Menu

ओझं - एक छोटी गोष्ट लहान मुलांचा मराठी मासिकात

image By Wayam Magazine 20 October 2022

‘तंबी दुराई’ म्हणून महाराष्ट्रातील वाचक ज्यांना ओळखतात, त्या मार्मिक लेखकाची ही मनस्वी गोष्ट - ओझं 


  नेहा आणि रिया दोघीही स्कूटीवर होत्या. स्कूटर चालवण्याचं दोघींचंही वय नव्हतं. दोघीही यावर्षी दहावीत होत्या आणि शाळा, क्लास, अभ्यास यातच दिवस जात होते. आज अचानक थोडं रिलॅक्स होण्याची संधी मिळाली. क्लासला अचानक सुट्टी मिळाली होती. दोघींचेही आई-बाबा घरी नव्हते आणि दोघींच्या आयांच्या स्कूटी सोसायटीच्या आवारात उभ्या होत्या. ठरलेला अभ्यास झाल्यावर दोघींनीही स्कूटर चालवून पाहण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. स्कूटर शिकून झालेली होती, परंतु अजून नीट चालवता येत नव्हती. शिवाय कायद्यानुसार स्कूटर चालवण्याचं वयही झालेलं नव्हतं. सोसायटीच्या गेटपासून रस्त्यापर्यंत म्हणजे साधारण अर्धा किलोमिटर जाऊन त्या परत आल्या. रहदारीच्या रस्त्यावर जाण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही. तिथून परतून गेटमधून सोसायटीच्या पार्किंगपर्यत जाता जाता दोघीही आपल्या पराक्रमावर खूश होत्या. दोघींनी आपापल्या स्कूटीवर बसूनच एकमेकींना टाळी दिली आणि त्या टाळीनंच घात केला. दोघींचाही तोल गेला. रिया स्कूटरसह खाली पडली आणि नेहाच्या स्कूटीनं समोर जाऊन थेट एका कारला धडक दिली. कारच्या एका हेडलाईटची काच फुटली. त्या काचेचे दोन-तीन तुकडे उडाले. पराक्रमाची सांगता या अवचित अपघाताने आणि कदाचित भावी संकटाने झाली. दोघींनाही फार काही लागलं नव्हतं. रियाच्या हाताला थोडंफार खरचटलं होतं. स्कूटी व्यवस्थित होती. नेहाच्या स्कूटीलाही काही झालं नव्हतं.

दुपारी तीनची वेळ होती. सगळीकडे शांत शांत होतं. ही पार्किंगची मागची बाजू असल्यानं वॉचमननंही हा अपघात पाहिला नव्हता.

“बरं झालं, कुणीच नाहीये, चटकन स्कूटी पार्क करून निघूया आपण.” रिया नेहाला म्हणाली. नेहाचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दाटून आले होते. स्वतःशीच बोलावं तसं तिनं विचारलं, “कुणाची आहे गं ही गाडी?”

“आपल्या ओळखींच्यांपैकी कोणाची नाही. चल लवकर, जाऊ दे,” असं म्हणत रिया घाई करू लागली.

“एक मिनिट गं…” असं म्हणत नेहा तिथून गेली. आता ही बया कशाला इथं रेंगाळते आहे, कुणी आलं तर पंचाइत व्हायची, म्हणत रिया तिथंच थांबून नेहाची वाट पाहू लागली.

नेहा तडक सोसायटीच्या गेटकडे धावत गेली, ती थेट वॉचमनच्या केबिनकडेच गेली. त्याच्याकडे आल्या-गेलेल्यांच्या नावांची नोंद करण्यासाठी ठेवलेलं रजिस्टर आणि काही कोर्या कागदांचा गठ्ठा होता. त्यातलं एक कोरं पान आणि पेन तिनं आणलं. त्या कागदावर लिहिलं-

व्हेरी सॉरी. माझ्या स्कूटीचा धक्का लागून तुमच्या गाडीच्या हेडलाईटची काच फुटली. मी सी-५०२ मध्ये राहते. माझा फोन नंबर ७६५४००२२१ आहे. -नेहा एवढं लिहून तिनं कागदाची सुरळी केली आणि फुटलेल्या काचेच्या फटीत सरकवली.

