
By Wayam Magazine, On 12th April 2021, Children Magazine
“आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,” बाबा आदूला समजावत होता. आई दुस-या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते. “पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती? “ आदूला अजूनही नेमका अंदाज येत नव्हता की, मग आपण आईचे लाडके असणार की नाही ?
“नाही रे. बाळ आईच्या पोटात आहे ना. ते खेळायला लागलं तुझ्यासोबत की, मग घेईल की परत तुला पण उचलून. पण आत्ता आई दोन बाळांना कशी उचलणार? पेलवणार नाही ना तिला? डॉक्टरआज्जी काय म्हणाल्या माहितीय का तुला? त्या आईला म्हणाल्यात काहीच जड उचलायचं नाही आणि आता आदू पण स्ट्राँग होतोय. आदूचं वजन पण आता वाढतंय ना. मग आईने आदूला उचलून घेतलं तर तिला त्रास नाही का होणार?”, बाबा त्याच्या परीने आदूला समजावत होता. “बाबा, मग मला जवळ पण नाही घेणार ती”, पुन्हा आदूने विचारलं.
मग मात्र आईच मध्ये पडली. तिने आदूला जवळ घेतलं आणि म्हणाली, “असं कसं होईल? आदूला जवळ घेतल्याशिवाय आईलाच छान नाही वाटणार. आदूला जवळ घेतल्याशिवाय आईला पण झोप येत नाही... हो ना...” आईने दिलेल्या दिलाशानंतर आदू जरा खूश झाला.
“आदू आईला दुधाचा पेला नेऊन देतोस का रे जरा”, आजीने स्वयंपाकघरातून हाक मारली.
आदू साडेपाच वर्षांचा आहे. पण तो तीन-साडे तीन वर्षांचा असल्यापासूनच स्वतःचा दुधाचा ग्लास, ताट नेऊन ठेवायला शिकला होता. त्याला आवडायचं ते करायला. आजीचाही चहा पिऊन झाला की तो म्हणायचा की, तू नको उठू. तुझी कंबर दुखते ना. मीच नेऊन ठेवतो कप. सुरुवातीला कप सिंकमध्ये फेकल्याने दोन-तीन कप फुटलेसुद्धा पण तरी त्याने माघार नाही घेतली. आई-बाबांनीही त्याला या कामांपासून चुकण्याच्या, तुटण्याफुटण्याच्या भीतीने थांबवलं नाही. त्यामुळे तो सहजपणे घरातली कामं करायचा. आई वाटाणे सोलायला बसली की तिला शेंगा उकलून द्यायचा, आजी वाल सोलायला लागली की सालं काढून द्यायचा. त्याला मजा यायची हे करताना. त्यामुळे आताही आईला डॉक्टरआजींनी खूप विश्रांती घे असं सांगितल्याने आजी, बाबा, आजोबा मदतीला नसले की लहान लहान कामं आदूला सांगायची. आजूबाजूच्यांना पण त्याचं भारी कौतुक होतं.
परवाच्या दिवशी आईला बरं वाटत नव्हतं म्हणून ती झोपली होती. आजी स्वयंपाकघरात होती. एवढ्यात दारावरची बेल वाजली. आजी दारात येईपर्यंत आदूने दार उघडलं. रोजचा कचरा नेणारा दादा आला नव्हता. त्याऐवजी कोणीतरी वेगळीच दीदी कचरा मागत होती. “कचरा है.?’’ तिने विचारलं. आजीने आदूला सुक्या कचऱ्याची पिशवी आणून दे म्हणून सांगितलं. त्याने दिली. आणि तो बघत होता तिच्याकडे. तिचं पोट खूपच पुढे आलं होतं. आजीने तिला विचारलं की, नेहमी कचरा न्यायला येणारा राजू कुठे आहे म्हणून. तर ती म्हणाली की, त्याला नोकरी लागली. त्यामुळे आता तीच येणार. आदूच्या आईसारखं तिला पण बाळ होणार होतं. त्यामुळे आजीने विचारलं तिला की, कैसे कर पाओगी... तर ती म्हणाली, “आदत है.. जब तक कर सकती हूं, करुंगी, वरना सासू मां आ जाएगी.” आजीने ‘ठीक’ म्हणून दार लावलं.
