डास-डासी आणि त्यांच्या दोन जुळ्या मुली डासुली, डुसुली. डासुली, डुसुली अशक्त होत्या. त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषू लागल्या तरी या आपल्या गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. शेवटी त्यांच्या आईने ‘घरगुती गटारी’ उपचार केले. सोंड खुपसून रक्त शोषायला शिकवले... मग त्या मस्त लाईफ एन्जॉय करू लागल्या!
एका गावात डास आणि त्याची बायको डासी राहात होते. त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. मग आई-बाबांनी त्यांच्या दोन छोट्या जुळ्या मुलींची नावं ठेवली डासुली आणि डुसुली. डासुली, डुसुली मोठ्या होऊ लागल्या, पण त्यांची तब्येत काही सुधरेना. काही न काही कारणाने त्यांचं आजारपण सुरूच. सर्दी, खोकला आणि शेंबडी सोंड. त्यामुळे त्या गूंगूं करायच्या कमी आणि गॅंगॅं मॅंगॅं शिंकायच्या जास्ती. डासुली, डुसुलीला जेवणही जाईना.
त्या दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या. आई बाबांना कळेना आता काय करावं. कारण त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषत, गाणी गुणगुणत फिरत असत. तर या दोघी गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत.
डास बाबा म्हणाले, “आपण यांना कुठल्यातरी स्पेशालिस्टला दाखवूया. औषधाचे दोन डोस पडले तर फरक पडेल गं...”
सोंड हलवत डासी म्हणाली, “नको. नको. मी पाहते काही ‘घरगुती गटारी’ उपचार करून. इतक्या लहान वयात त्यांना डॉक्टरची सवय नको लागायला.”
डासुली, डुसूलीला प्रेमाने पंखाळत, मायेने सोंडाळत आई म्हणाली, “चला आज आपण सारे जेवायला बाहेर जाऊ. थोडा चेंज हवाच. मी तुम्हांला नवीन गटारं दाखवते. वेगवेगळे प्राणी दाखवते. मग तुम्ही एन्जॉय कराल..”
आईला पुढे बोलू न देता डासुली म्हणाली, “पण आई, आम्हांला किनई त्या अनोळखी प्राण्यांच्या अंगात सोंड खुपसायलाच भीती वाटते. माणसांचीपण भीती वाटते..”
“आँ..? कुठली भीती वाटते?
“अगं मुलींनो.. ते आपल्याला घाबरतात! आपण त्यांना कशाला घाबरायचं..?”
“प..ण प..ण रक्त शोषताना आपली सोंड मोडली तर? ते आपल्या अंगावर वसकन ओरडले तर? आणि त्यांनी आपल्याला मारलं तर?..”
“ओऽऽऽह! आता कळलं मला. म्हणून तुम्ही रक्त न शोषता गटारातल्या पाण्यात सोंडा बुचकळत होतात. हो ना?”
दोघी मुलींनी ‘हां.. हां’ करत सोंडा हलवल्या.
आई हसतच म्हणाली, “गूंग गगॅंगूं. काहीच काळजी करू नका. मी शिकवते तुम्हांला. चला त्या समोरच्या गाढवाच्या पाठीवर बसूया..”
डासुली, डुसुली भीतीने थरथरत म्हणाल्या, “त्या एव्हढ्या मोठ्या गाढवाच्या पाठीत सोंड खुपसायची? नको आई नको. त्याला जर कळलं तर तो एका लाथेत आपल्या उडवेल. अंऽऽ आई तू पण जाऊ नकोस ना..”
आई दोघींना ढकलतच घेऊन गेली. तिघीजणी गाढवाच्या पाठीवर बसल्या, पण गाढवाला काही कळलंच नाही. मग तिघी मिळून रक्त प्यायल्या तरी गाढवाला काही कळलंच नाही. रक्त पिऊन तरतरीत झाल्यावर ताठ सोंडेने डासुली, डुसुली आईला खणखणीत आवाजात आत्मविश्वासाने म्हणाल्या, “आई, आता आम्ही कुण्णा कुण्णाला घाबरणार नाही आणि गावातल्या कुणाला सोडणारही नाही. आता जो आपुनसे लेगा पंगा.. उसका खून पिएंगा..”
आपल्या मुलींकडे कौतुकाने पाहात आई म्हणाली, “आता माझी काळजी मिटली. जा.. मुलींनो जा. हे सगळं जग आपल्यासाठीच आहे. रोज नवनवीन रक्त टेस्ट करा. लाईफ एन्जॉय करा.”
