Menu

पत्रांची जत्रा

image By Wayam Magazine 06 October 2023

`डाकिया डाक लाया...’  हे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं तुम्ही ऐकलय?  खरंच किती गंमत असायची पूर्वी गावात माहितीये? पोस्टमन काका आले की गावातील सर्व मंडळी त्यांना घेरा घालायची. गावातील काही अशिक्षित मंडळी तर पोस्टमन काकांकडून पत्र वाचून घ्यायची. पूर्वी चक्क शाळेच्या वार्षिक परीक्षेचा निकाल पोस्टाने येत असे. मग काय, निकालाचा दिवस जवळ आला की, सगळी मुले पोस्टमन काकांची वाट बघत बसायची. पोस्टमन काकांना बाहेरच्या बाहेर पटवून निकाल पालकांच्या हाती पडण्याआधी स्वतःच्या ताब्यात घेण्याची धडपड मुले करायची.  
...अशी जुनी माहिती आम्हांला सिक्वेरा ताईनी दिली. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल ना, की हे सगळं काय चाललं आहे आणि या सिक्वेरा ताई कोण? तर मित्रहो, ‘वयम्’च्या उद्योग भेटीचा लाभ आम्हांला घेता आला आणि ही उद्योग भेट होती पोस्ट ऑफिसला. ५० पैशांचे पोस्टकार्ड किंवा ५ रुपयांचे पाकीट  देशभर कुठेही कसे पोचते, पोस्टातून पाठवलेली गोष्ट कधी कधी उशिरा का मिळते, पोस्टाचा कारभार कसा चालतो- अशा अनेक शंका मनात होत्या आणि त्याची माहिती आम्ही ठाणे येथील मुख्य डाकघरात जाऊन तिथे काम करणाऱ्या सिक्वेरा ताईंकडून घेतली. या भेटीचा सविस्तर वृत्तान्त खास तुमच्यासाठी...

