By Kishor Darak, On 7th July 2020, Children Magazine
काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... ''''वयम्'''' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.
''''नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा'''' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी ''''नवं पुस्तक'''' म्हणजे ''''पाठ्यपुस्तक''''च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं!
आज तुम्ही मुले ज्या गोष्टी तुमच्या पालकांकडून किंवा आजी-आजोबाकडून ऐकता ना, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या. ''''लांडगा आला रे आला'''' ही गोष्ट असो किंवा ''''मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही'''' ही लोकमान्य टिळकांची गोष्ट असो, या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात आहे, याचे कारण त्या पूर्वी पाठ्यपुस्तकांत होत्या.
शालेय वयांत पाठ्यपुस्तकं फार महत्त्वाची मानली जातात. जगभर पाठ्यपुस्तकं वापरली जातात. त्यांचं स्वरूप, पद्धत अन महत्व वेगवेगळं असू शकतं, पण पाठ्यपुस्तकं नसलेल्या शाळा फार क्वचित आढळतील. आपल्याकडं तर ''सिल्याबस'' संपवायचं म्हणजे पाठ्यपुस्तक शिकवून/शिकून संपवायचं, असाच अर्थ घेतला जातो. इंग्रजांच्या काळापासून भारतात शाळा आखीव-रेखीव बनल्या. शिक्षकांनी नेमून दिलेलं पुस्तक निमुटपणे शिकवायचं अन त्यावर आधारीत परीक्षा शाळांनी घ्यायची अशी पद्धत रूढ झाली. त्यामुळं पाठ्यपुस्तकाना काही पर्याय असू शकतो का, याचा विचार देखील केला जात नाही.
छापलेला शब्द म्हणजे पवित्र !
छपाई तंत्रज्ञानाच्या (printing technology) सुरुवातीपासून छापलेल्या शब्दाला महत्व प्राप्त होत गेलं. पंधराव्या शतकात युरोपमध्ये छापलं गेलेलं पाहिलं पुस्तक म्हणजे बायबल. त्यामुळं छापलेला शब्द पवित्र मनाला जाऊ लागला. छापलेल्या शब्दाला अगदी देववाणीचं स्थान मिळालं. छपाई तंत्रज्ञान जसजसं स्वस्त आणि सार्वत्रिक होत गेलं तसतसा शाळांमधून छापील पुस्तकांचा वापर अधिकाधिक प्रमाणात सुरू झाला. पूर्वी ''''तोंडी'''' असलेल्या शाळा पुढे ''''लेखी'''' बनत गेल्या. पाठ्यपुस्तकमधली माहिती म्हणजे ज्ञान, असं समीकरण बनत गेलं.
सुरुवातीची पाठ्यपुस्तकं छपाईच्या दृष्टीनं अगदी प्राथमिक अवस्थेतली होती. संपूर्ण पुस्तकात एकाच प्रकारची अक्षरं (font) अन मुखपृष्ठ तेवढं वेगळ्या टाईपमध्ये असे. रंगीत पाठ्यपुस्तकं ही तर अगदी गेल्या शतकाची निर्मिती मानावी लागेल. आता आपण पाहतो तशी रंगीबेरंगी, सुबक छपाईची, वयोगटानुसार वेगवगळ्या आकारांचे font वापरणारी पाठ्यपुस्तकं या गोष्टींची कल्पना आपल्याकडं अगदी पन्नास-साठ वर्षांपूर्वीदेखील दिवास्वप्न ठरली असती.
सगळे विषय एकाच पाठ्यपुस्तकात
भारतात इंग्रज अंमलाच्या सुरुवातीला म्हणजे १८४०-६० च्या सुमारास वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी पाठ्यपुस्तकं असा प्रकार शाळांच्या बाबतीत फारसा नव्हता. भाषा, समाजशास्त्र, नितीमूल्ये, इतिहास, विज्ञान असे सगळे विषय एकाच पाठ्यपुस्तकात असायचे. शालेय पातळीवर गणिताची पाठ्यपुस्तकं मात्र वेगळी असलेली आढळतात. ''''मराठी तिसरे पुस्तक'''', ‘मराठी चौथे पुस्तक'''' अशी पुस्तकं १८५० ते १८८० च्या सुमारास प्रसिद्ध झालेली दिसतात. याशीवाय ''''मधुमक्षिका'''' किंवा ''''मनोरंजक गोष्टी'''' अशी पुस्तके १८६५-७० दरम्यान प्रसिद्ध झाली होती. यातली काही पुस्तकं विनायक कोंडदेव ओक किंवा कृष्णशास्त्री चिपळूणकर इत्यादी भारतीयांनी लिहिलेली किंवा त्यांच्या रचनांवर किंवा त्यांनी इंग्रजीमधून केलेल्या भाषांतरावर आधारित होती. (उदा. मराठी पुस्तक पांचवे - १८७४).
