Menu

मैत्री दिनानिमित्त

image By Wayam Magazine 06 August 2023

दोस्ती 

    आफ्रिकेतील ‘ग्रेट मायग्रेशन’ महास्थलांतर म्हणजे हजारो पाखरांचं हजारो मैल दूर ऊडून घरटी बांधण्यासाठी स्थलांतर. याच्या फिल्म्स तुम्ही टी.व्ही.वर पहिल्या असतील. तसच स्थलांतर जलचरांचं होत असावं. स्कॉटलंडच्या भोवती अ‍ॅटलांटिक महासागर आहे. या महासागरात छोटी बेटं आहेत. अशाच एका बेटावरील लोकांनी हजारोनी डॉल्फिनची कुटूंबं एकी कडून दुसरीकडे जाताना सागर कसा ढवळून निघतो ते पाहिल आहे. हे डॉल्फिन मासे जणू  सुट्टीत आपलं घर सोडून कुठेतरी फिरायला जातात! त्याचीच ही गोष्ट!!

समुद्र जमिनीचे दोन भाग करतो, असा आपला समाज आहे ना! पण तसं नसतं. समुद्र जमिनीचे दोन तुकडे जोडतो!  हजारो वर्षाच्या इतिहासानं हे सिद्ध केलं आहे. माणूस सागरी मार्गानं या खंडातून दुसर्‍या खंडात जाऊन राहिल्याची अ‍नेक उदाहरणं इतिहासात आहेत. जमिनीवर जशा मळलेल्या वाटा असतात ना,  तशाच समुद्रावरही असतात हं! सागर सफरी करणार्‍याना त्या ठाऊक असतात. कारण ते समुद्राचे दोस्त असतात. त्यांना समुद्रावर उठणार्‍या खाणाखुणा, बदलते वारे, आकाशातले तारे, बदलणारी पाणपाखरं, बदलते वास याची खडानख़डा माहिती असते. खरंतर थेंबाथेंबाची माहिती असते, असं म्हटलं पाहिजे.

भारतापासून दूर असलेला हा सागर... चुण्या पडलेल्या टेबलक्लॉथ सारखा त्याचा पृष्ठभाग दिसायचा... मग एकदम कहीतरी व्हायचं... गालाच्या आतून जीभ फिरवल्यावर गाल कसा दिसतो, तसा उंचवटा पाण्यावर तयार व्हायचा. मग दिसायची धारदार चकचकीत शेपटी.  डॉल्फिनची. कधी इतकी उंच लाट यायची की छातीत धडकीच भरावी. त्यातून काळसर व्हेलची पाठ दिसायची. असं सतत नाट्य त्या समुद्रावर घडायचं. कधी शांत वाटणार्‍या या समुद्रात अशा काही मोठ्ठ्या लाटा उठायच्या, की त्याना खलाशी व्हेलच्या  पाठी असच म्हणायचे. प्रत्त्येक लाट निराळी. काही लांबुडक्या, तर काही दुडक्या चालीच्या. काही डोंगराएवढ्या तर काही दोन टेंगळं असलेल्या उंटाच्या पाठीसारख्या. सागरदोस्ताना प्रत्त्येक लाट वाचता यायची. पण इतरांना मात्र सागर चिनी लिपीसारखा भासायचा. 

अशा या समुद्राच्या काठवर वसलं होतं एक गाव. दहा-वीस घरांचं. हिवाळा असो, उन्हाळा असो, हा समुद्र या गावकर्‍यांचा दोस्त. स्वच्छ गालिचा अंथरावा तसा वाळूचा बिच म्हणजे गावच्या मुलांसाठी खेळण्याचं आंगणच. पण गावात मुलच थोडी. एक मुलगा आणि त्याचा कुत्रा मात्र न चुकता सकाळ-संध्याकाळ वाळूत खेळायला, समुद्रात पोहायला यायचे. 

दिवस होते उन्हाळ्याचे. लवकर उजाडायचं. उशीरा मावळायचं. त्या मुलाला व त्याच्या कुत्र्याला उन्हाळा आवडायचा. खेळायला जास्त वेळ मिळायचा ना! 

एक दिवशी टळटळीत दुपारी मुलगा आणि कुत्रा दोघेही पाण्यात डुंबत होते. येणार्‍या प्रत्त्येक लाटेशी खेळत होते. आज समिंदर खुशीत होता. लाटा त्या दोघाना कुरवाळत होत्या. तेवढ्यात कुत्रा भुंकू लागला. पोराला काही कळेना, हा का भुंकतो आहे ते! तो आजुबाजूला पाहू लागला. त्याला दूरवर लाटांवरून काही तरी तरंगत येताना दिसलं. ते जसं जवळ येऊ लागलं तसा कुत्रा आणखी जोरात भुंकू लागला. जवळ येणार्‍या वस्तूचा आकार मोठा होऊ लागला. एका मोठ्या लाटेनं त्याला किनार्‍यावर आणून टाकलं. कुत्रा आणि मुलगा दोघेही धावत त्याच्या जवळ गेले. त्याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या, लचके तुटले होते. तो होता डॉल्फिन! 

