Menu

नंदादीपक

image By Wayam Magazine 08 November 2023

नीलनं आपल्या गूगल अकाउन्टचा पासवर्ड बदलला नि टाइप केलं,  NandaDeepak_03. मग तो स्वतःवरच खूश झाला. त्याने घड्याळात बघितलं, सकाळचे साडेनऊ वाजले होते. ‘म्हणजे इंडियात संध्याकाळचे सात वाजले असतील. ग्रँडमा... अहं... दादीमा दिया लावत असेल. आपणही त्याचवेळी पासवर्ड चेंज केला. व्हॉट अ कोइन्सिडन्स! दादीमाला कॉल करू या.’

असं मनाशी बोलत बोलत त्यानं फोन केला.

“दादीमाऽऽ... नील हियर. नंदादीपक लावतेयस ना? आय नो. मीही इथे एक नंदादीपक लावला. हा हा... कसा? लिसन...” नील दादीमाशी बोलण्यात रमला.

नील नुकताच भारतात येऊन गेला होता. त्याच्या आत्याबरोबर. जवळजवळ सात वर्षांनी तो भारतात आला होता. त्याआधी आला होता, पण तेव्हा तो लहान होता. जेमतेम पाच वर्षांचा. ह्या सात वर्षांत करोनासकट खूप काही घडामोडी घडल्या आणि नीलही मोठा झाला.

दिल्ली विमानतळावर उतरल्यावर तो भिरभिरत्या नजरेनं इकडेतिकडे पाहात होता. भारत खूप वेगळा वाटला त्याला. “सो कोऽझी हिअर.” तो आत्याला म्हणाला. आत्या गालातल्या गालात हसली.

भारतातलं त्याच्या दादा-दादीचं घर होतं मथुरा जिल्ह्यातल्या राया गावामध्ये. मथुरा आणि वृंदावन ह्या दोन्ही महत्त्वाच्या शहरांपासून काही किलोमीटर अंतरावर. ही तीन ठिकाणं म्हणजे त्रिकोणाचे तीन कोन जणू.

दिल्लीहून राया गावापर्यंतचा कारचा प्रवास. नील तर झोपूनच गेला. अमेरिकेतल्या घड्याळाची वेळ आणि भारतातल्या घड्याळाची वेळ, ह्यांच्यातल्या फरकामुळे होणारा जेटलॅग. घराजवळ आल्यावरही तो झोपाळलेलाच होता. आत्याने सांगितलं, म्हणून फक्त दादा-दादींना नमस्कार करून तो खोलीत जाऊन पुन्हा झोपून गेला.

नीलला जाग आली तेव्हा नक्की किती वाजलेत, हे त्याला कळेचना. डोळे चोळत तो आजूबाजूला पाहू लागला. ‘ओह् याह्... धीस इज इंडिया.’ त्यानं घड्याळात पाहिलं. संध्याकाळ होत आली होती. नील खोलीतून बाहेर आला. घराचं निरीक्षण करू लागला. तसं त्यानं फोटोमध्ये, व्हिडिओ कॉलमध्ये घर पाहिलं होतं. पण आता प्रत्यक्ष बघताना त्याला ते वेगळंच वाटलं. ‘ओहो...  किती मस्त घर आहे हे. मोठ्ठं. दादाजी, दादीमा, आन्टी? कुठेत सगळे?’

जिना उतरून तो खाली आला. दादीमा दिया पेटवत होती. ‘अमेरिकेत आपल्या घरी डिझाइन असलेले व्हरायटी ऑफ लॅम्प्स आहेत, पण हा लॅम्प वेगळाच दिसतोय.’ नीलच्या मनात विचार आला.

दादीनं नीलला प्रेमानं जवळ घेतलं. त्याला आवडतात म्हणून दुधाचे वेगवेगळे गोड भारतीय पदार्थ तिनं बनवले होते. नील खूश झाला. तेवढ्यात दादाजीही आले. त्यांनीही नीलला जवळ घेतलं. त्याच्याशी गप्पा मारल्या. दादाजींबरोबर नीलच्याच वयाचा एक मुलगा आला होता. दादीनं त्यालाही खायला दिलं. त्यांच्या शेताची देखरेख करणा-या जमनालाल यादवांचा मुलग सुदाम. साधारण नीलएवढाच. नीलचं तोडकंमोडकं इंग्लिश-हिन्दी आणि सुदामचं बृजभाषी हिन्दी, त्यामुळे दोघांनाही खूप हसू येत होतं.

