Menu

पार्सल

image By Wayam Magazine 14 November 2022

By Faaruq S Kaazi,  On 24th July 2020, Children Magazine

निरागस अलफाज आणि त्याचे प्रेमळ व समजूतदार अम्मी-अब्बू यांची ही तरल गोष्ट- शाळा सुटली आणि अलफाज घरी आला. दप्तर ठेवलं आणि हात पाय धुऊन खेळायला पळाला. आज मॅच ठरली होती गावातल्या पोरांशी... आज त्यांना हरवायचंच, असं सगळ्या गॅंगने ठरवलं होतं. अलफाज बेस्ट बॅटसमन होता... हमखास मॅच जिंकून देणारा. तो घाईतच गेला. जाता जाता त्याला अब्बू येताना दिसले. ते पार थकून गेलेले भासत होते. आज जास्त टपाल असणार. अलफाजचे अब्बू पोस्टमन होते. त्यांना पत्र वाटण्यासाठी तीन-चार गावात फिरावं लागे. अलफाजने अब्बुना ‘खेळायला जातो’ असं सांगितलं आणि तो पळाला.

अब्बू घरात आले. त्यांनी फ्रेश होऊन चहा घेतला. खुर्चीवर पेपर वाचता वाचता तिथेच झोपी गेले. उगीच झोपमोड होईल म्हणून अम्मीनेही त्यांना उठवलं नाही. अलफाज खेळून आला, तेव्हा ते अजून झोपलेलेच होते. नमाजला उशीर ओईल म्हणून अम्मीने त्यांना उठवलं. अब्बू नमाजला गेल्यावर अलफाज घरात आला आणि तो अब्बुंच्या बॅगेजवळ गेला. अब्बू नेहमी त्याच्यासाठी काही न काही आणत. आजही काहीतरी आणलेलं असेल या आशेने त्याने बॅग तपासली. पण आज त्याच्यासाठी काही नव्हतं. पण एक जाडजूड वस्तू त्याच्या हाती लागली. त्याने बाहेर काढून पाहिलं. एक पिवळ्या रंगाचं पार्सल होतं. आत काहीतरी जाडजूड होतं. अलफाजची उत्सुकता ताणली गेली. त्याने हळूच ते पार्सल उचललं आणि आतल्या खोलीत गेला.

अब्बूंना कळणार नाही अशा पद्धतीने त्याने पार्सल फोडलं. पाहतो तर काय, एक सुंदर जाडजूड गोष्टींचं पुस्तक! अलफाज हरकून गेला. पुस्तक म्हटलं की तो वेडावून जायचा. सरांकडून तो नेहमी पुस्तकं वाचायला आणायचा. अब्बुंना महागडी पुस्तकं घेणं शक्य नव्हतं, पण चौथीतल्या अलफाजला वाचनाची गोडी लागावी, म्हणून ते त्याला नवनवीन गोष्टी सांगायचे.

ते पुस्तक खूप सुंदर होतं. अलफाजने वाचायला सुरवात केली. भरपूर चित्रं आणि ठळक अक्षर! अलफाज त्यात गुंतून गेला.

“अल्फू बेटा, खाना खाने आ जाओ... अब्बू आयले हैं!”

“आया अम्मी....!”

अलफाज गडबडला. अम्मी आत येईल या भीतीने तो पटकन उठला. पुस्तक दडवून ठेवायला विसरला नाही.

जेवण आटोपून अलफाज त्याच्या खोलीत गेला. आतून कडी लावून बसला. पुस्तक काढलं व अधाश्यासारखा वाचू लागला. वाचता वाचता तो तिथेच झोपी गेला.

त्याला जाग आली ते अम्मीच्या उठवन्याने. अलफाज गडबडीने उठला. पुस्तक लपवलं आणि सकाळच्या कामाला लागला. अब्बू पोस्टात निघून गेले होते. अलफाज आपलं आवरून शाळेत गेला. शाळेतही त्याला सतत ते पुस्तक आठवत होतं. कधी एकदा शाळा सुटतेय, अन पुस्तक वाचतोय, असं त्याला झालं होतं.

शाळा सुटली एकदाची. अलफाज तडक घरी आला. कपडे बदलले नाहीत की खेळायला गेला नाही. परत आतल्या खोलीत गेला आणि कडी लावून बसला. पुस्तक वाचून पूर्ण करायचं होतं त्याला! त्याने ते पुस्तक जवळ जवळ संपवत आणलं होतं. इतक्यात अब्बुंचा आवाज कानी पडला.

