Menu

चैतन्यसखा श्रावण

image By Wayam Magazine 29 August 2023

      ज्येष्ठातली उन्हाची काहिली आणि आषाढातली पावसाची अखंड झड ओसरल्यानंतर श्रावण येतो. श्रावण हे फक्त बारा महिन्यांपैकी एका महिन्याचं नाव नाही. ते सृष्टीचं अतिशय लोभसवाणं रूप आहे. नवनिर्मितीची प्रसन्नता अनुभवायला लावणारा हा महिना आहे. तो दरवर्षी येतो पण तरीही प्रत्येक वेळी आपल्यासाठी तो अगदी नवा असतो. सहा ऋतूंची आवर्तनं सातत्यानं अनुभवताना आपण मुळीच कंटाळत नाही. ऋतुचक्रातला प्रत्येक बदल आपल्याला हवाहवासा वाटतो. कारण सृष्टीच्या सगळ्या विभ्रमांशी अनुकूल होऊन जगण्याची कला माणसाच्या रक्तातच भिनली आहे. म्हणून तर आपले सगळे सण-उत्सव ऋतुचक्राशी बांधलेले आहेत. भारतातला कुठलाही सण असो, एखादं लहानसं व्रत असो किंवा निरनिराळे कुळाचार असोत, या प्रत्येकात भोवतीच्या निसर्गाचं लख्ख प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

श्रावण तर निसर्गातली नवनिर्मिती मनसोक्त अनुभवण्याचा महिना. नजर फिरेल तिकडे हिरव्याच्या असंख्य छटांची बहार डोळ्यांना सुखावत रहाते. काळ्याभोर जमिनीवरही दाट, हिरवी मखमल पसरते. डोंगराच्या भरल्या कुशीतून शुभ्र पांढरे, फेसाळ झरे झुळझुळत राहतात. ऊन-पावसाचा खेळ सुरु होतो. आकाशात अधून मधून इंद्रधनुष्याची कमान झळकताना दिसते. गवताच्या पात्यांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमचमत राहतात. जाई-जुई, प्राजक्ताची रांगोळी हिरव्या रंगावर अलगद रेखाटली जाते आणि एक तृप्त ओलं समाधान सगळ्या आसमंतात भरून राहतं.

मनाचं कोवळेपण शिल्लक असेल तर अगदी शहरी वातावरणात सुद्धा ऋतूंचा स्पर्श झालेला समजतोच  आपल्याला. त्यांचे रंग-गंध आपल्या मनावरही पसरून राहतात. आणि श्रावण म्हणजे तर रंग-गंधांचा उत्सवच! तो पहाताना आठवतं आपलं निरभ्र बालपण. ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्याखेळात त्यावेळी आपणही किती मनापासून सामील झालेलो असतो! पावसाच्या हलक्या सरी झेलत मृगाचे लाल मखमली किडे पहाताना आणि ओळखी-अनोळखी फुलांचे रंग-गंध टिपताना आपणही श्रावणच होऊन गेलेलो असतो! लहानपणीचं हे मैत्र या दिवसांत पुन्हा जागं होतं. भवतालाशी स्वतःला जोडून घेण्याची उर्मी अनावर होते.

श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात वर्षानुवर्षं चालू आहे. खरं तर ही निर्मितीचीच पूजा आहे. पृथ्वीनं दिलेल्या समृद्धीच्या दानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक निमित्त आहे. सकाळी लवकर उठून रानावनात जायचं आणि पत्री गोळा करून आणायची. पत्री म्हणजे पानं. तऱ्हेतऱ्हेच्या सोळा झाडाझुडपांची पानं गोळा करायची. प्रत्येक पानाचा आकार वेगळा, रंग वेगळा. कुणाचं रूप बघावं तर कुणाचा औषधी गुण ओळखावा. भरभरून फुललेल्या निसर्गात मनसोक्त हिंडता यावं, त्याच्याशी आणखी घट्ट मैत्री व्हावी आणि मैत्रिणींच्या सोबतीनं आनंदाचे घट काठोकाठ भरून घेता यावेत,असा विचार असेल का यामागे? असेलही कदाचित.मंगळागौरीचं हे व्रत तरी श्रावणातच का करायचं? श्रावण हा सृष्टीला समृद्धीचा वर देणारा महिना आहे. पावसामुळे रुजलेल्या बीजातून तोच अंकुर फुलवितो. पंचेंद्रियांना तोच सुखावतो आणि लौकिक आनंदाची पायाभरणीही तोच करतो. मग त्याच्याकडे सौभाग्याचं दान नाही मागायचं तर आणखी कुणाकडे?