मग डासुली डुसुली गावभर बिनधास्त फिरू लागल्या. रक्तारक्ती करून लाईफ एन्जॉय करू लागल्या.
आता डासुली, डुसुली चांगल्याच मोठ्या झाल्या.
एकदा संध्याकाळी डासुली म्हणाली, “ए डुसुली ताई, तो लालेलाल गरगरीत माणूस पाहिलास का? माझ्या तर सोंडेला पाणी सुटलंय. कधी एकदा त्याच्या त्या मऊ मऊ दंडावर, नाहीतर त्याच्या मलईदार गोबर्या गोबर्या गालावर बसते आणि सोंड खुपसते असं झालंय मला. प्लीज चल ना गं.. आपण त्याचं सोंडभर रक्त पिऊन येऊ.”
पंख हलवत डुसुली म्हणाली, “हूं.. आले असते गं ताई, पण आज माझा कडकडीत उपवास आहे.”
हे ऐकताच डासुली किंचाळली, “का..य? तुझ्या अंगात माणसाचं रक्त भिनलंय की तुझं डोकं फिरलंय? कडकडीत उपवास म्हणजे..? अगं असलं ‘ब्लड डाएटींग’ करून तुझ्या फिगरची वाट लागेल हं. उगाचच त्या ‘झिरो फिगर’च्या नादाला लागू नकोस. आपली फिगर ऑलरेडी मायनस टू आहे.”
“अगं ताई, ‘झिरो फिगर’ नो..नो! आय लव्ह ब्लड सकींग एण्ड आय एन्जॉय इट! अगं कडकडीत उपवास म्हणजे, आज मी माणसाचं रक्त पिणार नाही. आज मी डुकराचं, गाढवाचं, भटक्या कुत्र्याचं रक्त पिईन. तेव्हढाच थोडा चेंज. खरं सांगू, ही माणसं उपवास बिपवास असला की अगदीच पचपचीत, सपक खातात. तेव्हा त्यांच्या रक्ताला शेणाचीही चव नसते. रोज रोज त्या दोन पायांच्या माणसांचं पांचट रक्त पिऊन सोंड अगदी बुळबुळीत होऊन जाते. दोन पायांच्या माणसांपेक्षा चार पायांचे भटके प्राणी तर अधिक सरस. हे गावभर फिरतात. उकिरडे फुंकतात. रोज नॉनव्हेज खातात. ताजी ताजी घाण खातात. फेकून दिलेलं चायनीज फूड खातात. त्यामुळे यांचं रक्त अगदी स्पायसी आणि यम्मी असतं. कुणाला सांगू नकोस.. पण खाण्याबद्दल चोखंदळ असणारे भटके कुत्रे, डुकरं आणि गाढवं मी मार्क करून ठेवली आहेत. आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी तरी मी हेच चार पायांचे प्राणीच ट्राय करते. कारण याच दिवशी अनेक माणसांचे उपवास असतात. अशावेळी त्यांच्या अंगाला सोंड लावून, आपली सोंड खराब कशाला करा. म्हणून तर ‘सोंड खुपसीन तिथून यम्मी रक्त काढीन’ असं आपल्यात म्हणतात ते काय उगीच? काय कशी आहे आपुनकी आयडिया?”
डासुली भलतीच खूश होत म्हणाली, “वॉव ताई! एकदम ऑसम ऑरक्त आयडिया!! या शोधाबद्दल तर तुला ‘डास भूषण’ हा पुरस्कारच द्यायला पाहिजे. डबक्याडबक्यांत तुझे सत्कार व्हायला पाहिजेत. ‘डास माझा’ आणि ‘डास 24 तास’ या आपल्या चॅनेल्सनी तुझ्यावर विशेष कार्यक्रम करायला हवेत. डुसुली, रिअली आय एम प्राउड ऑफ यू! ताई, आज मी पण येणार तुझ्याबरोबर. चल करुया शेकसोंड.”
दोघी जणी उडाल्या. दोघींनी एकमेकांच्या सोंडांना सोंड लावून शेकसोंड केलं.
डासुली म्हणाली, “अगं त्या चायनीज बॅटींचा किस्सा तुला माहित्यै का? त्या चायनीज बॅटी लई डेंजरस आहेत.”
“आँ? तुला कसं माहीत?”
“तुला डिसकू माहित्यै ना? अगं तो गं.. जांभळाच्या झाडावर तिसर्या फांदीवर असतो तो. त्याची मैत्रीण डिसकी थोडक्यात वाचली.”
“कसं काय?”
