Menu

रंगांची बेरीज-वजाबाकी

image By Wayam Magazine 11 November 2022

By Ujjwala Dalvi,  On 10th March 2020, Children Magazine

सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख -


 “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.”

“असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

आई आपला मोबाईल घेऊन मजेत त्या दोघांच्या मध्ये बसली. “ह्या तानापिहि भिंगरीतला तांबडा भाग तांबडा का दिसतो? त्याच्यावर प्रकाश पडला की तो सूर्यप्रकाशातला फक्त तांबडाच प्रकाश परत फेकतो आणि बाकीचे सगळे रंग शोषून घेतो. नारिंगी, पिवळा, हिरवा, सगळे भाग आपापल्या रंगाचा प्रकाश तेवढा परत पाठवतात. तुम्ही भिंगरी फिरवली की त्या साती भागांकडून येणारे प्रकाशकिरण एकत्र होतात आणि सात रंगांची बेरीज होऊन तुम्हांला पांढरा रंग दिसतो.

आपल्या भोवती अनेक रंग असतात. पण निळा, हिरवा आणि लाल हे तीन प्राथमिक रंग. इतर सगळे रंग निळा-हिरवा-लाल या तीन प्राथमिक रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणातल्या बेरजेने बनलेले असतात.

बशीतल्या मिश्रणाची गोष्ट वेगळी. तिथल्या तांबड्या ठिपक्याकडूनही तांबडाच रंग परत येतो आणि बाकीचे शोषले जातात. पण त्याच्यात निळा ठिपका मिसळला की तांबडा ठिपका निळा रंग शोषतो आणि निळा ठिपका तांबडा रंग शोषतो. परतणाऱ्या प्रकाशात रंगांची वजाबाकी होते. ते सगळे ठिपके मिसळले की सगळेच एकमेकांचे रंग वजा करतात. बाकी उरतो शून्य रंग म्हणजेच काळा!

बेरजेसाठी निळा, हिरवा, लाल हे तीन प्राथमिक रंग आणि वजाबाकीसाठी निळा, पिवळा आणि लाल. तशा बेरजा-वजाबाक्यांनी दिसणारे रंग ठरवणारी गणितं असतात आणि त्यांच्यावरून तक्तेही बनवतात.”
आईने मोबाईलमध्ये वर्तुळाकार तक्ता दाखवला.

“त्या तक्त्यांतले समोरासमोरचे रंग चित्रात शेजारीशेजारी भरले तर चित्र उठावदार दिसतं,” असं म्हणत आईने हिरव्या पानाला बिलगलेल्या लाल फुलाचं चित्र दाखवलं.

“काकू, हे दोन्ही रंग सारखेच तर दिसतात! पण मला रंग समजत नाहीत. माझ्या मामालाही नाही समजत!” अर्णव हिरमुसला झाला. “माझ्या बाबांनाही कळत नाहीत. त्यांनी जांभळी म्हणून आणलेली साडी लाल होती!”

“ते वेगळं, नील! आपल्याला वस्तूंचे जे रंग दिसतात ते भोवतालच्या प्रकाशावरही अवलंबून असतात. बाबांनी साडी रात्री खरेदी केली. ट्यूबलाईटच्या निळसर प्रकाशात लाल साडी त्यांना जांभळी दिसली. पिवळ्या प्रकाशात ती शेंदरी वाटली असती. म्हणून कपड्यांचे रंग दिवसाच्या प्रकाशात निवडायचे असतात.”
बोलताबोलता तिने मोबाईलवर एक चित्र शोधलं.

“हा इशिहारा चार्ट आहे. अर्णव, ही संख्या कोणती?”

“एकवीस.”

“नील, तू सांग.”

“चौऱ्याहत्तर! मग अर्णवने...”

“सगळं समजावून सांगते.

रंगांच्या बेरजा-वजाबाक्यांनी असंख्य छटा बनतात. संथ तलावात खडा टाकला की जशा लहरी दिसतात तशाच प्रकाशाच्याही लहरी असतात. कुठल्याही प्रकाशाचा रंग त्याच्या लहरींच्या लांबीनुसार ठरतो. तांबड्या रंगाची लहर-लांबी सर्वात अधिक असते तर जांभळ्याची सर्वात कमी. ती लहर-लांबी मोजता येते. अशा मोजमापांमुळे कुठल्याही ‘लहरी’ मिश्रणातून नेमकी कोणती छटा तयार होईल ते ठरवायला सूत्रं आणि गणितं देखील असतात. आताच्या नव्या संगणकांवर दीड कोटीहून अधिक रंगछटा दिसतात आणि निसर्गात तर अक्षरशः अनंत रंग असतात! निसर्गातल्या रंगांच्या प्रत्येक छटेला एक नंबर देता येतो, तिला गणितात बसवता येतं.

पण प्रत्येक माणसाला ती नेहमी, हुबेहूब तश्शीच दिसते का? मुळीच नाही.

