Menu

रंगांची ओळख

image By Wayam Magazine 11 November 2022

By Bal Phondke,  On 3rd March 2020, Children Magazine

इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

तसं पाहिलं तर रंगांची मजल इंद्रधनुष्याच्या तानापिहिनिपाजा या सात रंगांपर्यंतच जाते. त्या चौकटीतले सात रंगच तसे आपल्या ओळखीचे असतात, पण त्यातही विविध छटा असतात. गवताचा रंग हिरवा, पोपटाचाही हिरवा, कैरीचाही हिरवा आणि ऑलिव्हचाही हिरवाच. पण त्यांच्यामध्येही बारीकसारीक असले तरी फरक आहेतच. साडीला मॅचिन्ग ब्लाऊजचं कापड विकणार्‍याला विचारा. तो कोणत्याही एकाच रंगाच्या अगणित छटा वेगवेगळ्या दाखवू शकतो. केवळ आपल्या नजरेनं तो त्या ओळखू शकतो.

त्यात परत या सात रंगांमध्ये ज्यांची नावं येत नाहीत असे कोनफळी, गुलाबी, केशरी, आकाशी, राणी, चॉकलेटी, मातकट असेही अनेक रंग आपल्या भेटीला येतात. शिवाय या सात रंगांच्या पलीकडेही रंग आहेतच. ता म्हणजे तांबड्याच्या पलीकडे इन्फ्रारेड किंवा अवरक्त, तर जा म्हणजे जांभळ्याच्या अलीकडे अल्ट्राव्हायोलेट किंवा जंबूपार. त्याही पलीकडे आणखी काही. पण हे रंग आपण पाहू शकत नाही. ते पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये नसते. म्हणूनच मग प्रश्न पडतो की हे सात रंग तरी आपल्याला कसे दिसतात. तसं पाहिलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला दिसते कारण प्रकाश. मग तो सूर्यकिरणांचा असेल किंवा कृत्रिम दिव्यांचा असेल, त्या वस्तूवरून परावर्तित झाल्यानंतर आपल्या डोळ्यांवर पडतो. भिंगामधून आत डोळ्याच्या पडद्यावर जाऊन पोचतो. तिथं त्याचं ग्रहण करणार्‍या काही पेशी असतात. तो प्रकाश अशा रीतीनं शोषल्यावर त्या पेशीकडून तो संदेश आपल्या मेंदूकडे पाठवला जातो. तिथं त्याची फोड होऊन आपल्याला रंग समजतो.

सर्वच प्राण्यांना याच प्रक्रियेपोटी वस्तू दिसतात. तरीही प्राण्यांना आपल्यासारखा सर्वच रंगांचा अनुभव येत नाही. कारण त्यांच्या डोळ्याच्या पडद्याची रचना आपल्या डोळ्यांच्या पडद्यापेक्षा वेगळी असते. आपल्या डोळ्याच्या पडद्यामध्ये शंकूपेशी आणि काष्ठपेशी अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. काष्ठपेशींपाशी रंगांची संवेदना नसते. त्या पेशी फक्त वस्तूच्या निरनिराळ्या भागांवरून परावर्तित होणार्‍या प्रकाशाची तीव्रता मोजतात. प्रकाश गडद आहे की फिका आहे याची दखल त्या पेशी घेतात. ढगाळ आकाश असलं की जमिनीवर प्रकाशाचे पट्टे पडलेले दिसतात. काही ठिकाणी ढगांची गर्दी कमी असते. तिथून जास्ती प्रकाश येतो. तो जिथं पडतो तो भाग उजळ दिसतो. जिथं ढगांची दाटीवाटी झालेली असते तिथं प्रकाश कमजोर झालेला असतो. तो भाग थोडासा काळवंडल्यासारखा दिसतो. काष्ठपेशी हेच हेरतात.

