Menu

निर्भीड महावीरसिंग

image By Wayam Magazine 09 August 2023

ही गोष्ट आहे एका सच्च्या देशभक्ताची आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या एका निर्भीड क्रांतिकारकाची. त्याचं नाव होतं महावीरसिंग! १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन. या दिवशी तरी आपण आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक भारतीयाला मनोमन नमस्कार करून त्यांची आठवण जागवूया. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण जबाबदार नागरिक बनून आदर करूया.   

उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्यातील कासगंजच्या शाळेत महावीरसिंग शिकत होते, तेव्हाची घटना आहे. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाचं आंदोलन देशभर पसरत चाललं होतं. देशप्रेमी जनता त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत होती. गावागावांतील सरकारी अधिकारी, श्रीमंत आणि अमीर-उमराव मंडळी मात्र आंदोलनापासून दूर राहात होती. ब्रिटिश सरकारशी आपण कसे आणि किती प्रामाणिक आहोत आणि काँग्रेसचं आंदोलन किती चुकीचं आहे हे सांगून आपली राजनिष्ठा दाखवावी, म्हणून कासगंजच्या रायबहादूर खानबहादूर आणि सरकारी अधिका-यांनी एकदा सभेचं आयोजन केलं होतं. गावातल्या लोकांबरोबर त्यांनी शाळेतील मुलांनाही गोळा केलं होतं. सभा सुरू झाली. एकेक वक्ता व्यासपीठावर येऊन ब्रिटिशांचे गोडवे गात क्रांतिकारकांना आणि काँग्रेसला दूषणं देऊ लागला. विद्यार्थ्यांमध्ये बसलेल्या एका मुलाला ते सहन झालं नाही. भर सभेत तो जोरात ओरडला, ‘महात्मा गांधी की...’ आणि इतर मुलांनी ‘जय’ म्हणत घोषणा पूर्ण केली. त्यांनतर सभेत गांधीजींचा जयजयकारच ऐकू येऊ लागला. घोषणा देत मुलं-माणसं उठली आणि सभा उधळली गेली. चिडलेल्या आयोजकांनी घोषणा देणा-या महावीरसिंगांना हुडकून काढलं. त्यांना शिक्षा दिली. 

शालेय शिक्षण संपलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी १९२५ मध्ये महावीरसिंग यांनी कानपूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथं कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’चं काम करणा-या शिववर्मा यांच्याशी महावीरसिंगांची ओळख झाली. हॉस्टेलमधील शिववर्मांची खोली ही उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचं केंद्रच झालं होतं. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे पार्टीचे बिनीचे शिपाई नियमितपणे त्या खोलीवर जमत असत. त्यांच्या चर्चेतून, बोलण्यातून महावीरसिंगांच्या मनातील देशप्रेमाला खतपाणी मिळालं.  

एके दिवशी संध्याकाळी महावीरसिंग शिववर्मांच्या खोलीवर आले तेव्हा त्यांचा नूर वेगळाच होता. नेहमी हास्यविनोद करणारे महावीरसिंग त्या दिवशी काही बोलतच नव्हते. त्यांचा पडलेला चेहरा पाहून शिववर्मांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, ‘काय झालं?’ शब्दानं उत्तर न देता महावीरसिंगांनी गावाहून आलेलं त्यांच्या वडिलांचं- देवीसिंगांचं पत्र शिववर्मांच्या हाती दिलं. देवीसिंगांनी महावीरसिंगांचं लग्न ठरविलं होतं, ती गोष्ट महावीरसिंगांना पटली नव्हती. म्हणून थोडं चिडूनच ते शिववर्मांना म्हणाले, ‘मी कॉलेज सोडून जायचं म्हणतोय, माझी कुठे तरी राहण्याची व्यवस्था करा. नाहीतर या लग्नाच्या भानगडीमुळे मला जे क्रांतिकार्य करायचं आहे तेच थांबून जाईल.’  

शिववर्मांनी महावीरसिंगांना समजावलं आणि त्यांच्या मनात जे काही आहे ते देवीसिंगांना पत्र पाठवून कळवायचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला मानून महावीरसिंगांनी वडिलांना पत्र लिहिलं आणि तितक्याच तातडीनं देवीसिंगांनी त्यांना उलट पत्र धाडलं. पाकीट फोडून महावीरसिंगांनी पत्र वाचायला सुरुवात केली- 

प्रिय महावीरसिंग, अनेक आशीर्वाद.

