Menu

‘वयम्’च्या अनुभव लेख उपक्रमावर आधारित शैक्षणिक लेख, आज 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपदकीय पानावर

image By Wayam Magazine 18 October 2022

पाठ घेण्यापेक्षा पाठबळ द्या !

सध्या मुलांच्या शाळा निदान ऑनलाइन पद्धतीने सुरू व्हाव्या, असा अट्टहासी सूर आळवला जात आहे. करोना-काळात जणू मुलांचे शिक्षण थबकले आहे आणि शिक्षण-विरहित पोकळीत ती जगत आहेत, अशी चिंता काहींना वाटत आहे. खरोखरच अशी स्थिती आहे का? प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी मुलांचे शिकणे बंद पडले आहे का? या काळात अनेक मुलांनी नव्या क्षमता कमावल्या, नवी कौशल्ये आत्मसात केली, त्यांना नव्या जाणिवा झाल्या- ही शक्यता आपण लक्षात का घेत नाही?

येनकेन प्रकारे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ मुलांसमोर सादर केले तरच शिक्षण होते, या गृहीतकापलीकडे आपण शिक्षणाचा विचार केला तर नव्या शक्यता लक्षात येऊ शकतात. अगदी पाठ्यपुस्तक या महत्त्वाच्या व मूलभूत शिक्षण-साधनाला प्रमाण मानूनही मुलांना शिकण्यासाठी चालना देण्याच्या अनेक नव्या शक्यता आपण या काळात आजमावू शकतो.

करोनामुळे मिळालेल्या दीर्घ सुट्टीत घरातल्या घरात राहून काय काय केले मुलांनी, काय काय जाणवले त्यांना, हे जाणून घेण्यासाठी अनुभव-लेख पाठवा, असे आवाहन आम्ही ‘वयम्’मासिकातर्फे केले होते. त्याला सुमारे 300 मुलांनी प्रतिसाद दिला. राज्याच्या सर्व भागांतील, राज्याबाहेरीलही इ. तिसरी ते दहावीच्या मराठी मुलांनी अनुभव-लेख पाठवले. त्याचा धांडोळा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या.
बहुतांश मुलांनी ही परिस्थिती समजूतदारपणे स्वीकारली. मिळालेला वेळ सत्कारणी लावला. अनपेक्षित परिस्थितीचा स्वीकार कसा करायचा, समस्येचे रूपांतर संधीत कसे करायचे, हे महत्त्वाचे धडे मुले शिकली.

आपण घरातील मोठ्यांना मदत कशी करायची आणि आपल्या कामासाठी कोणाची मदत केव्हा, कशी घ्यायची, हेही मुलांना शिकायला मिळाले. कधी माणसांची तर कधी तंत्रज्ञानाची मदत मुलांनी घेतली.

एरवी मुलांना जराही मोकळा वेळ मिळत नाही. त्यांचे टाईमटेबल गच्च असते. आता वेळ मिळाल्यावर त्यांनी त्याचा विनियोग कलेत रमणे, छंद जोपासणे, निरीक्षणे करणे, आत्मपरिक्षण करणे अशा अनेक गोष्टींसाठी केला.

अनेक मुलांनी लिहिले की त्यांना अवांतर वाचायला आवडते, पण वेळ मिळत नाही. या काळात मात्र अनेक मुले वाचनात गढून गेली. कथा, कादंबऱ्यात, चरित्र असे अनेक प्रकारचे साहित्य वाचल्याचे मुलांनी लिहिले आहे. महात्मा गांधीजी, महात्मा फुले, रामदास स्वामी यांचे साहिती वाचून त्यांचे विचार काही मुलांनी समजून घेतले.

काही मुले बहुविध बुद्धिमत्तेची असतात. अशी एकावेळी अनेक गोष्टी करू पाहणारी मुले त्यांचे त्यांचे वेळापत्रक बरोब्बर आखतात व ते पाळतात, हेही आम्हाला जाणवले.

स्वयंपाक, सफाई, परिसराची निगा अशी अनेक जीवनकौशल्ये मुलांनी या काळात आत्मसात केली. ही कामे याआधी करण्याचा अनुभव घेतलेली मुले विरळाच! भाकरी, घडीची पोळी, केक असे पदार्थ छान जमल्यावर होणारा आनंद मुलांनी लुटला. भांडी घासायचे आणि लडी पुसायच्या क्लूप्त्या अवगत झाल्या, हेही मुलांनी आवर्जून कळवले.

काही मुलांनी त्यांच्या घरगुती व्यवसायात सहभाग दिला. जणू व्यावसायिक इंटर्नशिप झाली त्यांची! उदा. भाजी विकणे, शेतात काम, शिवणकाम, आरोग्य सेवेतील पालकांना मदत.

बागकाम, घरगुती शेती, पक्षीनिरीक्षण, आकाश निरीक्षण अशा विरंगुळयात रमताना मुले निसर्गाच्या जवळ गेली. पर्यावरणाचे काही ज्ञान त्यांना आपोआप मिळाले.

घरातल्यांशी (पालक, ज्येष्ठ पालक, नातेवाईक) भरपूर गप्पा मारणे, ही चैन मुलांना करता आली. अनेकांच्या घरी उद्भवलेल्या बिकट परिस्थितीशी मुलांनी समजूतदारपणे जुळवून घेतल्याचे अनुभव वचनं ही मुले किती शहाणी झाली, हेही जाणवून गेले. समाजात असलेली विषमता, देशासमोरची आव्हाने अशा विषयांवर मुले विचार करती झाली. मिळालेल्या निवांतपणातून असे विषय गांभीर्याने समाजोन घेतले मुलांनी! त्यातून त्यांच्या संवेदनशीलतेला खतपाणी मिळाले.

