Menu

विज्ञान कथा लहान मुलांसाठी वयम् मासिकात - मंगळावर स्वारी

image By Wayam Magazine 11 November 2022

आमचं अंतराळयान आता पृथ्वीपासून कितीतरी प्रकाशवर्ष अंतरावर पोचलं होतं. यानात आम्ही पाचजण होतो. मी स्वतः यानाचा कप्तान अपूर्व, आमच्या तब्येतीची काळजी घेणारा डॉक्टर अमेय शर्मा, खगोलवैज्ञानिक मधुरा अय्यर, रसायनशास्त्रज्ञ आशय गोडबोले, आणि जीवशास्त्रज्ञ अमृता जोशी. ज्या ग्रहावर माणसाला वस्ती करता येईल असा ग्रह शोधून काढायच्या मोहिमेवर आम्ही निघालो होतो. म्हणजे थोडक्यात पृथ्वीसारखा ग्रह शोधायला. आजवर २७ ग्रहांची पाहणी आम्ही केली होती. पण कोणताच ग्रह राहण्यासाठी योग्य वाटला नव्हता. कधी तो ग्रह अतिशय थंड असायचा, तर कधी भयानक उष्ण! काही वेळा ग्रहाच्या वातावरणात ऑक्सिजनच नसायचा, तर कधी तिथला हवेचा दाब इतका प्रचंड असायचा की त्यावर वस्ती करणं अशक्य व्हावं. एका ग्रहाच्या बाबतीत बाकी सगळं ठीक होतं, पण तिथले प्राणी आकारानं फार मोठे आणि हिंस्र होते. आणि त्यात आणखी भर म्हणजे त्यांना पंख असल्यामुळे ते उडू शकत. त्यांचा हल्ला आकाशातून कधी होईल ते सांगता येत नसे. ते पाहून आम्हीच तिथून काढता पाय घेतला होता. परग्रहावरची जीवसृष्टी आपल्या कल्पनेपेक्षाही विचित्र असते, हेच खरं.

शर्मिष्ठा तार्‍याच्या भोवती फिरणारा हा नवीन ग्रह मात्र आम्हाला सर्वच दृष्टींनी आदर्श वाटत होता. त्याचं तापमान, हवामान, गुरुत्वाकर्षण सगळंच पृथ्वीशी मिळतंजुळतं होतं. आणि मुख्य म्हणजे या ग्रहावर प्राणीच नव्हते. निदान मोठ्या आकाराचे तरी नव्हते. ग्रहाभोवती जवळून अनेक प्रदक्षिणा घालताना दुर्बिणीतून पाहून मधुरानं त्याची खात्री करून घेतली होती. ग्रहावर वनस्पती मुबलक होत्या. मोठी झाडं नव्हती, पण पाचूच्या हिरव्यागार रंगाचं गवत सगळीकडे डोलत होतं.

अशाच एका गवताने भरलेल्या कुरणाच्या मधोमध मी आमचं यान अलगद उतरवलं. वातावरणात कुठलेही विषारी वायु नाहीत याची आशयनं खात्री करून घेतली. यानाचं दार उघडलं आणि खाली उतरायला शिडी लावली. चार पायर्‍या खाली उतरलो आणि खाली पहिलं तो काय?...आम्हाला जोरदार धक्काच बसला.

यानाच्या भोवतालचं गवत पार नाहीसं झालं होतं. एका वैराण माळावर यान उभं होतं. आसपास कुठंही गवताचा मागमूस नव्हता. हा काय चमत्कार? यान तर मी गवताच्या कुराणात उतरवलं होतं.

आम्हाला पहिल्यांदा वाटलं की यानाच्या इंजिनच्या उष्णतेनं गवत जळून गेलं असेल. पण तसं नव्हतं. जळल्याच्या काहीच खुणा नव्हत्या. कुणीतरी मुळासकट गवत उपटून न्यावं आणि यान उतरायला छान साफसूफ जागा करावी तसं दिसत होतं. हा काय प्रकार असावा याचा विचार करत मी आणखी एक पायरी खाली उतरलो. माझ्या पाठोपाठ अमेय उतरत होता आणि त्यानंतर अमृता आणि मधुरा. “थांबा’’, अमृताने आम्हाला थांबवले. ती बोटाने काहीतरी दाखवीत होती, “अपूर्व, ते बघ.”

