By Wayam, On 11th March 2020, Children Magazine
रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त -
रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते. हा निसर्ग म्हणजे रंगाचा कारखाना आहे असं वाटतं. रंग हा आपला आवडीचा प्रकार. होळीच्या वेळी आपण विविध प्रकारच्या रंगाची उधळण करतो. परंतु आजकाल या रंगांमुळे शरीराला हानी पोहचलेल्याच्या बातम्याही आपणाला वाचायला मिळतात. हो ना ! असं का होतं बरं? मग चांगले रंग कोणते? आजकाल ‘इको फ्रेंडली’ रंग वापरण्याचा सल्ला आपणाला अनेकदा ऐकायला मिळतो. परंतु हे ‘इको फ्रेंडली’ रंग म्हणजे नक्की कोणते रंग आणि हे बनतात कसे? शिवाय हे हानिकारक का नसतात? ...आमचे हे कुतुहूल दूर झाले ते ‘वयम्’च्या उद्योग भेटीमुळे. रंग विशेषांक असल्याने यावेळी ‘इको फ्रेंडली’ रंग बनवणाऱ्या कंपनीला आम्ही भेट दिली. या कंपनीचं नाव होतं ‘लेजर मॅजिक कलर’. अंधेरी येथे या कंपनीचं ऑफिस होतं. या कंपनीची मुख्य फॅक्टरी अहमदाबाद येथे आहे. ‘लेजर मॅजिक कलर’ कंपनीची माहिती आम्हांला तेथील शास्त्रज्ञ राजा पटवर्धन काकांनी दिली. राजा पटवर्धन काकांनी आमचं स्वागत केलं आणि आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आम्हांला कागदापासून बनवलेल्या गणपती बाप्पाची छोटी मूर्ती दाखवली. ही मूर्ती वजनाने एकदम हलकी होती. या मूर्तीवरील रंगाना जास्त चकाकी नव्हती. मूर्तीसोबत त्यांनी आम्हाला मातीची मूर्ती दाखवली. या मूर्तीवरील रंगाना मात्र चकाकी होती. कागदापासून बनवलेली मूर्ती ‘इको फ्रेंडली’ रंगानी रंगवली होती. ‘इको फ्रेंडली’ बाप्पाची मूर्ती ‘इको फ्रेंडली’ रंगानी रंगवायची, या जिद्दीने त्यांनी पटवर्धन काकांनी खास संशोधन करून आकर्षक असे ‘इको फ्रेंडली’ रंग तयार केले. आता बाजारपेठेत या ‘इको फ्रेंडली’ रंगाना खूप मागणी असते.
यावर आमच्यातल्या एकाने विचारले की काका ‘इको फ्रेंडली’ रंग म्हणजे नक्की काय असतं त्यात? यावर काका म्हणाले, `‘इको फ्रेंडली’ रंग म्हणजे नैसर्गिक रंग. या रंगामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ मिसळलेले नसतात. जी गोष्ट निसर्गातून आपण घेतो ती निसर्गाला आपण परत केली पाहिजे. अन्यथा निसर्गतः निर्माण होणाऱ्या गोष्टींचा ऱ्हास होईल. यासाठी आपण प्रत्येकाने निसर्गप्रेमी असलं पाहिजे. हवा, पाणी शुद्ध ठेवलं पाहिजे. निसर्गाला बाधा निर्माण होईल अशा गोष्टी आपण निर्माण करता कामा नये. या प्रकारचं वर्तन म्हणजे ‘इको फ्रेंडली’ जीवनशैली. उदा. होळी-धुळवड आणि रंगपंचमीला रंग आणि रंगीत पाणी तुम्ही उडवता, तळ्यात रंग टाकता. त्यामुळे कोणाला, अगदी तळ्यातील प्राण्यांनादेखील हानी पोहचता कामा नये. हे जर तुम्हां लहान मुलांनी लक्षात ठेवले तरच तुम्ही निसर्गाशी मैत्री करू शकता. आता आम्ही नैसर्गिक रंग कसे बनवतो ते पाहूया.’’
