‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'
यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. ती वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'
“स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’
“स्वप्निल, अरे कोणतं जुनं पुस्तक वाचतोयस; पदार्थाच्या अवस्था तीन?”
“हो ताई, आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असच दिलंय.”
“आमच्यातर विज्ञानाच्या पुस्तकात पाच अवस्था दिल्यात. म्हणजे तुमच्या पुस्तकात चुकीची माहिती आहे.”
“अगं, नाही आम्हाला शाळेतही असंच सांगितलंय”
“पण तू लक्षात ठेव, पदार्थाच्या अवस्था पाच!”
“नाही, तीन!”
“पाच!”
वाद वाढायला लागला तसं आईला लक्ष घालावच लागलं. नेहा आणि स्वप्निल आपापल्या मुद्यावर ठाम होते. स्वप्निल सातवीच विज्ञानाचं पुस्तक वाचत होता आणि नेहा त्याच्याशी तिच्या ९ वीच्या पुस्तकात वाचून वाद घालत होती. आईच्या सर्व प्रकार लक्षात आला. ती त्यांना म्हणाली, “तुम्ही शेजारच्या शोभाताईंकडे का नाही जात, त्या शाळेत विज्ञानच तर शिकवतात.” दोघानांही ते पटलं. दोघेही शोभाताईंकडे गेले.
स्वप्निल म्हणाला, “मावशी तूच सांग, पदार्थाच्या अवस्था तीन की पाच? माझ्या पुस्तकात दिलंय तीन! ताई म्हणते पाच!” “माझ्या पुस्तकात दिलंय तसं. प्लाझ्मा आणि बोस... आईनस्टाईन कंडेनसेट.” “तुमचं दोघांचही बरोबर आहे,” शोभाताई म्हणाल्या.
मग शोभाताईंनी त्यांना पाठयपुस्तक कशी तयार होतात, त्यातील धडे कसे लिहिले जातात, ते लिहिताना कोणकोणता विचार करायला लागतो असं सर्व छान समजावून सांगितलं. शोभाताई म्हणाल्या, “स्वप्निल, तू आणि ताई यांच्या वयात अंतर आहे ना? ताईची अभ्यासाची पुस्तक तू कधीतरी चाळली असशील. कळत का तुला त्यातलं सर्व काही?”
“अगदी थोडं! विज्ञानातलं तर खूप सारं डोक्यावरूनच जात. ताईने ज्या दोन नवीन अवस्था सांगितल्या त्यांचीही नावं किती भारी आहेत.” स्वप्निल म्हणाला. त्याला आठवलं, 'ताईच्या पुस्तकात लिहील होतं की अवस्थांतरामुळे पदार्थाची घनता, दाब व इतर भौतिक गुणधर्मामध्ये बदल होतो परंतु मूळ रासायनिक रचना आणि गुणधर्म बदलत नाहीत... एकेक शब्द म्हणजे फुल बाउन्सर!
“स्वप्निल! म्हणूनच तुझ्या विज्ञानाच्या पुस्तकातील माहिती आणि तिच्या पुस्तकातील माहिती यात विस्ताराचा फरक असतो. म्हणजे एखादया विषयाची सर्वच्या सर्व माहिती एकदम दिली जात नाही तर त्याचे छोटे टप्पे करून, योग्य वयाला योग्य तेवढीच माहिती दिली जाते. आता हेच बघ ना! तुझ्या पुस्तकात जेमतेम १८ ते २० मूलद्रव्यांची छोटी नावे (सज्ञा) दिली आहेत, परंतू १०वी च्या पुस्तकात आजपर्यंत शोध लागलेल्या सर्वच मूलद्रव्यांच्या नावांचा संपूर्ण तक्ताच आहे. मूलद्रव्यांचा बायोडेटाच आहे म्हण न! अशा रीतीने एकाच विषयावरचा धडा वेगवेगळ्या इयत्तेत पुन्हा पुन्हा येतो. प्रत्येक पुढच्या इयत्तेत आधी ही मुले काय शिकली आहेत, ते लक्षात घेऊन थोडी भर घातली जाते. म्हणूनच ध्वनी या विषयावरचा धडा सातवीत आहे, तसा नववीतही आहे पण दोन्ही धड्यांच्या लांबी, रुंदी व खोलीमध्ये फरक आहे बर का!”