स्वअध्ययन करण्याची सवय अनेक मुलांनी या काळात लावून घेतली. त्यासाठी स्वतच्या पद्धती विकसित केल्या. ही तर केव्हढी मोठी उपलब्धी! क्लासचा टेकू सतत नकोय, असेच जणू या मुलांनी दाखवून दिले.

मुलांना काही गोष्टी आखीवरेखीव पद्धतीने शिकण्यापेक्षा स्वत खटपट करून शिकायला आवडतात. वाद्य वाजवणे, हस्तकला, नवीन भाषा शिकणे अशा गोष्टी स्वतच्या स्वत शिकण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. कुणी त्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर केला.

अनेक मुलांना तंत्रज्ञानाची आवड असते. पण त्यात प्रयोग करण्यासाठी एयरवी उसंत मिळत नाही. करोना-काळात अनेक मुलांनी संगणकाची भाषा शिकणे, प्रोग्रामिंग करून पाहणे, घरगुती उपकरण दुरुस्त करणे असे तंत्र-शिक्षण स्वताहून घेतले.

‘वयम्’वाचकांच्या अनुभवलेखांतून व्यक्त झालेली त्यांच्या शिकण्याची रेंज किती मोठी आहे बघा–

अभ्यासातील गोष्टी- कच्चे विषय पक्के केले, पाठ्यपुस्तकातील कृती उपक्रम केले, शब्दसंग्रह वाढवला. त्यासाठी खेळ, साधने यांची मदत घेतली.
Encyclopedia, Dictionary वापरायला शिकले. गोष्टीच्या पुस्तकाचे भाषांतर (मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी) केले. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. शाळेने दिलेला अभ्यास केला.

नवीन तंत्र- प्रोग्रामिंग लँग्वेज, App बनवणे, अनिमेशन फिल्म करणे, घरगुती Sanitizer, Mouthwash, Soap बनवणे, इ. कौशल्ये - स्वयंपाक, घरातील सफाईची कामे, बेगमीचे पदार्थ करणे, शिवणकाम, घरगुती शेती, आवारात काही रुजवणे, बागेत नवे प्रयोग, व्यायामप्रकार, वक्तृत्वकला, कविता करणे, लेखन करून बघणे.

कला-छंद - वाचन, चित्रकला, हस्तकला, सुलेखन, संगीत, नृत्य, बागकाम, पक्षी निरीक्षण, आकाशनिरीक्षण, छोट्या पडद्यावर जुनी नाटके, जुने-नवे चित्रपट पाहणे, चांगले कार्यक्रम पाहणे, इ. छंदांचा आस्वाद मुलांनी घेतला. आपल्या शिक्षणव्यवस्थेचे मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ च्या मसुदयात स्पष्ट म्हटले आहे की, शिक्षण ही वितरीत करण्याची भौतिक गोष्ट नव्हे. मुले आपलीआपण विविध रीतींनी शिकत असतात. अनुभवांतून, कृतींतून, वाचनातून, व्यक्त होण्यातून, चर्चा करण्यातून, प्रश्न विचारण्यातून, ऐकण्यातून, विचार करण्यातून, पडसाद उमटवण्यातून, निरीक्षण करण्यातून, इत्यादी मार्गानी. औपचारीक शिक्षणव्यवस्थेने या सर्व कृतींना प्रोत्साहन व खतपाणी द्यायचे असते, दिशा द्यायची असते.

या मुलांनी जे अनुभव घेतलेत, त्यातून हेच तर सिद्ध झाले!

या अभ्यासक्रम आराखड्यात असेही म्हटले आहे की, औपचारीक विषयांचे ज्ञान घेण्याच्या बरोबरीने विवेकाने निर्णय घेण्याची क्षमता कमावणे, संवेदनशीलता जागी करणे, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, कामाचा अनुभव घेता येणे, कौशल्ये भिनवणे, कलाप्रकारांचे रसग्रहण करता येणे, सर्जनशीलता वाढवणे हीही शिक्षणाची मूलभूत उद्दीष्ट्ये आहेत. ही उद्दीष्ट्ये साध्य होतील अशी साधने व संधी शिक्षणव्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजेत.

सध्याच्या अवघड काळात आर्थिक विवंचना, घरातील तंटे यांचे काच सहन करणाऱ्याच मुलांना भावनिक, मानसिक आधाराची गरज भासत असेल. अनेक शिक्षक अशा मुलांशी ज्या ज्या पद्धत्तींनी संपर्क करता येईल, तो ठेवत भावनिक, मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करत असतील. काही मुलांना कृतीप्रवण करण्यासाठी जरा प्रोत्साहनाची गरज असेल. काहींमध्ये प्रेरणा चेतवणे आवश्यक असेल. शिक्षकवर्गाने सध्या एव्हढेच केले तरी पुरे. करोनाचे संकट टळेपर्यंत ऑनलाइन पाठ्यक्रम शिकवण्याचा आटापिटा करायलाच हवा असे नाही, त्यांना फोन, इंटरनेट अशा शक्य असलेल्या मार्गानी शिकत राहण्यासाठी पाठबळ देत राहिले की बास, शिकतील ती नक्की, यावर जरा विश्वास ठेवून बघूया! शिक्षकांच्या बरोबरीने समाजतील सर्व जबाबदार घटकांनी आपआपल्या घरातील, परिसरातील मुलांना संधी, साधने व प्रेरणा देऊया, जेणेकरून शिक्षणाच्या मूलभूत उद्दीष्टांपर्यंत पोचता येईल!!

-शुभदा चौकर
cshubhada@gmail.com
मुख्य संपादक, ‘वयम्’ मासिक


जून २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...