Menu

मुलांसाठी गोष्ट - ‘पायरो’ मयूर

image By Wayam Magazine 07 October 2022

रोहितने दोनच दिवसांपूर्वी विकत घेतलेली नवी फूटपट्टी त्याच्या स्कूलबॅगमधून गायब झाली होती. प्लास्टिकच्या फूटपट्टीवरची अक्षरं काही दिवसांनी पुसट होतात म्हणून रोहितच्या दादानं त्याला स्टीलची महागडी फूटपट्टी विकत घेऊन दिली होती. फूटपट्टीवर नेहमीचे आकडे होतेच, शिवाय गणिताची काही सूत्रं आणि इतरही उपयोगी माहिती होती. तशी पट्टी रोहितने कोणाकडेही याआधी पाहिलेली नव्हती. इम्पोर्टेड वस्तूंच्या कुठल्यातरी दुकानात रोहितच्या दादाला ती मिळाली होती. त्या पट्टीबद्दलचं अप्रूप आणि कौतुक अजून संपलंही नव्हतं आणि पट्टी गायब झाली होती. रोहितचं सरांच्या शिकवण्याकडे लक्षच लागत नव्हतं. दादा रागावणार याची भीती तर होतीच शिवाय स्वतःच्या वेंधळेपणाचीही त्याला चीड येत होती. आपण स्कूलबॅग बेंचवर ठेवून वॉशरूममध्ये गेलोच कसे, या प्रश्नानं त्याचा तोच अस्वस्थ होता. त्याच्या शेजारीच बसलेल्या परागच्या हे लक्षात आलं. तो म्हणाला, ‘हा पिरियड संपला की आपण पायरोकडे जाऊ.’

‘पायरोकडे?’

‘अरे आपला मयूर. त्याला सांगू या ना. काहीतरी मार्ग काढेल तो फूटपट्टी शोधण्याचा.’

परागच्या या सूचनेनं रोहितला जरा हायसं वाटलं. मयूर दहावीत होता. रोहितच्या एक वर्ष पुढं. काही महिन्यांपूर्वी शाळेचा स्काऊट आणि गाईडचा कॅम्प गेला होता. तेव्हा त्यांची आणि मयुरची चांगलीच गट्टी जमली होती. रात्री कॅम्प फायरच्यावेळी, ‘प्रत्येकानं दोन मिनिटं कुठल्याही, आपल्याला जमेल, आवडेल त्या विषयावर बोलावं’ अशी सूचना सरांनी केली होती. तेव्हा मयूर हर्क्युल पायरो या विषयावर बोलला होता. तेव्हाचा सगळा माहोल त्याला आठवला.

मयुर बोलायला उभा राहिला आणि त्यानं सगळ्यांवर नजर फिरवत विचारलं, ‘हर्क्युल पायरो ज्यांना माहिती आहे, त्यांनी हात वर करा...’ फारच कमी मुलांनी हात वर केले. ज्यांनी हात वर केले त्यांनीही पायरोचं फक्त नाव ऐकलं होतं. त्याच्याविषयी त्यांना काही सांगता आलं नाही. मग मयुरनं बोलायला सुरूवात केली आणि सगळे ऐकतच राहिले. कॅम्प फायर संपल्यावर मयुरच्या भोवती गराडाच पडला आणि त्यानं सांगितलेली माहिती ऐकून सगळेच चकीत झाले. सगळ्यांनीच घरी गेल्यावर ती पुस्तके वाचण्याचा निश्चय केला. मयूर त्याच्या खास शैलीत बोलला ते सगळं रोहितला आठवत होतं-

‘तुम्हाला अगाथा ख्रिस्ती माहिती आहे का? बायबल आणि शेक्सपीअरची पुस्तकं, यांच्यानंतर जगात सर्वाधिक विक्री होते ती अगाथाच्या कादंबऱ्यांची. हर्क्युल पायरो हे अगाथाच्या कादंबऱ्यांमधल्या गुप्तहेराचं नाव. तो जिथं कुठं जातो तिथं हमखास खून होतो किंवा आपण असं म्हणू या, जिथं कुठं खून होतो तिथं तो हमखास असतो. पायरोच्या हाती केस आली की खूनी सापडलाच म्हणून समजा. 1976 साली अगाथाचा मृत्यू झाला, पण तिच्या कादंबऱ्या सतत विकल्या जात असतात. शेकडो भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली आहेत.’

