Menu

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

image By Wayam Magazine 15 November 2022

By Narendra Lanjewaar,  On 15th August 2020, Children Magazine

१५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, वयम् मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा!

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीलाच ''''प्रतिज्ञा’ असते. आपण रोज ती म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? या लेखकाने संशोधन करून ही माहिती मिळवली. वाचा तर, कोण आहेत आपल्या प्रतिज्ञेचे जनक!

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत आलो आहोत. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? याची माहिती जवळपास कुणालाच दिसत नाही. मी पण ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो आहे. बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ किंवा कविता वाचली किंवा त्या कवितेखाली त्या त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. मला बालपणापासून हा प्रश्न पडला होता की, आमची ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल? कारण या प्रतिज्ञेच्या खाली कोणाचेच नाव नव्हते. मला शिकवणाऱ्या बऱ्या च शिक्षकांना मी हा प्रश्न विचारला, परंतु मला उत्तर मिळाले नाही. पुढे मी बऱ्याच विद्वान व्यक्तींशी याबाबत चर्चा केली, पण त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींनी साने गुरुजींचे नाव सांगितले, तर काहींनी यदुनाथ थत्ते यांचे नाव सांगितले. काहींना वाटले, ही प्रतिज्ञा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली असावी. परंतु आपल्या पाठ्यपुस्तकात ही प्रतिज्ञा कशी आली? केव्हापासून आली? याबाबत काही संदर्भ अधिकृतरित्या मिळत नव्हते.

आपल्या देशाला जसे राष्ट्रगीत आहे, जसा अधिकृत ध्वज आहे, घोषवाक्य आहे, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, झाड, फूल, फळ, खेळ आहे तशीच राष्ट्रीय प्रतिज्ञाही आहे. या प्रतिज्ञेला राष्ट्रीय मानाचे वलय आहे. राष्ट्रगीताला जो मान आहे

तोच सन्मान या प्रतिज्ञेला देण्यात आलेला आहे. आपण रोजच ती म्हणतो, म्हणून कदाचित तिच्याबाबत आपल्या मनात विशेष कुतूहल नसावे असे मला वाटते.

आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी मुळात १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा लिहिली होती, परंतु त्यांचा नामोल्लेखही कुठे प्रतिज्ञेच्याबाबत पाठ्यपुस्तकात आढळत नाही, याची मला नेहमी खंत वाटते. ते आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपथीं गावचे राहणारे होते. संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले होते. ते विशाखापट्टणम् या जिल्ह्याचे अनेक वर्षं ''''जिल्हा कोषागार अधिकारी’ म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांच्या काही कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासुद्धा गाजले होते. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी.व्ही.जी. राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा पाठवली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

केंद्र सरकारच्या नेतृत्वात मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते काम करत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ''''डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया’ या समितीची स्थापना केलेली असते. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या ''''डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इंडिया’ची एकतिसावी मिटिंग तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री एम.सी.छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११ आणि १२ ऑक्टोबर१९६४ मध्ये बंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तान्तामध्ये- Development of Education in India: A Historical Survey of Educational Documents before and after Independence या पुस्तकाच्या पान १४० वर मुद्दा क्रमांक १८ मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्याथ्र्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याकरिता पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेल्या India is my country , All Indians are my brothers and sisters…


...ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून सर्वत्र लागू करावी. या प्रतिज्ञेचे देशपातळीवर विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती. २६ जानेवारी २०१२ ला या प्रतिज्ञेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुब्बारावांच्या मित्रपरिवाराने साजरे केले. तेव्हा ''''टाइम्स ऑफ इंडिया’ आणि दैनिक ''''हिंदू’ या राष्ट्रीय वृत्तपत्रात छोटीशी बातमी प्रकाशित झाली.

आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते, तसेच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जावी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जावे, कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे, जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणारच आहोत, यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सन्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे आहे. म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण? हा प्रश्न इतरांना पडणार नाही... याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल...

-नरेंद्र लांजेवार
l_narendra2001@yahoo.com


ऑगस्ट २०२० ‘वयम्’
(ग्रंथपाल, भारत विद्यालय-बुलडाणा)

My Cart
Empty Cart

Loading...