“पण मावशी, आम्हाला कोणत्या वयात काय कळेल हे कोण ठरवतं?” “अरे मानसशास्त्र म्हणजे psychology या विषयाची एक शाखा आहे, जी शिक्षण कसं घडतं याचा अभ्यास करते. तिला म्हणतात शैक्षणिक मानसशास्त्र “Educational Psychology”. तुम्हाला एखादा भाग कसा शिकवला तर तुमच्या लक्षात राहील, तुम्ही वर्गात एखाद्या विषयावर किती काळ मन एकाग्र करू शकता? पुस्तकात माहिती देताना चित्रांचा उपयोग केल्यास समजणं सोप होईल का? अशा अनेक मुद्यांचा विचार या शाखेत केला जातो. पुस्तक बनवताना याचा खूप उपयोग होतो. एवढंच नाही तर पुस्तकाचा आकार, त्यातील अक्षरांचा आकार (font) याचाही विचार केला जातो.”
नेहा म्हणाली, “मावशी आता म्हणूनच का गं आता आमच्या पुस्तकांचा आकार बदललाय आणि ती रंगीत झाल्येत?”
मावशीच्या स्पष्टीकरणामुळे आता त्याच्या डोक्यात नवनवीन प्रश्नांनी गर्दी केली. “मावशी, आमच्या पुस्तकात प्रत्येक धड्यात हे करून पहा, ते करून पहा अशा अनेक कृती दिल्या आहेत. त्या कशासाठी?”
“अरे स्वप्निल! आपण जे पहातो किंवा ऐकतो त्यापेक्षा जे प्रत्यक्ष हाताने करून पहातो ते आपल्या दीर्घकाळ लक्षात रहात. आता हेच बघ ना, परवा तू बनवलेली LED टॉर्च मला दाखवायला आणली होतीस. त्यासाठी तू जी बॅटरी वापरली होतीस ती किती क्षमतेची होती सांगता येईल तुला?’’
“हो, नऊ व्होल्टस”
“हे तू कोठे वाचलस?”
“बॅटरीवर लिहिलेलं असतं ना!”
“म्हणजे कोणत्या पुस्तकात नाही वाचलस. पण तुझ्या लक्षात राहील कारण ते तू स्वतः केलं होतंस.”
“मावशी ही पुस्तकं बनवत कोण?”
“अरे प्रत्येक राज्यात एक पाठ्यपुस्तक मंडळ व १०वी च्या परीक्षा घेणारं शिक्षणमंडळ असतं. त्यांच्याकडे प्रत्येक विषयाचा विचार करण्यासाठी तज्ञ शिक्षकांची एक विषय समिती असते. प्रत्येक इयत्ता, इयत्तेनुसार विषय, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाला योग्य अशी धड्यांची रचना, धड्यातील मजकुराला उपयोगी पडतील अशी चित्रे अशा सर्वांची जुळवणूक केली की मग पाठयपुस्तक बनतं.”
“मावशी, पुढच्या वर्षी काही पुस्तकं बदलणार असतील, तर त्याचं काम यावर्षी सुरू होईल ना!”