चार-पाच दिवसांत नील आपल्या इंडियन व्हिलेजमध्ये रमू लागला. खरंतर राया हे अगदी खेडं नव्हतं. हिन्दी-इंग्लिश शाळा, इंजिनियरिंग कॉलेज, मोठी दुकानं इत्यादी ब-यापैकी नव्या सुधारणा असलेलं गाव. मथुरा आणि वृन्दावन अशी दोन्ही महाभारताच्या काळापासून दुधाचा व्यवसाय करणारी मोठी गावं जवळ. त्यामुळे राया गावातल्या घरांमध्येही दुधाचा व्यवसाय परंपरेनं चालत आलेला.

नीलच्या आजोबांचं घर त्यापैकीच एक. बृजवासी मिठाईचा मोठा उद्योग चालवणारे त्याचे आजोबा आणि दोन काका. नीलचे वडील आणि आई फक्त कामानिमित्ताने अमेरिकेत. त्यामुळे नील अमेरिकेतच जन्मला नि वाढला. बाकी सगळे भारतात, राया गावातल्या घरात. नीलने आपल्या अमेरिकन दोस्तांना भारतातले फोटो पाठवले नि खाली लिहिलं... ‘अ बिग इंडियन फॅमिली’... 

आपल्या चुलत भावंडांशी नीलची दोस्ती झालीच, पण का कुणास ठाऊक  सुदामशी जरा जास्तच मेतकूट जमलं त्याचं. सुदाम स्वभावानं अगदी शांत होता. त्याचं घरही नीलच्या घराहून लहान नि साधं होतं. पण तरीही नीलला ते चक्क आवडलं. सुदाम सुंदर स्केच काढायचा. फक्त तोच नाही तर त्याचा धाकटा भाऊ गोवर्धनसुद्धा. त्या दोघांच्या हातातली ड्रॉइंगची कला पाहून नीलला आश्चर्य वाटलं. 

नीलच्या दादाजींच्या शेताजवळ गाई-म्हशींचा भलामोठा तबेला होता. तो पाहून तर नीलला खूप आश्चर्य वाटलं. तिथून काही अंतरावर दुधावर प्रोसेस करणारा आणि दुधापासून मिठाई बनवणारा त्यांचा खूप मोठा कारखाना होता.  दादाजी आणि त्याचे दोन्ही काका हे उद्योग सांभाळत होते. नीलला फार आवडलं हे सगळं.

रात्रीच्या वेळी दादी कृष्णाच्या गोष्टी सांगायची. नीलला आवडू लागल्या होत्या त्या गोष्टी. तसं त्यानं थोडंफार लॉर्ड क्रिष्णाबद्दल ऐकलं-वाचलं होतं. अॅनिमेशन

फिल्मही पाहिल्या होत्या. पण, ‘दादीमाकडे असलेला क्रिष्णाज स्टोरीज स्टॉक इज डिफरन्ट,’ असं त्यानं आईला कळवलं.

दिवाळीच्या आदल्या दिवशी दुपारी दादी आणि नील दोघेच गच्चीतल्या शेडमध्ये बसले होते. दुपार असूनही थंड हवा अंगात हुडहुडी भरवत होती.  छान वाटत होतं. अंगाभोवती रजई गुंडाळून नीलने दादीच्या मांडीवर डोकं ठेवलं नि म्हणाला, “दादीमा... क्रिष्ण कन्हैय्या की स्टोरी बताओ.”

दादी हसली, “आत्ता दुपारी? रात्री सांगीन रे.”

नील हटूनच बसला. म्हणाला, “एक लहानशी सांग ना गोष्ट.”

“ठीक बेटा, सांगते.” दादी म्हणाली नि गोष्ट सांगू लागली.

‘कृष्णकन्हैय्या ज्याच्या घरी लहानाचा मोठा झाला तो नंद राजा.

गोकुळचा राजा. त्या गोकुळ गावाला वळसा घालून झुळझुळत वाहायची जमुना नदी. दिवसभर हसणारं, खिदळणारं गोकुळ तिन्हीसांजेला अंधारात गुडूप झालेलं दिसलं तिला. रोजच दिसायचं. फक्त गोकुळाच्या मध्यभागी असणारा नंदराजाचा राजवाडा मात्र, मंद सुवासाचं तेल असलेल्या एका मोठ्या दिव्यामुळे आणि लहान लहान पणत्यांमुळे उजळून निघालेला दिसायचा.  

