Menu

भाषाप्रभू कुसुमाग्रज

image By Wayam Magazine 27 February 2024

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. ह्या उपक्रमामागील प्रेरणा कोणती? ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेवरील प्रेम व त्या मागील आग्रह नेमका का बरं ? आणि या भाषाप्रभू महाकवीने आपल्या कवितेतून भाषेचा संपन्न वारसा कसा दिला? हे सांगणारा विशेष लेख, खास ‘वयम्’ बालदोस्त व त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी...

महाकवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून गौरवाने साजरी केली जाते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न करण्याचं कार्य वि.वा.शिरवाडकर यांनी केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ज्ञानपीठ पुरस्कारानेही त्यांच्या साहित्य कर्तृत्वाचा सन्मान झाला. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९३३ साली प्रकाशित झाला, परंतु जेव्हा त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह (१९४२) साली प्रसिद्ध झाला, तेव्हा साहित्यातील ज्येष्ठांचे लक्ष्य ‘विशाखा’ने वेधून घेतले. कल्पनेची उत्तुंग झेप, शब्दांची तेजस्वी झळाळी आणि मराठी भाषेचे रत्नजडित सौंदर्य यामुळे ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी कवितेत दीपस्तंभच उभारला गेला. त्यानंतर समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा वादळवेल, छंदोमयी, मुक्तायन.. नावे तरी किती घ्यावीत! 

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केवळ काव्यलेखन केले नाही, तर नाटक, कथा-कादंबरी, ललित-वैचारिक अशा अनेक वाङ्मय प्रकारांत त्यांनी लेखन केले. कुसुमाग्रज हे त्यांनी काव्यलेखनासाठी घेतलेले नाव, पण आपल्याला माहीत आहेत विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि.वा.शिरवाडकर. या त्यांच्या मूळ नावाने त्यांनी विपुल असे गद्यलेखन केले.

आज बहुचर्चित असलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट शिरवाडकरांच्याच ‘नटसम्राट’ ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित आहे. एका यशस्वी नटाची व त्यातील माणसाची व्यवहारिक जगात कशी शोकांतिका होते याचे दर्शन वि.वा.शिरवाडकर यांनी घडविले आहे. ‘नटसम्राट’च्या आधीही त्यांनी एकाहून एक दर्जेदार नाटके मराठी रंगभूमीला दिली. दूरचे दिवे, कौंतेय, ययाती आणि देवयानी- अशी काही नावे आपण लक्षात ठेवा. ‘वैष्णव’, ‘जान्हवी’ या त्यांच्या कादंब:याही वेगûया ठरल्या. त्यांच्या अष्टपैलू लेखनाबद्दल खूप बोलता येईल; पण त्यांचा जन्मदिवस ‘मराठी दिन’ असा गौरवाने साजरा करण्यामागचे कारण, त्यांच्या कवितेच्या सोबतीने जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न आपण करूया. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि इथल्या सुरांची, संतांची परंपरा हे शिरवाडकरांच्या श्रद्धेचे विषय होते. 

माझ्या मराठी मातीचा 

लावा ललाटास टिळा  

तिच्या संगाने जागल्या 

दऱ्याखोऱ्यातील शिळा  

या शिरवाडकरांच्या म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळी! अवघ्या चार ओळींतूनच मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे.

आपला शौर्याचा वारसा त्यांनी कवितेतून रसिकांपुढे मांडला. आपण ध्वनिमुद्रिकेद्वारे त्यांचे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गीत अनेकदा ऐकले असेल. ही कविता खरे तर आपण मूळातून संपूर्ण वाचायला हवी. प्रतापराव गुर्जर ह्या शूर सरदाराने छत्रपती शिवरायांच्या उद्विग्न उद्गाराने प्रेरित होऊन जो विलक्षण पराक्रम अवघ्या सात वीरांच्या साथीने गाजवला; त्यात हे सातही वीर बलाढ्य शत्रूपुढे धारातीर्थी पडले. कुसुमाग्रजांच्या या कवितेत गोष्ट आहे, नाट्य आहे. अवघ्या सात योद्ध्यांसह प्रतापरावांनी समशेर चालवली; त्या तुफानाचे वर्णन करताना कुसुमाग्रज लिहितात- 

खालून आग, वर आग, आग बाजूंनी 

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी 

गर्दीत लोपले सात जीव ते मानी 

खग सात जळाले अभिमानी वणव्यात 

वेडात मराठे वीर दौडले सात!

वाचतानाही तुम्हांला भाषेतून मनगटाला उर्जा कशी मिळते याचे प्रत्यंतर येईल. अशीच अत्यंत गाजलेली आणि जी कविता म्हणजे मराठी कवितेतला मानदंड झाली, ती म्हणजे ‘क्रांतीचा जयजयकार!’ ही कविता भाषेच्या अभ्यासासाठी, उच्चारांच्या स्पष्टतेसाठी आणि राष्ट्रभक्तीच्या संस्कारासाठी पाठ करा. राष्ट्रासाठी आपल्या घरादाराचा त्याग करून केवळ भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणा:या क्रांतिकारकांचे हृदयातले उद्गार, कुसुमाग्रजांनी टिपले आहेत. प्रत्येक ओळ म्हणजे काळोखावर रेखलेले तेजाचे सुभाषित आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतमातेला, चहूबाजूंनी तिचा लचका तोडायला उत्सुक असणा:या शत्रूला आपले सुपुत्र म्हणतात- 

‘कशास आई, भिजविसि डोळे, 

उजळ तुझे भाळ 

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल 

सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते 

उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते 

लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार 

आई, खळाखळा तुटणार, 

गर्जा जयजयकार क्रांतीचा 

गर्जा जयजयकार!’