अर्थातच आदूचे प्रश्न तयार होतेच. आजी आईचं पोट पण असं होणार आता. एवढं मोठं. आईसारखं तिला पण बाळ होणार का...
आजीने ‘हो’ म्हटल्यावर आदूने विचारलं, “मग ती का येते? आईने सुट्टी घेतली आहे, ती झोपून राहते तशी तिने घ्यायला हवी ना...?”
आजीकडे खरं तर या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ‘हं’ म्हणून आजीने विषय बदलला. खरं तर आजीला पण ती एवढा मोठा कचऱ्याचा डबा सहा मजले कसे उतरवणार, हा प्रश्न पडलाच होता. पण असते सवय म्हणत तिने त्या विषयाला पूर्णविराम दिला होता.
आदूच्या मनातले मात्र प्रश्न थांबत नव्हते. “आई आता रोज बदाम, अंजीर, चांदीच्या पेल्यातून दूध, कसली-कसली चाटणं, ठरावीक वेळेने फळं असं काय काय खात होती. पूर्वी आई एवढं खात नव्हती. आणि रोज दूध पण प्यायची नाही. आता तर ती चांदीच्या पेल्यातून पिते दूध... कचरा न्यायला येणारी मावशीपण असंच करत असेल ना...” त्याच्या मनात प्रश्न आला. त्याने आई उठल्यावर आईला न राहवून विचारलंच की, हे सगळं का करतात आई. तू रोज बदाम नाही खायचीस. चहा प्यायचीस. आता का खातेस आणि चांदीच्या पेल्यातून दूध का पितेस? आईने त्याला सांगितलं की, बाळ छान सुदृढ व्हावं म्हणून ती असं रोज खायला लागली आहे. त्यातून बाळाला पोषक पदार्थ आहार मिळतो. त्यामुळे बाळ आदूसारखं हसरं होणार.
बाळ आदूसारखं होणार म्हटल्यावर तो खूश झाला.
मग त्याने विचारलं, “आई, आपल्याकडे आज कचरा न्यायला त्या दीदी आल्या होत्या ना त्यांना पण बाळ होणार आहे. त्यांचं बाळ पण माझ्यासारखं हसरं होणार ना?”
आईला नेमका संदर्भ कळत नव्हता. आईने आजीला विचारलं की कोण आलं होतं नेमकं. तेव्हा आजीने तिला काय झालं ते सांगितलं. आईचं शंकासमाधान होईपर्यंत आदूला धीर नव्हता. त्याने आईला विचारलं, तू ऑफिसमधून सुटी घेतली तशी त्या दीदीनेपण सुट्टी घ्यायला हवी ना. तिने पण झोपून राहायला पाहिजे ना?
मग आईने त्याला सांगितलं की प्रत्येकाला अशी झोपून राहायची गरज असेतच असं नाही. काहींना थोडं जास्त बरं नसतं. काहींना थोडं बरं नसतं. आदूला सर्दी झाल्यावर आदू कुठे झोपून राहतो? तो पळतोच की खेळायला... बाबा मात्र सर्दी झाली की तो गरम पाण्यात पाय बुडवून बसून राहतो ना, तसंच असतं. मग आदूला थोडंसं कळलं.
मग त्याने विचारलं की, ती दीदी पण तुझ्यासारखं थोड्या थोड्या वेळाने खात असेल ना. बदाम, खारीक, अॅपल, वॉटरमेलन असं खात असेल ना...
