Menu

योद्धा संन्यासी!

image By Wayam Magazine 11 January 2024

१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख- 

संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुलं डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेनं एक नाग सरपटत जात असल्याचं एका मुलाने पाहिलं. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलंही सापाला पाहून घाबरली. परंतु त्यातील एक मुलगा मात्र किंचितही हलला नाही. तो ध्यानात मग्न होता. मुलांनी त्याला हाका मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. मुलांनी धावत जाऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावले. एव्हाना त्या नागाने फणा पसरला होता. सारी मुले खिळून बसली होती. पण काही वेळातच तो साप सळसळत निघून गेला. हे सगळे ऐकल्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला, “मला नाग वगैरे काही कळलं नाही. मला कसला तरी खूप आनंद होत होता.”

वयाच्या सहाव्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला. पहिला दिवस त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याला या दिवशी पहाटे त्याच्या घरातील पुजारींनी काही पूजा, संस्कार करण्यासाठी बोलावलं होतं. शाळेच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने हा विद्यारंभ होता. त्याची घरची सारी मंडळी उपस्थित होती. पुजारीबुवांनी काही मंत्र म्हटले. या नव्या विद्यार्थ्याला सरस्वतीच्या ठायी अर्पण केले. सरस्वती म्हणजे ज्ञानदेवता मानली जाते म्हणून! मग त्यांनी ‘रामखडी’ नावाचा लालसर खडू त्याच्या उजव्या हातात ठेवला आणि त्याचे बोट धरून पाटीवर अक्षरं गिरविली. शाळेत जाताना त्यानं नवं कोरं धोतर नेसलं होतं. बगलेत बैठकीची गुंडाळी होती. कमरेला लांब दोरी बांधलेली बोरूची लेखणी लोंबकळत होती. हे सर्व त्या मुलाला खूप छान वाटत होतं. या मुलाची स्मरणशक्ती तीव्र होती. आईनेच त्याला प्राथमिक इंग्रजी वाचनाची अक्षरओळख करून दिली. जगात कितीही दु:ख, संकटे वाट्याला आली तरी नैतिक मूल्यं कधीही बाजूला टाकायची नाहीत, हाही धडा तो आईकडूनच शिकला. आईने त्याला सांगितले होतं, ‘आयुष्यभर पवित्र राहा. स्वत:चा सन्मान राखून राहा आणि इतरांच्या सन्मानालाही कधी ठेच पोहोचू देऊ नकोस. स्वभावाने शांत आणि मृदू हो. पण प्रसंगी कठोर हो.’

भीती, अंधश्रद्धा हे शब्द त्याच्या गावीच नव्हते. कंटाळा आला की, नरेंद्र एका मित्राच्या घरी जायचा. त्याच्या अंगणात चाफ्याचे झाड होते. फांदीला लोंबकळून डोके खाली करून लटकण्याचा खेळ त्याला आवडायचा. एक दिवस तो तशाच पद्धतीने लटकत होता. घरातल्या आजोबांनी त्याचा आवाज ओळखला. हा मुलगा पडेल, या काळजीने आजोबांनी त्याला बोलावलं आणि ‘झाडावर चढून असे खेळ खेळू नकोस’ असं सांगितलं. त्या मुलाने याचे कारण विचारलं. तेव्हा आजोबा म्हणाले, “झाडावर ब्रह्मराक्षस राहतो. जे झाडावर चढतात त्यांची मान तो तोडून टाकतो.” त्या मुलानं हे ऐकून घेतलं. आजोबांना बरे वाटलं. परंतु आजोबांची पाठ वळताच तो पुन्हा झाडावर चढला. बाकीच्या मुलांनी त्याला विचारलं, “आजोबांनी सांगितलेलं विसरलास का?” तो म्हणाला, “कुणी काही सांगितले म्हणून कधीही त्यावर विश्‍वास ठेवू नका. आजोबांनी सांगितलेले खरं असतं तर माझी मान यापूर्वीच ब्रह्मराक्षसाने मोडून टाकली नसती का?”

विवेकानंद खूप स्पष्ट विचारांचे होते. पुढे मोठ्या जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी हेच सांगितले की, “तुम्ही पुस्तकात वाचलं म्हणून कशावरही विश्‍वास ठेवू नका, सत्य काय आहे ते तुम्हीच शोधा.’