ती दाखवत होती त्या दिशेला आम्ही पहिलं. आमच्या यानाची भलीमोठी सावली जमिनीवर पडली होती. त्या सावलीत गवत अजिबात दिसत नव्हतं. आजूबाजूला हिरवळ होती. सावलीतलं गवत तेवढं रहस्यमय रीतीनं नाहीसं झालं होतं. “हे कसं शक्य आहे?”, अमेय म्हणाला. “मगाशी पहिलं तर तिथं गवत होतं”. “हो, ना”, मी म्हणालो. “कुठं गेलं ते अचानक? पळून तर नाही ना गेलं?”

“या ग्रहावरचं गवत चालू शकतं की काय?”, मधुरानं शंका काढली. “हो, तसंच दिसतंय. ते बघा”,’’ अमृता म्हणाली, “आपल्या भोवतीचं गवत परत येतंय”.’’

तिने सांगितलं ते खरं होतं. आमच्या भोवतालचं बिनगवताचं वर्तुळ हळूहळू लहान होत होतं. आम्ही नीट निरखून पहिलं. वर्तुळाच्या कडेवर असलेलं ‘गवत’ उड्या मारत हळूहळू आत येत होतं. आम्ही धीर करून त्याच्या जवळ जाऊन पहिलं. ते गवत नव्हतं. वीतभर आकाराचे हिरवे किडे होते. टोळासारखे! पण त्यांना पंख किंवा पाय नव्हते. त्यांची हालचाल करायची पद्धतही अगदी वेगळीच होती. ते अंगाची स्प्रिंगसारखी गुंडाळी करून घेत आणि मग एकदम सोडून देत. त्यामुळे ताणलेला रबरबॅंड एकदम सोडून दिला की जसा दूर फेकला जातो, तसे ते दूर फेकले जात.

“बापरे!, म्हणजे सगळीकडे दिसणारं हे हिरवेगार गवत म्हणजे हिरव्या किड्यांचा समूह आहे की काय? ईss”, मधुरा किंचाळली. आम्ही सगळेच शहरलो. “हे किडे विषारी तर नसतील?”, अमेय म्हणाला, “अमृता, तुला सांगता येईल?”

“मी सांगतो ना”, आशय म्हणाला, “अमृता, हे किडे एखाद्या बाटलीत घालून आपण यानात घेऊन जाऊया. मी टेस्ट करून सांगेन, विषारी आहेत की नाहीत ते.”

गवताच्या पात्यासारखे दिसणारे दोन-तीन किडे पकडून, एका बाटलीत घालून आम्ही आणले. त्यांचं पृथक्करण करून आशय विजयी स्वरात म्हणाला, “संपूर्णपणे बिनविषारी. त्यांच्यापासून काहीही धोका नाही. त्यांच्या शरीरात क्लोरोफिल आहे. सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करणारं हरितद्रव्य. म्हणून ते हिरवे दिसताहेत. खरं सांगायचं तर अंगात क्लोरोफिल असलेले कीटक मी प्रथमच बघतोय”.

“पण खरं तर ते किडे नाहीतच,” अमृता म्हणाली, “ती पानं आहेत. झाडाची पानं. त्यांना तोंड नाही. पचनसंस्था नाही. मेंदू नाही. त्यांना किडे नाही म्हणता येणार. ती पानंच आहेत. आपल्या यानाची सावली पडली होती ना, त्या भागातली पानं तिथं सूर्यप्रकाश नसल्यामुळे अन्न बनवता येत नाही म्हणून सावलीतून दूर गेली”. “चल, काहीतरीच काय?”, मधुरानं नाक उडवलं, “ही जर झाडाची पानं आहेत तर ती हालचाल कशी करू शकतील?” “का? पृथ्वीवरसुद्धा हालचाल करू शकणार्‍या वनस्पती आहेतच की. लाजाळूचं झाड नाही का हात लावला की पानं मिटून घेत?”, अमृतानं स्पष्टीकरण दिलं, “काही काही वनस्पती तर फुलांवर कीटक बसले की त्यांना गट्टसुद्धा करतात”. “हे बाकी खरं”, अमेयनं मान डोलावली.