गुप्तहेर हे प्रकरणं फारच इंटरेस्टिंग असलं पाहिजे असं पायरोविषयी ऐकून सगळ्यांना वाटू लागलं. तोवर मयुरनं आणखी रहस्यमय चेहरा करत विचारलं, ‘शेरलॉक होम्स तरी माहिती आहे का कुणाला?’ हिस्ट्री चॅनेलवर मालिका सुरू असल्यानं हे नाव सगळ्यांनी ऐकलं होतं. पण त्याच्याविषयी मयूरनं आणखी सांगावं, असा आग्रह सगळ्यांनी धरला. सरसुध्दा उत्सुकतेनं आणि कौतुकानं ऐकायला बसले.

‘बरं... सांगतो,’ असं खास शैलीत म्हणत मयुर सांगू लागला. ‘पायरो हा जसा अगाथा ख्रिस्तीच्या कल्पनेतून निघालेला गुप्तहेर होता तसा शेरलॉक होम्स हा ब्रिटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या लेखनीतून साकार झालेला गुप्तहेर होता. म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यांचा हीरो. पायरो हा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे खुन्याचा शोध लावण्यात हुषार, तर होम्स हे तर्क, एखाद्या माणसाची विचार करण्याची पद्धत, स्वभाव, सवयी यावरून गुन्ह्याच्या मुळापर्यत पोचत. कॉनन डायल 1930 मध्येच निधन पावले, मात्र त्यांच्या कादंबऱ्यांची आणि शेरलॉक होम्सची लोकप्रियता अजूनही सारखी वाढतेच आहे.’ पायरो आणि होम्स यांनी शोधलेल्या गुन्ह्यांच्या आणि उकललेल्या खुनांच्या काही कथाही त्यानं थोडक्यात सांगितल्या. एका नावाजलेल्या शाळेत एकेका शिक्षकांचे खून होतात आणि हर्क्युल पायरो त्या खुनांचं रहस्य कसं शोधतो हे ऐकतांना सगळ्यांच्या अंगावर काटाच आला.

तयार झालेल्या वातावरणात आणखी माहितीची भर घालत मयुर म्हणाला, ‘मराठीमध्येही बाबुराव अर्नाळकरांनी काळा पहाड, झुंझार अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या. सत्यजित राय यांनी फेलुदा नावाच्या तरूण गुप्तहेराच्या कथा बंगाली भाषेत लिहिल्या. हा फेलुदा तर आपला मोठा भाऊच वाटतो.’ फेलुदानं एका अंगठीवरून गुन्हेगार शोधल्याची कथा त्यानं सांगितली. ‘फेलुदाच्या कथा आणि अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या मराठीत अनुवाद होऊन प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या नक्की वाचा,’ असं मयुरनं सांगितलं तेव्हा ही सगळी पुस्तकं वाचायचीच असा निर्धार तेव्हा सगळ्यांनीच केला होता. जणू मयुर हा स्वतःच एक गुप्तहेर आहे, असं सगळ्यांनाच वाटू लागलं होतं.

ठरल्याप्रमाणं तो पिरियड संपल्यानंतर रोहित आणि पराग दहावीच्या वर्गावर गेले आणि मयुरला भेटले. रोहितनं मयुरला सगळं सांगितलं आणि म्हणाला, ‘मला नक्की आठवतं, मी शाळेत आलो तेव्हा फूटपट्टी बॅगमध्येच होती. प्लीज काही मदत कर ना.’

