Menu

मकर संक्रांती वर एक सुंदर लेख वाचा वयम् मासिकात

image By Wayam Magazine 14 November 2022

By Wayam Magazine,  On 14th January 2021, Children Magazine

संक्रांतीच्या सणाला तिळगूळ खाता खाता या सणाचे शास्त्र समजून घ्या, ते मजेदार आहे!

१४ जानेवारी म्हटलं की, आपल्याला आठवते ती मकर संक्रांत. दसरा, भाऊबीज, गणपती, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी इ. उत्सव किंवा सण आपल्या कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतात; मग मकर संक्रांतच तेवढी जानेवारीला का येते, हा प्रश्न तुम्हांलाच नव्हे तर मोठ्यांनाही पडतो. अज्ञानाच्या बाबतीत पुष्कळ वेळा लहान - मोठा हा वयातला फरक नाहीसाच होतो.

आपण वर ज्या सणांचा उल्लेख केला त्या सणांत, पौर्णिमा, अष्टमी, दशमी (दसरा म्हणजे विजया दशमी) यमद्वितीया (भाऊबीज) अशा तिथी दडलेल्या आहेत. तिथी ही चंद्रावर अवलंबून असते, त्यामुळे चांद्रमहिन्यातील तिथी (म्हणजे चैत्र, वैशाख इत्यादी महिने) आणि इंग्रजी महिन्याची तारीख यांचा एकमेकींशी निश्चित असा मेळ नसतो. कॅलेंडरचे म्हणजे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात, तर चांद्र वर्षाचे म्हणजे चंद्राच्या बारा महिन्यांचे दिवस ३५४ भरतात. मग तिथी आणि दिनांक (तारीख) यांचा मेळ कसा बसेल सांगा बरं!

सूर्यसंक्रमण

सूर्यसंक्रमण म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करणे. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीत प्रवेश करतो. मग ते संक्रमण त्या त्या राशीच्या नावाने ओळखले जाते. अशा त-हेने मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाशी निगडित आहे; तो तिथीवर म्हणजे चंद्रावर अवलंबून नाही. आपण रोज वापरतो ते इंग्रजी (ग्रेगोरियन) कॅलेंडर हे सूर्याच्या राशी किंवा नक्षत्रस्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे सूर्याचा मकर राशीतील प्रवेश दरवर्षी १४ जानेवारीला होतो, त्यामुळे मकर संक्रांत १४ जानेवारीला येते (कधी कधी ती १५ जानेवारी रोजी येते.) तसे का ते आपण पुढे पाहणार आहोत.

मकर संक्रांत हा एक ‘सार्वजनिक’ सण आहे. तो अनेकांचा आवडता सण आहे. कारण त्या दिवशी घरी आणि दारी चक्क तिळगूळ खायला मिळतो. तिळगुळाचा लाडू असतो छोटासाच, पण ‘गोड बोला’ असा संदेश देऊन जातो. इतर लाडवांच्या वाट्याला हा योग येत नाही. इतरांची एवढी जाणीव ठेवायला सांगणारा तिळाचा लाडू जसं सामाजिक भान ठेवायला शिकवतो, तसं शास्त्रही शिकवतो.

सूर्याचा मकर राशीतील प्रवेश म्हणजे ऐन थंडीचे दिवस, त्यामुळे शरीरात उष्णता टिकवून ठेवणे आवश्यक. स्वेटर वगैरे लोकरीचे कपडे वापरून आपण उष्णता बाहेर जाऊ देत नाही, पण आतून उष्णता तर निर्माण व्हायला हवी की नको? त्यासाठी तिळासारखे उष्णता निर्माण करणारे स्निग्ध पदार्थ आपण खातो.

आपले सण आणि उत्सव अशा त-हेने परंपरा, पर्यावरण अशांशी निगडित आहेत. मकर संक्रातीच्या आसपास एवढी थंडी (हिवाळा) का असते, ते आपण समजावून घेऊ.

सूर्याचे उत्तरायण

उत्तरायण, दक्षिणायन हे शब्द तुमच्या कानावर गेलेही असतील. शालेय जीवनात भूगोलाच्या पुस्तकात हे शब्द डोकावतात, पण तेव्हा पुष्कळशा गोष्टी डोक्यावरून जाण्यातच आपण धन्यता मानतो.

आकाशातील सूर्याचा मार्ग विषुववृत्ताशी २३.१/२ अंशाचा (साडेतेवीस) कोन करतो त्यामुळे सूर्याचा वर्षभरातील अर्धा मार्ग उत्तर गोलार्धात तर अर्धा मार्ग दक्षिण गोलार्धात असतो. उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाण्याची सूर्याची जास्तीत जास्त मर्यादा २३.१/२ अंशाची आहे. दक्षिणेकडे जाण्याची ही कमाल मर्यादा सूर्य २१-२२ डिसेंबर रोजी गाठतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो, त्यामुळे या दिवशी सूर्याचा आकाशातील मार्ग खूप दक्षिणेकडे असतो. माध्यान्ही सूर्य आपल्या डोक्यावर तर येत नाहीच, उलट दक्षिणेकडे जेमतेम ४६ ते ४७ अंश उंची गाठून मावळतीकडे वळतो. परिणाम उघड आहे. आपल्याकडे तापमान कमी असते. थंडी जाणवते. म्हणूनच सूर्याचा मकर प्रवेश हा थंडीचा किंवा हिवाळ्याचा इशारा आहे. सूर्य २२ डिसेंबर रोजी पीछे मूड करून दक्षिणेकडून उत्तरेला वळतो म्हणूनच २२ डिसेंबर हा दिवस उत्तरायणाचा समजला जातो.