“अगं डिसकू आणि डिसकी एका घरातल्या पडद्यावर बसून टीव्हीच्या पडद्यावर विंबल्डनची फायनल मॅच पाहात होते. मॅचमधला मॅचपॉईंट जवळ आला होता. इतक्यात डिसकूला जवळच विचित्र आवाज आला आणि पाठोपाठ काहीतरी जळल्याचा वास आला. यू काण्ट बिलीव्ह. जवळच एक माणूस उभा होता. त्याच्या हातात ती चायनीज बॅट. आणि.. त्या बॅटमधे अडकलेला डास ओरडत रडत होता. आणि तो दुष्ट माणूस त्या बॅटचं बटण दाबून त्या डासाला जाळत होता...”
“माय डॉस! माणसं इतकी क्रूर असतात यावर विश्वास बसत नाही. पण इटस् ट्रू! हे ऐकूनसुद्धा माझ्या पंखावर शहारे आले आहेत.”
तेव्हापासून डिसकू आणि डिसकीने बॅटींचा धसकाच घेतलाय! आता ते दोघे ‘बॅट असणारे’ टीव्हीवरचे कुठलेच गेम्स पाहात नाहीत. फक्त सिरियल्स आणि फिफाच्या फुटबॉल मॅचेस पाहतात.
डासुली म्हणाली, “अगं तू टीव्ही पाहात नाहीस का?”
“पाहते की.. सर्व सिरीयल्स पाहाते. कां..ग?”
“अगं तू त्या अॅड पाहात नाहीस का? ‘पुश करो और खून करो’ ही अॅड जाम फेमस झाली होती.”
“हो ना. पहिल्यांदी मलाही खरंच वाटलं होतं. मी तर इतका धसका घेतला होता की, मी त्या जाहिरातीतल्या मशीनला पण घाबरायचे. पण आता मला कळलंय त्या ‘पुश खून’ मशीनचा नवीन प्रकार लई भारी आहे.”
“म्हणजे..? पुश न करताच खून? मायडॉस!”
“नाही.. नाही तसं नाही. बी पॉझीटिव्ह!”
“हो..हो. पण म्हणजे काय?”
“चल माझ्याबरोबर. त्या दुसर्या मजल्यावरच्या तिसर्या खोलीतल्यांनी परवाच नवीन मशीन घेतलंय. त्यांनी मशीन सुरू करायच्या आधी आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे.”
“पण का..?”
“अगं एकदा का त्यांनी मशीन सुरू केलं की, ते लगेचच दारं-खिडक्या बंद करून घेतात. मग आपल्याला नो एण्ट्री.”
“अगं शहाणे, यामागचा त्या माणसांचा प्लॅन वेगळाच आहे. त्यांनी मशीन सुरू केलं तर बाहेर पळता येणार नाही आणि विषारी वायूमुळे काही करता येणार नाही. तिथेच शेवटचा श्वास घ्यायचा आणि प्राण सोडायचा...”
“चूक..चूक. मलाही आधी असंच वाटलं होतं. पण नो!
आता तू माझ्याबरोबर चल आणि तो अमेझींग रोमांचक अनुभव घेच.”
“ओके. चल.”
दोघीजणी उडत उडत त्या दुसर्या मजल्यावरच्या तिसर्या खोलीत गेल्या. त्या घरात आल्या नाहीत तोच त्या घरातल्या माणसाने पटापट खिडक्या बंद केल्या. दरवाजे लावून घेतले. शोकेस उघडून त्यातलं नवीन मशीन बाहेर काढलं. त्या मशीनला खालून लावायच्या चार सुगंधी बाटल्या त्याच्याकडे होत्या. लव्हेंडर, रेड मस्क, रातराणी आणि मोगरा. त्याने विचार करुन मोगर्याची बाटली निवडली. मशीनमधे लावली. मशीन सुरू केलं. त्या दोघीजणी सोफ्याच्या मागे लपून हे सगळं पाहात होत्या.
डासुली म्हणाली, “चल जाऊया. मला भीती वाटते. उगाच काही झालं तर जीव जाईल.”
डुसुली कुजबुजली, “जीव बीव काही जात नाही गं. जरा धीर धर. मी एकदा इथे येऊन गेलेय म्हणून सांगतेय.”
