Menu

पतंग उडतो का? कसा?

image By Wayam Magazine 07 October 2022

मकर संक्रांत आली की आकाशात पतंग उडताना दिसू लागतात. पण पतंग उडविण्यासाठी योग्य वेळ कोणती? पतंग उडतो कसा? त्यामागे कोणते विज्ञान आहे?

पतंग आणि विमान या दोन्ही गोष्टींचे आकर्षण लहानथोर सर्वांनाच असते. दोन किंवा अधिक पतंगांची चढाओढदेखील आपले लक्ष खिळवून ठेवण्यास समर्थ असते. कोणाचा पतंग गोते खातोय, कोणाचा कटतोय किंवा कोणाचा उंच उंच जातोय हे महत्त्वाचे नसते, पण मनोरंजक असते.

पतंगाच्या या खेळाने मराठीला अनेक वाक्प्रचार बहाल केले आहेत. त्यात 'वावडी उठविणे', 'गोते खाणे', 'ढील देणे', 'अट्टी लावणे' यांसारख्या वाक्प्रचारांचा समावेश आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेत वारंवार नापास होत असेल तर तो 'गोते खातोय' असे उपहासाने म्हटले जाते. नेहमी खोटे बोलणारी एखादी व्यक्ती अट्ट्या लावणारी म्हणून प्रसिद्ध होते! 'वावडी' म्हणजे खूप मोठ्ठा पतंग असणे. वावड्या उठविणे या वाक्प्रचाराचा अर्थ अफवा पसरविणे असा असतो. बेन्जामिन फ्रॅन्कलीन यांनी पतंगाच्या खेळातून विद्युत्शक्तीचा शोध लावला, असे एक अर्धवट सत्य सांगितले जाते. पण त्यांनी शोध लावला नव्हता, तर आकाशात चमकणारी वीज व विद्युत्- शक्ती एकाच स्वरूपाच्या आहेत हे दाखविण्याचा तो खटाटोप होता. अठराव्या शतकात ह्या विजेचा व विद्युत्शक्तीचा एकमेकांशी काही संबंध नाही असाच समज प्रचलित होता. पण बेन्जामिन साहेबांच्या मनात मात्र ह्या दोन्ही वेगळ्या नसून एकच आहेत असा ठाम विश्वास होता. प्रवाहातील विसंवाद, रंग आणि आवाज यात दोन्हींमधील असलेले साम्य त्यांना अस्वस्थ करीत होते. म्हणूनच त्यांनी हा रेशमी पतंग उडविण्याचा प्रयोग पावसाळी वातावरणात करून, किल्लीच्या जुडग्यात आकाशातील विजेचा प्रवाह खेळवून दाखविला होता. हा प्रवाह आपल्याला घातक ठरू नये म्हणून त्यांनी किल्ल्यांचा जुडगा हातात न धरता एक प्रकारच्या घटात (लेडन जार) ठेवला होता व त्यातील दर्शकाच्या साहाय्याने तो घट पूर्णपणे प्रभारित झाला आहे हे दाखवून, आकाशातील वीज व विद्युत्-शक्ती यांत काही फरक नाही हे सिद्ध केले होते.

इतिहासात काही नोंदी अशा आढळून येतात की, बेन्जामिन साहेबांनी केलेल्या प्रयोगासारख्याच केलेल्या दुसऱ्या एका प्रयोगात किल्लीऐवजी धातूची कांब वापरण्याचा प्रयत्न केलेल्या एका वैज्ञानिकाला, विजेच्या तीव्र झटक्यामुळे आपले प्राण गमवावे लागले होते. बेन्जामिन साहेबांच्या या शोधातून स्फूर्ती घेत मायकेल फॅरेडे यांनी विद्युत् घट व विद्युत् मोटरची निर्मिती केली होती. याच प्रयोगातून विद्युत् निवार्काची देखील निर्मिती झाली होती; यावरून बेन्जामिन साहेबांचा हा पतंग विज्ञानात अजरामर झाला यात शंकाच नाही.