“आपलं यान उतरलं त्याच्या भोवती ते बिनगवताचं वर्तुळ कसं तयार झालं ते कळलं मला”, मी म्हणालो, “ते उतरत होतं तेव्हा खालच्या भागातली पानं उष्णतेपासून दूर पळाली. म्हणून ते गवत नसलेलं वर्तुळ तयार झालं. मग जेव्हा इंजिन बंद झालं आणि भोवतालची जमीन थंड झाली तेव्हा ती पानं पुन्हा जवळ यायला लागली.” “पण त्यांना जर मेंदू नाही तर उष्णतेपासून दूर पळायचं किंवा सावलीतून दूर व्हायचं त्यांना कसं कळतं?”, मधुरानं नवीन शंका काढली.

“पृथ्वीवरच्या झाडांना सूर्यप्रकाशाच्या दिशेनं जायचं जसं कळतं, तसंच”, अमृतानं उत्तर दिलं, “मुळाना पाण्याच्या दिशेने जायचं कसं कळतं? ती नैसर्गिक प्रेरणा असते, मधुरा. त्यासाठी बुद्धी लागत नाही”.

आम्ही सगळे विचारात पडलो. अमृता सांगत होती ते आम्हा सगळ्यांना पटलं. मधुरालासुद्धा.

“बरोबर आहे. हा ग्रह स्वतःभोवती साठ दिवसात फिरतो. म्हणजे पृथ्वीच्या हिशेबात,’’ हं”, मधुरा म्हणाली, “म्हणजे इथं महिन्याभराचा दिवस आणि महिन्याभराची रात्र असणार. तेव्हा पानांना जर हालचाल करता येत नसली तर त्यांची महिनाभर उपासमारच होईल, नाही का? पृथ्वीवर हिवाळ्यात पक्षी जसे स्थलांतर करतात तशी या ग्रहावरची झाडं रात्र पडली की स्थलांतर करून सूर्यप्रकाशात येत असणार.”

सगळ्यांनी माना डोलवल्या.

हिरवागार दिसणारा हा ग्रह प्रत्यक्षात हिरव्या किड्यांच्या समुद्रामुळे हिरवागार दिसत नसून खरोखरच वनस्पतींमुळे हिरवा दिसतोय, हे समजल्यामुळे आम्ही हुश्श केलं. मग सगळ्यांनाच फेरफटका मारायची उत्कंठा लागून राहिली. जामानिमा करून आम्ही बाहेर पडलो. दीडदोन किलोमीटर जातोय न जातोय तोच – “अगं आई गंss” अशी मधुराची किंकाळी आमच्या काळजाचा थरकाप उडवून गेली.

आम्ही तिच्याकडे धावलो. एका सापाने तिच्या पायाला विळखा घातला होता. क्षणाचाही विचार न करता मी आणि अमेयनं वडाच्या पारंबीसारख्या दिसणार्‍या त्या सापाला पकडून विळखा सोडवायचा प्रयत्न केला. पण आमची शक्ती कमी पडली. त्या झटपटीत मधुरा खाली पडली. तिच्या गळ्यातली पाण्याची बाटली जमिनीवर पडली. लगेचच त्या सापानं तिच्या पायाचा विळखा सोडून त्या बाटलीवर झडप घातली आणि आपली निमुळती शेपटी तिच्यात खुपसली. बाटली प्लॅस्टिकचीच होती पण अतिशय भक्कम होती. तरीही क्षणार्धात ते प्लॅस्टिक फाटून त्यातून सापाची शेपटी आत गेली. शेपटीवाटे त्याने भराभर पाणी शोषून घ्यायला सुरुवात केली. सातआठ सेकंदातच पाणी पिऊन साप टम्म फुगला. ही संधी साधून मी माझी लेसर गन काढली आणि सापाची खांडोळी करणार तोच अमृता ओरडली,

“थांब, अपूर्व. त्याला मारू नकोस. तो साप नाहीये”. “साप नाहीये? म्हणजे काय?”, मी थबकलो. पण हातातल्या गनच्या ट्रीगरवरचं बोट न काढता तसाच उभा राहिलो. तशी अमृता पुढं होत म्हणाली,

“तो साप नाही. ते मूळ आहे!” “मूळ?”, मी चक्रावलोच. “हो, मूळ. मूळ. झाडाचं मूळ’’, अमृता हसून म्हणाली. “काय?”