पोस्ट ऑफिसविषयी आम्हांला माहिती घेता येणार म्हणून आम्ही खूप उत्सुक होतो. ठाण्यातील मुख्य डाकघर येथे आम्ही गेलो. बाहेर छोट्या-मोठ्या लाल रंगाच्या जाळी असलेल्या गाड्या उभ्या होत्या. सिक्वेरा ताईनी आमचं स्वागत केलं. पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक मोठा फलक लावलेला होता. त्या फलकाचा रंगही लाल होता आणि त्यावर इंगजी आणि हिंदी भाषेत ‘भारतीय डाक’, ‘India Post’ असं लिहिलेलं होतं आणि त्याखाली स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, लेटर आणि पार्सल, आय-एमओ, ई- एमओ, ई-पेमेंट, ई-पोस्ट, पोस्टल लाईफ इंशोरंस आणि सेव्हिंग बँक असे मुद्दे लिहलेले होते. सुरुवातीला आम्हांला हा फलक पाहिल्यावर हे मुद्दे का लिहले असावेत, असा प्रश्न पडला होता. परंतु सिक्वेरा ताईनी आम्हांला माहिती द्यायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “या फलकाच्या सगळ्यात वर पट्टे असलेलं चित्र दिसतं आहे, तो आहे भारतीय पोस्टाचा लोगो ! ठाणे मुख्य डाकघर म्हणजे हे ठाण्यातील सर्व पोस्ट ऑफिसचे मुख्य म्हणजेच हेड ऑफिस आहे. हेड ऑफिसच्या अख्यात्यारीत ठीकाठीकाणची छोटी पोस्ट ऑफिस असतात. हेड ऑफिसमध्ये स्टाफ जास्त असतो. या लाल फलकावर जे मुद्दे लिहिले आहेत, त्या सर्व पोस्टाच्या सेवा आहेत. या सेवा पोस्ट पुरवते. 
आता आपण या सर्व सेवांविषयी माहिती करुन घेऊ. स्पीड पोस्ट सेवा म्हणजे कुरियर सारखी सेवा पोस्ट पुरवते. स्पीड पोस्ट ने तुम्ही कोणतीही गोष्ट पाठवली की त्याची रिसीट तुम्हांला मिळते आणि जलद गतीने ती गोष्ट पोहचते. ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली याची सहीची रिसिट घ्यावी लागते. स्पीड पोस्ट करण्यासाठी येणारा खर्च हा त्या गोष्टीच्या वजनानुसार ठरतो. किती वजनाला किती दर हे पोष्टाने  ठरवलेले आहे. लेटर म्हणजे पत्र पोस्टाने पाठवतात, त्याचबरोबर मोठी पार्सलही पोस्टाने पाठवता येतात. आता आय-एम ओ, म्हणजे इन्स्टट मनी ऑर्डर. समजा गावी कोणाला पैसे पाठवायचे असतील मनी ऑर्डरच्या काऊंटरवर जाऊन IMO चा फॉर्म भरायचा आणि पैसे द्यायचे, मग इंटरनेटच्या सहाय्याने ही IMO त्या एरियातील जवळच्या पोस्टात पाठवली जाते. मग तुम्हांला पोस्टात जाऊन ही IMO कलेक्ट करावी लागते,  मात्र यासाठी तुमचे ID प्रुफ लागते बरं का! तरच पैसे मिळतात. EMO म्हणजे इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. यामध्येसुद्धा इंटरनेटच्या सहाय्याने मनी ऑर्डर त्या त्या पोस्टात पाठवली जाते. यामध्ये एक बारकोडसारखा कोड असतो. हा कोड त्या पोस्टात SMSच्या सहाय्याने पाठवला जातो. तो कोड त्या पोस्टात टाईप केलात की मग पूर्ण माहिती भरलेल्या मनी ऑर्डर फॉर्म दिसतो. मग EMO ची प्रिंट काढून तुम्हाला घरपोच आणून दिली जाते. सही करुन रिसीट पोस्टमन काका घेऊन जातात. हे झाले मनी ऑर्डरचे दोन प्रकार. याशिवाय पोस्टमध्ये तुम्ही बिले भरू शकता. यात लाईट बील, गॅस बील, अन्य बिलेही तुम्ही ई-पेमेंट द्वारा पोस्टात भरू शकता.’’ 
“इन्शुरन्स हा शब्द तुम्ही ऐकला आहे का?’’ ताईनी आम्हांला विचारलं. आम्ही ‘हो’ असं उत्तर दिलं, पण नेमक्या भाषेत आम्हांला सांगता येईना. मग ताई आम्हांला पोस्टल लाइफ इन्शुरन्सविषयी सांगू लागल्या- “पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असतो. विशेष म्हणजे पोलिसांसाठीही खास पोस्टाची सुविधा आहे. पोलिसांच्या जीवाला सतत धोका असतो त्यामुळे जीवन विमा त्यांना इन्शुरन्स देते. पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये प्रीमियम कमी असतो आणि बोनस जास्त असतो. शिवाय पोस्टल लाईफ इन्शुरन्सवर लोनही घेता येते. हे काम पोस्टाची बँक पाहते म्हणजेच सेव्हिंग बँक. पोस्टाचीही बँक असते. यातही बँकेप्रमाणे सर्व सुविधा असतात. उदाहरणार्थ सेव्हिंग, गुंतवणूक, कर्ज, रिकरिंग इत्यादी. रिकरिंग ही पोस्टाच्या बँकेची खास सुविधा आहे. यात तुम्ही जमतील तसे पैसे साठवत जायचे. अमुक महिन्याला अमुकच पैसे भरले पाहिजे अशी सक्ती या रिकरिंगमध्ये नसते.’’ 
