Menu

प्राण्या तुझा रंग कसा ?

image By Wayam Magazine 11 November 2022

By Nandini Deshmukh,  On 4th March 2020, Children Magazine

इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का? प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात. आपल्या त्वचेच्या खाली जसे मेलॅनिन हे रंगद्रव्य असते, तशीच निरनिराळी रंगद्रव्ये प्राण्यांच्या त्वचेत असतात. लाल-गुलाबी प्राणी, पक्षी, रंगीत मासे यांच्या त्वचेत कॅरेटिनॉईडस् ही रंगद्रव्ये असतात. ही कॅरेटिनॉईडस् त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत, तर ती खाण्यावाटे त्यांच्या शरीरात पोहोचतात. तांबड्या-गुलाबी पंखाचा रोहित पक्षी (फ्लेमिंगो) दिवसभर तांबड्या कोलंब्या खातो आणि तोच रंग त्याच्या पंखावर चढतो. म्हणून तर त्याला ‘अग्निपंख’ असेही नाव आहे.

कोलंब्या सागरी जालातले सूक्ष्म शेवाळे खातात म्हणून त्या लाल होतात. शेवाळांना मात्र स्वतःचा कॅरेटिनॉईडस् रंगद्रव्य निर्माण करता येतो. अन्नसाखळीच्या मार्गाने रंग एकाकडून दुसरीकडे जातो. आहे की नाही गंमत! मग तुम्ही म्हणाल, गाई आणि काळ्याकभिन्न म्हशी हिरवंगार गवत खातात तरी त्या हिरव्या का नाही होत ? तर त्याचे कारण असे आहे की, हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल हे पचनक्रियेत साफ बदलून जाते. काही प्राण्यांच्या शरीरात क्रोमॅटोफोर्स (रंगद्र्व्यांच्या पेशी) असतात. या पेशींचा आकार, त्यात असलेले रंगद्र्व्याचे प्रमाण इत्यादी बदलता येते. आणि हा बदल प्राणी स्वतःच्या इच्छेनुसार करतो. या रंगबदलू प्राण्यांच्या शरीरातील प्रक्रियेला

‘मेटॅक्रोसिस’ असे म्हणतात. कॅमेलियॉनसारखा (सरडा) सरीसृप प्राणी किंवा माकुलासारखा मृद्काय अपृष्ठवंशीय, सागरी प्राणी हे दोघेही अतिशय वेगाने आपला रंग बदलू शकतात. रंग बदलाचे मुख्य कारण छदमावरण- कॅमोफ्लेज- हे असते. सभोवतालच्या परिसरात बेमालूम लपून जाण्याची ही प्रक्रिया अनेक प्राणी व विशेषतः कीटक दाखवतात. नळ, माकूळ यांसारखे शीर्षपाद प्राणी फिकट रंगावर पोहोत आले की त्यांच्या शरीरातल्या कोमॅटोफोर्सचे प्रसारण होते आणि काळसर ठिपके आता मोठ्या डागात परावर्तीत होतात. सहाजिकच त्यांचा रंग गोऱ्यापासून काळ्यापर्यंत बदलत जातो.

बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांमध्ये तीन प्रकारचे चांदणीच्या आकाराचे क्रोमॅटोफोर्स असतात. हे त्वचेच्या निरनिराळ्या थरात असतात. सर्वांत वरच्या थरांत नारिंगी, लाल किंवा पिवळ्या रंगद्र्व्यानी भरलेली ‘झॅन्योफोर्स’ असतात. मधल्या थरांमध्ये असतात ‘इरिडीओफोर्स’. यात चंदेरी चकचकीत रंगद्रव्य असतात, तर सर्वात तळाच्या थरात मेलॅनोफोर्स हे मेलॅनिन रंगद्रव्ये असणारे पेशीसमूह दिसतात.

पक्ष्यांची पिसे आणि रंगीत कीटकांची कवचे यांचे रंगकाम वेगळेच असते. यात अत्यंत सूक्ष्म व तरल पृष्ठभाग असलेल्या भागांचा दृश्य प्रकाशाशी संयोग होतो. त्यात असणाऱ्या थोड्याफार रंगद्र्व्याचा परिणाम त्यामुळे निराळाच असतो. उदा. मोराची पिसे आपल्याला निळी-हिरवी-मोरपिशी दिसतात. खरे तर मोरपिसात तपकिरी (ब्राऊन) रंगाचे रंगद्रव्य असते, पण पिसाच्या खास रचनेमुळे हिरव्या, निळ्या, मोरपिशी रंगाची उधळण झाल्यासारखे दिसते. या पद्धतीने निर्माण होणारे रंग बहुतेक वेळा झळाळी मारतात.

काही प्राणी स्वयंप्रकाशित असतात. लुकलुकता काजवा जमिनीवर, तर अनेक सागरी जीव आणि मासे हा उजेडाचा खेळ करताना आढळतात. या सर्व प्राण्यांत ‘ल्युसिफेरीन’ नावाचे रंगद्रव्य असते. अगदी खोल खोल पाण्यात राहणाऱ्या अँगलर माशाच्या डोक्यावर शेंडी असते. या शेंडीवर प्रकाश निर्माण करणारे रंगद्रव्य असणारे जीवाणू कायम वास्तव्याला आलेले असतात, काळोखात भक्ष्य सापडणे तसे कठीण, पण या अँगलरला अशा उजेडाचा उपयोग होतो.

वनस्पतींमध्ये निरनिराळी रंगद्रव्ये असतात. गाजरात असणारे कॅरॅटिनॉईड; हिरवा रंग देणारे क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य; याशिवाय झँथोफिल आणि अँन्योसायनिन ही रंगद्रव्ये पानावर, फुला-फळांवर रंगांची निरनिराळी डिझाईन्स करतात.

-नंदिनी देशमुख
nanddesh@gmail.com


मार्च २०१५ ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...