आपल्याला रंग कसे दिसतात?
आपल्या डोळ्याच्या पाठीमागे सिनेमाच्या पडद्यासारखा, नेत्रपटल नावाचा एक पडदा असतो. एखाद्या वस्तूकडून निघून डोळ्यात शिरणारा सगळा प्रकाश नेत्रपटलावर प्रोजेक्ट होतो. तिथे शंकूच्या आकाराच्या अनेक मज्जापेशी असतात. त्यांच्यातल्या काही फक्त निळा रंग ओळखतात, काही हिरवा जाणतात तर काही लाल. ते हिरवे-निळे-लाल संदेश मज्जातंतूंमार्फत मेंदूला पोचतात. मेंदूला कळणारा रंग त्या संदेशांतल्या प्राथमिक रंगांच्या बेरजेवरून ठरतो. पण सगळ्या माणसांत त्या निळा, हिरवा किंवा लाल रंग ओळखणाऱ्या शंकूंचं प्रमाण एकसारखं नसतं. ते प्रत्येकाच्या जेनेटिक्सप्रमाणे बदलतं आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळं असतं. त्यामुळे एखादी रंगीत वस्तू प्रत्येकाला त्याच रंगाची दिसत नाही. नीलला दिसणारा लाल रंग अर्णवला दिसणाऱ्या लाल रंगाहून वेगळा असू शकतो. पण गुलाबाचा जो काही रंग दिसतो त्याला लाल म्हणायचं आणि पानांच्या रंगाला हिरवा म्हणायचं असं तुम्हांला लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यामुळे दोन माणसांच्या नजरेतला वेगळेपणा उघडपणे जाणवत नाही. जगातल्या सुमारे आठ ते दहा टक्के पुरुषांमध्ये लाल किंवा हिरवा रंग ओळखणारे शंकू कमी काम करतात. त्यामुळे लाल आणि हिरव्या रंगांमधला फरक त्यांना समजत नाही. म्हणूनच हिरव्या पानांमधला लाल गुलाब त्यांच्या नजरेला उठावदार दिसत नाही. इशिहारा चार्टमधल्या रंगीबेरंगी ठिपक्यांत लिहिलेल्या संख्या लाल-हिरवा रंग बघू शकणाऱ्यांना आणि बघू न शकणाऱ्यांना वेगवेगळ्या दिसतात. अर्णवला आणि त्याच्या मामाला तसं दिसत असावं. त्याच्या आईला सगळे रंग दिसत असले तरी तिच्याकडूनच अर्णवला त्याची खास नजर मिळाली आहे. त्या नजरेमुळे एरवी फारसं अडत नाही. पण मोटार चालवताना सिग्नलच्या लाल-हिरव्या दिव्यांतला फरक न कळणं हे मात्र धोक्याचं आहे. आता शास्त्रज्ञ त्याच्यासाठी वेगळे गॉगल्स शोधताहेत. तसा गॉगल लावून अर्णवला नीलच्या रंगदृष्टीतून जग कसं दिसतं ते कळेल आणि दोन्ही दृष्टिकोनांचा वेगवेगळा फायदाही शोधता येईल.

फारच क्वचित काही लोकांच्या नेत्रपटलात निळ्या दृष्टीचे शंकू नसल्यामुळे त्यांना निळ्या-पिवळ्यात काहीच वेगळेपणा जाणवत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे भाषांत इंद्रधनुष्याच्या सातही रंगांना वेगवेगळे शब्द आहेत. पण अतिपूर्वेच्या काही भाषांत निळा आणि हिरवा दोन्ही रंगांना एकच शब्द वापरतात. त्या शब्दाचं इंग्रजी भाषांतर green or blue= grue असं होतं. मराठीत त्याला निरवा (=निळा किंवा हिरवा) म्हणता येईल. आफ्रिकेतल्या बांटू लोकांच्या भाषेतही ‘निरवा’च रंग आहे. नामिबियाजवळच्या हिम्बा जमातीच्या भाषेत तर पांढरट, मातकट, निरवा आणि गडद असे चारच रंगशब्द आहेत. त्यांच्यातही निळ्या दृष्टीचे शंकू नसावे, अशी शास्त्रज्ञांची अटकळ आहे.

लिओनार्डो-डा-विन्चीसारख्या मोठ्या चित्रकारांना निसर्गातले अगणित रंग कदाचित सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असावेत. चित्रं काढताना ते तशा विविध छटांचा वापरही करत असतील. म्हणूनच, बघणाऱ्यांना त्यांच्याइतके रंग समजले नाहीत तरीही त्यांनी रंगवलेली चित्रं अधिक भावतात.

रंगांचा माणसांच्या भावनांशीही संबंध असतो. माणसाच्या मनात उबदार शेकोटीच्या शेंदरी-पिवळ्या रंगछटा घरकुलाच्या निवाऱ्याशी नातं सांगतात, त्याला सुरक्षित वाटतं. एकाकी रात्रीच्या निळ्या-जांभळ्या रंगांची उधळण त्याला उदास करते. नेपथ्यकार त्याचा वापर चतुराईने करतात. आनंदी नाटकासाठी नेपथ्यात उबदार रंगांचा वापर होतो, तर शोकांतिकेच्या पार्श्वभूमीत निळाईवर भर असतो. हळद-तिखट, आंबा, केशर यांचे रंग भूक वाढवतात आणि निळ्या-करड्या रंगाचं असलं तर ताजं, रुचकर अन्नदेखील खावंसं वाटत नाही.

ते सगळे प्रयोग आजवर सर्वसामान्य नजरेच्या माणसांवर केले गेले आहेत, अर्णवच्या दृष्टीतून नाही. तसं संशोधन झालं तर त्या द्वैचित्रातून नवीच क्षितिजं खुली होतील. अर्णवबाबू, ते चॅलेंज तुमच्यासाठी बरं!”

-डॉ. उज्ज्वला दळवी
ujjwalahd9@gmail.com


मार्च २०१५ ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...