त्या लाल फलकावरील सर्व मुद्द्यांविषयी माहिती सांगितल्यानंतर ताई आम्हांला मागच्या दाराने पोस्ट ऑफिसमध्ये घेवून गेल्या. अबब! किती तरी बॉक्स जमिनीवर ठेवलेले होते. शिवाय शिक्के मारल्याचा आवाजही सतत घुमत होता. कागदांचा तर हा पसारा होता! 
ताई सांगू लागल्या, “रेल्वे, बस, विमान, जहाज या मार्गाने पोस्टाकडे पार्सल येतात. परदेशी राहणारे लोक विमानाने पार्सल पाठवतात. विमानतळावरही पोस्ट ऑफिस असते. मग ही पार्सल पोस्टाच्या गाड्या जाऊन घेवून येतात. मग त्याचं सॉर्टींग  केलं जातं आणि त्या त्या जवळील पोस्टात ही पार्सल पाठवली जातात. पोस्टाची पार्सल्स सील केलेली असतात. डांबर वितळून गोणीच्या तोंडाला बांधतात व सील करतात. त्यावर पोस्टाचा शिक्का असतो. यामध्ये तारीख, पिन कोड, पोस्ट ऑफिसचे नाव लिहिलेले असते. त्यावरून समजते की पार्सल कुठून आले आहे. प्रत्येक पोस्टाला सहा अंकी पिन कोड म्हणजे फिक्स असा नंबर दिलेला असतो. उदा. ४००६०५ हा पिन कोड झाला. प्रत्येक शहरात जे मुख्य डाकघर असते, त्याला ०१ असा नंबर दिलेला असतो. या पिनकोड वरून पटकन समजत की पार्सल, पत्र कुठे पाठवायचं आहे ते. त्यामुळे पिनकोड हा सर्वात महत्त्वाचा असतो. या प्रत्येक पार्सलची नोंद त्या त्या पोस्टला ठेवावी लागते. स्पीड पोस्टसाठी वेगळ्या बॅग्ज असतात, रजिस्टर पोस्टसाठी वेगळ्या बॅग्ज असतात. प्रत्येक देशाचा स्टँप वेगवेगळा असतो. तुम्ही पोस्ट पाकिटावर वेगवेगळी तिकीट, स्टँप पाहता. ह्या तिकिटावर महनीय व्यक्तींचे फोटो असतात. आता तर सचिन तेंडूलकरचाही स्टँप आला आहे. गंमत म्हणजे तुम्हीही तुमच्या कुटुंबाचा, तुमचा स्वतःचा स्टँप पोस्टाकडून तयार करून घेऊ शकता. ही सुविधा मुंबईमधील मुख्य डाकघरात सुरू झाली आहे. विशिष्ट रक्कम भरून तुम्ही तुमचे स्टँप बनवून घेऊ शकता. मग हे स्टँप पोस्ट पाकीट किंवा पत्रावर लावलेत, पार्सलवर लावलेत की ज्यांना पाठवणार आहेत त्यांना बघताक्षणी कळेल की कोणी पाठवलं आहे ते!’’ हे सांगितल्यावर ताईनी आम्हांला वेगेवेगळ्या महनीय व्यक्तींची तिकिटे दाखवली. सचिन तेंडुलकरचा स्टंपही दाखवला. हे वेगवेगळे स्टँप बघताना खूप मजा येत होती. 
हे बघून झाल्यावर ताईनी आम्हांला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, “बरेचदा पत्र पोचत नाही, पाठवलेली वस्तू रिटर्न येते, अशा तक्रारी सतत ऐकू येतात. याला कारण म्हणजे पत्ता अपूर्ण असणे हे असते. कधीही कोणतीही गोष्ट पोस्टाने पाठवताना पत्ता पूर्ण पाहिजे. यामध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पाठवत आहात त्याचे संपूर्ण नाव, बिल्डींग किंवा घराचे नाव, विंग असल्यास विंगचे नाव, रूम नंबर, रोड चे नाव, जवळील प्रसिद्ध ठिकाणचे नाव, त्या एरियाचे नाव आणि पिन कोड या सर्व गोष्टी नमूद केल्या तर त्या व्यक्तीपर्यंत पत्र पोहचणार ह्यात शंका नाही. परंतु ही माहिती अर्धवट असेल तर मात्र टपाल कोणाला द्यायचं आहे, हे कळत नाही. तसेच टपाल पाठवणाऱ्याचा म्हणजे प्रेषकाचा पत्ताही पूर्ण लिहिला  पाहिजे. आणि अक्षर वाचनीय असावं. 
ताईची ही माहिती आम्ही ऐकली. आम्हांला अनेक गोष्टी कळल्या. तरी अजूनही काही प्रश्न आमच्या मनात होते ते आम्ही विचारण्यास सुरुवात केली- 
ताई, एवढी सारी पत्र तुमच्याकडे येतात, त्यांचं सॉर्टींग कसं होतं? हे सॉर्टींग कोण करतं? पोस्टमन काकांना ही पत्र कुठे वाटायची, ह्या सूचना कोण देतं?
-पोस्टात पत्रे आली की प्रत्येक एरिया आणि पिन कोड प्रमाणे ती वेगवेगळी केली जातात. उदा. वाशी, भांडूप, ऐरोली अशा एरियानुसार त्याची विभागणी केली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक एरियाचे नाव लिहलेले कप्पे तयार केलेले असतात. त्यात पोस्टमन आलेल्या पात्रांची विभागणी करुन ठेवतात. प्रत्येक पोस्टमनला नंबर दिला जातो. एरियाही नेमून दिला जातो. शिवाय एरिया नंबरही दिला जातो. रजिस्टर-स्पीड पोस्ट वर बारकोड नंबर असतात, त्यानुसार यांचे सॉर्टींग केले जाते. 