“या ग्रहावरची वनस्पतीसृष्टी वेगळीच आहे. इथली झाडाची पानं सूर्यप्रकाशात जाऊन अन्न तयार करतात, हे तर आपण पहिलंच. जी गोष्ट पानांची तीच मुळांची. तीही स्वतंत्रपणे हालचाल करू शकत असणार. ती पाण्याच्या शोधात दूरवर जाऊन पाणी घेऊन येत असतील”.

“अच्छा! असं आहे तर”, आशय म्हणाला. “या ग्रहावर पाऊस नसला तरी सगळीकडे हिरवंगार कसं हे कोडं मला पडलं होतं. त्याचं उत्तर मिळालं. पण इथं पाणी तरी कुठं आहे? आपल्याला तळी, सरोवरं काही दिसली नाहीत”.

“मी सांगतो”, अमेय पुढं झाला, “इथल्या जमिनीच्या आत बर्फाच्या स्वरूपात पाणी असणार. ही मुळं खोलवर जाऊन ते पाणी शोषून आणत असतील”.

“ही जर झाडाची मुळं आहेत तर मग झाडं कुठं आहेत?”, मधुरानं शंका काढली. तिला नेहमीच काही न काही शंका येत असायच्या. त्यावरून आम्ही तिला शंकेश्वरी म्हणून चिडवत असू! “झाडं असणारच”, अमृता म्हणाली. “आपल्याला दिसतील नंतर कुठंतरी. अन्न बनवणारी पानं आणि पाणी घेऊन येणारी मुळं यांना जोडणारा दुवा कुठंतरी असेलच”.

“कुठंतरी नाही, त्या दिशेला”, पश्चिमेकडे बोट दाखवत मधुरा म्हणाली, “तिकडे असणार”.

“कशावरून?”, मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. “कारण तो साप – किंवा सापचं रूप घेतलेलं ते मूळ, ते त्या दिशेने चाललं आहे”, मधुरानं शांतपणे सांगितलं.

“खरंच की”, मधुराचं निरीक्षण बरोबर होतं. पाणी पिऊन तृप्त झालेला तो ‘साप’ हळूहळू सरपटत त्या दिशेला निघाला होता. आम्हीही त्याच्या मागोमाग निघालो. आम्हाला फार चालावं लागलं नाही. थोड्याच अंतरावर साधारणपणे मीटरभर उंचीचा एक उंचवटा दिसला. वारुळासारख्या आकाराचा. त्याला अनेक भोकं होती. त्यातल्या एका भोकातून तो साप आत गेला. आम्ही थोड्या अंतरावर उभं राहून त्या वारुळाचं निरीक्षण करू लागलो.

आम्हाला दिसलं, हिरव्या गवताच्या पात्यांची एक लांबच लांब रांग हळूहळू त्या वारुळाकडे येत होती. आणि दुसर्‍या बाजूने तशीच दुसरी रांग वारुळाच्या बाहेर पडत होती. रांगेतली गवताची पाती स्प्रिंगच्या गुंडाळीसारखी दिसत होती. मुंग्यांची रांग असावी तशी ही पाती शिस्तशीरपणे वारुळाच्या आत-बाहेर करत होती.

“हे आहे या ग्रहावरचे झाड. किंवा झाडाचे खोड म्हणा हवे तर”, वारुळाकडे बोट दाखवून अमृता म्हणाली, “ही जी पानांची रांग आत जातेय तिच्याकडे नीट पहा. ती आहेत अन्न तयार करून ते वारुळाकडे आणणारी पानं. मधमाशा मध घेऊन येतात ना, तसं! ते अन्न ती त्या खोडाला पुरवतात आणि तिथून मुळांनी आणलेलं पाणी घेऊन बाहेर येतात. बाहेर येणार्‍या रांगेतली पानं पहा. पाणी पिऊन आता कशी तजेलदार दिसताहेत. आत जाणारी पानं बघा कशी सुकल्यासारखी दिसताहेत.” “अमृता म्हणाली ते खरं असेल बहुतेक”, आशय म्हणाला, “पण मी त्यांचं पृथक्करण करून खात्री करून घेईन”. त्यानं खाली वाकून दोन्ही रांगातल्या पानांचे नमुने उचलून घेतले.