आदूच्या प्रश्नाने आई थोडी हेलावली. आदूला गरीब, श्रीमंत असा फरक कधी सांगायची वेळ आली नव्हती. आज मात्र आई त्याला बाजूला घेऊन बसली. त्याला जगातील विविध आर्थिक परिस्थिती समजावायला हवी, असं तिला काहीसं वाटलं. “आदू, आई ऑफिसात जाते. कचरा न्यायला ज्या दीदी आल्या त्या ऑफिसात नाही जात. आईला खूप हजारांच्या नोटा पगार म्हणून मिळतात. त्या दीदीला नाही तितक्या मिळत. आपण जसं मोठ्या घरात राहतो, अशा ठिकाणी ती दीदी नाही राहत. तिचं घर कदाचित लहानसं असेल. मग आईने आदूला मुंबईच्या झोपडपट्टीबद्दल सांगितलं. तिने यु ट्यूबवर काही व्हिडिओ दाखवले. आदूला त्याच्या आणि तिच्या परिस्थितीतील फरक कळला असावा असं आईला वाटलं. आदू आता काहीच बोलत नव्हता.
‘आदू काय झालं?..’ आईने एवढं विचारलं तर तो आईला फक्त बिलगून बसला. आई खूप वेळ थोपटत राहिली त्याला.
दुस-या दिवशी परत तीच दीदी कचरा न्यायला आली. आदूने तिला कचरा उचलू दिला नाही. त्यानेच आपला कचरा नेऊन कचऱ्याच्या तिच्या मोठ्या डब्यात ओतला. मी मदत करू का डबा ढकलायला, असंही त्याने विचारलं. ती दीदी म्हणाली- तुला झेपणार नाही. तुला झेपेल तितकं केलंस की तू...
आदूच्या डोक्यातून त्या दीदीसाठी काहीतरी करूया, हा विचार जात नव्हता. आजीने त्याला आईला दूध नेऊन द्यायला सांगितलं. तर तो म्हणाला, “आणखी एका पेल्यात दूध दे. “
“का रे आदू... तू पिणार आहेस का आणखी दूध...”
“नाही. तरी मला हवंय दूध. आणि बदाम पण. दोन. आईला देतेस तसे.”
आजीला नेमकं काहीच कळेना, त्याला काय सांगायचंय. पण आदूने मागितलं म्हणून आजीने दूध ओतून दिलं त्याला. बदामपण काढून दिले. आदूने तो दुसरा दुधाचा पेला आणि बदाम उचलले आणि तो दाराकडे निघाला. “आदू कुठे निघालास?’ आजीने विचारलं.
“आजी त्या दीदींना पण आईसारखं बाळ होणार आहे. त्यांचं घर आपल्याएवढं मोठं नाही. त्यांच्याकडे बदाम नसतील. दूधपण नसेल. म्हणून त्यांना नेऊन देतोय.” “आदू, अरे...? काहीतरी डोक्यात येतं तुझ्या..” आजीने दामटवलंच त्याला. आदू हिरमुसला झाला.
“आजी प्लीज. देऊ दे ना ग. ते बाळ पण माझ्यासारखं हसरं होईल मग...
प्लीज... प्लीज...”
आदूच्या आजीला काय करावं नेमकं कळेना. म्हणजे एकीकडे आपला नातू एवढा संवेदनशील आहे म्हणून छान वाटून घ्यायचं की...
“आदू, मी आज बाबाशी बोलेन मग बघू काय करायचं ते. थांब.. तुला प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये दूध भरून देते, ते नेऊन दे.”
आदू दुधाची बाटली आणि बदाम घेऊन खालच्या मजल्यावर गेला. तोपर्यंत कचरा उचलणा-या दीदी तळमजल्यावर पोहोचल्या होत्या. तिथे आदूने त्यांना गाठलं. तो म्हणाला, “पटकन हात धुऊन ये. तिने ‘का?’ असं विचारलं.
“तुला माहीत नाही का, काही खाण्यापिण्याआधी हातपाय स्वच्छ धुवायचे असतात...” आदूने तिला थेट ओरडून विचारलं.
“अरे पण मी काहीच खात-पित नाहीय. ”
“तुला हे दूध संपवायचंय. बी अ गुड गर्ल. ”
कचरा द्यायला आलेल्या इतर आजी, मावशी, आत्या, काकू, ताई, दादा कोणालाच काही कळेना की आदू काय म्हणतोय.
“आदू काय रे काय झालं? तिला का हातपाय धुवायला सांगतोयस. आणि तू कच-याच्या डब्याजवळ उभा आहेस. आधी लांब हो नाही तर मी आजीला जाऊन सांगते, “ तळमजल्यावरच्या दळवी आजी आदूला ओरडल्या.
