Menu

'लढाऊ' भरारी

image By Wayam Magazine 06 October 2023

विचार करा, काश्मीर खोऱ्यातलं द्रास आणि बटालिक सेक्टरचं अत्यंत प्रतिकूल हवामानाचं क्षेत्र. हवा विरळ, बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला प्रदेश आणि त्यातही पाकिस्तानी शत्रूंच्या बंदुकीचा वर्षाव  कधी सहन करावा लागेल, हे सांगता येत नाही. अशा प्रतिकूल वातावरणात भारतीय हवाई दलाचं चीता हे अत्यंत छोटेखानी हेलिकॉप्टर तिथे न्यायचं आणि शत्रूच्या माऱ्यापासून बचाव करीत आपल्या जखमी सैनिकांना उचलून लगोलग सैन्यदलाच्या रुग्णालयात आणायचं…इतक्या कठीण प्रदेशात आणि हवामानात हेलिकॉप्टर उतरवायलाही जागा नसते…वैमानिकाच्या झटपट निर्णयक्षमतेची कसोटीच लागते इथे…हवा कधी पालटेल सांगता येत नाही आणि शत्रू कधी टिपेल, त्याचाही नेम नाही…परंतु कारगील युध्दातला हा कसोटीचा क्षण झेलत होती वयाच्या विशीतली भारतीय तरुण महिला वैमानिक गुंजन सक्सेना…

सैन्यदलांमध्ये फॉरवर्ड पोस्ट्सवर म्हणजेच प्रत्यक्ष युध्दभूमीवर महिलांना तैनात केलं, तर त्याही पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून किती अतुलनीय साहस दाखवू शकतात, त्याचा हा परिपाठच होता. भारतीय हवाई दलात त्यावेळी युध्दसामग्रीवाहक म्हणजेच ट्रान्सपोर्ट विमानं आणि हेलिकॉप्टर या दोनच शाखांमध्ये महिला वैमानिकांची भरती झालेली होती. १९९४ मध्ये भारतीय हवाई दलात महिलांना वैमानिक होण्याची संधी मिळाली आणि एक दशक होण्याच्याही आतच त्यांच्यासाठी युध्दकामगिरीवर जाण्याचा कसोटीचा क्षणही चालून आला.  म्हटलं तर ही संधी आणि म्हटलं तर परीक्षा पाहणारा काळ. पण भारतीय स्त्री कशातच मागे नाही, हे या काळात हवाई दलात भरती झालेल्या महिला वैमानिकांनी दाखवून दिलं. आज हे सारं आठवण्याचं विशेष कारण आहे. भारतीय हवाई दलाच्या ८३ वर्षांच्या इतिहासात यंदाच्या वर्षी प्रथमच तीन तरुण महिला वैमानिक लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हैदराबादमधील डुंडिगल येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जूनमध्ये हवाई दल अकादमीची पासिंग आऊट परेड झाली. त्यात अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या तीन तरुण महिला वैमानिकांचं लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी कमिशनिंग झालं. देशाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे उद्गार आपले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी काढले. खरंच, इतकं कठीण आहे का हे सगळं, असं तुमच्यासारख्या बच्चेकंपनीला आज कदाचित वाटू शकेल.

हो, तुमचंही बरोबरच आहे. का नाही वाटणार बरं असं? कारण असं पहा, आपल्या भारतात आज स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा द्यावा लागतो असं आपण म्हटलं, तरीही मुलींनी कित्येक क्षेत्रात बाजी मारली आहेच आणि आम्ही या समानतेच्या योग्यतेच्या आहोत, हे दाखवूनच दिलंय. अहो, एव्हरेस्ट शिखर आपल्या महाराष्ट्रातल्याच दोन लहानग्या मुलींनी काबीज केलं, तेलंगण राज्यातली पूर्णा मालवथ तर अवघ्या 13 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान महिला ठरली. महिला रेल्वेच्या मोटरमन बनल्या. गावातल्या एसटी स्टँडवर पहाल, तरी लक्षात येईल, कित्येक बसमध्ये महिला बस कंडक्टर आहेत. महिला टॅक्सीचालक आहेत आणि त्यांच्यासाठी आता वेगळ्या रंगाच्या रिक्षा आल्या आहेत. एवढंच काय, अवाढव्य रोडरोलरही महिला चालवतात. समुद्रात जाणाऱ्या महाकाय व्यापारी जहाजांच्या त्या कप्तान आहेत. परवाच एका भारतीय महिला कप्तान राधिका मेननला व्यापारी जहाजातून अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल जगातला सर्वोच्च सन्मान मिळाला. आजकाल विमानात बसल्यावर 'मै कप्तान मिस...बोल रही हूँ' असा महिलेचा आवाज आल्यावर तुम्हालाही फारसं आश्चर्य वाटत नाही. मग एवढं सगळं असताना महिलेने फायटर पायलट म्हणजेच लढाऊ विमानाचं वैमानिक होणं ही एवढी अप्रूपाची गोष्ट कशासाठी ? शिवाय ही गोष्ट आपल्या हवाई दलात घडण्यासाठी इतकी 83 वर्षं का जावी लागली ? हो, खरंय, तुमच्या मनातला प्रश्न योग्यच आहे. पण उत्तरासाठी तुम्हाला थोडं जगभरातील इतिहासाकडेही पहावं लागेल.