शंकूपेशींकडे रंगसंवेदना असते. त्यांच्यामुळंच आपल्याला रंग दिसतात. त्यांची संख्या मात्र मर्यादितच असते. बारा कोटी काष्ठपेशींच्या तुलनेत शंकूपेशींची संख्या केवळ सहा-सात लाख इतकीच असते. या शंकूपेशी तीन प्रकारच्या असतात. चौसष्ट टक्के शंकूपेशींना केवळ लाल रंग ओळखता येतो. ३२टक्के हिरव्या रंगाला दाद देतात. उरलेल्या दोन टक्के शंकूपेशी निळ्या रंगाशी हितगूज करतात. या पेशींनी शोषलेल्या प्रकाशांची सरमिसळ होत आपल्याला कोणत्याही वस्तूच्या खर्‍या रंगछटेची ओळख होते. रंगीत टीव्हीच्या पडद्याची रचनाही आपल्या डोळ्यातल्या पडद्याच्या रचनेसारखी केलेली असते. तो पडदा उजळवणार्‍या अतिशय छोट्या छोट्या दिव्यांमध्येही तांबडा, हिरवा आणि निळा या तीन रंगांचे दिवे असतात. त्यांची तीव्रता पडद्यामागील सूत्रधाराप्रमाणे वागणारे इलेक्ट्रॉनिक नियंत्रक ठरवतात. त्यांनी बाहेर टाकलेल्या त्या प्रकाशांची गोळाबेरीज होत आपल्याला पडद्यावरचं डोळ्यांना सुखावणारं रंगीत चित्र दिसतं. या दिव्यांची संख्या आणि संवेदनशीलता जितकी जास्त, तितकं ते चित्र मूळाबरहुकुम रंग दाखवते.

प्राण्यांच्या डोळ्याच्या पडद्यामध्ये अशा तीन प्रकारच्या शंकू पेशी नसतात. काहींच्या अंगी दोनच रंगांच्या तर काहींच्या अंगी एकाच रंगाच्या शंकू पेशी असतात. आपण जर डोळ्यांवर लाल रंगाचा चष्मा चढवला तर आपल्याला जशा सगळ्याचं वस्तू त्या एकाच रंगाच्या निरनिराळ्या छटांमध्ये दिसतात तशीच या प्राण्यांची अवस्था असते. बैल लाल रंग पाहिला की चिडतो असा जो समज स्पेनमधल्या बुलफायटिंगच्या खेळामुळं पसरलेला आहे, तो चुकीचा असल्याचं शास्त्रज्ञांनी प्रयोग करून सिद्ध केलं आहे. त्यांनी निळा, पांढरा किंवा लाल रंगाचं फडकं त्यांच्या समोर धरलं तेव्हा त्या बैलाकडून कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. पण जेव्हा तेच फडकं स्थिर न ठेवता फडकावलं तेव्हा मात्र रागानं फुसांतड तो धावून आला. म्हणजे त्याचा संताप रंगापायी उसळला नव्हता तर त्या हालचालीपायी आलेला होता.

तुम्ही वाचत असलेला हा लेखही रंगीत छपाईनं नटलेला आहे. ती छपाईही अशाच प्रकारे झाली आहे. कोणत्याही रंगीत चित्राची प्रथम निरनिराळ्या चाळणींमधून मॅजेन्टा म्हणजे लाल, यलो म्हणजे पिवळा आणि सायान म्हणजे निळा अशा तीन आणि त्या प्रकाशाची तीव्रता मोजणारा काळा अशा चार रंगांमध्ये फोड केली जाते. त्यानुसार तयार केलेल्या चार निरनिराळ्या प्लेट छपाई यंत्रावर चढवल्या जातात. त्या प्लेटमधून त्या त्या रंगांची शाई पसरत जाते. ती कागदावर आपला ठसा उमटवते. एकावर एक असे चार ठसे उमटले की त्यातून ते रंगीत चित्र कागदावर अवतरतं. ते करताना हे चार ठसे बरोबर एकावर एक असेच उमटतील याची काळजी घ्यावी लागते. ती घेतली नाही तर मग ते रंग पसरल्यासारखे होतात. रंगीच चित्राचा विचका उडतो. अर्थात वयमची छपाई करताना चांगलीच काळजी घेतली जात असल्यामुळं तुमच्या डोळ्यांना त्रास देणारी रंगीत चित्रं तुम्हाला दिसणार नाहीत. ठसठशीत आणि उठावदार रंगांमुळं तुमचे डोळे सुखावतील आणि रंगाची तुमची आवड चांगलीच वाढेल.

-डॉ. बाळ फोंडके
balphondke@gmail.com


मार्च २०१५ ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...