नागपंचमी हाही निसर्गपूजेचाच भाग. घर बांधून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची कला माणसाला अवगत होण्यापूर्वीच्या दिवसांची जरा कल्पना करून बघा. पावसामुळे बिळात पाणी शिरल्यानंतर वळवळत बाहेर येणारे सर्प पाहून केवढे शहारले असतील ते आदिम समूह! या सरपटणाऱ्या प्राण्याच्या दंशामुळे येणारा मृत्यू पाहून त्यांना त्याच्यापुढे नतमस्तक व्हावंसं वाटलं असेलतर त्यात नवल नाही. सर्पपूजेमागे आणखीही एक कारण आहे. विज्ञानाचा मानवी आयुष्याला स्पर्शही झालेला नसण्याचा तो काळ होता. त्यामुळे जमिनीच्या पोटात राहणारा नाग या प्राचीन परंपरेनं आदिपुरुष मानला. भूमीशी होणाऱ्या त्याच्या संयोगामुळे भूमी फळते, असा विश्वास तिनं बाळगला आणि अन्नदात्या भूमीला या आदिपुरुषानं अखंड फुलवत रहावं म्हणून त्याची पूजा सुरु केली.

आजच्या संदर्भात विचार केला तरी परंपरेचा हा विश्वास अगदीच खोटा नाही. कारण भूगर्भातल्या नागाच्या चलनवलनामुळे मातीत नांगरटीसारखी प्रक्रिया घडते आणि आपसूकच पीक चांगलं यायला मदत होते. शिवाय पिकांचं नुकसान करणाऱ्या उंदरांना साप खाऊन टाकतात. शेतीचं रक्षण करतात. भूमीचा रक्षणकर्ता आणि पालनकर्ता असल्यामुळेच नागाला ‘क्षेत्रपाल’ म्हटलं जातं. सजीवांचं सृष्टीचक्रातलं स्थान ओळखून त्यांचा आदर करण्याची भारतीय परंपरेची सहिष्णू वृत्तीही नागपंचमीच्या सणानं अधोरेखित केली आहे.

नारळीपौर्णिमा हाही असाच समुद्राला हाक देणारा उत्सव. श्रावणात पावसाचा भर तसा संपलेला असतो. वादळं शमलेली असतात. अशा वेळी सफरींसाठी समुद्र मोकळा होतो. म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करायचा आणि मासेमारीला आणि व्यापाराला पुन्हा सुरुवात करायची.ज्या समुद्राच्या जिवावर हा व्यापार चालतो, त्यानं प्रवास सुखरूप पार पाडावा म्हणून नारळी पौर्णिमेचा उत्सव सुरु झाला.

श्रावणी अमावास्येला बैलपोळा येतो. हा सण शेतकऱ्यांचा, बैलांची पूजा करण्याचा. वर्षभर बैल शेत नांगरतात. आपल्याला पोटभर अन्न मिळावं म्हणून शेतात राबतात. त्यांचे उपकार फेडायचे कसे? मग या दिवशी त्यांना विश्रांती द्यायची, सजवायचं, त्यांची मिरवणूक काढायची, पुरणपोळी खाऊ घालायची. त्यांना ओवाळायचं. आपल्यासाठी जमिनीत अखंड राबणाऱ्या या प्राण्याविषयीचं प्रेम व्यक्त करणारा हा सण. पेरणीची कामं झाल्यावर या मुक्या प्राण्याविषयीचं ऋण शेतकरी न चुकता प्रकट करतात.

श्रावण हा निसर्गाच्या नवनिर्मितीची, त्याच्या सळसळत्या जिवंतपणाची खूण पटविणारा महिना आहे. ऋतूचक्राच्या झुल्यावर बसून आनंदाचं गाणं गाणारा हा महिना आहे. आणि निसर्गानं भरभरून दिलेल्या समृद्धीच्या दानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणाराही हाच महिना आहे.

आज आपण श्रावणातले सण साजरे करतो खरे. पण त्यांचं भवतालाशी असलेलं नातं आपण विसरलो आहोत. हे सण हा माणसाला सृष्टीशी जोडणारा दुवा आहे. सृष्टीतल्या बदलांचं प्रतिबिंब सण-उत्सवांमध्ये उमटत असतं. फक्त ते पाहण्यासाठी आतले डोळे उघडून भवतालाकडे पाहायला हवं. तरच आपली ओंजळ कायम निखळ आनंदानं भरलेली राहील.

-वर्षा गजेंद्रगडकर  

                                                                     ***

My Cart
Empty Cart

Loading...