तुझे पत्र मिळाले. तू आपले जीवन देशकार्यासाठी अर्पण केलंस, हे वाचून आनंद झाला. आपल्या वंशजांमध्ये आपल्या शूर पूर्वजांचे रक्तच उरले नाही, असे मी समजत होतो. पण आता मी मलाच भाग्यवान समजायला लागलो आहे. तुझ्या लग्नाची बोलणी ज्यांच्याशी चालली होती, त्यांना निरोप पाठविला आहे. तुझ्या महान कार्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट मी करणार नाही. देशसेवेचा मार्ग तू निवडला आहेस तर दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही मागे वळून पाहू नकोस आणि सहका-यांना धोका देऊ नकोस. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असतील.

तुझा पिता,

देवीसिंग

महावीरसिंगांनी वडिलांचं पत्र वाचलं आणि ते आनंदून गेले. धावत जाऊन त्यांनी ते पत्र शिववर्मांना दाखवलं, तेव्हा त्यांनीही महावीरसिंगांची पाठ थोपटली.

१९२७ मध्ये लाहोर शहरात पार्टीच्या सभासदांसाठी मोटार ड्रायव्हिंग शिकण्याची सोय करण्यात आली होती. बळकट शरीरयष्टीच्या उत्साही महावीरसिंगांनी मोटार चालविण्याचे धडे सुरू केले. 

इंग्रज सरकारनं नेमलेल्या जुलमी सायमन कमिशनच्या विरोधात देशभरात निषेधाचे मोर्चे निघत होते. लाहोरमधील मोर्चाचं नेतृत्व पंजाब केसरी लाला लजपतराय करीत होते. वरिष्ठांचा हुकूम आला आणि पोलिसांनी शांततेनं चाललेल्या त्या मोर्चावर क्रूरपणे लाठीचार्ज केला. त्यात लालाजी गंभीर जखमी झाले आणि काही दिवसांतच त्यांचं निधन झालं. अंत्यदर्शनाच्या वेळी भगतसिंगांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पार्टीच्या सदस्यांनी पोलीस अधिकारी स्कॉट आणि साँडर्सला धडा शिकविण्यासाठी एक योजना आखली. या योजनेत कामगिरी उरकल्यानंतर भगतसिंग आणि राजगुरू यांना मोटारीतून सुरक्षित स्थळी नेण्याचं काम महावीरसिंगांना करायचं होतं. दिवस ठरला, वेळ ठरली, स्थळही निश्चित झालं. कुणी काय करायचं, कुणी कुठे थांबायचं, हेही प्रत्येकाला सांगितलं गेलं.

लाहोरच्या डी.व्ही.ए.कॉलेजमधून येणा-या रस्त्याच्या दुस-या टोकाला मोटार घेऊन महावीरसिंग थांबले होते. साँडर्सला यमाच्या भेटीला पाठवून भगतसिंग, राजगुरू सायकलवर बसून कॉलेजच्या रस्त्यानं मोटारीपर्यंत आले. त्यांना गाडीत बसवून महावीरसिंगांनी मोटार सुरू केली आणि काही क्षणातच भरधाव धावणारी ती मोटार दिसेनाशी झाली. गो-या शिपायांनी अनेक दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण ती मोटार आणि साँडर्सला कायमचा धडा शिकविणारे क्रांतिकारक त्यांच्या हाती लागले नाहीत.

हिंदुस्थानी जनतेची स्वातंत्र्याची मागणी इंग्रज सरकारला ऐकू जावी म्हणून पुढच्या एका अॅक्शनमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्बचा धमाका उडवला. मात्र त्यानंतर पळून न जाता ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांच्या अटकेनंतर फितुरीमुळे पोलिसांना पार्टीच्या अनेक सभासदांची नावं कळली. त्यांचे पत्तेही मिळाले. धरपकड सुरू झाली आणि इतरांबरोबर महावीरसिंगांनाही अटक झाली. सर्वांना कोठडीत डांबण्यात आलं. इतर कैद्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस कोठडीतील एखाद्या धष्टपुष्ट कैद्याला कोठडीतच चोपून काढीत. बरेचदा आडदंड शरीराच्या महावीरसिंगांना चोप बसे. पण देशकार्य म्हणून हा लाथाबुक्क्यांचा मार ते चुपचाप सहन करायचे. क्रांतिकारकांना राजबंद्यांचे हक्क मिळावेत, तुरुंगात त्यांना राजकैद्यांसारखी वागणूक मिळावी म्हणून बंदिवान सदस्यांनी तुरुंगातच उपोषण सुरू केलं. ब्रिटीश सरकारनं ते उपोषण मोडून काढण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली. रोज आठ-दहा तगडे वॉर्डर्स सोबत घेऊन तुरुंगातील डॉक्टर कोठड्यांमध्ये शिरत आणि नळीतून क्रांतिकारकांच्या पोटात दूध सारण्याचा प्रयत्न करीत. मात्र क्रांतिकारक त्यांच्याहीपेक्षा जिद्दी होते. ते घशात बोटं घालून नाहीतर माशी गिळून पोटातील दूध ओकून बाहेर काढत. 