तोवर आदूची आजी खाली आलीच होती. तिने सोबत एक डबी पण आणली होती. तिने त्या डबीतले बदाम आदूच्या हातात ठेवले आणि त्या कचरेवाल्या दीदींना म्हणाली की, माझ्या आदूसारखं बाळ तुला पण होऊ दे म्हणून हे दूध आणि बदाम. घरी जा, आंघोळ कर आणि खा...
त्या दीदीच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
“रडते काय. आजी, आजोबा आईला सांगतात असं रडायचं नसतं. हसायचं. म्हणजे हसरं बाळ येणार तुझ्या घरी...”
तिने पटकन तिथल्या कच-याचे डबे आपल्या मोठ्या डब्यात रिकामे केले आणि दुधाची बाटली नि छोटी डबी घेऊन ‘थँक्यू’ म्हणत तिथून निघून गेली. आजीने घरी गेल्यावर त्याला सांगितलं की आपण पुढचे सहा-आठ महिने तरी त्या दीदीला रोज दूध आणि एखादे फळ देऊया.
बाबा तर लगेच तयार झाला. आजोबा पण म्हणाले की, आदूने नवा विचार आपल्यात रुजवला. माणुसकी आपण विसरतोच रोजचं जगताना!
बाबाने आणि आईने बिल्डिंगमध्ये त्यांच्यासोबत कचरेवाल्या दीदींना दूध, फळं किंवा इतर पोषक आहार द्यायला कोण तयार आहे याची चौकशी करायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता, पन्नास फ्लॅट्सपैकी चाळीसहून जास्त जणांनी होकार दिला. कोण कोणत्या दिवशी काय देणार, याची चर्चा व्हायला लागली.
दुस-या दिवशी ती दीदी कचरा न्यायला आली, तेव्हा तिच्या हातात सगळ्यात आधी वॉचमनने ग्लोव्हज दिले. बच्चा होनेवाला है, और तुम ऐसेही बिना ग्लोव्हज के कचरा उठाओगी... ?
बी विंगमधल्या एका मावशींनी तिला कच-याची गाडी येऊन गेली की खालच्या नळावर स्वच्छ हातपाय धुऊन दूध प्यायला वर ये, म्हणून बजावलं. कित्येकांनी स्वतःच डब्यात कच-याच्या पिशव्या टाकल्या.
असा बदल पाहून ती भारावून गेली होती.
आठवड्याच्या शेवटी सर्वांनी ठरवलं की सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत पुढचे सहा महिने कचरा स्वतःच खाली नेऊन डब्यात टाकायचा. जोपर्यंत कचरेवाल्या दीदीचं बाळ मोठं होत नाही तोवर ही शिस्त पाळायची, असा नियम सेक्रेटरींनी नोटीस बोर्डवर लावला. त्याला काही जणांनी विरोध केला. पण विरोध करणारे एवढे कमी होते की त्यांचं काहीच चालू शकलं नाही.
तिच्यासाठी कधी राणे आजी धिरडी करायच्या, तर कधी दळवी आजी लाडू द्यायच्या. ती आता आणखी आनंदात आणि हसरी दिसायला लागली होती. ...अलीकडेच कचरा उचलणा-या त्या दीदीला मस्त गुब्बु बाळ झालंय. बाळाचा बाबा खास येऊन सर्व बिल्डिंगमध्ये पेढे वाटून गेलाय. आता चार-पाच दिवसांनी आजी आणि तिच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी बाळाला पाहायला तिच्या घरी जाणार आहेत.
आदूच्या आईलाही बाळ झालंय. ते आदूसारखंच हसरं आहे. कचरेवाल्या दीदी आता कधी-कधी आपल्या बाळाला नि त्याच्या आजीला सोबत घेऊन येतात आणि ते बाळ टाकीवर आईचं काम होईपर्यंत खेळत राहातं. आदू नि दोस्तसुद्धा सुटीच्या दिवशी ज्यांच्याकडे जसा वेळ असेल तसे त्या बाळाशी खेळायला जातात.