ही कविता संपूर्ण मिळवून, सा:या वर्गाने शिक्षकांसह एकत्र म्हटल्यास कुसुमाग्रजांच्या भाषेचे वैभव आपणास आपोआप जाणता येईल व त्यांचा जन्मदिवस आदराने ‘भाषा दिन’ म्हणून आपण का साजरा करतो, त्याचे कारणही समजेल.

भाषा आणि जिद्दीने वैभव प्रतीत होते, अशी ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही एक महत्त्वाची कविता आहे. माणसाची ध्येयावरील निष्ठा किती टोकाची हवी, निराशेवर, पराभवावर मत करून माणसाने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कसे झुंजार व्हायला हवे हे सांगणारी ही अजरामर कविता आहे. नव्या भूमीच्या शोधात निघालेला कोलंबस समुद्रालाही लाजवेल अशा अथांग जिद्दीने अपु:या साधनांसह निघाला आहे- अशी कल्पना करून त्याच्या उरातील सूर्य- जिद्दीचे स्फूर्तिदायी उद्गार कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ह्या कवितेतून व्यक्त केले आहेत. खवळलेला समुद्र, होडी उद्ध्वस्त करणारे वादळ, आयुष्य भस्मसात करणा:या कडकडणा:या विजा पदोपदी असतानाही मानामनांतील अगम्य, अजिंक्य प्रवृत्ती जागी करणारा हा कोलंबस म्हणतो- 

कोट्यवधी जगतात जिवाणू, 

जगती अन् मरती 

जशी ती गवताची पाती 

नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली 

निर्मितो नव क्षितिजे पुढती!

नुसते गवताच्या पात्यासारखे अनेकजण जगतात, परंतु ज्यांना काही ध्येय गाठायचे आहे ते नवेनवे मार्ग धुंडीत, समुद्रालाही- अरे पामरा, तुला तरी किनारा आहे, आमच्या ध्येयाच्या आसक्तीला किनाराच नाही- असे म्हणत पुढेच जात असतात. आता याच संस्कारक्षम वयात कोलंबसाच्या जिद्दीच्या बिया मनगटात पेरल्या तर पुढच्या आयुष्यात त्याचा महावृक्ष होऊ शकेल. 

‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कुसुमाग्रजांची अशीच उत्कृष्ट कविता. खगोलातील एक सत्य ह्या महान कवीने आपल्या प्रतिभेच्या परीसस्पर्शाने काव्यरूपात मांडून निष्ठा आणि स्वप्नांवर प्रेम करणा:या अढळ मनाला अजरामर केले. खरे तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे भौगोलिक वास्तव. परंतु तेजावर प्रेम करणारी पृथ्वी, सूर्याच्या भेटीसाठी युगेयुगे उत्सुक आहे, अशी कल्पना कविराजाने केली; आणि त्यातून मनाची कणखरता, समर्पण ही जीवनमूल्ये आयुष्य कसे सुंदर करतात, याचे दर्शन घडवले-

युगामागुनी चालली रे युगेही 

करावी किती भास्करा वंचना 

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी 

कितीदा करू प्रीतिची याचना!

निसर्ग, इतिहास यांमधील तेजाचे जसे आकर्षण कुसुमाग्रजांना आहे त्याप्रमाणेच राष्ट्रपुरुषांचे, समाजसंतांचेही! लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वांतील उत्तुंगतेचा वेध घेणा:या कविता आपल्या शिक्षक व पालकांच्या मदतीने मिळवून आपण वाचायला हव्यात. 

मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम यांची पराकोटीची पिछेहाट होत आहे. तो वि.वा.शिरवाडकर यांच्या चिंतेचा विषय होता. इंग्रजी भाषा व या भाषेची महती ते जाणून होते, परंतु मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक प्रश्नांना निमंत्रण देणारे आहे, हे वि.वा.शिरवाडकरांनी अनेकदा सांगितले आहे. ते म्हणतात- ‘मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील एकमेकांच्या भवितव्यावरील संकट आहे. समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किना:यावरच पेरता येते.’

वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे हे चिंतन मार्गदर्शकांकडून समजून घ्या, मातृभाषेतील सकस संतसाहित्याचे वाचन व श्रवण हेच तुम्हांला समृद्ध माणूस करेल याचे भान बाळगा. त्यासाठीच २७ फेब्रुवारी हा शिरवाडकरांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा होतो.

‘नटसम्राट’ चित्रपट अवश्य पाहा. पण त्यानंतर मूळ नाटकाचं पुस्तक जरूर वाचा. 

‘कणा’सारख्या अनेक कवितांतून संकटातून झेप घेण्याची जिद्द तुमच्यात येईल, तर ‘आगगाडी आणि जमीन’ तुम्हांला विज्ञान आणि निसर्ग यांच्यातील रस्सीखेच व अंती निसर्गाचे सामथ्र्य समजून देईल. ‘अहि-नकुल’ ही कविता तुमच्या दृष्टीने जरा अवघड वाटेल, पण भाषासौंदर्याची लखलखती प्रचिती त्यातून येईल. 

गगनापरी जगावे 

मेघापरी मरावे

तीरावरी नदीच्या 

गवतातुनी उरावे।।

असं जीवनाचं उद्दिष्ट सांगणा:या कवीने, आपल्याला भाषेचा व सुरेल जगण्याचा जो मंत्र दिला, तो जपण्यासाठी भाषा दिन! त्यांच्या नावाचा आकाशात ‘कुसुमाग्रज तारा’ झालाच, शिवाय हा साहित्य प्रांतातीलही अढळ ध्रुवतारा ठरला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यावरील आपले प्रेम विकसित होत राहो व मराठी भाषेला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त होवोत, ही शुभेच्छा!

-प्रवीण दवणे

***

My Cart
Empty Cart

Loading...