मग आम्ही त्यांच्या प्रयोगशाळेत गेलो. तिथे सीमाताई असे रंग बनवत होती. काकांनी तिला एक लिक्विड कलर बनवायला सांगितला. यासाठी ताईने पांढऱ्या रंगाची जेली आणली होती. ही जेली इडली पिठासारखी दिसत होती. ताईने साधारणतः एक किलो पांढरी जेली आणि त्यात पावडर स्वरुपात असलेला थोडासा केशरी रंग प्रमाणानुसार टाकला. हे मिश्रण ती एका यंत्राच्या (स्टरर) सहाय्याने ढवळू लागली. सीमा ताईचा लिक्विड रंग बनवून झाल्यावर राजा काकांनी आम्हांला प्रत्येकाला रंग दिला आणि हातावर, चेहर्यावर लावायला सांगितलं. या इको फ्रेंडली ऑरेंज रंगाला छान सुगंध येत होता. शिवाय तो जेली रंग खूपच मऊसहार (सोफ्ट) असा हा रंग होता. आम्ही सगळे तिथेच रंगपंचमी खेळायला लागलो. काकांनी आम्हांला सांगितलं की आता हा रंग रुमाल किंवा पाण्याने पुसून जातो काय बघा. वा! खरच रंगाचा डाग अंगावर दिसत नव्हता. नाहीतर आपण रंगपंचमी खेळलो की दोन-दोन दिवस आपल्या अंगावरील रंग निघत नाहीत. आम्हाला हा रंग खूप आवडला. यानंतर आम्हांला सीमाताईने इको फ्रेंडली पावडर कलर बनवून दाखवले. यामध्येही प्रथम पांढऱ्या रंगाची कोस्मेटीक पावडर घेतली आणि त्यात साधारण छोटा पाव चमचा गुलाबी रंग टाकला आणि स्टटरच्या ठराविक हवा तेवढा दाब देउन ही पावडर मिक्स करू लागली. पण काही लवकर गुलाबी रंग येत नव्हता. तेव्हा काकांनी आम्हांला सांगितलं की बघा, पांढरी पावडर त्या रंगाला खाऊन टाकते, म्हणून त्याचा रंग बदलत नाही. ह्या पावडरमध्ये नुसता रंग मिक्स करून ह्या पावडरचा रंग बदलणार नाही, त्यासठी यात अर्धा चमचा पाणी टाकावे लागले. आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे किंचित पाणी टाकल्यावर हळू हळू ती पांढरी पावडर गुलाबी होऊ लागली. हे पावडर कलर पण आम्ही एकमेकांना लावले. धमाल आली!
मग काकांनी आमच्याशी पुन्हा संवाद साधण्यास सुरुवात केली. काका सांगू लागले, ``आता तुम्ही रंग बनवताना पाहिलं की आम्ही कोणतेही रसायन मिक्स करत नाही. बाजारात सर्रास जे रंग मिळतात, त्यात रसायनं असतात. त्यापासून आपल्याला बाधा होऊ शकते. हे रंग आम्ही टनावर विकतो. इको फ्रेंडली कलर कसे बनतात ते आम्ही प्रत्यक्ष बघितले. आमच्या मनात काही प्रश्न आले. ते आम्ही काकांना विचारण्यास सुरुवात केली.
`काका, इको फ्रेंडली कलर बनविण्यासाठी जी पांढरी जेली घेतली ती निसर्गातील कोणत्या गोष्टींपासून बनवलेली आहे ?’ -झाडाच्या खोडावर जो डिंक असतो तो डिंक आणि पाणी यांच्या मिश्रणावर रसायनं न वापरता ही पांढरी जेली बनवली आहे. निसर्गातील रंगीत भाज्या, फळे, बिया, फुलं, पाने अशा गोष्टींपासून आम्ही हे नैसर्गिक रंग बनवतो.
नॉर्मल रंग आणि इको फ्रेंडली रंग यात नेमका फरक कोणता ? पहिला फरक म्हणजे इको फ्रेंडली रंगात रसायनं नसतात. सर्व गोष्टी ह्या इको फ्रेंडली रंगात योग्य प्रमाणातच वापरलेल्या असतात यात रंगाचं प्रमाण हे अत्यल्प असते. इको फ्रेंडली रंगांचा सजीव सृष्टीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. तसेच याचे डागही राहत नाहीत. होळीच्या वेळी हातगाडीवर रंगाचे जे मोठे ढीग दिसतात ते रंग मात्र घातक असतात.
