

मुलांचा नेहमी एक गोड गैरसमज असतो की आपल्या पालकांना काहीही माहीत नसतं. म्हणजे बघा, मी एवढी मोठी ऑफिसर आहे, रोज संख्यांशी माझा संबंध येतो. मग मला मूळ संख्या माहीत नसतील का? पण असू दे.मुलीच्या उत्साहावर कशाला पाणी टाकायचं,म्हणून मी फक्त हसले. 

“अगं,पण सोसायटीचं नाव काय?”

“तेही एक वेगळंच कोडं आहे,आई.पण मी आधी त्यांच्या फ्लॅटचा नंबर शोधत्येय.हे बघ आपल्या आजूबाजूला सगळया सोसायट्या आहेत त्या चार ते सात मजली आहेत. बरोबर?”

“हो,पण एक मिनिट हं. चहा करते,आणि मग बोलूया.तू दूध घेणार का?”

“तू चहा कर तुझ्यासाठी, मी सफरचंद घेते.” लेक लगेच माझ्याआधी किचनमध्ये घुसली. 

पोटोबा शांत झाल्यावर आम्ही जोमाने डोकं चालवायला घेतलं. 

“बघ आई, फ्लॅट नंबर कसा लिहितात - 101, 102, 503, असा ना? सातपर्यंत सगळे मजले धरायचे आणि प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स. म्हणून मी 704 पर्यंतचे सगळे प्राइम नंबर्स बघितले. मग त्यातले शेवटचा आकडा 1, 2, 3, 4 यांच्या आत असणारे लिहून काढले. हे बघ.”

तिच्या वहीत दिसत होते ते – 101, 103, 401, 503, 601, 701. 

“एवढेच आहेत का? मग झालं तर. पण पुढे काय?”

“आता?” पोरीच्या डोळ्यात केवढी काकुळत होती! 

“असं करूया, हे बाजूला ठेवून त्या सोसायटीचं नाव आधी शोधूया का?”

“चालेल. हे बघ हे तिच्या सोसायटीचं नाव-”अनिकाने माझ्यापुढे वही धरून एका शब्दावर बोट ठेवलं. 

“कीरअ? असं कधी नाव असतं का?”

“अगं, ते कोडं आहे म्हटलं ना! सांकेतिक भाषा आहे ती. माहीत आहे ना ते काय असतं ते?”

“हो. आहे थोडंसं माहीत.” मी हसू दाबत म्हणाले. “पण नुसत्या कीरअ वरून कसं सोडवणार आपण हे कोडं?”

“एक्झॅक्टली!” अनिका आनंदाने उत्तरली. “मी पण तिला तेच विचारलं. तेव्हा तिने एक क्लू म्हणून तिचं नाव याच कोडमध्ये लिहून दिलं.”

“अरे वा! मग येईल आपल्याला हे सोडवता.” माझ्या अंगात आता जोश संचारला. “दाखव बघू तिने काय लिहिलं आहे?”

“पल्टका.”

“पल्टका?”

“हां. म्हणजे प्रत्येक अक्षराला एक दुसरंच अक्षर असं एक सीक्रेट कोड अर्चनाने दिलं आहे, आणि ते शोधून काढलं की आपल्याला तिच्या सोसायटीचं नाव मिळेल.” 

“बरं. हे बघ, पल्टका हे थोडं अर्चनासारखंच वाटतं आहे. मग प = अ असेल का?”

“हो. तसंच आहे. आणि ल =र, ट = च, न = क. हे मिळालं मला.”

“मिळालं ना, आणि सोसायटीचं नाव काय दिलंय?”

“कीरअ.”

“अरे! यात तर आपल्याला माहीत सगळी अक्षरं आहेत.” मी आनंदाने म्हणाले.

“हो गं, पण मग ती अक्षरं घालून काय येतं माहीत आहे, नीलप. अशा नावाची कोणतीच सोसायटी नाहीय!”

“पण नीलपर्णी आहे की!”

“नीलपर्णी? पण मग असं अर्धवट का दिलं नाव अर्चनाने?”

“ते तिलाच विचारू ना उद्या. नाहीतर तिच्या कोड्याचा एक भाग म्हणून सुद्धा असेल! पण तुला नीलपर्णी सोसायटी आठवली का? ती मागच्या बाजूची नाही का? अनिका, दुसरीत असताना तू ड्रॉइंगच्या क्लासला जायचीस तिथे.”

“मीना मॅमकडे ना? आठवतं मला. तिकडे खूप मोठी मोठी चित्रं लावली होती घरात.”

“हो. चौथ्या मजल्यावर उड्या मारत जायचीस पळत पळत. आणि मला मात्र धाप लागायची चढताना-”

हसता हसता आम्हा दोघींचे डोळे चमकले! 

नीलपर्णीला लिफ्ट नव्हती. जुनी बिल्डिंग होती, आणि चारच मजले होते. 

“म्हणजे आई,” वहीचं आधीचं पान उलटत ती जोराने ओरडली, “फ्लॅट नंबर 503, 601, 701 कॅन्सल!”

“बेस्ट! आता तीनच नंबर उरले – 101, 103, आणि 401.” मी तिला टाळी देत म्हणाले. 

“सोप्पंय!” माझी चुणचुणीत मुलगी उत्तरली. “उद्या सकाळी नीलपर्णीत जायचं. आधी 101ची बेल वाजवायची. तिथे अर्चना असेल तर झालंच. नाहीतर 103कडे बघायचं. तिथे पण नसेल, तर पटापट जायचं 401 मध्ये!” 

मी मात्र विचारात पडलेय - अर्चना जर चौथ्या मजल्यावर राहत असेल, तर? माझी अनिका जाईल पटापट. पण मला मात्र चार जिने चढून जाण्याचं टेन्शन! 

-मेघश्री दळवी

               ***


My Cart
Empty Cart

Loading...