पतंग उडविण्यासाठी जी तयारी करावी लागते त्यात मांजा बनविणे व पतंग बनविणे ह्या दोन महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. पतंग बनविल्यानंतर त्याला योग्य असे सुत्तर पाडणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते. ह्या सर्व गोष्टींच्या मागे दडलेली वैज्ञानिक तत्त्वे अभ्यासणे देखील मनोरंजक आहे. मांजा म्हणजे पतंग उडविण्यासाठी लागणारा धागा. यासाठी 'सनÓ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धाग्याचा वापर अधिकतर केला जातो. या धाग्याची रिळे आणून त्यावर काचेची पूड व शिरस (जनावरांच्या चरबीपासून तयार केलेला एक प्रकारचा चिकट पदार्थ किंवा डिंक) यांच्या मिश्रणाचा लेप दिला जातो. त्यामुळे धागा अतिशय पक्का बनतो व सहजासहजी तुटत नाही.

आम्ही लहान होतो तेव्हाही म्हणजे ४०-५० वर्षांपूर्वी मांजा तयार करण्याची कृती खूपच किचकट होती. दोन ते तीन बालकामगार त्यात (आमचे आम्हीच) वेठीला धरून हे काम होत असे. शिवाय सर्वांच्याच घरी हे असले उद्योग मान्य नसायचे, त्यामुळे हा छुपा उद्योग दूर जाऊन करावा लागे. थोड्या खोलगट असलेल्या एका पसरट थाळीत शिरस आणि काचेच्या पुड्यांचे मिश्रण केले जात असे. शिरस गरम असेल तरच ती द्राव स्वरूपात राहते हे विज्ञान आम्हांला तिसरी इयत्तेतच समजले होते, ते त्यावेळी बसलेल्या चटक्यांमुळे! एक मुलगा हातात ही थाळी धरून उभा राहत असे. त्या थाळीत दाभण उभा ठेवून त्यातून धागा ओवला जात असे. एक मुलगा हा धागा दुसऱ्या बाजूने ओढायचा व दूर खेचत न्यायचा. त्यामुळे धाग्यावर लेप व्यवस्थित बसून तो चटकन वाळतही असे व त्यानंतर तो चक्रीवर गुंडाळला जात असे. ह्या कृतीला कधी कधी ३ ते ४ तास सहज लागत होते! शिवाय काचेने हात कापले जाणे व हाताला चटके बसणे हे दोन संभाव्य धोके यात होते, ते निराळेच! मांजामुळे काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत.

पतंग कसा बनवायचा?
बाजारात पतंग बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे ताव मिळतात. आपण हे पतंग वापरलेल्या वह्यांच्या कागदापासून किंवा वर्तमानपत्राच्या कागदापासून देखील तयार करू शकतो. कागद चौरसाकृती असेल तर त्याच्या कर्णाएवढी जाडसर काडी त्यावर फेविकॉल किंवा खळीच्या साहाय्याने चिकटवून, त्यावर दोन्ही टोकांना सेलोटेप लावावी म्हणजे ही काडी कागदाला व्यवस्थितपणे चिकटून बसेल. दुसरी जी काडी आपण वापरणार आहोत ती पहिल्या काडीपेक्षा साधारण दीडपट लांबीची व अर्धा ते पाऊणपट जाडीची असावी. कमी जाडीची ही काडी लवचीक असणे गरजेचे असते. ही काडी आपल्याला धनुष्याकृतीसारखी पतंगावर चिकटवायची आहे. कर्णाची काडी आपल्या समोर उभी येईल अशारीतीने कागद ठेवून त्यावर आधी डाव्या कोप:यात लवचीक काडीचे टोक फेविकॉलने हलक्या हाताने थोड्याशा आतल्या बाजूला चिकटवून, त्यावर त्याच कोप:यातील त्याच कागदाचा भाग चिकटवायचा व त्यावर सेलोटेप लावायची आहे. नंतर ती काडी धनुष्याकृती वाकवित तिचे दुसरे टोक विरुद्ध बाजूला तसेच चिकटवून त्यावरही सेलोटेप लावायची आहे. कर्णाच्या दुसऱ्या टोकाला एक छोटासा त्रिकोणाकृती ताव चिकटविला की झाला आपला पतंग तय्यार! त्रिकोणाकृती ताव वापरण्याऐवजी लांब पण निरुंद पट्टी जरी शेपटासारखी चिकटविली तरी चालते. पतंगाचे नीटपणे उडणे या दोन काड्यांच्या जाडीवर व शेपटीवर अवलंबून असते.