ती लिहीत असताना मध्ये डोकं खूपसून रिया आ वासून पाहातच होती. “अगं बावळट, काय करते आहेस हे? कशाला करते आहेस हे सगळं? आपल्याला कुणीही पाहिलेलं नाही.”

नेहानं तिच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाली, “चल.”

नेहा घरी गेली तरी तिचं कशात मन लागेना. एक तर आई-बाबांची परवानगी न घेता तिनं स्कूटी चालवायला घेतली होती. त्यात हा अपघाताचा एक नसता उद्योग होऊन बसला होता. ज्याची गाडी आहे ती व्यक्ती फोन तरी करेल किंवा थेट घरी तरी येईलच नक्की. आई-बाबा आले की, त्यांना सगळं सांगून टाकायचं आणि मनावरचा भार हलका करायचा, असं तिनं ठरवून टाकलं. काय ओरडा मिळेल तो खायचा आता! कोणी मोठं माणूस सोबत नसताना आपण स्कूटी काढायला नकोच होती... अजून नीट चालवता येत नाहीये, लायसन्स नाहीये, तरी... मी चालवायलाच नको होती.. पण आता घडू नये ते किंवा जे घडायचं होतं ते घडलंच आहे... असं विचारचक्र तिच्या मनात सुरू होतं. नेमका त्या दिवशी आई-बाबांना घरी यायला उशीर झाला. तोवर नेहा झोपाळली होती. सकाळी उठली आणि शाळेच्या धामधुमीत ती काल काय घडलं ते आई-बाबांना सांगायला विसरूनच गेली. शाळेत गेल्यावर कधीतरी तिला ते आठवलं आणि मग तिच्या पोटात बाकबुक सुरू झालं. आपण आपल्या फ्लॅटचा नंबर दिला होता. ज्याची कार आहे ते थेट आपल्या घरी गेले असतील तक्रार घेऊन, तर मग आज घरी गेल्यावर काय होईल माहिती नाही. आपण मोबाइल नंबरही लिहिला होता चिठ्ठीत, त्यांनी फोन केला तर बरं होईल.... असे नाना विचार तिच्या मनात घोळू लागले आणि तिचं शाळेतलं लक्ष उडालं. मधल्या सुट्टीत तिनं आईला सहज म्हणून फोन केला आणि घरातल्या वातावरणाचा अंदाज घेतला. सगळं काही नॉर्मल होतं. ज्याची कोणाची गाडी आहे, त्या व्यक्तीनं कदाचित अद्याप ती चिठ्ठी पाहिलीच नसेल, असंही तिला वाटून गेलं.

रियाची आणि तिची शाळा वेगळी होती. संध्याकाळी शाळा सुटल्यावर तिला रियाचाही फोन आला आणि तिनंही “सगळं काही ठीक ना गं?”, अशी चौकशी केली. “तू ती चिठ्ठी लिहायलाच नको होती”, असं पुन्हा एकदा तिनं नेहाला सांगितलं. मात्र आपण जे केलं ते योग्यच केलं असं नेहाला मनापासून वाटत होतं. आज घरी गेल्यावर आई-बाबांना सगळं सांगून टाकायचं, असं तिनं ठरवून टाकलं.

नेहा स्कूलबसमधून उतरली तर तिला सोसायटीच्या गेटवर बरीच गर्दी दिसली. माने काकांचा रडून डोळे लाल झालेला चेहरा दिसल्यावर, काय झालं असावं, ते तिच्या लक्षात आलं. माने काकांचे बाबा म्हणजे शरयूचे आजोबा आजारी होते. ते गेले असावेत. नेहाच्या शेजारचाच फ्लॅट मानेकाकांचा होता. नेहाची आई तिला पाहून गर्दीतून पुढे आली आणि म्हणाली, “तू जा घरी, इथं नको थांबूस.”