“सापासारखी दिसणारी ती मुळं पाणी वारुळात आणून देतात. आणि पुन्हा कोरडी होऊन पाणी आणायला बाहेर येतात, हो ना?”, मधुरानं विचारलं. “अगदी बरोबर”, अमृता म्हणाली. आणि त्याच वेळी कोरडे झालेले एक मूळ वारुळातून बाहेर येताना आम्हाला दिसले. “माझ्या वॉटरबॅगमधलं पाणी पिऊन टम्म झालेला तो साप हाच तर नाही?”, मधुरा म्हणाली. 

“तूच सांगू शकशील तो तोच आहे की दुसरा आहे ते”, अमेय खोडकरपणे म्हणाला, “तू त्याला अगदी जवळून पहिलं होतंस, हो ना? तुझा दोस्त बनला होता तो. अगदी घट्ट मिठी मारली होती तुला त्यानं!”

अमेयच्या थट्टेमुळे आपल्या पायाला सापाने विळखा घातला होता तो क्षण मधुराला आठवला. त्या आठवणीनं ती किंचित शहारली. “आता नाही ना तो परत अंगावर येणार?”, ती जरा घाबरलीच होती. “नाही येणार. अगं तो मुळी साप नाहीच आहे. मूळ आहे ते. ते तुझ्या वॉटरबॉटलमधल्या पाण्याच्यासाठी आलं होतं. आता तुझ्याकडे पाण्याची बाटली नाही तर नाही तुझ्या अंगावर येणार.”

“पण वॉटरबॉटलमध्ये पाणी आहे ते तेव्हा त्याला कसं कळलं?”, ‘शंकेश्वरी’नं विचारलं.

“कुणास ठाऊक! त्या मुळाना पाण्याचा ठावठिकाणा कसा कळतो ते एक गूढच आहे’’, अमृतानं खांदे उडवले. “पण असणार काहीतरी सिस्टिम. पाण्याचा माग काढणारी. आपल्या पृथ्वीवरच बघ ना, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत. प्रत्येकाची अन्नपाणी मिळवायची, शिकार शोधायची, पद्धत किती निराळी असते. आणि या तर परग्रहावरच्या वनस्पती. त्यांची जगायची पद्धत किती विचित्र आणि चमत्कारिक असेल, त्यांची ज्ञानेंद्रिये कशी असतील, आपल्याला कल्पनाच करता येणार नाही.”

अमृताचं म्हणणं खरं होतं. पृथ्वीवरून आणलेल्या काही वनस्पती आम्ही त्या ग्रहावर लावायचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्या ग्रहावरच्या वनस्पतींनी त्यांच्याशी जणू युद्धच सुरू केलं. त्यात पृथ्वीवरच्या वनस्पतींचा पूर्ण पराभव झाला. हालचाल करणारी त्या ग्रहावरची पानं पृथ्वीवरच्या झाडांभोवती गर्दी करून त्यांच्यापर्यंत प्रकाश पोचूच देत नसत. शिवाय ती सापासारखी मुळं त्यांच्यातला जीवनरस शोषून घेऊन निघून जात. त्यामुळे झाड मरून जाई.

या ग्रहावरची वनस्पतीसृष्टी जर इतकी विलक्षण तर प्राणिसृष्टी काय असेल या विचाराने आम्ही हबकून गेलो. आसपास प्राणी तर काही दिसत नव्हते. पण ते असू शकतील आणि असले तर आपल्याला ओळखूसुद्धा येणार नाहीत, याची भीतीच वाटायला लागली होती.

