Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 14

image By Wayam Magazine 16 November 2022

 On 2nd June 2020, Children Magazine

शिस्तशीर मुलांना सलाम!

“आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत?

आज वाचा भाग- 14

1. करोना फायटिंगच्या कामात छोटीशी मदत!

मी दिल्लीला राहते. मी या दोन महिन्यांत काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याबद्दल तुम्हांला सांगणार आहे.
या दोन महिन्यांत माझे तीन दात पडले. ह्या तीन दातांपैकी एक दात तर माझ्या आजीच्या वाढदिवसाला पडला. जेव्हा मी दुसरीत होते, तेव्हा माझ्या मैत्रिणींचे माझ्यापेक्षा जास्त दात पडले होते. आता लॉकडाऊननंतर जेव्हा केव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणी दात पडण्याच्या बाबतीत सेम सेम असू बहुतेक!

मी माझ्यासाठी पेन्सिल ठेवण्याचा पाऊच तयार केला. त्यासाठी मी बिस्किटाचा रिकामा खोका घेतला. त्या खोक्याला कोरा कागद चिकटवला. खोक्याच्या उघड्या बाजूला कागद लावला नाही. रिकाम्या बाजूने पेन्सिली ठेवायच्या खोक्यात!

या दोन महिन्यांत अधूनमधून कंटाळा येत असला तरी मी खूशही होते. कारण-आई बाबा घरीच होते आणि माझ्याबरोबर रोज खेळतही होते. आम्ही रोज एकत्र जेवतो. आम्ही एकमेकांना जेवण वाढतो. इथे दिल्लीत आता खूप गरम होतंय, त्यामुळे जेवताना आम्ही एकमेकांना माठातलं थंडगार पाणी देतो. मी स्वयंपाक करायला शिकले. रोज दुपारचा चहा आता मीच करते. भाज्या चिरायला शिकले. माझ्या बाबांनाही वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड आहे. आम्ही दोघांनी मिळून मँगो कुल्फीसुद्धा केली.

लॉकडाऊनमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हांला सांगते. दिल्लीत ‘आरएमएल’ नावाचं एक मोठ्ठं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधल्या एक डॉक्टर आमच्या कॉलनीत राहतात. या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांसाठी फेस शिल्ड्स आल्या होत्या. पण त्याचे तीन सुटे भाग होते आणि ते एकमेकांशी जोडायचे होते. डॉक्टर किंवा नर्स तर पेशंटना बघण्यात बिझी. मग आमच्या ह्या डॉक्टर मावशींनी विचारलं, कोणी मदत करू शकेल का हे भाग जोडायला? माझ्या आईने त्यांना सांगितलं की आम्ही सगळे करू तुम्हांला मदत. मग काय? चार तासांत आम्ही २०० फेस शिल्ड असेम्बल करून दिले त्यांना! करोनाशी फाईट करण्यात जे जे पुढे आहेत, त्यात आमचाही हा एक छोटासा सहभाग!