Menu

पुन्हा एकदा चंद्राकडे

image By Wayam Magazine 22 August 2023

२३ ऑगस्टला भारताचे ‘चांद्रयान-३’ चंद्रावर अलगद उतरेल. तोपर्यंत आपला अंक छपाईला गेलेला असेल. त्यामुळे ‘चांद्रयान-३’च्या करामतींबद्दल आपण पुढच्या अंकात जाणून घेऊया. ‘चांद्रयान-२’च्या  अपयशाने खचून न जाता, कोणत्या सुधारणा करत ही नवीन मोहीम आखली गेली, ते समजून घेऊया. 

 भारताचे ‘चांद्रयान-३’ चंद्रावर उतरून तिथे एक चांद्रदिवस काम करणार आहे. एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरचे १४ दिवस! त्यामुळे २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत त्याने नेमून दिलेलं काम करत राहणे अपेक्षित आहे. या चंद्राच्या वातावरणाबद्दल नव्याने कोणती माहिती मिळाली, चंद्राच्या जमिनीमध्ये कोणकोणती खनिजं आहेत, चंद्राच्या जमिनीच्या कवचाची रचना नेमकी कशी आहे, यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलेलं असल्याने तिथे असणाऱ्या पाण्याचं नेमकं स्वरूप काय आहे, अशा अनेक प्रकारच्या माहितीचा साठाच आपल्याला या मोहिमेमुळे मिळणार आहे. त्यातून आपल्याला चंद्राबद्दलची अनेक रहस्यं समजतीलच, शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दलची मिळणारी माहिती आपल्या सौरमालेच्या सुरुवातीच्या काळातील काही गुपितांचा छडा लावण्यसही मदत करेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

यापूर्वीची ‘चांद्रयान-२’ ही आपली मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नाही. त्या मोहिमेत आपण आपलं यान चंद्राच्या जमिनीवर अलगद उतरवू शकलो नाही. हळुवारपणे उतरण्याऐवजी ते यान चंद्राच्या जमिनीवर जोरात आपटलं; साहजिकच त्याच्याकडून हवी असणारी कामं झाली नाहीत. पण त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातले (इस्रो) संशोधक काही हिरमुसले नाहीत. नव्याने जोमात काम करण्याची त्यांची उमेदही कमी झाली नाही. उलट पुन्हा एकदा चंद्राकडे झेपावण्यासाठी,  
आली जरी कष्टदशा अपार।
 न सांडिती धैर्य कदापि थोर।
केला जरि पोत बळेचि खाले।
ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।’
या न्यायाने, आलेल्या अपयशाला न घाबरता त्यांनी उत्साहाने कामाला सुरुवात केली. ‘चांद्रयान-३’च्या मोहिमेमध्ये अपयश येऊ नये, यासाठी काय करायला हवं, त्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांनी या मोहिमेत सुधारणा केल्या.
म्हणजे असं की ‘चांद्रयान-२’ हे ५०० मीटर ५०० मीटर जागेमध्ये उतरेल, असं ठरवण्यात आलं होतं. तशा आज्ञाही त्या यानाला देऊन ठेवण्यात आल्या होत्या. पण इतक्या कमी जागेत उतरण्याचं ठरवणं चुकीचं होतं, हे सिद्ध झाल्यानंतर ‘चांद्रयान-३’ हे ४ २.४ किमी जागेत उतरेल, असं ठरविण्यात आलं. त्यामुळे उतरताना यानाला ऐनवेळी ठरल्या ठिकाणापेक्षा दूर जावं लागलं तरी कोणतीही अडचण येणार नाही. अर्थात यानाला असं दूर जायची वेळ आली, तर त्यासाठी यानात अधिक इंधनाचीही सोय हवी. तशी ती यावेळी करण्यात आली आहे. यानाची इंधनक्षमता वाढवण्यात आली आहे. चंद्राच्या जमिनीवर उतरणाऱ्या ‘विक्रम’चे पाय पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आले आहेत. यानावर असणाऱ्या सौरपट्ट्यांचा आकारही वाढवला आहे. यामुळे यानाला अधिक ऊर्जा मिळू शकणार आहे. पृथ्वीवर संपर्क साधण्यासाठी अँटेनाही ‘चांद्रयान-२’पेक्षा ‘चांद्रयान-३’वर जास्त आहेत. यानाच्या सॉफ्टवेअरमध्येही आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यानावरील स्वयंचलित यंत्रणा काम करायला लागल्या. त्यानुसार यान आपलं काम करू लागलं की,होऊ शकणाऱ्या संभाव्य चुका टाळता येतील, असा विश्वास संशोधकांना आणि तंत्रज्ञांना वाटतो आहे. ‘चांद्रयान-२’ने टिपलेली छायाचित्रे ‘चांद्रयान-३’च्या मेमरीमध्ये टाकण्यात आली आहेत. अर्थात ‘चांद्रयान-३’सुद्धा छायाचित्रं घेणार आहे. मेमरीतील छायाचित्रं आणि ताजी छायाचित्रं यांची सांगड घालून ‘चांद्रयान-३’ आपली उतरण्याची जागा नक्की करेल आणि तिथे उतरेल. आपल्याला नेमून दिलेलं काम करू लागेल.चांद्रयान-३’मुळे चंद्राबद्दल आपल्याला नव्याने नेमकं काय समजलं आहे, चंद्राची कोणती गुपितं आपल्यापुढे उघड झाली आहेत, चंद्राच्या वातावरणाबाबतची नवीन माहिती आपल्याला काय सांगते अशा अनेक गोष्टी आपल्याला समजतीलच. त्याबाबतची माहिती आपण आगामी दिवाळी अंकात घेऊ या.


-श्रीराम शिधये
***

My Cart
Empty Cart

Loading...