सूर्यास्तानंतर दाट काळोख पसरत असल्यामुळे गोकुळात राहणाऱ्या लोकांना आपली बरीचशी कामं त्या वेळेआधी कशीबशी संपवावी लागत. रात्रीचा अंधार चढायला लागला की, नंदराजाच्या राजवाड्यातून सर्वांचा लाडका कान्हा आपली बासरी वाजवू लागे. मग गोठ्यांतून गाई-गुरांच्या घुंगुरमाळाही शांत होत असत. आज मात्र संध्याकाळच्या वेळी या गोकुळाचं वेगळंच रूप जमुनेला बघायला मिळालं. आज गावाच्या मध्यभागी असलेला नंदराजाचा राजवाडा नेहमीप्रमाणे पणत्यांच्या प्रकाशानं लखलखला होताच, पण गावातली गरीब गोप-गोपींची लहान लहान घरंही दिव्याच्या प्रकाशानं उजळली होती. जमुनानदीला आश्चर्य वाटलं की, या गरिबांच्या घरी ही सुवासिक तेलाची दिवाळी कशी काय? तिच्या पाण्यावरचा गारवा घेऊन तो गोकुळात पसरवणाऱ्या वाऱ्याला तिने विचारलं. तो म्हणाला, “अगं जमुने, गरीब गोकुळातल्या कष्ट करणाऱ्यांच्या घरात संध्याकाळ झाली की, काळोख असतो. तेलाचे दिवे लावणं त्यांना परवडत नाही. नंदराजांच्या हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी आज सकाळी आदेश दिला की, त्यांच्या राजवाड्यातल्या सर्वात मोठ्या दिव्यामधून गरीब गावकऱ्यांनी तेल घेऊन जावं. आपल्या घरातले दिवे लावावेत. हा सगळा प्रकाशत्यामुळेझालाय. चमत्कार म्हणजे, इतक्या गरिबांनी राजवाड्यातल्या दिव्यामधलं तेल नेलं, तरीही त्या दिव्यातलं तेल काही कमी झालं नाही. तो अजून जळतोच आहे.”

हे ऐकून जमुना नदीचं मन गहिवरून आलं. तिनं प्रार्थना केली की, 

“अशा नंदादीपकानं प्रत्येकाच्या घरातला, मनातला अंधार दूर होवो. मैत्रीचा, प्रेमाचा प्रकाश पसरो.”

दादीची गोष्ट ऐकता ऐकता नीलला कधी झोप लागली, हे त्याचं त्यालाच कळलं नाही.

त्याला जाग आली तेव्हा तो आश्चर्यानं भोवताली बघू लागला. संध्याकाळ झाली होती. त्याचं मोठ्ठं घर एखाद्या पॅलेससारखं झगमगलं होतं. सगळ्या खिडक्यांमध्ये, दारांमध्ये, गच्चीच्या कठड्यांवर पणत्याच पणत्या तेवत होत्या. नुसत्या तेवत नव्हत्या, तर त्या तेवणाऱ्या पणत्यांमधून एक मंद सुवास दरवळत होता.

‘ओह् याह्, इट्स दिवाली...फेस्टिव्हल ऑफ लॅम्प्स. फेस्टिव्हल ऑफ लाईट. व्हॉट अ स्वीट स्मेल. यस्स...आय अॅम एक्सायटेड टू सेलिब्रेट दिवाली इन इंडिया, इन माय होम स्वीट होम.’ 

तो जिन्यावरून उड्या मारत खाली आला. खालचं दृश्य पाहून जागीच उभा राहिला. त्याच्या घराचं जणू एका राजवाड्यात रूपांतर झालं होतं. व्हरांड्यात एक मोठा दिवा तेवत होता. सुंदर डिझाइन असलेला दिवा. दादीनं सांगितलेल्या नंदादीपकाच्या गोष्टीची आठवण झाली नीलला.

तेवढ्यात सुदाम आत आला. त्याच्याबरोबर गोवर्धनही होता. त्या दोघांनी नीलला स्वतः स्केच काढलेली, बनवलेली सुंदर ग्रीटिंग देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नीलकरता हे सगळं नवीन होतं. त्याला आठवलं, दादीमा घरी आलेल्या प्रत्येकाला काही ना काही घरचं देते.

तो आत गेला. आपल्या बॅगेतली ड्रॉइंगची दोन मोठ्ठी, नवी स्केचबुकं घेऊन तो बाहेर आला. त्या दोघांना ती स्केचबुक देत त्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते दोघंही अमेरिकेतली ती भारी भेट पाहून खूप खूश झाले.

नीलनं पाहिलं, त्याला वाटलं व्हरांड्यात लावलेला तो मोठा, सुंदर डिझाइन असलेला नंदादीपक आणखीनच झगझगलाय. सुवासिक प्रकाश देऊ लागलाय.

जणू त्या नंदादीपकातलं सुवासिक तेल आता कधीच संपणार नव्हतं. नीलच्या मनातल्या भारताबद्दलच्या, गावाबद्दलच्या, इथल्या माणसांबद्दलच्या प्रेमासारखं.

...नंदादीपकाचा लखलखीत प्रकाश घेऊन नील अमेरिकेला परत गेला.

नीलच्या लॅपटॉपवर पासवर्ड झळकत होता…

-डॉ. निर्मोही फडके

***

My Cart
Empty Cart

Loading...