नेहा फाटकातून आत गेली आणि स्वतःच्याही नकळत ती घरी जाण्याऐवजी सोसायटीच्या पार्किंगकडे गेली. थेट त्या कारच्यापुढे जाऊन उभी राहिली. फुटलेला हेडलाईट आणि त्याच्या काचेत खुपसलेली ती चिठ्ठी अजूनही तशीच होती. क्षणभर तिला मोह झाला, रिया म्हणते ते ऐकावं का? चिठ्ठी काढून टाकण्याची संधी होती. रियाच्या मते आपण चूक केली होती, ती सुधारण्याची संधी अजून गेलेली नव्हती. पण केवळ काही क्षणच! तिनं त्या चिठ्ठीकडे पुन्हा एकदा पाहून घेतलं आणि घरी गेली.

मानेकाकांच्या घरचे काही पाहुणे दोन-तीन दिवस झोपायला नेहाकडेच होते. स्वैपाकही अर्धा नेहाकडे, अर्धा शरयूकडे होत होता. या असल्या वातावरणात आणि घरी सतत कोणीतरी पाहुणे असताना आपण गाडीच्या अपघाताविषयी, आपण ठेवलेल्या त्या चिठ्ठीविषयी काही सांगावं, हे नेहाला प्रशस्त वाटत नव्हतं. मात्र शाळेतून आल्यावर घरी जाताना नेहा गाडीकडे चक्कर टाकायची आणि ती चिठ्ठी तिला तिथेच दिसायची.

रियाला तर आता हे सगळं एखाद्या रहस्यकथेसारखं वाटू लागलं होतं. ती रोज विचारायची, “चिठ्ठी आहे का गं तिथंच? गाडी आहे का तशीच...?” असे आणखी तीन-चार दिवस गेले. पाचव्या दिवशी नेहा शाळेतून आल्यावर पार्किंगकडे गेली, तेव्हा मात्र गाडी जागेवर नव्हती. म्हणजे ज्यांची गाडी होती, त्यांना आता सगळं कळलं असणार. आता घरचं, शेजारचं वातावरणही नॉर्मल झालं होतं. ‘आता लगेचच ट्यूशनला जायचं आहे, पण उद्या सकाळी आपण सगळं घरी सांगून टाकायचं’ असं तिनं ठरवून टाकलं.

सकाळी सगळे ब्रेकफास्टच्या टेबलवर बसलेले होते. बाऊलमध्ये सांबार होता आणि गरमागरम इडल्या त्यात कधी पडतात याची वाट नेहा आणि तिचे बाबा पाहात होते. जे झालं ते सांगण्यासाठी नेहा मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती. तेवढ्यात बेल वाजली. बाबा गेले आणि दार उघडलं. बाहेर कुणीच नव्हतं. त्याचं लक्ष दाराच्या कडीकडे गेलं. कडीत एक कागद खुपसलेला होता. त्यांनी तो काढला आणि तो वाचून ते गोंधळून गेले. ते मोठ्यानं म्हणाले, ‘गॅरेजचं बिल आहे. फुटलेला हेडलाईट रिप्लेस केल्याचं.’ बहुधा कोणीतरी चुकून ते आपल्या दाराच्या कडीत खुपसलं असावं. नेहानं ते ऐकलं. आपण सांगायच्या आधी ते असं कळावं याचं वैषम्य तिच्या चेहऱ्यावर उमटलं. तिचे बाबा बिल घेऊन आत वळले तशी पुन्हा बेल वाजली. दारात एक गृहस्थ जरा रागीट चेहऱ्यानंच उभे होते. त्यांनी नेहाच्या बाबांकडे पाहून विचारलं- ‘नेहा...इथंच राहते का?’

‘हो... मी तिचा बाबा. या ना, आत या’
गृहस्थ आत आले आणि म्हणाले, ‘मीच ते बिल ठेवलं होतं.’ ‘पण हे?...’

‘तुमच्या मुलीच्या गाडीचा धक्का लागून माझ्या गाडीचा हेडलाईट फुटला. गाडी चालवता येत नाही तर कशाला चालवावी? तुम्हांला तुमच्या मुलांवर लक्ष नाही का ठेवता येत?’