इको फ्रेंडली रंग हे फक्त होळीसाठी वापरले जातात की आणखी कोणत्या गोष्टीत वापरता येतात ?
इको फ्रेंडली रंग हे फक्त होळी-रंग्पंचमीसाठी वापरत नाहीत, तर रंगकाम, डेकोरेशन, हस्तकला यांसाठीही वापरता येतात.
बाजारात तुमचे रंग कोणत्या नावाने विकत मिळतात आणि कुठे ?
बाजारात ‘मजिक कलर’ या नावाने आमचे हे रंग मिळतात. होळीच्या मोसमात मॉलमध्येही आमचे रंग मिळतात. शिवाय मुंबई ग्राहक संघाच्या सदस्यांना आम्ही रंग पुरवतो.
हे रंग आम्ही घरच्या घरी आम्ही बनवू शकतो का ?
हो तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता. त्यासाठी वाफवणे, सुकवणे यांसारख्या प्रक्रिया कराव्या लागतात, परंतु हे रंग आशा प्रकारे बनवणे तेवढे सोपे नाही हं!
तुम्ही यासाठी काही वेगळा कोर्स केला आहे का काका ?
-यासाठी विज्ञानाचा गाढा अभ्यास करावा लागतो. सोबत गणित आणि तंत्रज्ञान याचही परिपूर्ण ज्ञान असावं लागतं. नुसता कोर्स करून पुरेसा नाही तर स्वतः अभ्यास करून, वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. आणि मग त्यातील अधिक माहितीसाठी एखादा कोर्स केला तर ज्ञनात भर पडू शकते.
तुम्हांला ही कल्पना कशी काय सुचली ?
काही रंगामुळे अपाय झाले, मोठी चर्चा झाली. पोलीस तक्रार झाली. पोलीस माझ्याकडे यावर उपाय विचारायला आले. तेव्हा मी मुलाखत दिली आणि रंग कसे असावेत आणि रंगात काय मिसाळल्यामुळे हे झालं असावं, हे त्या मुलाखतीत मी सांगितलं. यातूनच मला कल्पना सुचली की आपण असे सुरक्षित आणि पर्यावरणप्रिय रंग विकसित करावे.
तुम्ही हे एको फ्रेंडली रंग किती वर्ष बनवता आहात ?
गेली दहा वर्ष मी या कंपनीत इको फ्रेंडली रंग बनवत आहे. तत्पूर्वी मी याच कंपनीत नॉर्मल रंग बनवायचो.
साधारणतः हे रंग नॉर्मल रंगांपेक्षा महाग असतात का? हे रंग किती रुपयांपर्यंत मिळतात ?
हो. थोडे महाग असतात. आणि साधारण ५ रंगाचा एक बॉक्स ९० रुपयांपर्यंत मिळतो.
या आमच्या प्रश्नाच्या सरबत्तीनंतर आम्हांला कळून चुकलं की इको फ्रेंडली राहणं किती गरजेचं आणि हितावह आहे. काकांनी आम्हांला ऑरेंज रंगाच्या लिक्विड कलरचा छोटा पाऊच दिला आणि येणारी होळी तुम्ही इको फ्रेंडली रंगाने खेळा, असा सल्लाही दिला. रंग आपले आयुष्य रंगीत करू शकतात तसेच बिघडवूही शकतात, हे आम्हांला समजलं. आता तुम्हीसुद्धा हे वाचून तुमच्यात बदल घडवा आणि रंगपंचमी, होळी ही इको फ्रेंडली रंगांसोबत खेळा. आणि तुमच्या नातेवाईक, दोस्तांनाही तसे सांगा. नैसर्गिक आणि सुरक्षित रंगपंचमीचा आनंद लुटा. ही रंगतदार उद्योगभेट आम्ही कधीच विसरणार नाही. थंक्स ‘वयम्’. Happy eco- friendly Holi!
मार्च २०१५ ‘वयम्’