मयुर म्हणाला, ‘अरे मी गुप्तहेर कथा वाचतो म्हणजे मी स्वतःही गुप्तहेर आहे, असं वाटलं की काय तुम्हाला? मी कशी शोधणार तुझी फुटपट्टी?’ पण रोहितचा रडवेला चेहरा पाहून मग मयूरलाच त्याची दया आली. ‘ओके. मी प्रयत्न करतो. मधल्या सुट्टीत येतो मी.’ तो असं म्हणाल्यावर रोहितचा चेहरा खुलला.

मधल्या सुट्टीत मयुर आला तेव्हा रोहित आणि पराग त्याची वाटच पाहात होते. आल्या आल्या मयुर म्हणाला ‘स्कूलबॅग कुठे ठेवली होतीस तशीच ठेव परत बेंचवर.’

रोहितनं ती तशी ठेवल्यावर मयुर बेंचजवळ उभा राहिला आणि त्यानं वेगवेगळ्या कोणांमधून वर्गाकडे पाहिलं. मग बॅग उघडली आणि तिच्यात डोकं खूपसून त्यानं काय केलं, ते मात्र मयुर-पराग यांना कळलं नाही. ‘आणखी काही हरवलंय का?’

रोहितनं नकारार्थी मान हलवली तेव्हा मयुर म्हणाला, ‘परत एकदा बॅगमध्ये पाहून घे.’

रोहितनं बॅग तपासली आणि म्हणाला, ‘पल्सचं एक चॉकलेट होतं बॅगेत... पण ते जाऊ दे रे... पट्टी महत्त्वाची. आणखी काही हरवलं नाही.’

‘प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल अशा वेळी महत्त्वाची असते रोहित.’ ...मयुरमध्ये आता जणू हर्क्युल पायरो शिरला होता. ‘पट्टी हरवल्याचं कधी लक्षात आलं, तू ते परागला कधी सांगितलं, तुम्हा दोघांत काय काय बोलण झालं, तुला कुणाविषयी शंका आहे का, सगळं मला सांग...’ रोहितनं त्याला माहिती दिली आणि मग नकारार्थी मान हलवली. मला शंका नाही कोणाही विषयी.

‘बरं..’ असं म्हणत मयुरनं वर्गातील प्रत्येक बेंचवरील स्कूलबॅगांचं अगदी जवळून निरीक्षण केलं. परंतु कुणाचीही बॅग उघडली नाही. कारण तसं करायचं तर परवानगी घ्यावी लागली असती. सर्व बॅगांचं निरीक्षण करून झाल्यावर तो परागला म्हणाला, ‘सॉरी पराग, तुझीही बॅग बघावी लागेल.’

‘अरे मग बघ ना, त्यात काय?’ मयुरनं परागची बॅगही जवळून पाहिली आणि तो रोहितला म्हणाला, ‘तुम्ही दोघं इथंच थांबा, मी आलोच दोन मिनिटांत.’

मयुर कुठंतरी जाऊन आला तोवर मधली सुट्टी संपत आली होती आणि मुलं क्लासमध्ये परत येऊ लागली होती. पाठोपाठ संस्कृतचे सौरभ सरही येताना दिसले. मयुर सौरभ सरांकडे गेला आणि म्हणाला, ‘सर, तुमच्या पिरियडमधली पाच मिनिटं मला हवी आहेत.’ आणि त्यानं थोडक्यात त्यांना कल्पना दिली. सरांनी त्याला परवानगी दिली.

वर्ग भरला. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसली. सौरभ सर म्हणाले, ‘आपल्या रोहितला त्याच्या दादानं दिलेली नवी इम्पोर्टेड फूटपट्टी हरवली होती. मयुरच्या मते ती हरवली नसून चोरीला गेली आहे आणि त्यानं चोर शोधला आहे...’ असं म्हणत त्यांनी मयुरकडे सूत्र दिली. मयुरनं एखाद्या कसलेल्या गुप्तहेरासारखं काही वेळ शांततेत जाऊ दिला आणि म्हणाला, ‘एखादी व्यक्ती जेव्हा ठरवून चोरी करते तेव्हा ती चोरी उघडकीस येऊ नये म्हणून ती अतिरिक्त सावधगिरी बाळगते. ही अतिरिक्त सावधगिरी आणि नकळत घडलेल्या काही चुकांमुळेच चोरी उघडकीला येते.