पतंग नेमका कसा उडतो?
एखादी गोष्ट हवेत गेली की गुरुत्वाकर्षणामुळे ती खाली येते हे आपल्याला माहीत आहे. पतंग जेव्हा हवेत जातो तेव्हा त्याच्यावर देखील गुरुत्वाकर्षण कार्य करीत असते. मग तो खाली का बरे येत नाही? त्याचे कारण आहे वारा! वारा त्या पतंगावर कार्य करीत असतो व तो त्याला हवेत खालून वर ढकलण्याचे प्रयत्न करीत राहतो. काही वेळा जोरदार वारा आला तर प्लास्टिकची एखादी पातळ पिशवी किंवा कागदाचा कपटा त्या भोव:यात सापडला, तर कधीकधी तो खाली न येता गरगर फिरत वरवर जाताना आपल्याला दिसतो. पंख्यासमोर जर आपण एखादी रिबन धरली तर ती तरंगाच्या स्वरूपात फडफडू लागते, हेही आपण पाहिले असेल. पंख्याच्या पात्याच्या हालचालीमुळे जे हवेचे झोत निर्माण होतात ते त्यालाही कारणीभूत असतात. आता एखादी वस्तू, किंवा कागदाचा कपटा किंवा पतंग हवेत किती उंच जाऊ शकेल, हे त्याच्या आकारावर व वजनावर देखील अवलंबून असते. कागदाचा कपटा हवेत वरवर जाऊ शकेल पण त्या कपट्याची चुरगाळून गोळी केली व ती हवेत फेकली तर ती अजिबात वर वर जाणार नाही, तर एकदम खाली येईल; कारण त्याचे आकारमान लहान होते व वजन एकत्रित होऊन तो खाली येतो. पतंग जरी मोठा असला तरी त्याला आपण ज्या बांबूच्या कामट्याचा आधार दिलेला असतो त्यामुळे वा:याला ह्या पतंगाला वर ढकलणे सोपे जाते. त्याशिवाय त्याला आपण जी कन्नी बांधतो किंवा सुत्तर पाडतो त्यामुळे देखील तो हवेत स्थिर राहतो किंवा खाली न येता वरवर जातो.

पतंगाला सुत्तर कसे पाडतात?
हे विज्ञान समजावून घेणे देखील आवश्यक आहे. पतंगाच्या उभ्या व सरळ काडीभोवती वरच्या टोकापासून साधारणपणे एक बोट खाली काडीच्या दोन्ही बाजूंना व अगदी जवळ जवळ एकेक छिद्र पाडून, त्यातून पतंगाच्या बाजूपेक्षा मोठा दुहेरी धागा ओवून घ्यायचा. त्या धाग्याचे दुसरे टोक काडीच्या खालच्या बाजूला त्या टोकापासून तेवढ्याच अंतरावर तसेच ओवून घ्यायचे असते. म्हणजे आता एखाद्या पेटीच्या कडीसारखा तो दुहेरी धागा हातात खेळविता येईल. मग त्याला दोन्ही टोकांपासून समान अंतरावर पक्की गाठ बांधली की, आपला पतंग उडविण्यास योग्य झाला. नंतर गाठीशी त्याला मांजा बांधला की आपण तो हवेत पाठवू शकतो. पतंगाच्या काड्या, सुत्तर व ताव यांच्या एकत्रित परिणामामुळे तो हवेत उडू लागतो व आपल्याला पतंग उडविल्याचा आनंद मिळू लागतो.

पतंग कोणत्या वेळी छान उडतो?
पतंग उडविण्यासाठी योग्य वेळ कोणती? झाडांची पाने हलत असली व उजेड असला, तर ती वेळ योग्य समजायला हरकत नाही. जेव्हा इमारतीवर झेंडा फडकत असतो त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १० ते २५ किलोमीटर एवढा असू शकतो व त्या वाहत्या वाऱ्यात पतंग अगदी छान उडू शकतो.

--डॉ. शरद काळे
--sharadkale@gmail.com

वयम् मासिकाचा सदस्य होण्यासाठी कृपया वरच्या उजव्या कोपर्यातील सभासद व्हा बटनावर या क्लिक करून व ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही सभासद होऊ शकता. धन्यवाद!

My Cart
Empty Cart

Loading...