Menu

पॅकबंद खाऊ घेताना...

image By Wayam Magazine 04 December 2023

२४ डिसेंबर हा दिवस भारतात 'राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर १९८६ या दिवशी, भारतात 'ग्राहक संरक्षण कायदा’ अमलात आला. तुम्ही मुले चोखंदळ ग्राहक आहात ना? छोट्या छोट्या वस्तू तुम्ही खरेदी करू लागला असाल. तुमची खरेदी अचूक आणि उत्तम व्हावी, यासाठी या काही गोष्टी तुम्हांला माहीत हव्यात.

खाण्याचे पदार्थ पॅकबंद असतील तर आपल्याला एक प्रकारचा विश्वास वाटतो. म्हणून तर बिस्किटे, चॉकलेट, फरसाण, मिठाई असे तयार खाद्यपदार्थ आपण सुटे, उघड्यावरचे न घेता, शक्यतो पॅकबंद अवस्थेतील घेतो. या पॅकबंद वस्तूंच्या वेष्टनावर बारीक अक्षरांत बरेच काही लिहिलेले असते. ते तुम्ही वाचता ना? अधूनमधून ते वाचत जा. त्यावरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असते.

या पॅकबंद पदार्थांना आवेष्टित वस्तू म्हणतात. कायद्यानुसार त्यावर पुढील माहिती असली पाहिजे :  

* वस्तूचे नाव - ब्रँड नाव आणि प्रकार-  उदा.- २०० लिटरचे पेय, 'क्ष’ कंपनीचे

* त्याचे वजन-  

* किंमत- MRP- (जास्तीत जास्त किंमत.)

* उत्पादकाचे नाव व पत्ता.

* उत्पादनाशी निगडित काही परवाने लागत असतील तर तो परवाना क्रमांक.

* एका कंपनीने दुसऱ्या कोणाकडून तो पदार्थ बनवून घेतला असेल, तर त्या उत्पादकाची आवश्यक माहिती.

* ग्राहकांसाठी संपर्क क्रमांक, इमेल, पत्ता, इ.

ही झाली ठोकळ माहिती. खाण्याच्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात नक्की काय काय जाते, याची जाणीव आपल्याला असावी म्हणून त्या पॅकवर बारीक अक्षरांत आणखीही काही माहिती दिलेली असते. आपल्या ओठांतून पोटात जाणारा खाऊ आपल्यासाठी योग्य, चांगले पोषण देणारा, वाढत्या वयासाठी उपयुक्त असा आहे का, हे जरा पाहून घ्या.

१. पोषण मूल्य तक्ता- न्युट्रिशनबाबत माहिती : यामध्ये आपण घेत असलेल्या पॅकमधून १०० ग्रॅम खाऊ खाल्ला तर काय काय मिळेल हे त्या तक्त्यात असते.

सव्र्हिंग साइझ- म्हणजे एका वेळी किती खावे आणि त्यातून काय काय, किती मिळेल, हेही देणे आवश्यक असते. बिस्कीट किंवा वेफर्स घेतले तर त्याचा सगळा पुडा एका बैठकीत एकट्याने खायचा नाही, हे तर लक्षात घ्यायला हवे ना!

२. घटक पदार्थ- ब्राऊन ब्रेड, आटा ब्रेड, हाय फायबर ब्रेड अशा विविध नावांचे ब्रेड मिळतात. अमुक इतके टक्के आटा (कणीक) असेल तर त्याला आटा ब्रेड म्हणता येते, नाहीतर नाही.

त्या पॅकवर दिलेली कृत्रिम रसायनांची यादी वाचायची बरं का! प्रक्रिया केलेले अन्न टिकविण्यासाठी त्यात जे काही टिकवणारे, स्वाद फुलवणारे, चव खुलविणारे, रंग आकर्षक करणारे घटक बाहेरून घालतात, ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार (कोडेक्स) असावे लागतात. घटक पदार्थ यादीत त्यांचे जगभरात सारखे असे क्रमांक असतात. हे सगळे अगदी शेवटी असतात त्या यादीत. कारण ही यादी उतरत्या क्रमाने द्यायची असते. म्हणजे सगûयांत अधिक प्रमाणात असणारा घटक प्रथम लिहिला जातो. आता ज्यावेळी आपण फळांचा रस (फ्रूट ज्यूस) घेतो, त्यावेळी नीट पाहा. पाणी आणि साखर किती आहे आणि प्रत्यक्ष फळाचा रस किती आहे! तसेच दुधाचे म्हणून समजल्या जाणा:या पदार्थात दूध किती आणि इतर घटक काय आहेत, हेसुद्धा लक्षात येईल.

३. याशिवाय अन्न संरक्षण आणि मानके कायद्याअंतर्गत कंपनीने नोंदणी करणे जरूर आहे. तो क्रमांक आणि त्याचे चिन्हसुद्धा खाऊच्या पॅकवर हवेच.  

४. हे पाकीट उघडलेत की, त्यातील पदार्थ कधीपर्यंत खायचा, उरलेला कसा टिकवायचा, (म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचा की नाही) हे सुद्धा महत्त्वाचे ठरते.

५. ह्याशिवाय काही व्यक्तींना काही पदार्थ वज्र्य असतात म्हणून तीही नोंद असते, जसे- बाळांना देऊ नये, गर्भवती / स्तनदा माता ह्यांना नको, इत्यादी.

६. तरुणांना भुलविणारे पदार्थ- एनर्जी ड्रिंक, शीत पेये, कुरुम कुरुम आवाज करत खायचे चटपटीत खाऊ. ह्यांच्या पॅकवरची माहिती अगदी नीट वाचा म्हणजे कळेल की, खूप किंमत देऊन आपण नक्की काय घेतोय, काय खातोय आणि आपल्या आरोग्यासाठी ते योग्य आहे की नाही याचा विचार करा. 

-वसुंधरा देवधर 

***


My Cart
Empty Cart

Loading...