उत्तरायण आणि मकर संक्रमण यांची सांगड

सुमारे सतराशे वर्षांपूर्वी सूर्याचा मकर प्रवेश आणि उत्तरायणाचा प्रारंभ एकाच दिवशी होत असे. त्यामुळे सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाला लोकांनी प्राधान्य दिले. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हाच उत्तरायणाचा निकष मानला गेला. ‘मकर संक्रांत म्हणजे थंडी’ असे समीकरण लोकांच्या मनात ठाण देऊन बसले. परंतु पृथ्वीच्या एका विशिष्ट गतीमुळे उत्तरायण आणि मकर संक्रमण यांची सांगड राहात नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंतचा कालावधी लागोपाठच्या उत्तरायणाच्या कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे. त्यामुळे उत्तरायण अगोदर होते आणि त्यानंतर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. इंग्रजी कॅलेंडर उत्तरायणाच्या घटनेशी निगडित केल्यामुळे उत्तरायण दर वर्षी २२ डिसेंबरला होते, परंतु मकर प्रवेश तारखेनुसार पुढे जातो. उत्तरायण २२ डिसेंबरला आणि सूर्याचा मकर प्रवेश १४ जानेवारीला म्हणजे दरवर्षी पडणारा थोडा थोडा फरक आता २२ ते २३ दिवसांवर पोहोचला आहे. पुढील काळात तो हळूहळू का होईना, वाढणार हे निश्चित. मग आता तिळगूळ २२ डिसेंबरला वाटायचा, की १४ जानेवारीप्रमाणे पुढे पुढे सरकणा-या मकर संक्रांतीच्या दिवशी वाटायचा हे ठरविण्याची वेळ आली आहे.

पुढे सरकणा-या संक्रांतीचा अनुभव-

मकर संक्रांत स्वामी विवेकानंदांच्या जन्मवर्षीच्या सुमारास १२-१३ जानेवारीला येत असे. आता ती १४ किंवा १५ जानेवारीला येते. म्हणजे मकर संक्रांत पुढे जाण्याचा अनुभव आपण सध्या घेतच आहोत. सूर्याचा मकर प्रवेश दरवर्षी बरोबर ३६५ दिवसांनी होत नाही, प्रत्यक्षात तो ३६५ दिवस ६ तास आणि काही मिनिटांनी होतो. त्यामुळे खरं तर संक्रांत ४ वर्षांनी एक दिवस पुढे सरकली पाहिजे, पण लीप वर्षाच्या जादा दिवसामुळे ती पुन्हा मूळ पदावर येते. नाहीतर आपल्या हयातीतच ती दर चार वर्षांनी पुढे गेली असती. धार्मिक कार्यासाठी आपण दिवस प्रशस्त मानतो. या कारणामुळे मकर संक्रांत काही वर्षी १४ ऐवजी १५ तारखेला येते. हा मुद्दा उदाहरणाने स्पष्ट होईल. २०१४ साली सूर्याचा मकर प्रवेश १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी झाला म्हणजे दिवसा झाला, त्यामुळे मकर संक्रांत आपण १४ तारखेलाच साजरी केली. परंतु सूर्याचा मकर प्रवेश सुमारे ६ तासांनी पुढे जात असल्यामुळे २०१५ साली १४ जानेवारीला रात्री साडेसातच्या सुमारास झाला म्हणून मग संक्रांत १५ जानेवारीला साजरी करावी लागली. २०१६ सालीही याच कारणामुळे संक्रांत १५ जानेवारी रोजीच साजरी झाली. २०१६ साल लीप वर्ष असल्यामुळे २०१७ सालचा सूर्याचा मकर प्रवेश दि.१५ रोजी सकाळी ७-३८ वाजता न होता तो १४ जानेवारीला सकाळी ७-३८ वाजता झाला म्हणून पुन्हा २०१७ ची संक्रांत १४ जानेवारी रोजीच झाली. मकर राशीतील सूर्याचा प्रवेश दरवर्षी ६ तासापेक्षाही सुमारे ९ मिनिटांनी पुढे जात असल्यामुळे संक्रांतीची तारीख टप्प्याटप्प्याने १५ जानेवारीच्याही पुढे जातच राहणार आहे. इ.स.२०४८ पर्यंत मकर संक्रांत ४ वर्षांत दोनदा १५ तारखेला येईल. नंतर २०८५ सालपर्यंत ४ वर्षांत तीनदा १५ तारखेला येईल. २०८५ सालनंतर ती १४ तारखेला कधीच येणार नाही. २१०० सालपर्यंत संक्रांतीची तारीख १५ जानेवारी असेल, परंतु २१०० साल लीप वर्ष नसल्यामुळे संक्रांत १६ तारखेवर उडी मारेल. त्यानंतर मात्र ती १६-१७ असे करीत करीत हळूहळू पुढे सरकत राहील. म्हणून मग तिळगूळ वाटपाचा समारंभ उत्तरायणाच्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला (म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे १ पौष) करायला हवा, नाही का? (आकृती पुढील पानावर पहा)

-हेमंत मोने
hvmone@gmail.com
My Cart
Empty Cart

Loading...