Menu

महत्त्व विज्ञानदिनाचं!

image By Wayam Magazine 28 February 2024

'ज्ञान हे अंतराळातील गोलाप्रमाणे आहे. त्या गोलाचा आकारमान जेवढा मोठा, तितका त्याचा अज्ञाताशी संबंध जास्त. आपण सर्वजण माझ्या कार्याबद्दल आणि यशाबद्दल फार कौतुकानं बोललात. पण खरं सांगायचं, तर मी जे काही काम केलं, त्याविषयी मी पूर्ण समाधानी नाही. आइनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञांच्या तुलनेत मी कोण मोठा लागून गेलो आहे?'... हे उद्गार आहेत सर सी. व्ही. रामन यांचे. विज्ञानातील कामगिरीसाठी नोबेल पारितोषिक मिळविणारे रामन हे आपल्या देशातील पहिले शास्त्रज्ञ. १९६८ सालामध्ये रामन यांचा ८0वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी विक्रम साराभाई यांनी पुढाकार घेतला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये रामन यांचा सत्कार करण्यात आला. त्याला उत्तर देताना रामन यांनी वर दिलेले उद्गार काढले! ते आत्ता आठवण्याचं कारण रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेत 'रामन परिणाम' या शोधाची घोषणा केली. त्या दिवसाचं महत्त्व ओळखून १९८६ सालापासून आपल्या देशात २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळण्यात येतो. देशात विज्ञानाचा प्रसार व्हावा, लोकांमध्ये विज्ञानविषयक सजगता निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये देशातील विविध संशोधन संस्थाच नाहीत तर महाविद्यालये, विद्यपीठंही सहभागी होतात. संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारेसुद्धा या कार्यक्रमांत भाग घेतात. हे सर्व कार्यक्रम त्या त्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या संकल्पनेवर आधारित असतात. यंदाची संकल्पना आहे, 'देशाच्या विकासासाठी लोकांमध्ये विज्ञानविषयक प्रश्नांबाबत सजगता निर्माण व्हावी आणि विज्ञानविषयांमधील आवड वाढीस लागावी!' 

आणि एकविसाव्या शतकातील विज्ञानाची घोडदौड पाहिली तर देशाच्या सर्वच भागातील नागरिकांमध्ये विज्ञानाच्या विविध विषयांबद्दल सजगता निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र नुसती सजगता निर्माण होऊन भागणार नाही, तर अगदी सामान्य माणसाच्या मनातसुद्धा विज्ञानविषयाबद्दल मनापासून आवड निर्माण व्हायला हवी. आपल्या देशाच्या पुढील वाटचालीसाठी या दोनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इथं लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की रामन यांना त्यांच्या अलौकिक अशा शोधाबद्दल १९२९ सालामध्ये ‘सर’ हा किताब मिळाला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९३0 सालामध्ये, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचवर्षी त्यांना रॉयल सोसायटीचे ह्युजेस पदक मिळाले. १९३२ सालामध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाकडून डी.एस.सी.ची सन्माननीय पदवी मिळाली. आणि १९३३ साली बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यु्रूट ऑफ सायन्स’ या संस्थेचे ते पहिलेच गोरेतर संचालक झाले!

एक गोष्ट आवर्जुन लक्षात घ्यायला हवी की ज्या संशोधनामुळं रामन यांना वर उल्लेख केलेल्या सन्मानांसह इतर अनेक मानमरातब मिळाले, ते संशोधन करण्यासाठी रामन यांनी जी साधनं वापरली होती, त्यांची त्यावेळची किंमत फक्त ५०० रुपये होती! देश पारतंत्र्यात होता. विज्ञानाच्या संशोधनाला पोषक असं वातावरण नव्हतं. विज्ञानातील संशोधनाबाबत समाजात उदासीनता होती. संशोधनास आवश्यक अशा साधनसामुग्रीची विपुलता नव्हती. तरीसुद्धा रामन यांनी विज्ञानाच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा शोध लावला. त्या शोधामागे त्यांनी सातत्यानं सात वर्षं केलेल्या श्रमांची, अभ्यासाची तपश्चर्या होती. समर्पित वृत्तीनं केलेल्या या अभ्यासाचा परिपाक म्हणजेच त्यांनी लावलेला शोध! त्यावेळच्या आपल्या देशातली परिस्थिती लक्षात घेतली, तर या शोधाचं महत्त्व अधिकच उजळून निघतं. मूलगामी स्वरूपाच्या संशोधनासाठी महागडी यंत्रं आणि साधनसामग्री हवी असते असं नाही, तर संशोधकाची बौद्धिक कुवत, उत्तुंग प्रतिभा, अदम्य चिकाटी, प्रचंड कष्ट करण्याची मानसिक-बौद्धिक तयारी आणि निवडलेल्या विषयाला सर्वार्थानं वाहून घेण्याची वृत्ती इतकंच भांडवल पुरेसं असतं, हे रामन यांनी आपल्या संशोधनानं सिद्ध करून दाखवलं. 

येणाऱ्या पिढ्यांसाठी फार मोठा आदर्श निर्माण करणाऱ्या रामन यांचं हे संशोधन काय होतं ते आपण थोडक्यात पाहू या. पारदर्शक पदार्थातून एकरंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर नेमके काय होते, या प्रश्नाचा अभ्यास करताना रामन यांना असं आढळून आलं की असे प्रखर किरण जाताना मिळवणाऱ्या वर्णपटात (स्पेक्ट्रम) मूळ एकरंगी प्रकाशाशिवाय इतर अनेक विविध वंâपनसंख्या असणाऱ्या रेषाही वर्णपटात उमटल्या आहेत. याचाच अर्थ असा की पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशाचे प्रकीर्णन (स्वॅसटरिंग) झाले होते. यालाच ‘रामन इफेक्ट’ म्हणतात. 'रामन परिणाम'चा ( Raman Effect ) उपयोग रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी होतो. त्यामुळेच रामन यांच्या शोधानंतरच्या दहाच वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त संयुगांची रचना निश्चित करण्यात आली. २0१३ साली तर अमेरिकन केमिकल सोसायटीने रामन परिणामचा समावेश ‘इंटरनॅशनल हिस्टॉरिक केमिकल लँडमार्क्स’मध्ये केला! रामन यांच्या संशोधनाचं महत्त्व असं अनन्यसाधारण आहे.

मात्र रामन यांच्यानंतर गेल्या ८५ वर्षांत भारतातील संशोधनाबद्दल कोणाही भारतीय संशोधकाला नोबेल मिळालेलं नाही. हरगोविंद खुराणा (सन १९६८), सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३) आणि वेंकटरामन रामकृष्णन (२००९) या भारतीय वंशाच्या तीन संशोधकांना नोबेल मिळालं, पण त्यांचं संशोधनकार्य परदेशांतलं! यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनी आपल्याकडं विज्ञानातील मूलभूत स्वरूपाचं संशोधन का होत नाही, याचाही विचार व्हावा आणि आज शैशवात असणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी तसंच तरुण/तरुणींनी मूलभूत संशोधनाकडं वळण्याचा निर्धार करावा. आपला देश प्रगतीची अधिकाधिक शिखरं पादाक्रांत करण्याची मनीषा बाळगावी. तसा निश्चय केला जाईल, अशी आशा करू या.

-श्रीराम शिधये

***

My Cart
Empty Cart

Loading...