रोहित आणि पराग माझ्याकडे तक्रार घेऊन आल्यावर मी या वर्गाची तपासणी केली. रोहितशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की फूटपट्टीसोबतच त्याच्या बॅगेतलं एक चॉकलेटही चोरीला गेलं आहे. मग मी शाळेभोवती एक चक्कर मारून आलो तेव्हा या वर्गाच्या खिडकीबाहेर मला त्या चॉकलेटचं रॅपर मिळालं. याचा अर्थ त्या खिडकीला लागून जी बेंचेस आहेत त्या चार पैकी एका ठिकाणाहून ते फेकलं गेलं असावं...’ सगळा वर्ग उत्सुकतेनं ऐकत होता. एका गुप्तहेरकथेचे आपण साक्षीदार होतो आहोत, या कल्पनेनं त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते... खिडकीच्या जवळील बेंचावर बसलेल्या चारही विद्यार्थ्यांना मात्र छातीत धडधडू लागलं होतं.

मयुर पुढे बोलू लागला, ‘रोहितच्या बॅगमध्ये बरेचसे तीव्र वासांचे सुवासिक खोडरबर आहेत. दोन दिवस ती फूटपट्टी त्याच्या बॅगेत रबरांच्या सहवासात होती, त्यामुळं पट्टीला त्या रबरांचा वास नक्कीच लागला असावा असा तर्क मी बांधला. मग मी वर्गातील सर्व स्कूलबॅग्स हुंगून पाहिल्या. खिडकीजवळच्या फक्त एकाच स्कूलबॅगला तसा सुवास येतोय... मंदारच्या! मंदारची हरकत नसेल तर मी सरांना विनंती करतो, त्यांनी मंदारची स्कूलबॅग तपासावी.’

मंदारचा चेहरा रडवेला झाला होता. सौरभ सरांनी त्याची बॅग तपासली आणि त्यातून रोहितची फूटपट्टी बाहेर काढली. तिचा वास घेऊन पाहिला. तिला खरंच सुंगध येत होता. सरांनी मयुरकडे कौतुकानं पाहिलं आणि मंदारकडे रागानं पाहिलं. मंदारच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. तो रडत रडतच म्हणाला, ‘पण मयुरदादा... मी नाही रे चोरली पट्टी, मला माहिती नाही माझ्या बॅगमध्ये ती कशी आली.’ सौरभ सर त्याचा कान धरत म्हणाले, प्रत्येत चोर असंच म्हणत असतो...

तेवढ्यात मयुरचाच आवाज आला, ‘सर, मंदार खरं बोलतोय. त्यानं ती पट्टी चोरलेली नाही.’

सगळे चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. मयुर रहस्य सांगितल्याच्या स्वरांत म्हणाला- ‘मलाही आधी असं वाटलं की, झालं चोर सापडला आपल्याला! पण मग माझ्या लक्षात आलं, कँपफायरच्या दिवशी जेव्हा प्रत्येकाला दोन मिनिटं बोलायला सांगितलं होतं तेव्हा मंदार ‘आय हेट चॉकलेट्स’ या विषयावर बोलला होता. मग मंदारला पट्टी चोरताना चॉकलेट चोरण्याचा मोह कसा होईल?’