वॉर्डर्सना घेऊन डॉक्टर कोठडीकडे येताना दिसले की, महावीरसिंग कोठडीच्या दरवाजाला पाठ लावून ठाम उभे राहात. त्यांच्यात इतकी शक्ती होती की, दहा-बारा  वॉर्डर्सना ते अर्धा-पाऊण तास दारावरच रोखून धरीत. पाऊण तासानंतर दार उघडल्यावर कोठडीत शिरलेल्या डॉक्टरांना, महावीरसिंगांना दूध पाजण्याची कामगिरी पार पाडणं कठीण व्हायचं, कारण ते कुस्तीच्या पवित्र्यात उभे राहिलेले असायचे. उपोषणामुळे शरीराची शक्ती कमी होत गेली, पण महावीरसिंगांच्या विरोधाची धार काही कमी झाली नाही.

लाहोर खटल्याचा निकाल लागला. महावीरसिंगांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांना बेल्लारीच्या कारागृहात पाठविण्यात आलं. तिथल्या मग्रूर जेलरने एकदा कारण नसताना क्रांतिकारक कैद्यांवर लाठीहल्ला केला तेव्हा तुरुंगातील कैद्यांनी डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांच्या सांगण्यावरून सत्याग्रह सुरू केला. ‘परेडच्या वेळी कैद्यांचे क्रमांक असलेले बिल्ले छातीवर लावायचे नाहीत, टोपी घालायची नाही, डोक्यावर बिस्तरा घ्यायचा नाही, असं दोघांनी बंदिवानांना सांगितलं आणि सत्याग्रही तसेच वागू लागले. डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंग तुरुंगाचे नियम स्वत: पाळत नाहीत आणि इतरांना फितवतात, हे पाहिल्यावर जेलर चिडला. वॉर्डर्सना सोबत घेऊन तो डॉ. गयाप्रसाद आणि महावीरसिंगांना गुरासारखा मारू लागला. हातात बेड्या घातलेल्या दोघांवर तो आपली बॉक्सिंगची हौस भागवू लागला. एकदा तर जेलरच्या ठोशामुळे गयाप्रसाद बेशुद्ध पडले आणि ३६ तासांनंतर शुद्धीवर आले. तेव्हा मात्र आता ‘जेलरला अद्दल घडवायचीच’ असं महावीरसिंगांनी ठरवून टाकलं. 

एकदा दुपारच्या वेळी जेलरसाहेबांना अचानक बॉक्सिंगचा सराव करण्याची लहर आली. ‘महावीरसिंगला घेऊन या’ जेलरने हुकूम सोडला. वॉर्डर्सनी महावीरसिंगांना कोठडीबाहेर काढलं आणि जेलरसमोर उभं केलं. त्यावेळी महावीरसिंगांच्या हातात बेड्या नव्हत्या. वॉर्डर्सनी त्यांचे दोन्ही हात पकडले होते. छद्मी हसत हसत जेलर महावीरसिंगांजवळ आला आणि त्यानं महावीरसिंगांच्या चेह-यावर गुद्दे मारायला सुरुवात केली. एक..दोन.. आणि जेलर तिसरा गुद्दा मारणार इतक्यात महावीरसिंगांनी सर्व शक्तिनिशी वॉर्डर्सच्या पकडीतून आपले हात सोडवून घेतले आणि जेलरच्या थोबाडावर असा काही गुद्दा हाणला की, जेलर पाच-दहा फूट भेलकांडत गेला. वॉर्डर्स आणि इतर कैद्यांसमोर झालेल्या या प्रकारानं जेलर चिडला आणि जोराने ओरडला- ‘घेऊन जा त्याला, घेऊन जा आणि ३० फटक्यांची शिक्षा द्या.’ महावीरसिंगांना उघडं करून फटाक्यांची शिक्षा देण्यासाठी तयार केलेल्या लाकडाच्या चौकटीला घट्ट बांधण्यात आलं.

