हाय फ्रेंड्स! शाळा सुरु होऊन तुमचं रुटीन एव्हाना सेट झालं असेल. पाऊसही आता कमी झालाय. मग आता happening काय आहे बरं? आता मोस्ट happening आहे श्रावण महिना! श्रावणात म्हणजे फुल टू धमाल असते. वेग वेगळी व्रतं - वैकल्य असतात, प्रथा - परंपरा असतात आणि खाण्याची पण एकदम व्हेजिटेरियन चंगळ असते. आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या जर आपण आजच्या काळाशी नीट रिलेट केल्या ना, तर खूप सही वाटतं. आपणही तसाच काहीसा प्रयत्न आज करूया.
श्रावण पंचमी म्हणजे नाग पंचमी. या दिवशी अनेक लोक अगदी भक्तीभावाने नागाची पूजा करतात, त्याला दूध देतात. आजच्या काळात नागाची पूजा करायची आवश्यकता आहे का? नागाला दूध खरंच आवडतं का? सगळेच साप विषारी असतात का? आपण घरात साप पाळू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भेटूया अभय काकांना. त्या आधी त्यांची थोडीशी ओळख करून देते. ठाण्याला राहणारे अभय पावगी सर्पमित्र आहेत. लोकांपासून सापांना आणि सापांपासून लोकांना वाचवण्याचं काम ते गेली अनेक वर्षं करतायत. त्यांना ट्रेकिंग, mountaineering आणि पक्षी -निरीक्षण, फोटोग्राफी करण्याची खूप आवड आहे. साधारण १९८८-८९ मध्ये अभयकाका त्यांच्या दोन मित्रांसोबत भीमाशंकरला गेले होते. तेव्हा एक मण्यार - म्हणजे सापाचा एक प्रकार - त्यांना दिसली. तेव्हापासून त्यांच्या मनात सापां विषयी उत्सुकता निर्माण झाली. पुढे मग तळेगावला नोकरी निमित्त राहत असताना त्यांना तिथे एक सर्प प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली आणि तिथल्या सर्पमित्र असणाऱ्या ग्रुपशी त्यांचा संपर्क वाढला. तेव्हा अभय काका घरी एकटेच राहत असल्यामुळे सर्पमित्रांनी पकडलेले साप त्यांच्याच घरात ठेवले जात. एकाच वेळी त्यांच्या घरी ३० - ४० साप सुद्धा असायचे! तेव्हा शेतकऱ्यांसाठी एक सर्प जागृती उपक्रमही ते करयचे. तळेगावहून अभयकाका ठाण्याला आले आणि तिथे त्यांच्या कंपनीच्या आवारातच त्यांना एक साप मिळाला, तो त्यांनी येऊरच्या जंगलात सोडला आणि तेव्हा पासून ठाण्यातही त्यांचं नाव सर्पमित्र म्हणून घेतलं जायला लागलं. मनुष्य वस्तीत कुठेही साप निघाला तर अभय काकांना बोलावणं येतं आणि तेही काहीही पैसे न घेता कॉल अटेंड करतात. त्यांचा नंबर १०१ या फायर ब्रिगेडच्या नंबरवर सुद्धा मिळू शकतो.
अभय काकांची ओळख तर मी तुम्हाला करून दिली, आता त्यांच्याशीच गप्पा करूया. साप पकडण्यासाठी गेल्यावर तिथले लोक अभयकाकांना बरेच प्रश्न विचारात. त्याबद्दल अभ्यास करून त्यांनी सापांची भरपूर माहिती मिळवली. अभयकाका म्हणाले, सापांच्या एकूण ३५० जाती आहेत. त्यापैकी ४७ विषारी आहेत. त्यातल्या २४ जाती तर खोल समुद्रात राहतात. त्यामुळे माणसांशी त्यांचा संपर्क येण्याची शक्यता अगदीच नगण्य असते. सर्वसाधारणपणे नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस असे ४ प्रकारचे विषारी साप आपल्याला बघायला मिळतात. विषारी सापांपैकी काही न्युरो टॉक्सिक असतात तर काही हेमो टॉक्सिक असतात. न्युरो टॉक्सिक सापांमुळे माणसाच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. त्यामुळे असा साप जर झोपेत चावला तर माणूस झोपेतच बेशुद्ध होऊन दगावतो. हेमो टॉक्सिक सापांमुळे रक्त वाहिन्यांवर परिणाम होऊन रक्तस्रावाने माणूस मृत्यू पावतो. कुणालाही साप चावला तर ताबडतोब त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं. 000साप चावल्यावर साधारणतः दीड तासाने त्याची लक्षणं दिसायला लागतात आणि दीड तासात पोहोचता येईल एवढ्या अंतरावर एखादं सिव्हिल हॉस्पिटल नक्कीच असतं.
