Menu

पर्सिव्हिअरन्स रोव्हर ची गोष्ट - वयम् मराठी मासिकात

image By Wayam Magazine 11 November 2022

By Wayam Magazine,  On 31st March 2021, Children Magazine

सध्या मंगळावर काम करत असलेला पर्सिव्हिअरन्स रोव्हर नेमका कसला शोध लावतोय? समजून घेऊया!

हॅलो, मी ‘पी’ बोलतोय. थांबा, असं दचकू नका. ‘पी’ म्हणजे पर्सिव्हिअरन्स यांत्रव. होय, तोच तो, सध्या मंगळाच्या भूमीवर असणारा. ३० जुलै २०२० या दिवशी वसुंधरेचा निरोप घेऊन मी अवकाशात झेप घेतली आणि १८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी मंगळावर उतरलो. त्यासाठी जवळपास ४५० कोटी किलोमीटरचं अंतर मला पार करावं लागलं. आता मी माझ्या कामाला लागलो आहे. माझं काम आहे, या ग्रहावर कधीकाळी सूक्ष्मजीव होते का, ते शोधण्याचं! ते काम सोपं नाहीये बरं! पण माझ्याकडे उत्तम कॅमेरा आहे, उपकरणं आहेत- जमीन खोदणारी, खडकाला भोक पाडून त्यातला नमुना गोळा करणारी. मला इथे मंगळावरच एक वर्ष काम करायचं आहे; म्हणजे आपल्या पृथ्वीच्या हिशेबात जवळपास ६८७ दिवस! त्यासाठी मला इंधन लागणार. ते तयार करण्याचीही सोय माझ्यातच आहे. शिवाय एक छोटंसं हेलिकॉप्टरही आहे. या सगळ्यांच्या मदतीनं मी या ग्रहावरच्या जमिनीत कोणे एके काळी सूक्ष्मजीव असल्याच्या खुणा मिळताहेत का, ते पाहणार आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट सांगतो. मंगळावर सजीवसृष्टी असली पाहिजे, असं ठाम मत पेर्सिव्हल लोवेल या अमेरिकी खगोलशास्त्रज्ञाने मांडलं होतं. आपल्या ‘मंगळ’ या पहिल्याच ग्रंथात लोवेल यांनी ‘मंगळावरील प्रगत जीवसृष्टी मृत्युपंथाला लागली आहे,’ असं प्रतिपादन केलं होतं. ते वाचून लोकांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला होता. मग काय विचारता! अनेक हौशी खगोलनिरीक्षकांनी आपल्या दुर्बिणींमधून मंगळाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. त्यांपैकी काहीजणांना मंगळावरील रेषांमध्ये परमेश्वराचं नाव कोरलेलं आढळून आलं, तर काहीजणांना मंगळवासीयांनी त्यांना वाचविण्यासाठी पाठविलेले संदेश दिसू लागले. मंगळवासीयांवर आलेल्या संकटाची कल्पना आम्हांला आली आहे, हे त्यांना सुचविण्यासाठी पृथ्वीवर प्रचंड आकाराचा पायथागोरसचा सिद्धान्त कोरण्याची सूचनाही काहीजणांनी त्यावेळी केली होती. पण ते सारं तितकंच राहिलं.

पुढे, म्हणजे १९८४ सालात, रॉबर्टा स्कोअर नावाची एक तरुणी अंटार्क्टिका खंडाच्या अॅलन हिल्स या भागात फिरत होती. फिरता फिरता तिला बर्फातून बाहेर आलेला एक दगड दिसला. तो जरा निराळाच दिसत होता. साहजिकच रॉबर्टानं तो उचलला. तिनं तो नासाच्या ताब्यात दिला. नासानं त्याची कसून तपासणी केली, तेव्हा तो मंगळावरून आल्याचं सिद्ध झालं. मंगळावरचा हा दगड पृथ्वीवर आला कसा आणि कधी- या दिशेनेही अभ्यास केला गेला. तेव्हा असं दिसलं की, हा दगड १३ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळला होता. मात्र तो दगड मंगळाची भूमी सोडून अंतराळात फेकला गेला होता, त्याला जबाबदार होती एका अशनीनं मंगळाला दिलेली धडक! ही घटना एक कोटी ६० लाख वर्षांपूर्वीची! मग त्या दगडाची अधिक सखोल तपासणी सुरू झाली. नऊ वर्षं चाललेल्या अभ्यासानंतर त्या दगडात अतिप्राचीन सूक्ष्मजंतूंचे जीवाष्म सापडल्याची घोषणा करण्यात आली.