स्वामी विवेकानंदांना लहान मुलांशी संवाद साधायला खूप आवडत असे. त्यांनी दुसर्‍यांदा पाश्‍चात्त्य देशांना भेट दिली होती, त्यावेळच्या कित्येक आठवणी आज उपलब्ध आहेत. मिड भगिनींच्या परिवारात स्वामीजी घरातील एक सदस्य बनून गेले होते. या भगिनींपैकी एक होत्या हॅन्सबरो. त्यांची मुलगी डोरोथी चार वर्षांची होती. तिचा मानसभाऊ म्हणजे व्हिकॉप यांचा मुलगा राल्फ हा १७ वर्षांचा होता. स्वामीजींचा या मुलांबरोबर खूप मजेत वेळ जात असे. घरच्या अंगणात ते त्यांच्या बरोबर खेळत असत. सार्‍या मुलांबरोबर हात धरुन ‘रिंग-अराऊंड-द रोझी’ या गिरक्या घ्यायच्या खेळात ते सहभागी होत. मुलांना भीती दाखवून काही गोष्टी शिकवायची पद्धत त्यांना अजिबात आवडत नसे. कधीकधी ते मुलांबरोबर बागेतील सावलीत बसून मुलांची गोष्टीची पुस्तके पाहत. लेविस कॅरॉलने लिहिलेली ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ आणि ‘अ‍ॅलिस थ्रू दि लुकिंग ग्लास’ ही पुस्तके त्यांना नेहमी आवडायची. स्वामीजींनी राल्फला एकदा विचारले, ‘तुला तुझे स्वत:चे डोळे दिसतात का?’ त्यावर स्वामी त्याला म्हणाले, ‘बाळा ईश्‍वरही तसाच असतो, तुमचे डोळे जसे तुमच्याजवळ असतात तितकाच तोही जवळ असतो, तुम्हांला तो दिसत नसला तरी तो अगदी तुमचा स्वत:चाच असतो.’ देव आपल्यातच असतो, असे जणू त्यांना सूचित करायचे होते. 

१६ ऑक्टोबर १८९२  रोजी हा तरुण कोल्हापूरमार्गे बेळगावात आला. कोल्हापूरला छत्रपती शाहूंची त्याने भेट घेतली होती. १६  ते २७  ऑक्टोबरपर्यंत या संन्याशाचा मुक्काम बेळगावात होता. यातील नऊ दिवस भुईकोट किल्ल्यातील एका खोलीत त्यांचा मुक्काम होता. या काळात त्या तरुणाबरोबर आध्यात्मिक चर्चा करण्यासाठी काही जण किल्ल्यात येत असत. कुणी काही शंका विचारत असत. त्याचे निरसन हा तरुण आपल्या कुशाग्र बुद्धीने करीत असे.

एक दिवस एक तरुण त्यांच्या खोलीपाशी घुटमळून परत गेला. पुन्हा दोन-तीन दिवस असेच घडले. तेथे येणार्‍यांनी त्या संन्याशाला याबाबत विचारले. संन्यासी म्हणाले, “या मुलाला त्याची परीक्षा चुकवायची आहे आणि संन्यासी व्हायचे आहे म्हणून तो इकडे फेर्‍या मारतो आहे.” एकदिवस तो तरुण त्या संन्याशाकडे गेला. संन्याशाने त्याच्या मनातला हेतू जाणला होता. तो संन्याशी म्हणाला, “एकवेळ परीक्षा देऊन उत्तीर्ण होणे सोपे आहे, पण संन्याशी होणे त्याहून कठीण आहे. संन्याशी होण्यासाठी परीक्षा चुकविणे ही पळवाट नाही. तू तुझी परीक्षा पूर्ण कर आणि खूप शीक.”

बेळगावातील मुक्कामात हा संन्यासी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री कपिलेश्‍वर देवस्थानात येऊन ध्यानधारणा करायचा. याआधी स्नानासाठी म्हणून तो जोशी मळ्यातील विहिरीत पोहायला जात असे. त्याचा हा रोजचा परिपाठ होता. २७  ऑक्टोबर १८९२ रोजी या संन्याशाने बेळगावचा निरोप घेतला आणि गोव्याकडे निघाला.

११  ते २७ सप्टेंबर १८९३  या काळात अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरली होती. या परिषदेत त्यांनी सुरुवातच संस्मरणीय केली. ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो...’ असे उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. इथूनच आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि भक्कम आध्यात्मिक बैठकीमुळे हा तरुण सार्‍या जगात लौकिक पावला. हा तरुण आणि तो विद्यार्थी म्हणजेच स्वामी विवेकानंद.

-सुनील आपटे

***

My Cart
Empty Cart

Loading...