नाग पंचमीला नागाला सर्रास दूध पाजलं जातं. नागाला दूध खरंच आवडतं का, सापाचं नेमकं खाणं काय असतं असं विचारल्यावर अभय काकांनी सांगितलं, दूध हे साप / नागाचा शत्रू आहे. दूध प्यायल्याने नागाला सर्दी होते, त्यातून न्यूमोनिया होतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे सापाला कधीही दूध पाजू नये. मण्यार आणि कोब्रा हे इतर साप खाऊन जगतात. जर इतर साप नाही मिळाले तर मण्यार एकवेळ बेडूक वगैरे खाते पण नाग मात्र साप शिवाय दुसरं काहीही खात नाही. बिन विषारी साप भक्ष्याला पकडून, विळखा घालून सफोकेट करून मारतात आणि मग खातात तर विषारी साप भक्ष्याला डंख मारतात आणि सोडून देतात. सावज थोड्या अंतरावर जाऊन मेल्यावर त्याचा माग काढत जातात आणि मग ते खातात. तोपर्यंत सावजाच्या अंगात सापाचा लाळे सारखा द्रवही इंजेक्ट झालेला असल्यामुळे ते सावज पचण्यासाठी सोपं होतं. सापाचे पाचक रस सूर्य प्रकाशाशी संपर्क आल्यावर activate होत असल्याने बऱ्याचदा साप भक्ष्य पचवण्यासाठी उन्हात बसतात. बिन विषारी सापांना विषारी सापांपेक्षा भक्ष्य पचवण्या साठी जास्त वेळ लागतो.
अभय काकांच्या घरी साप, नाग वगैरे मोठ्या डब्यात बंद करून ठेवलेले असतात वगैरे बरच काही, या मुलाखतीसाठी त्यांच्याकडे जाण्या आधी ऐकलं होतं. त्यामुळे तिथे जाताना मनात जरा धास्तीच होती. पण अभयकाका म्हणाले की साप सापडल्यावर त्याला जंगलात सोडे पर्यंत कधी कधी घरात ठेवावं लागतं. एखादा साप पकडल्यावर त्याला योग्य वेळी जंगलात सोडावं लागतं. कधी तो आजारी असेल, अशक्त झाला असेल तर त्या अवस्थेत त्याला जंगलात सोडणं त्याच्या हिताचं नसतं किंवा मण्यारी सारखा साप असेल तर त्याला रात्रीच जंगलात सोडावं लागतं कारण मण्यारीला रात्रीच दिसतं, दिवसा तिची दृष्टी क्षीण असते. अशा वेळी काही काळ साप घरात सुरक्षित ठेवावे लागतात. साप अनेक दिवस सुप्तावस्थेत राहू शकतो त्यामुळे उजेड, अन्न - पाणी मिळालं नाही तरी बराच काळ साप जिवंत राहू शकतो. कधी दुष्काळ किंवा पूर परिस्थिती असेल तर अशा पद्धतीने सुप्तावस्थेत जाऊन स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता निसर्गाने काही प्राण्यांना दिलेली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी साप घरात ठेवायची वेळ आली तर त्याची विशेष काही देखभाल करावी लागत नाही. पण साप पाळणं हे कायद्यात बसत नाही आणि साप हा काही पाळीव प्राणी नाही. तुम्ही वर्षभर साप अगदी प्रेमाने पळालात तरी त्याला धोका जाणवला तर तो तुम्हाला चावतोच!
