Menu

माझी पहिली चहाडी

image By Wayam Magazine 14 November 2022

By Nidhi Pathwardhan,  On 24th July 2020, Children Magazine

कोकणातल्या एका छोट्याशा गावात राहणारी पिंटी आणि तिचे दोन भाऊ यांच्या बालपणीच्या काळातल्या, म्हणजे १९८० च्या दशकातील मजेदार अनुभव-कथा सांगणारे डॉ. निधी पटवर्धन यांचे ''पिंटी’ हे नवे पुस्तक जरूर वाचावे, असे आहे. वाचा यातील एक कथा''

आजी प्लास्टिकच्या जाड कागदावराच्या चिकोड्या सोडवत होती. मी पण तिला मदत करत होते. चिकवड्या सुकल्या की आपोआपच सुटत. न सुटणारी एखादी जाड चिकवडी पाठून ओलसर राहिलेली असे, ती मी गट्टम करत होते. आजी ओरडत होती, ‘पुरे झाली मदत.’ मी पुन्हा दोन चिकवड्या घेऊन पळ काढला. रुप्याला एक दिली. त्याने आणि मी आपापली चिकवडी डोळ्यांना लावली. त्यातून आरपार दिसते का ते पाहिले. मग आम्ही कित्तीवेळ ती चिकवडी ओठांमध्ये ठेवून त्यातल्या खारटपणाची मौज घेत बेड्यात (सुपारीच्या राशीत) बसून राहिलो. चैत्रगौरीचे हळदीकुंकू आटपून आई परत येताना दिसली. आम्ही धावत तिच्यापाशी गेलो. ‘आंब्याची डाळ आम्हांला दे’ म्हणून तिच्या अंगापाशी झोंबत राहिलो. तिच्याबरोबर घरात आलो. चांदाडीच्या पसरट पानावरची डाळ खाली ठेवून, आजीच्या भाषेत ‘मांडा ठोकून’ आम्ही बोटाने चाखू लागलो.

आई आजीला काही सांगत होती. ती म्हणत होती, “काय करावं कळत नाही. पुरोहितकाकू झांज हळू वाजवतात भजनात. त्यांच्यामुळे भजन रंगत नाही. झांज जरा मोठ्याने वाजवायला हवी त्यांनी. बरं त्या काकू एवढ्या मोठ्या आहेत, की त्यांना हे कोण सांगणार?”

आम्ही हे ऐकत होतो. डाळ खाऊन आम्ही त्रिविक्रमाच्या देवळात खेळायला गेलो. घरी आल्यावर आई हेच बाबांना सांगताना मी ऐकले.

दुसऱ्या दिवशी मी फणसाचा पारा (कोवळा, छोटा फणस) घेऊन शांतूमावशीकडे द्यायला जात होते. त्रिविक्रमाच्या देवळाच्या थोडं पुढे मला पुरोहितकाकू दिसल्या. उंच आणि बारीक असलेल्या काकूंनी चष्मा लावला होता. डोक्यात अनंताचं फूल घातलं होतं. हातात बारीक फुलाफुलांची पिशवी होती. ‘काय गो पिंट्ये?’ त्यांनी मला हाक मारली. त्यांचा आवाज त्यांच्या झांजेसारखाच हळू नि नाजूक होता. मी म्हटले, ‘‘काय काकू?’’ त्यांनी मला विचारले, “फणस कोणाकडे नेतेयस? आज घरात जेवण काय होते? आजी काय म्हणते?” ...असे आणखी बरेच प्रश्न विचारले. त्यांचे घर आले. त्या आत वळणार तोच मला काही आठवले. मी त्यांना म्हटले, “काकू, तुम्ही झांज हळू वाजवता असे आई म्हणत होती.” त्या जराशानं पुन्हा जवळ येत म्हणाल्या, ‘‘आणखी काय म्हणत होती तुझी आई?’’ “ती एवढेच म्हणत होती की, ‘‘त्या मोठ्या आहेत, त्यांना कोण सांगणार? त्या झांज हळू वाजवतात...” त्यांनी आणखी काय, आणखी काय, असे परत परत विचारले. मी त्यांना परत परत याच दोन्ही ओळी सांगितल्या. माझ्या मनाला एकदम अभिमान वाटला. ‘‘चला... आई जे सांगू शकली नाही ते मी सांगितले कीनई...! यंव रे यंव!’’ दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघराच्या पायरीवर बसून आजी गरे तळत होती ते पाहत होते. तितक्यात आई आली. तिने माझ्या पाठीवर दोन धपाटे घातले. “कोणी सांगितलेलं नसत्या चहाड्या करायला?” असे म्हणून ती मला चौदावे रत्न दाखवीन असे म्हणू लागली. मला कळेना, काय झालं? काय सांगितलं म्हणून आई अशी कडाडली!

आजी आईला समजावत होती, “जाऊदे सूनबाई, पोर लहान आहे.”

‘‘चहाडी करायची कळते, तेव्हा ती लहान नाही वाटतं?’’ – आई पुन्हा तणतणली. मी झोपाळ्यावर बसून हमसून हमसून रडत होते. बाबा खालच्या मळ्यातून वर आले. आईशी त्यांचे बोलणे झाले. मग ते झोपळ्यावर आले. मी रडत असले की बाबांना वाईट वाटतं. मग ते गाणं गातात- ‘‘ताई रडू नको बाई, मला रडू दाटते, तुझे आसू माझ्या गाली ओघळते वाटते.’’ मग मला आणखी रडू येते.

मी बाबांच्या कुशीत शिरले. बाबा मला समजावून सांगू लागले. “आईनं एकदम तुला मारायला नको होतं. तुला तरी काय माहीत, चहाडी काय असते? त्यानं काय होतं ते? पण तुला सांगतो पिंटा, कोणी कोणाविषयी खरंतर वाईट बोलू नये आणि कोणी कोणाविषयी काही बोलत असेलच तर ते दुसऱ्याला सांगू नये. एकदा जर ती सवय लागली की भाजीवर कीड पडावी तसे आयुष्य नसून जाते. सांगायचेच असेल, तर कोणालाही कोणाविषयी चांगलंच सांगावं, ज्याने त्या माणसाच्या आयुष्यात आनंद वाढतो. दुसऱ्याच्या जीवनात आनंद भरावा, दुःख नाही... म्हणून असं दुसऱ्याबद्दल आपल्या कानावर काही वाईट पडलं तर ते आपण दुसऱ्याला सांगू नये कधी!” मी मानेने ‘हो’ म्हटलं आणि बाबांना बिलगले. आता कोणी कोणाविषयी काही सांगत असेल की माझ्या मनात पुरोहितकाकूंची झांज वाजते आणि मला सावध करते. पुरोहितकाकू आता नाहीत. त्या देवाघरी गेल्या, पण त्यांच्या झांजेने मला केवढे शहाणे केले !

-डॉ. निधी पटवर्धन


जुलै २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...