रामोशानं त्यांच्या उघड्या पाठीवर वेत मारायला सुरुवात केली. ‘एक’ महावीरसिंगांच्या पाठीवर वेत कडाडला आणि  महावीरसिंगांच्या ओठांतून शब्द उमटले, ‘इन्कलाब जिंदाबाद..’ ‘दोन...’ पुन्हा तेच ‘इन्कलाब जिंदाबाद..’ वेताचे ३० फटके आणि तितक्याच वेळा ‘इन्कलाब जिंदाबाद..’ ची उंच आवाजात घोषणा! शिक्षा पूर्ण झाल्यानंतर महावीरसिंगांना लाकडी चौकटीपासून मोकळं करण्यात आलं. कुणाचाही आधार न घेता रक्तबंबाळ झालेले महावीरसिंग चालत कोठडीकडे गेले. त्या दिवशी ३० फटक्यांची शिक्षा सोसूनही खंबीर उभा राहिलेला पहिला माणूस बेल्लारी तुरुंगानं पाहिला.

गयाप्रसाद, महावीरसिंगांसारख्या कैद्यांमुळे तुरुंगाची शिस्त बिघडून जाईल म्हणून १९३३च्या जानेवारी महिन्यात दोघांनाही अंदमानच्या कारागृहात पाठविण्यात आलं. तिथं कुंदनलाल, बटुकेश्वर दत्त, कमलनाथ तिवारी हे जुने मित्र भेटल्यामुळे महावीरसिंगांना आनंद झाला. अंदमानला आल्याचं त्यांनी पत्रानं घरी वडिलांना कळविलं. देवीसिंगांनी ताबडतोब महावीरसिंगांच्या पत्राला उत्तरही दिलं- 

‘बेटा, सरकारनं भारत देशातील हिरे निवडून अंदमानला पाठविले आहेत. त्या हि-यांमध्ये राहाण्याची संधी तुला मिळाली हे तुझं भाग्य आहे. त्यांच्यात राहून तू माझं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावंस हीच इच्छा. माझा आशीर्वाद तुझ्या मस्तकी आहेच.’ 

सरकारनं कारागृहातील स्थिती सुधारावी म्हणून अंदमानच्या सेल्युलर जेलमधील राजबंद्यांनी १२ मे १९३३ पासून उपोषण सुरू केलं. लाहोरच्या तुरुंगात ६२ दिवस जेलर, डॉक्टर, वॉर्डर्सना नको जीव करणारे महावीरसिंग अंदमानच्या उपोषणात आघाडीवर होते. राजबंद्यांचं उपोषण मोडून काढण्यासाठी तुरुंगाधिका-यांनी त्यांना जबरदस्तीनं दूध भरविण्याचे प्रयत्न सुरू केले. बलदंड महावीरसिंगांनी पाच दिवस डॉक्टरांना निकराचा विरोध केला. सहाव्या दिवशी मात्र अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी महावीरसिंगांच्या तोंडात नळी सारली आणि घाईघाईनं नळीत दूध ओतलं. महावीरसिंगांना दूध पाजल्याच्या आनंदात डॉक्टर कोठडीबाहेर पडले. आणि काही मिनिटांतच महावीरसिंग तडफडू लागले. कारण दूध अन्ननलिकेत न जाता श्वासनलिकेच्या वाटेनं फुप्फुसात शिरलं होतं. त्यामुळे त्यांना श्वास घेणं अशक्य झालं. त्यांची ती स्थिती पाहून घाबरलेल्या वॉर्डर्सनी आरडाओरड सुरू केली. डॉक्टर परत आले. त्यांनी महावीरसिंगांना हॉस्पिटलमध्ये हलवायचा निर्णय घेतला. रुग्णालयात नेण्यासाठी वॉर्डर्स महावीरसिंगांना उचलायला लागले, पण उशीर झाला होता. महावीरसिंगांचा श्वास कायमचा थांबला होता. तो दिवस होता १७ मे १९३३. आपलं नीच कर्म लपविण्यासाठी तुरुंगाधिका-यांनी महावीरसिंगांचा निष्प्राण देह समुद्राच्या लाटांवर सोडून दिला. 

देशासाठीच जगण्या-मरण्याची शपथ घेतल्यानंतर या बलवान देशभक्तानं अंदमानच्या पवित्र भूमीत चिरविश्रांती घेतली. धन्य ते पितापुत्र - देवीसिंग आणि महावीरसिंग!


-प्रकाश कामत 


***


My Cart
Empty Cart

Loading...