ते साल होतं १९९६! खरंतर १९७६ सालामध्ये मंगळावर उतरलेल्या व्हायकिंग नावाच्या दोन यानांनी सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या शोधातून निश्चित काही हाती आलं नव्हतं. मात्र प्राचीन काळी या ग्रहावर नद्या वाहात असाव्यात. मोठाली सरोवरं आणि सागरही असावेत, असं या यानांनी घेतलेल्या छायाचित्रांवरून वाटत होतं. २००४मध्ये आणि २०१०मध्ये दोन यांत्रव इथे उतरले होते. त्यांच्याकडेही इथल्या भूमीमध्ये काय दडलंय याचा शोध घेण्याचंच काम होतं. त्यांना असं दिसलं होतं की, कधीच्या काळी या ग्रहावर पाणी होतं. सजीवसृष्टीला पोषक वातावरण होतं. आता आणखीन शोध घेणं आवश्यक होतं. त्यासाठी २०१२मध्ये इथे क्युरिऑसिटी यांत्रव आला. तो उतरला ‘गेल क्रेटर’मध्ये! हे विवर म्हणजे एकेकाळी पाण्याने भरलेलं सरोवर असल्याच्या खुणा त्याला मिळाल्याच, पण कार्बन असलेले काही रेणूही आढळले. माझ्याही अगोदर इथे आलेल्या यांत्रवांनी सजीवसृष्टीच्या खुणांचा मागोवा घेण्याचं जे काम केलं ना, तेच मी पुढे चालू ठेवणार आहे.

‘पृथ्वीवरून लाल रंगाच्या दिसणाऱ्या या ग्रहाबद्दल आपल्याकडे आतापर्यंत बरीच माहिती जमा झाली आहे. ती असं सूचित करते की, या ग्रहाच्या जन्मानंतरची काही शे वर्षं या ग्रहावर सजीवसृष्टीला पोषक असं वातावरण होतं; तर त्या काळात या ग्रहावरचं पर्यावरणं कसं होतं, त्याचा मला शोध घ्यायचा आहे. मी ज्या ‘जेझिरो क्रेटर’मध्ये उतरलो आहे, त्या विवरामध्ये एकेकाळी पाणी असल्याच्या स्पष्ट खुणा मिळाल्या आहेत. मी त्याचाच अधिक शोध घेणार आहे. त्यासाठी मी इथल्या खडकांना भोक पाडून त्यातून त्या खडकाचा नमुना घेणार आहे. फळ्यावर लिहिण्यासाठी आपण खडू वापरतो ना, त्याच आकाराचा हा नमुना असेल. असा नमुना ताब्यात आला की, माझ्याकडे असलेली उपकरणं तो पॅकबंद करतील आणि इथल्याच भूमीवर ठेवून देतील. थांबा, थांबा, मंगळावरच्या खडकाचे नमुने पॅकबंद करून तिथेच ठेवून उपयोग काय? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण गोष्ट अशी आहे की, मला ज्या नासानं इथे पाठवलं, तीच संस्था नंतर दुसऱ्या एका यांत्रवाला इथे पाठवणार आहे. तो इथे उतरून हे नमुने उचलेल आणि मंगळाच्या अवकाशातल्या भ्रमणयानाकडे (ऑर्बिटरकडे) पाठवेल. ते यान नमुने घेऊन पृथ्वीवर येईल. मग त्यांचा अभ्यास केला जाईल.

मी ज्या विवरात आहे, तिथं नदीच्या मुखाजवळचा त्रिभुज प्रदेश जसा असतो, तसा एकेकाळी होता. तशा गडद खुणा इथे आहेत. तर अशा प्रदेशात नदीने आपल्या पाण्याच्या प्रवासाबरोबर वाहून आणलेली माती, दगडगोटे, वाळू येते. या वाळूच्या लहान लहान कणांना एकत्र बांधून ठेवणारा घटक आपल्यासाठी मोलाचा आहे. याचं कारण त्यातून आपल्याला कधीच्या काळी वाहणाऱ्या पाण्याचा आणि त्यातील घटकांचा शोध घेता येईल. इथल्या खडकांत काही खनिजं आहेत का, काही सेंद्रिय घटक आहेत का, याचाही मी तपास करणार आहे. थोडक्यात, दूरवरच्या भूतकाळात डोकावण्यासाठी मी काम करत आहे. त्यातून प्राचीन काळच्या मंगळावरच्या वातावरणाची आपल्याला माहिती होईल. शिवाय इथे एकेकाळी सजीवसृष्टी नांदून गेली असलीच तर तिचं स्वरूप काय होतं हे समजण्यासाठी माझा तपास कामी येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळावरच्या वातावरणातून प्राणवायू तयार करणं शक्य आहे का, हेसुद्धा मी आजमावून पाहणार आहे. भविष्यातील मोहिमांसाठी ते फार उपयोगी पडणार आहे.

अरे, बोलण्यात मी बराच वेळ घालवला की! पण तुमच्याशी बोलताना मला मजा आली. या मजेतून तुम्हांलाही मंगळाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली असेल नं!

-श्रीराम शिधये
shriramshidhaye@gmail.com
ज्येष्ठ पत्रकार व विज्ञान लेखक
My Cart
Empty Cart

Loading...