  कुत्र्याचं भुंकणं थांबलं. तो जवळ जाऊन हुंगू लागला. शार्कच्या तावडीतून सुटला बिचारा डॉल्फिन!  पण जखमा होऊन मेला. मुलगा कावराबावरा झाला. त्यानं गावाकडे धाव ठोकली. कुत्रा त्या डॉल्फिनजवळ बसून होता. दूरवर लाटांमध्ये पुन्हा हालचाल झाली. एक डॉल्फिन किनार्‍याजवळ आला. पाण्यात गोल चकरा मारू लागला. कुत्रा धावत पाण्यात जाई. परत माघारी येई. कुत्र्याला त्या डॉल्फिनजवळ जायचं होतं. पण तो मेलेल्या डॉल्फिनजवळ बसून राहिला. थोड्याच वेळात तो मुलगा त्याच्या बाबाला व काकाला घेऊन आला. मुलगा अगदी रडवेला झाला होता. बाबानं व काकानं त्या डॉल्फिनला बघितलं. आता काही करण्यासारखं उरलं नव्हतं. बाबा त्या मुलाला समजावून सांगत होता. तो मान डोलवत होता. हुंदके देत होता. डोळे पुसत होता. बाबानं त्या डॉल्फिनला गावात पुरायचं ठरवलं. त्यानी एक कापड वाळूवर पसरलं. त्यावर त्याला ठेवल. ती झोळी उचलून ते दोघे चालू लागले. तसा समुद्रात काठाजवळ आलेला डॉल्फिन जोरजोरात गोलगोल पोहू लागला. कुत्र्यानं आणि मुलानं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं हात उंचाऊन त्याला बाय केलं. मेलेल्या डॉल्फिनचा तो दोस्त असावा, असं त्या मुलाला वाटलं. 

दुसर्‍या दिवशी दुपारी कुत्रा आणि मुलगा परत समुद्रावर आले. आज त्या मुलाचं खेळण्यात मन लागेना. पाण्यात जावसं वाटत नव्हतं. तो वाळूचा डोंगर करत होता, मोडत होता, परत करत होता. कुत्रा जवळच दोन पाय पुढं करून त्यावर तोंड ठेवून समुद्राकडे बघत बसला होता. 

अचानक कुत्रा उठला. त्यानं कान टवकारले. भुंकु लागला. समुद्रात दूरवर हालचाल दिसली. डॉल्फिन येत होता. मुलगा ताडकन उभा राहिला. तो डॉल्फिन खूप पुढे आला. ते दोघे पोहत त्याच्या जवळ पोचले. डॉल्फिन बरोबर ते पोहू लागले. रिंगण घालू लागले. मुलानं त्याच्या निळसर काळसर पाठीवरून हात फिरवला. दोघेही शहारले. 

अर्धा तास हा खेळ चालला होता. `आता घरी जायला पाहिजे. आई रागवेल,’ तो डॉल्फिनच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. दोघे जण किनार्‍याकडं पाहू लागले. डॉल्फिन गोल गोल फेर्‍या मारत होता. मुलानं हात उंचावून बाय केले. डॉल्फिनने उंच उडी मारत गिरकी घेतली. त्याचं निळंकाळं शरिर सूर्यकिरणात चकाकलं. त्याच्या अ‍ंगावरून ओघळणारे पाण्याचे मोती चमचमत होते. हां हां म्हणता तो दूरवर समुद्रात दिसेनासा झाला. 

असं चाललं होतं रोज. तीच वेळ, तोच खेळ. त्या तिघांची दोस्ती जमली. उन्हाळ्याची सुट्टी संपली. मुलाचं रोजचं बीचवर येणं बंद झालं. तो फक्त सुटीच्या वारी येत असे. पण कुत्रा मात्र रोज यायचा ठरल्या वेळी. डॉल्फिनशी पाण्यात खेळायचा. मग गावात परतायचा. बातमी गावात पसरली. गावातील मोठी माणसं येऊन ही गंमत पहात. सर्वाना या दोस्तीचं कौतुक होतं. हिवाळ्यात सागराचं पाणी खूप थंड व्हायचं, तरी सुद्धा तो कुत्रा डॉल्फिनशी खेळायचा. हिवाळा संपून पुन्हा उन्हाळा आला. सुटी लगली. मुलगा व कुत्रा रोज येऊ लागले. डॉल्फिन बरोबरचा हा खेळ वर्षभर चालला होता. त्या मुलाला वाटायचं डॉल्फिननं जमिनीवर यावं पण त्याला माहित होतं की डॉल्फिनचं घर पाण्यात असतं. तो कसा येणार जमिनीवर? डॉल्फिनच्या पाठीवरून हात फिरवत तो सांगायचा-‘आम्ही तुझ्या दोस्ताला जमिनीत सुखरूप ठेवलं आहे. दर रविवारी तेथे जाऊन मी फुलं ठेवतो.’ 

असे त्यांचे दिवस छान चालले होते. आता काही दिवसात उन्हाळ्याची ही सुट्टीसुद्धा संपणार होती. मुलाला त्याचंच वाईट वाटत होतं. 

एक दिवशी कुत्रा आणि मुलगा वाळूत खेळत असताना त्या दोघाना समुद्रात बरीच खळबळ दिसली. त्या दोघानी पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहत पुढे गेले. डॉल्फिनची कितीतरी कुटुंबं त्यांच्या पिल्लांसह दूरवर चालली होती. तेवढ्यात हा दोस्त डॉल्फिन आला. आज तो खेळला नाही. त्यानं दोघांबरोबर एकच गोल फेरी मारली. दोन उंच उड्या मारल्या आणि त्या इतर डॉल्फिनचा मागोवा घेत घाईघाईनं निघून गेला. मुलगा आणि कुत्रा बघतच राहिले. थोडे निराश होऊन घरी परतले. 

लागोपाठ तीन दिवस तो कुत्रा व मुलगा नियमानं बीचवर येत होते.. त्याना आशा होती आज तरी तो डॉल्फिन येईल, मग आपण खेळू...

...पण तो डॉल्फिन पुन्हा कधीच परतला नाही. तो दूर नव्या ठिकाणी गेला होता! 

-डॉ.आनंद जोशी.

***

My Cart
Empty Cart

Loading...