राणीचे गुणगान
पाठ्यपुस्तकांमध्ये मुख्यतः बायबलमधील नीतिकथा, व्हिक्टोरिया राणी आणि तिच्या राज्याविषयी आदर व्यक्त करणारया कथा आणि अभंग यांचा आवर्जून समावेश झालेला असायचा. उदा. १८७४ मध्ये प्रकाशीत ‘मराठी पुस्तक पांचवे’ मधील ही अभंगसदृश कविता पहा.
इंग्लंड देशांत लंडन राजधानी|| तेथील सिंहासनी विराजीत ||१||
तीच आहे आम्हा समस्तांची राणी|| महत्वाची खाणी व्हिक्टोरिया ||२||
देवा त्वांच दिले तिला सिंहासन|| त्याचा अभिमान तुला असों ||३||
देवराया तुझे धरितों चरण|| राणीचें रक्षण करीं सदा||४||
परशुरामपंत गोडबोले यांनी इंग्रजीमधून भाषांतरीत केलेली ही कविता इंग्लंडच्या राणीच्या भक्तीने ओतप्रोत भरलेली आहे. पाठ्यपुस्तकांमधून समाजातल्या सत्ताधारी वर्गाला योग्य वाटणाऱ्या कथा, कविता, नीतीमूल्ये यांचा समावेश होणं ही देखील पाठ्यपुस्तकांची परंपरा आहे!
आज आपली पाठ्यपुस्तकं नेमकी बनतात कशी?
-महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ''''विद्यापारिषद'''' (SCERT) नावाची शासकीय, स्वायत्त संस्था आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करते अन ''''बालभारती'''' (MSBTPCR) ही दुसरी शासकीय, स्वायत्त संस्था पाठ्यपुस्तकं तयार करते. नववी ते बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं SSC बोर्ड तयार करतं. या तीनही संस्था पुण्यात आहेत. पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी ''''बालभारती'''' किंवा ‘SSC बोर्ड’ प्रत्येक विषयाची एक समिती नेमतात. पुस्तकात काय येणार किंवा नाही येणार, कशाचा समावेश होणार आणि कशाकशाचा नाही होणार, याचे निर्णय मुख्यतः या समित्या करतात. अर्थात त्यासाठी ''''विद्यापरिषदे''''चा अभ्यासक्रम अन शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्वं पाळली जातात. एखादी कविता, कथा, पाठ्यांश, ऐतिहासिक घटना, अश्या कोणत्याही वेच्याचा समावेश होताना समितीचा, ''''बालभारती''''चा /’SSC बोर्डा’चा किंवा शासनाचा निर्णय महत्वाचा ठरतो. क्वचितप्रसंगी या प्रक्रियेमध्ये शासन किंवा इतर संस्था/संघटना हस्तक्षेप करतात अन त्यामुळं समित्यांचे निर्णय दबावाखाली घेतले जाऊ शकतात. पण सर्वसाधारणतः पाठ्यपुस्तक समित्यांनी स्वायत्तपणे काम करणं अपेक्षित असतं. किंबहुना ''''बालभारती'''' किंवा ''''SSC बोर्ड'''' यांनी तयार केलेल्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाला शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच ते बाजारात येऊ शकतं. ''''शिवछत्रपती''''- ४४ वर्षे हेच पुस्तक!
कधी कधी एखाद्या पाठ्यपुस्तकाबद्दल शासनाने घेतलेला निर्णय तंतोतंत पाळला जातो. उदा. महाराष्ट्रात इयत्ता चौथीला ''''शिवछत्रपती'''' हे शिवरायांचा इतिहास शिकवणारं पाठ्यपुस्तक वापरलं जातं. १९७० पासून गेली ४४ वर्षे हे पुस्तक तसंच ठेवण्यात आलंय. म्हणजे आज दुसरी-चौथीत असणाऱ्या मुलांच्या आज्जी-आजोबांनीखील देखील त्यांच्या चौथीत कदाचित हेच पुस्तक वापरलं असण्याची शक्यता आहे, अन तुमच्या सगळ्यांच्या आई-बाबांनी व बहुतांश शिक्षकांनी तर नक्की हे पुस्तक वापरलंय. साधारणतः दर १० वर्षांनी पाठ्यपुस्तकं बदलली जातात पण १९७० साली तयार झालेल्या ''''शिवछत्रपती'''' या पुस्तकाविषयी महाराष्ट्र विधीमंडळाने १९९२ साली एक निर्णय घेऊन ते पुस्तक तसंच ठेवलं. अशा प्रकारचं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे.
जुलै २०२० ‘वयम्’