पुन्हा सगळे विचार करू लागले. सगळ्यांची उत्सुकता ताणत मयुर म्हणाला- ‘याचा अर्थ कुणीतरी मंदारच्या बॅगेत ती पट्टी ठेवली आणि तसं करता करता चॉकलेट खाऊन खिडकीतून रॅपर बाहेर फेकून दिलं...’ ‘कोण असेल तो?’ प्रत्येकजण एकमेकांकडे संशयानं पाहू लागला. सगळ्यांना पुरेसा वेळ देऊन झाल्यावर मयुर रहस्यमय स्वरांत म्हणाला, ‘चोर सर्वप्रथम काय करतो? स्वतःला संशयाच्या वर्तुळातून बाहेर काढतो. रोहितची पट्टी हरवल्यावर त्याला माझ्याकडे येण्याचा सल्ला देऊन परागनंही तेच केलं. स्वतःला संशयातून बाद करून घेतलं….’ सगळा वर्ग परागकडे पाहू लागला. आपण बोलणं पुढे सुरू ठेवत मयुर म्हणाला, ‘रोहित आणि पराग माझ्याकडे येण्यासाठी निघाले तेव्हा वर्ग रिकामा होता. रोहितची पाठ फिरताच परागनं घाईघाईनं त्याच्या बॅगेतून पट्टी काढली आणि ती मंदारच्या बॅगेत ठेवून दिली. चॉकलेट खाऊन रॅपर त्यानं खिशात ठेवून दिलं असणार. तेही त्यानं खिडकीतून बाहेर फेकून दिलं आणि तो धावतपळत रोहितच्या पाठोपाठ आला. हे दोघे मला भेटायला आले तेव्हा रोहित नॉर्मल होता आणि पराग धापा टाकत होता, याची मी नोंद घेतली होती, ती मला नंतर कामी पडली. आणि रबराचा सुवास परागच्या स्कूलबॅगलाही आहे...’

पराग खाली मान घालून उभा होता. त्याला रडू आवरत नव्हतं. त्यानं सर्वांदेखत स्वतःचे कान धरले आणि वर्गाची माफी मागितली. त्या पट्टीचा मोह आवरला नाही, अशी कबुली दिली. रोहितची पट्टी हाती धरत सौरभ सर परागला म्हणाले, ‘तू माफी मागितली असलीस तरी तुला प्रिन्सिपॉलकडे यावंच लागेल. तुला माफ करायचं की शिक्षा करायची ते तेच ठरवतील.’

मयुरच्या हुषारीला दाद देण्यासाठी सर्व वर्गानं उभं राहून टाळ्या वाजवल्या. मान हलवून मयुरनं ते कौतुक स्वीकारलं. सौरभ सरांनीही मयुरची पाठ थोपटली. तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच. ते मयुरला म्हणाले, ‘तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच. परागनं फूटपट्टी लपवण्यासाठी मंदारचीच बॅग का निवडली?’

मयुर हसत म्हणाला, ‘कुणीतरी हा प्रश्न विचारेल याची वाटच पाहात होतो मी. त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. स्कूलबसमध्ये मंदार आणि पराग नेहमी एकाच सीटवर बसतात. तेव्हा मंदारच्या बॅगमधली पट्टी हळूच काढून घेऊन स्वतःच्या बॅगेत ठेवायची, अशी योजना असणार परागची. काय पराग, खर ना?’

परागनं मान खाली घातली. सौरभ सरांनी कौतुकानं मयुरकडे पाहिलं. स्वतःच्या खिशाला लावलेलं पेन काढून ते मयुरच्या पुढं धरत म्हणाले, ‘आमच्या छोट्या गुप्तहेराला ही छोटीशी भेट आणि दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा.’ मग ते वर्गाकडे वळले आणि म्हणाले, ‘पुस्तकं, कथा, कादंबऱ्या वाचता वाचताच आपण स्वतःही भोवतालाचं निरिक्षण करायला, तर्काचा वापर करायला, शिकलं पाहिजे. मयुरकडून हा धडा तुम्ही सर्वांनी घ्यायला हवा..’

हो सर...म्हणत सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर केला. अर्थातच मंदारच्या टाळ्यांचा आवाज सर्वात मोठ्ठा होता.

-श्रीकांत बोजेवार
shrikant.bojewar@gmail.com
My Cart
Empty Cart

Loading...