“स्वप्नील, अरे एवढा कमी वेळ नाही पुरत. अभ्यासक्रम बदलला की प्रथम तो किती धड्यांमध्ये विभागायचा ते ठरतं. धड्यांचा आशय ठरला की तज्ञ शिक्षकांकडून धडे लिहून घेतले जातात. विज्ञानाच्या पुस्तकात आकृत्या, भूगोलाच्या पुस्तकात नकाशे तर इतर विषयात मजकुराला साजेशी चित्र घातली जातात. या आकृत्या, नकाशे अतिशय अचूक, अधिकृत असावे लागतात. अर्थात ही सर्व खातरजमा विषयसमिती करते. पदार्थ तयार झाल्यावर आई तुम्हाला चव घेवून बघायला सांगते ना, तसंच पुस्तकांचही दर्जा परीक्षण करावं लागतं. यालाच quality review म्हणतात. यासाठी शाळा, महाविद्यालयातील त्या त्या विषयातील तज्ञ शिक्षक तसेच होमी भाभा विज्ञान केंद्रासारखा त्या त्या विषयात कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी बोलावले जातात. ते धड्याचा आशय, त्यातील भाषा, मुलांच्या वयानुसार व शिक्षणशास्त्रातील तत्वानुसार लिखाणाची योग्ययोग्यता अशा सर्वांचे काटेकोर परीक्षण करतात. त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल केले जातात. मजकूर व्याकरण दृष्ट्या योग्य असावा यासाठी ३-४ वेळातरी प्रुफ रिडिंग केलं जातं. ऱ्हस्व दीर्घ तपासलं जातं. म्हणजे बरं का मुलांनो, अभ्यासक्रम बदलायचा असं ठरल्यापासून पुस्तकं बाजारात यायला दीड ते दोन वर्ष जातात.” “पण काय ग मावशी, एकाच इयत्तेची वेगवेगळी पुस्तकं; विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी...पण प्रत्येकातील भाषा वेगळी असं कसं? वेगळी म्हणजे मराठीच, पण वेगळ मराठी.. म्हणजे मला सांगता नाही येत पण कळलं ना तुला मला काय म्हणायचं! आता हेच बघ ना! स्रोतापासून ध्वनीचे प्रसारण होते. हे वाक्य 'आवाज त्याच्या उगमापासून दूर दूर पसरतो’ असे सोप्या शब्दात नाही का लिहिता येणार? “नेहा तुझा मुद्दा बरोबर आहे, पण एक लक्षात घे की प्रत्येक विषयाला त्याची अशी एक भाषा असते, शब्दसंपत्ती असते. त्याला परिभाषा असे म्हणतात. या अर्थाने विज्ञानाची भाषा वेगळी, गणिताची वेगळी आणि इतिहासाचीही वेगळी. आता मराठीच्या पुस्तकातही वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या बोलीभाषेतील धडे स्वतःचा भाषेचा बाज घेऊन येतात. तो तो विषय शिकताना तुम्हीही ती भाषा आत्मसात करावी, अशी कल्पना असते.”
मावशीच्या बोलण्यातून नेहा व स्वनिलच्या डोक्यातील शंका हळूहळू फिरत होत्या. आपली पाठ्यपुस्तकं त्यांना थोडी जास्त ओळखीची वाटू लागली होती.
मुलांनो, पाठ्यपुस्तकांत काही वेळा खूप छान चित्रे असतात. आतापर्यंत काही नामवंत चित्रकारांनी पाठ्यपुस्तकांत चित्रे काढली आहेत. चित्रकार शि. द. फडणीस, गिरीश सहस्रबुद्धे, चारुहास पंडित, रेश्मा बर्वे, ऋतुजा घाटे अशा चित्रकारांची चित्रे पाठ्यपुस्तकाची शोभा वाढवतातच, शिवाय चांगली चित्रे सतत पाहिल्यामुळे आपल्याला चित्रांची गोडी लागते. आपल्या ‘वयम्’साठी सुंदर चित्रे काढणारा निलेश काका (निलेश जाधव) याची चित्रेही पाठ्यपुस्तकांत छापली गेली आहेत. इयत्ता तिसरीच्या ‘परिसर अभ्यास’चे निलेश काकाने साकारलेले मुखपृष्ठ पाहा. किती देखणे आहे ते! इतर पानांवरही त्यांची सुंदर चित्रे आहेत. यापूर्वीच्या पाठ्यपुस्तकांतही काही नामवंत चित्रकारांची चित्रे होती- दीनानाथ दलाल, मारिओ मिरांडा, सुभाष अवचट, पद्मा सहस्रबुद्धे, चंद्रमोहन कुलकर्णी.
जुलै २०२० ‘वयम्’