पोस्टमन होण्यासाठी किती शिक्षण असावे लागते ?
पोस्टमन होण्यासाठी पूर्वी शिक्षणाची आवश्यकता नव्हती. परंतु आजकाल पोस्टमन हे संगणकाचा ज्ञान असणारे, किमान दहावी-बारावी झालेले असावेच लागतात. 

पिन कोड नंबर म्हणजे काय? प्रत्येक राज्याचे आणि देशाचे पिन कोड वेगळे असतात का?
पिनकोड नंबर म्हणजे पोस्टाला दिलेला एक संकेतांक किंवा कोड नंबर. हा नंबर त्या पोस्टला कायमस्वरूपी दिला जातो. प्रत्येक राज्याचे व देशाचे पिन कोड हे वेगवगळे असतात. उदा. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व पिन कोड ४०० ने सुरू होतात. पिनकोडमुळे एका पोस्टातून दुसऱ्या पोस्टात टपाल पोचवणे सोपे जाते. 

साधारणतः किती रुपयांपर्यतची मनीऑर्डर आपण पाठवू शकतो?
एक फॉर्म भरून तुम्ही ५००० रुपयांपर्यंतची मनीऑर्डर तुम्ही पाठवू शकता. समजा १०००० पाठवायचे तर दोन फॉर्म भरायचे. प्रत्येक मनीऑर्डरसाठी चार्ज ठरलेले असतात. उदा. समजा १०० रुपयाची मनीऑर्डर असेल तर ५ रुपये चार्ज बसतो. 

टपाल पोचायला वेगवेगळा कालावधी लागतो का? किती?
हो. नक्कीच. वरील सर्व गोष्टी पोचायला वेगवेगळा कालावधी लागतो. स्पीड पोस्ट असेल तर ते साधारणतः दोन दिवसात पोचले पाहिजे. रजिस्टर पोचायला चार दिवस लागतात आणि पत्र पोचायला साधारणतः एक आठवडा लागतो. 

कोणत्या गोष्टी पोस्टाने पाठवता येत नाहीत? चेक पोस्टाने पाठवता येतात का?
द्रव पदार्थ व इलेक्ट्रॉनिक वस्तू पोस्टाने पाठवता येत नाहीत. अत्यंत नाजूक अशा वस्तूही पोस्ट सहसा घेत नाहीत, कारण अशा वस्तू घेणं ही जोखीम असते. नोटा किंवा नाणी पाकिटात बंद करून पोस्टाने पाठवू शकत नाही. मात्र चेक पोस्टाने पाठवू शकता.

काही वेळा पत्र मिळत नाही. असं का होतं ? मग ही पत्रं कुठे अडकतात की हरवतात? 
मुळात पूर्ण पत्ता पिनकोडसहित नसेल तर असं होतं की पत्र फिरत राहत आणि कुठे पाठवायचं हे कळत नाही. मग ही रिटर्न लेटर ऑफिस (RLO) ऑफिसमध्ये असतात. 

पोस्टाची वेबसाईट आहे का ? 
www.indiapost.gov.in ही भारतीय पोस्टाची वेबसाईट आहे. यावर पोस्ट कारभाराविषयी सविस्तर माहिती इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेतून दिली आहे. शिवाय तुमची तक्रारही तुम्ही येथे नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यावर अवघ्या काही तासात तुम्हांला उत्तर मिळते. 

ताई, तुम्ही पोस्ट खात्यात किती वर्ष कार्यरत आहात? इथे तुम्ही कोणत्या विभागाचे काम पाहता ?
गेले २२ वर्ष मी पोस्ट खात्यात कार्यरत आहे. सध्या मी या पोस्टात आहे. पूर्वी दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये होते. मनी ऑर्डर विभागाचे काम मी पाहते. 
यानंतर ताईनी आम्हांला पोस्टाची बँक आतमध्ये नेऊन दाखवली. नंतर आम्ही गेलो, पोस्टाच्या जवळ असलेल्या पोस्टाच्या बिझनेस सेंटरमध्ये. मुख्य डाकघरात तर पत्रांचे सॉर्टींग  होते पण इथेही पोस्टातील पत्रे, रजिस्टर या सर्वांचे सॉर्टींग होते. तसेच तुम्हाला लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, मासिके, LICचा प्रीमियम भरण्याची पत्र याचं पॅकिंग इथे होतं आणि मग दिलेल्या यादीनुसार वरील सर्व गोष्टी त्या त्या पत्त्यावर पाठवल्या जातात. समजा तुम्हाला १००० वा १०००० अंक, पत्रिका पाठवायच्या असतील तर तुम्हांला पोस्टाची परवानगी घ्यावी लागते. या बिझनेस सेंटरमध्ये तर बाप रे बाप पत्रांचे केवढे मोठाले डोंगर होते! आणि त्याचे सॉर्टींग पोस्टमन काका करत होते. हे बघितल्यावर आम्हाला कळून चुकलं की पत्र का उशिरा मिळतात. एवढ्या ढिगातून त्याचं सॉर्टींग होऊन पुढील पोस्टात जातील तेव्हाच ना! पोस्टाची हे भेट आमच्या कायम लक्षात राहील. ‘थॅंक्स वयम्’ ! 
बाल विकास भवन पंचशिल एज्युकेशन संचालित, ठाणे 

-शब्दांकन : क्रांती गोडबोले-पाटील 
***

My Cart
Empty Cart

Loading...