कोणी म्हणतं कि साप वारुळात राहतो, कोणी म्हणतं कि तो बिळात रहतो. नक्की सापाचं निवासस्थान कोणत? अभयकाकांनी सांगितलं, २४ अंशा पेक्षा जास्त तापमान हे सापासाठी योग्य नसतं. तापमान २४ अंशा पेक्षा जास्त असेल तर साप अस्वस्थ होतात. वारूळ किंवा बिळात बाहेरच्या तपमाना पेक्षा काही अंश कमी तापमान असतं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी साप कम्फर्टेबल असतो. पण साप स्वतः कधीच वारूळ किंवा बीळ तयार करत नाही. मुंग्यांचं वारूळ किंवा उंदीर, घूस, खेकडे, साळींदर यांची बिळं हे सापांच वसतीस्थान असत. त्यामुळे 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणतात ते अगदी खरं आहे!
बऱ्याचदा देवळात ज्या नागाच्या प्रतिमा असतात त्यांच्या तोंडात तांब्याचा पैसा किंवा तांब्याची वस्तू ठेवलेली दिसते. एक धार्मिक गोष्ट म्हणून हे केलं जातं पण त्यामागे खरंतर शास्त्रीय कारण आहे. सापाचं विष 'तांबे' या धातूवर पडलं तर त्यातले विषारी घटक नाहीसे होतात. इतर कुठल्याही धातू बरोबर ही अभिक्रिया होत नाही. त्यामुळे साप मेल्यावर त्याचं विष वातावरणात पसरून हानी होऊ नये म्हणून त्याला पुरण्या आधी त्याच्या तोंडात तांब्याची वस्तू ठेवली जाते. मेलेल्या सापाला कधीही जाळायचं नसतं कारण साप जाळल्यावर जी राख राहते ती हवेत पसरणं हे धोकादायक असतं त्यामुळे मेलेल्या सापाला पुरणं हेच योग्य असतं असंही अभय काकांनी सांगितलं.
नाग पंचमीला गारुड्यांकडून साप/नागांना त्रास होतो. अभय काकांनी वाईल्ड लाईफ बरोबर पाच वर्षं काम करून पुष्कळ साप जप्त केलेत. आता ठाण्यात एकही गारुडी नाग पंचमीला नाग घेऊन फिरताना दिसत नाही! पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडता यावं, इतरांना भेटता यावं म्हणून वट पौर्णिमा, नाग पंचमी अशा व्रतांची निर्मिती झाली. आता तो उद्देश राहिला नसल्याने आपण काळा बरोबर बदललं पाहिजे असं अभय काकांना वाटतं. ते म्हणतात, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच सापांचं जैविक महत्त्व खूप आहे. साप उंदरांना त्यांच्या बिळात शिरून मारतात. उंदराची मादी तिच्या आयुष्यात साधारण एक हजार पिल्लांना जन्म देते आणि एक धामण जवळजवळ ऐंशी हजार उंदरांना नष्ट करते! जर साप नसतील तर सगळ्या जगात उंदरांचाच सुळसुळाट होईल आणि माणसाचंही जगणं कठीण होईल! नाग पंचमीला नागाची पूजा करण्या पेक्षा सापांविषयी माहिती मिळवून त्यांच्या बद्दलची मनातली भीती, घृणा काढून टाकणं, सापांना त्रास न देणं या गोष्टी आता केल्या जायला हव्यात.
सापांना गंधज्ञान नसतं, त्यांना ऐकू सुद्धा येत नाही मग गारुड्याने पुंगी वाजवली की साप कसा डोलतो हा एकदम नागपंचमी स्पेशल प्रश्न माझ्या मनात होताच. अभय काकांनी आमच्या गप्पा संपता संपता सांगितलं की गारुडी त्यांच्या त्या पुंगीला एखादी गडद रंगाचा गोंडा किंवा कापडाचा तुकडा वगैरे बांधतात. साप त्या रंगाकडे बघून डोलतो!
अभयकाकांशी गप्पा, त्यांच्या कडचे फोटो बघणं हा माझ्या साठी तर सॉलिड एक्स्पिरीयन्स होता. आता मी सापाला घाबरणार नाही आणि कुठेही साप दिसला किंवा सापाला कुणी त्रास देतंय असं जरी दिसलं तरी लगेच अभयकाकांना फोन करणार. तुम्ही पण कराल ना?
-अंजली कुलकर्णी-शेवडे
***