हे सगळं बंबार्डिंग सुरू असताना नेहाच्या बाबांचा चेहरा कसनुसा झाला. तिच्या आईनं गॅस बंद करून बाहेर येण्यासाठी पदर खोचला आणि नेहाही अपराधी चेहऱ्यानं सगळं काही कबूल करण्याच्या तयारीनं किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. “मी सांगते सगळं बाबा. माझीच चूक आहे. माझ्याकडून फुटला लाईट....”

तेव्हढ्यात ते गृहस्थ पुढे आले आणि त्यांनी विचारलं, “तूच आहेस का नेहा?” “हो, मीच आहे.” नेहाचा चेहरा अधिकच अपराधी झाला.

अचानक त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला. रागाच्या जागी एक हास्य फुललं आणि त्यांनी आपला हात शेकहँडसाठी पुढे केला. “ग्लॅड टू मिट यू नेहा. मी समीर करंदीकर. तू मला समीर काका म्हणू शकतेस.’’ नेहाची आई आणि बाबा गोंधळून गेले होते. त्यांच्या गोंधळात पुढील काही मिनिटांत अधिकच भर पडली. करंदीकरांनी आवाज देताच बाहेर उभी असलेली त्यांची बायको अंजली आणि नेहाच्या वयाची मुलगी कौमुदी आत आली.

करंदीकरांनी चिठ्ठीचा सगळा किस्सा सांगितला आणि म्हणाले, “आम्ही गेल्याच आठवड्यात या सोसायटीत राहायला येण्यासाठी थोडे सामान हलवले. परत जुन्या घरी गेलो. चार-पाच दिवसांत तिकडचं सगळं आवरलं आणि काल इथं आलो, तर कारचा लाईट फुटलेला आणि त्यात ही चिठ्ठी. फुटलेला लाईट बघून मी वैतागलो. वाटलं, काही खरं नाही. बहुधा आपण चुकीच्या सोसायटीत फ्लॅट घेतला आणि मग ही चिठ्ठी पाहून मात्र सुखावलो. वाचून शांत झालो. इथं चांगली माणसं राहतात याची खात्री पटली.”

करंदीकरांची बायको म्हणाली, ‘’अहो, मुलं चुकणारच. त्यांनी नाही अशा चुका करायच्या तर कोणी करायच्या? पण आम्हांला नेहाचा प्रामाणिकपणा खूप भावला. चार लोकांसमोर झालेली चूकसुद्धा कबूल करायला आपण तयार नसतो. आणि नेहानं मात्र स्वतःची चूक कबूल केली आणि तीही लेखी. स्वतःचं नाव, फ्लॅट नंबर वगैरे लिहून. तिला भेटून तिचं कौतुक केलं पाहिजे, असं आम्हांला वाटलं.’’

नेहानंही मग सगळं सांगून टाकलं आणि हे सगळं आपण आई-बाबांना आज सांगणारच होतो याचीही कल्पना दिली.

त्यानंतर गप्पा रंगल्या. सगळ्यांनीच इडली-सांबारचा नाश्ता केला. करंदीकरांनी नेहाला आणि सगळ्यांनाच त्यांच्या घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. शेवटी नेहाचे बाबा म्हणाले- ‘’नेहानं केलं ते मलाही आवडलं. पण तरीही तिनं आम्ही घरी नसताना स्कूटी चालवायला काढली ही चूकच झाली.’’ मग करंदीकरांना ते म्हणाले, “तुम्ही या बिलाची रक्कम माझ्याकडून घेतली, तरच मला बरं वाटेल.”

त्यावर करंदीकर हसत हसत म्हणाले, “त्यापेक्षा मी संधी मिळेल तेव्हा तुमच्या गाडीचा हेडलाईट फोडतो, म्हणजे फिट्टंफाट होईल.” त्यानंतरच्या हास्यकल्लोळात नेहाचे आई-बाबा मनमोकळेपणे सामिल झाले, तेव्हा नेहाच्या मनावरचं मोठे ओझं उतरलं होतं.

-श्रीकांत बोजेवार
My Cart
Empty Cart

Loading...