होता होता आमचा जाण्याचा दिवस उजाडला. शेवटचा फेरफटका मारायला आम्ही बाहेर पडलो. हिरव्या रंगाचा समुद्र डोळ्यात साठवून ठेवत होतो. तेवढ्यात मधुरा ओरडली, “ते पहा पक्षी”. आम्ही पहिलं. एका उंचवट्यावर दहाबारा लहान पक्षी बसले होते. रंगाने हिरवेच होते. म्हणून झाडीत पटकन दिसून येत नव्हते. त्यांना पंख होते पण ते उंच उडू शकत नव्हते. जगाच्या जागी उडल्यासारखे करून पुन्हा खाली बसत होते. आम्ही जवळ गेलो तरी त्यांनी दूर जायचा जराही प्रयत्न केला नाही. त्यांना कान किंवा डोळे नव्हतेच. आमची चाहूलही त्यांना लागली नाही. अगदी सहज ते आमच्या हातात सापडले. “किती गोजिरवाणे आहेत नाही? अपूर्व, आपण त्यांना पृथ्वीवर घेऊन जाऊया का?”, मधुरानं विचारलं.

“मुळीच नाही. मी नाही परवानगी देणार”, मी म्हणालो. “त्यात खूप मोठा धोका आहे. इथल्या वनस्पती किती भयंकर आहेत, हे आपण पहिलं नाही का? हे पक्षीही असेच असू शकतील. ते पृथ्वीवरच्या पक्ष्यांशी लढाई करतील.”

“इथल्या वनस्पती धोकादायक आहेत, हे मान्य”, अमेय म्हणाला. “त्या नको नेऊया आपण, पण अपूर्व, हे पक्षी न्यायला काय हरकत आहे? आपण त्यांना पिंजर्‍यात ठेऊ”.

हो-नाही करता करता त्यातले काही पक्षी बरोबर न्यायचे ठरले. मात्र वाटेत अमृताने आणि आशयने त्यांचा नीट अभ्यास करावा आणि पूर्ण सुरक्षित असेल तरच त्यांना पृथ्वीवर न्यावं, असं आम्ही ठरवलं. एका भक्कम पिंजर्‍यात दहा-बारा पक्षी घेऊन आम्ही त्या ग्रहाचा निरोप घेतला.

पृथ्वीपर्यंतच्या प्रवासात त्या पक्ष्यांचा अभ्यास करायला आम्हाला भरपूर वेळ मिळाला. ते कुठलाही विषारी पदार्थ उत्सर्जित करत नाहीत, याची आशयने खात्री करून घेतली. पण त्यांचा जीवनव्यापार कसा चालतो, ते बरेच दिवस प्रयत्न करूनही अमृताला समजू शकलं नाही. आमचे यान पृथ्वीच्या जवळ आले. त्या पक्ष्यांना पृथ्वीवर न्यायचे की नाही, याचा निर्णय घ्यायची वेळ आली.

...आणि त्याच वेळी अमृता धावतच माझ्या केबिनमध्ये आली. म्हणाली, “त्या पक्ष्यांना पृथ्वीवर नेणे हा निव्वळ मूर्खपणा होईल, अपूर्व. ते पक्षी नाहीतच.”

“पक्षी नाहीत तर मग काय मासे आहेत?”, मी तिची थट्टा केली. “बालिश विनोद करू नकोस. ते पक्षी नाहीत. त्या बिया आहेत”, ती गंभीरपणे म्हणाली.

“काय? बिया?” “हो, त्या बिया आहेत. त्या ग्रहावरल्या झाडांच्या बिया. माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं ते. अरे, त्या ग्रहावरची वनस्पतीसृष्टी वेगळी आहे, हे आपण बघितलं. तिथल्या झाडाची पानं प्रकाशात जाऊन अन्न तयार करतात. मुळं पाण्याच्या शोधात दूरवर जातात आणि पाणी घेऊन येतात. जी गोष्ट पानांची, जी गोष्ट मुळांची, तीच बियांची असणार नाही का? त्याही स्वतंत्रपणे हालचाल करू शकत असणार. पक्ष्यांसारख्या!” “काय बोलतेस?”, मी चक्रावूनच गेलो.

“अरे, बघ ना, पृथ्वीवरसुद्धा बिया दूर जाऊन रुजण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. सावरीच्या कापसाच्या बिया वार्‍याबरोबर उडत जातात. आपण त्यांना ‘म्हातार्‍या’ म्हणतो, त्या. पक्षी, माकडं, खारीसारखे प्राणी फळं खातात आणि त्यांच्या बिया त्यांच्या विष्टेतून दूरवर जातात. मधुमालतीच्या बियांना तर हेलिकॉप्टरसारखे पंख असतात. त्या भिंगरीसारख्या गरगर फिरत दूर जातात. अगदी तसंच!” थोडा विचार केल्यावर अमृताचं म्हणणं मला पटलं.