“बेटा अल्फू. तुने पार्सल देखा क्या? मेरे बॅग में था. पर अब नहीं दिखता...” अलफाज घाबरला. पुस्तक तर सोडवेना. अलफाज खोटं बोलला, “नै अब्बू. मैने नै देक्या!” ते पार्सल रस्त्यात कुठं पडलंय का ते पाहायला अब्बू बाहेर गेले. रात्र झाली. जेवणाच्या वेळी अब्बू घरात आले.

“सापडलं का?” अम्मीने आल्या आल्या विचारलं. अब्बुंनी ‘नाही’ अशी मान हलवली. ते खूप उदास दिसत होते. अम्मीने जेवण वाढलं, पण अब्बुंचं मन लागेना. “काय झालं?”

“ते पार्सल मिळायला हवं होतं....! एका लेकरासाठी त्याच्या बाबांनी पाठवलेली ती वाढदिवसाची भेट होती. आज त्याची आई पोस्टात येऊन गेली. आज त्या मुलाचा वाढदिवस! त्याचे बाबा फौजी आहेत. काश्मीरमध्ये. तिथून पाठवलं होतं त्यांनी. बापाची भेट माझ्यामुळे मुलापर्यंत नाही पोचली.”

अब्बुंच्या डोळ्यात पाणी आलं. अलफाज खजील झाला. त्याला स्वत:ची लाज वाटू लागली. आपण वाईट काम केलं आणि वर खोटं बोललो... अब्बुना दुखावलं. ‘नाही, आपण चूक सुधारायला हवी!’ तो मनातल्या मनात म्हणाला.

अलफाज जेवण आटोपून उठला. त्याने पार्सल बाहेर काढलं. पत्ता वाचला. तो होता जवळच्या गावातला. त्याने पुस्तक पपरत पाकिटात टाकलं. ते चिकटवलं. “अम्मी मित्राकडून गाईड घेऊन येतो.”

“जल्दी आना अल्फू....!”

अलफाज पटकन बाहेर आला. संदीपला गाठलं. त्याला सगळी हकिगत सांगितली. संदीप हा अलफाजचा जिवलग मित्र. दोघंही सायकलवरून निघाले. गाव जवळच होतं. दोघं नाव विचारत विचारत त्या घरी गेले.

“काकू, गौरव आहे का?”

गौरवची आई बाहेर आली. तिने या दोघांना ओळखलं नाही.

अलफाजने सगळी हकिगत सांगितली. गौरवची आई कौतुकाने पाहत होती दोघांकडे. “बाळांनो, खूप उशिरा आलात. आज गौरवचा वाढदिवस होता. पाप्पांचं गिफ्ट नाही आलं म्हणून रडून रडून झोपला तो. केकही कापला नाही त्याने... मित्रांना माघारी घालवून दिलं.” गौरवच्या आईने गौरवला उठवलं. त्याला गिफ्ट दाखवलं. तो हरखून गेला. अलफाजच्या गौरवच्या आईला म्हणाला, “काकू, मला माफ करा!”

गौरवची आई म्हणाली, “माफी कां मागतोस.? तूही लहान आहेस, पण तू ज्या मायेनं पार्सल आणून दिलंस त्याला तोड नाही. सावकाश जा.”

अलफाज घरी आला. अम्मीला त्याने खरं काय ते सांगितलं आणि माफीही मागितली. अम्मीने त्याला पोटाशी धरलं आणि म्हणाली- “बिट्टू, पुन्हा अशी चूक करू नकोस.”

अम्मीने अब्बुना सगळं सांगितलं तेव्हा त्यांनी त्याला जवळ बोलावलं. ते म्हणाले, “तू चूक केलीस, पण ती चूक दुरुस्तही केलीस. अच्छा लगा बेटा. अशी चूक तू पुन्हा करणार नाहीस याची खात्री आहे मला. येत्या वाढदिवसाला तुला मोठं गोष्टीचं पुस्तक भेट देईन ह मी.” अलफाज हरखून गेला. आता तोही शांत झोपी गेला. आपल्याला मोठं चित्रांचं सुंदर पुस्तक गिफ्ट मिळाल्याचं स्वप्न त्याला पडलं. तो झोपेत हसतच होता. ते पाहून अब्बू-अम्मीही खूष होते.

-फारूक एस.काझी


जुलै २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...