थोड्याच वेळात घरात मोगर्याचा मंद सुगंध दरवळू लागला. हळूहळू मोगर्याच्या दाट सुगंधाच्या घट्ट लाटा त्य दोघींवर आदळू लागल्या. त्याच बरोबर त्या दोघींची अंगं जड होऊ लागली. पंख हलेनात. डोळे बंद होऊ लागले. सोंडा सैल होऊ लागल्या. त्या दोघींना सुगंधी गुंगी आली.. आणि त्या सोफ्याच्या मागच्या बाजूला चक्कर येऊन पडल्या.
पहाटे पहाटे त्यांना जाग आली. उठल्या उठल्या आधी त्यांनी मशीनकडे पाहिलं. पण ते बंद होतं. आता भुकेने त्यांच्या पोटात ठिणग्या पडत होत्या.
घरातली माणसं गारेगार झोपली होती. त्यांचं गरमागरम रक्त त्या प्यायल्या.
मस्त फ्रेश झाल्या. घरभर हिंडून आल्या. आरामात सोफ्यावर लोळत गप्पा मारू लागल्या.
डुसुली म्हणाली, “काय मस्त सुखद अनुभव होता तो..!”
“म्हणजे याचा अर्थ त्यांनी आता अॅड बदलायला पाहिजे- “माणसांनो पुश करा, डासांना खूश करा’ असं म्हटलं पाहिजे.”
“एकदम सही!” दोघी खसखसून गुंगुल्या.
नंतर डासुली उत्साहाने सांगू लागली, “हं. तर त्या तळमजल्यावरच्या घरातले बाबा आपल्या मुलांना सांगत होते, ‘डास माणसांना चावतात’.. हे ऐकताच डुसुली ‘उडोळू’ लागली. म्हणजे उडत उडतच लोळू लागली.
सोंड पुसत डासुली म्हणाली, “अगं त्यांना इतकं पण समजत नाही की, चावण्यासाठी दात असावे लागतात. डासांना दातच नसतात तर ते चावणार कसे? म्हणजे मग मासे पाय नसून समुद्रात धावतात.. असं म्हणायचं का?”
डुसुली आणि डासुली इतक्या हसहस हसल्या आणि गूंगूं गुंगल्या की उडता उडता त्या वहिनींच्या केसातच पडल्या.
डुसुली म्हणाली, “अगं ताई तुला माहित्यै का, आपले बाबा आणि काका दोघंही कुठल्याही ओळखीच्या किंवा अनोळखी कानाशी गूंगूं गूंगूं करत नाहीत.
बाबा आणि काका दोघंही अगदी प्युअर व्हेज आहेत. ते कुणाच्याही पोटाला, मानेला, दंडाला, गालाला आपली सोंडसुद्धा लावत नाहीत.”
डासुली चिडून चिरचिरली, “डास बाबा आणि डास काका रक्त पीत नाहीत तर काय पितात.. लिंबू सरबत?”
डुसुली तिला समजावत म्हणाली, “अगं ते झाडावरच असतात. कधी लिंबाच्या तर कधी जांभळाच्या. ते झाडावरचं दव पितात. म्हणून तर ते प्युअर व्हेज.”
“अगं म्हणजे, रक्त शोषतो आणि पचवतो आपण मुली आणि ती येडी माणसं मात्र बिचार्या मुलांवरच संशय घेतात! आहे किनई मजा?”
डासुली मिशा फिरवत म्हणाली, “म्हणून तर, ‘जी चवीचवीने रक्त पिणार तीच माणसांच्या कानाखांद्यावर उडणार’ असं आपल्या मुलींत म्हणतात ते काय उगीच?”
डुसुली हसतच म्हणाली, “हो ना. ‘जेवणारे आणि चरणारे यांच्यापेक्षा शोषणारेच अधिक हुशार असतात’ असं आपल्यात म्हणतात ते खरंच आहे.”
डासुली गंभीर होत म्हणाली, “ही गोष्ट ऐकल्यावर तरी माणसं शहाणी होतील असं वाटतंय..”
डुसुलीने पंख ताठ करत विचारलं, “का गं ताई?”
डासुली म्हणाली, “आजपासून तरी माणसं ‘डास चावतात’ असं म्हणून आमच्यावर खोटेनाटे आरोप न करता ‘डास टोचतात’ असं सभ्यपणे म्हणतील, असं वाटतंय.”
डुसुली आपलं मन मोठं करत म्हणाली, “चल ताई, आज मी उपवास सोडते. आज आपण माणसांना टोचून पाहूया.. ते हुशार झालेत का?”
केवळ माणसांची हुशारी टेस्ट करण्यासाठी त्या दोघी आनंदाने गूंगूं गुंगत माणसांच्या कानाखांद्यावर बागडू लागल्या.
-राजीव तांबे
***