“बापरे! म्हणजे हे पक्षी जर आपण पृथ्वीवर नेले तर त्या ग्रहावरची झाडं पुथ्वीवर रुजवण्यासारखं होईल. पृथ्वीवरच्या वनस्पतींची पुरती वाटच लागेल.”

“खरं आहे”, आशय म्हणाला. अमृताच्या मागोमाग तोही आला होता. पाठोपाठ मधुराही.

“आशय, ह्या पक्षांना काही आपण पृथ्वीवर नेऊ शकणार नाही. त्यांना मारूनच टाकावं लागेल. एखादं विष देता येईल त्यांना?” “आपण असं केलं तर?”, आशय म्हणाला, “त्यांना पृथ्वीवर न्यायचं नाही. पण मारायचंही नाही”.

“म्हणजे?”, मी म्हणालो. “काय म्हणायचंय तुला, आशय?” “मला सुचवायचंय की आपण त्यांना मंगळावर सोडून देऊया. तिथं त्या बिया रुजतील. त्या ग्रहावरची वनस्पतीसृष्टी मंगळावर वाढेल”. “अरे, पण..”, मी विरोध करायचा दुबळा प्रयत्न केला. “काय अशक्य आहे? मंगळावर सूर्यप्रकाश आहे. त्या ग्रहावर होता तेवढा नक्कीच आहे. तिथं ही वनस्पतीसृष्टी जगेल, वाढेल. मंगळावरची रखरखीत जमीन हिरवीगार करेल.”

“अरे पण पाणी? पाण्याचं काय? मंगळावर पाणी कुठंय?’’ “मंगळावर पाणी नाही हे माहीताहे मला. पण बर्फ आहे ना? काही वर्षांपूर्वी लागलेल्या शोधांनुसार मंगळाच्या ध्रुवप्रदेशात, जमिनीखाली बर्फाचे भरपूर साठे आहेत. त्या ग्रहावरच्या झाडांच्या मुळांचा तिथं खूपच उपयोग होईल. ती मुळं जमिनीखाली पाणी शोधत जातील आणि बर्फाचं पाणी घेऊन येतील. त्या ग्रहावर तेच काम तर ती करत होती!”

“आणि हवा?”, मधुरानं नेहमीप्रमाणे शंका काढली. “मंगळावर हवा अजिबात नाही असं नाही’’, आशय म्हणाला, “खूप विरळ आहे. पण आहे. आणि विरळ असली तरी त्यात जवळजवळ सगळा कार्बन डायऑक्साइड आहे. वनस्पतींना अन्न बनवायला तोच लागतो”.

“हो, खरंच की. मस्त कल्पना आहे तुझी”, अमृता म्हणाली, “या पक्षीरूपी बिया मंगळावर नक्की रुजतील. परग्रहावरील वनस्पतींनी ही ‘मंगळावर स्वारी’च केलीय म्हणायला पाहिजे!” थोडा विचार केल्यावर त्या पक्ष्यांना मंगळावर सोडायची आशयची कल्पना मलासुद्धा आवडली. एवितेवी या पक्ष्यांना मारूनच टाकावं लागणार होतं, मी मनाशी म्हटलं, मग एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? हालचाल करणारी ही परग्रहावरची झाडं मंगळावर जगली तर उत्तमच. पण नाही जगली तरी फार काही बिघडणार नाही.

पृथ्वीकडे येताना आम्हाला मंगळाजवळूनच यायचं होतं. आम्ही ते पक्षी मंगळावर सोडून आलो. वीस वर्ष झाली त्या गोष्टीला.

आज जर तुम्ही शक्तीशाली दुर्बिणीतून मंगळाकडे पहिलंत तर तुम्हाला त्याच्या ध्रुवप्रदेशात दोन छोटी जंगलं दिसतील. त्यातल्या उत्तर ध्रुवावरच्या जंगलाला आशय गोडबोलेचं नाव दिलं आहे आणि दक्षिण ध्रुवाजवळच्या जंगलाला अमृता जोशीचं! ..त्यांच्या अफलातून कल्पनेचा गौरव म्हणून!

My Cart
Empty Cart

Loading...