जगभरातच एकूणच लढाऊ विमानांच्या वैमानिकपदी महिलांची वर्णी लागण्यास तसा उशीरच झाला. तुर्की (तुर्कस्तान) देशात 1936 साली सबिहा ग्योकसेन ही महिला जगातील पहिली लढाऊ विमान वैमानिक बनली होती. 1942 ते 1945 या काळात दुसऱ्या महायुध्दात काही महिला लढाऊ वैमानिक कार्यरत होत्या व त्यात त्यांनी शत्रूंचा मोठ्या प्रमाणात खात्मा केला. परंतु त्यांनाही तितक्याच संख्येने प्राणही गमवावे लागले. विशेष म्हणजे सुपरपॉवर गणल्या गेलेल्या अमेरिकेतही फायटर पायलट म्हणून महिलांची वर्णी लागायला 1993 साल उजाडावं लागलं. जीनी लीविट ही अमेरिकी हवाई दलात विमानं उडविणारी पहिली लढाऊ महिला वैमानिक ठऱली. पुढे तिने अफगाणिस्तान आणि इराक युध्दात भाग घेत 300 तासांचं उड्डाण केलं. ब्रिटनची जो साल्टर ही महिला लढाऊ वैमानिक शाही हवाई दलासाठी काम करू लागली, तेही 1994 मध्ये. तर एकूणच 1990 च्या दशकातच महिला वैमानिक लढाऊ विमानांवर काम करू लागल्या. आश्चर्य म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेल्या आणि आपला लष्करी प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने मात्र 2013 मध्ये आयेशा फारुक या महिलेच्या हाती फायटर जेटचं सारथ्य सोपवलं. आयेशा फारुक ही चीनी बनावटीची एफ7 पीजी विमानं उडवायची. चीनमधूनही साधारण याच काळात सहा महिला वैमानिकांची पहिली तुकडी रुजू झाली.

भारतात युध्दसामग्रीवाहक विमानं आणि हेलिकॉप्टर्सवर महिला वैमानिक तैनात झाल्या, त्यास दोन दशकं होऊन गेली. परंतु त्या तुलनेत लढाऊ विमानांपर्यंत महिलाशक्ती दिसण्यासाठी तसा बराच वेळ लागला. याची कारणं विविध स्वरुपाची होती. हवाई दलात वैमानिक बनायचं, तरी स्त्री म्हणून तुम्हाला वेगळी सूट नसते आणि आकाशात रोंरावत जाणाऱ्या विमानात आपल्या शरीरातील गुरुत्वशक्तीच्या विरोधात ऊर्ध्व दिशेने प्रवास करीत तुम्हाला अनेक शारीरिक कसोट्या पार कराव्या लागत असतात. या जमान्यातली लढाऊ विमानं तर आता सुपरसॉनिक म्हणजेच स्वनातीत किंवा ध्वनीच्याही पेक्षा अधिक वेगाने आभाळ भेदणारी आहेत. अशा या विमानात टिकून तर रहायचंच, परंतु त्यांचं योग्य दिशादर्शन आणि शत्रूच्या टापूत शिरून पलिकडचं विमान किंवा लक्ष्य बेचिराख करायचं, असं दुहेरी-तिहेरी आव्हान या फायटर विमानांच्या महिलांपुढे असतं. ट्रान्सपोर्ट विमानं, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानं यांच्या कार्यात थोडाथोडा तांत्रिक फरक आहे आणि प्रत्येकाचं आव्हान वेगवेगळं आहे. अर्थात त्यामुळे लढाऊ विमानंच उत्तम आणि बाकीचे जॉब एकदम सोपे असं अजिबातच घडत नाही. तरीही लढाऊ विमानातलं सर्वात कठीण आव्हान हे त्यांच्या वेगामुळे असतं. तुमच्याकडे क्षणार्धात एखादा निर्णय घेण्याची क्षमता आहे का, या मानसिक क्षमतेचा कस प्रशिक्षणात जोखला जातोच. त्याचप्रमाणे विमान जेव्हा आकाशात 40 हजार फुटांची उंची गाठतं आणि क्षणार्धात खाली येऊन पुन्हा वर उसळी मारतं, तेव्हा आपल्या शरीरातील जीव-रासायनिक प्रक्रियांमध्ये अनेक बदल घडत असतात. आपल्या रक्ताभिसरणाला अशी उसळी आणि हा ध्वनिहून अधिक वेगाने जाणारा विमानाचा झपाटा पेलवेल का, हा खरा प्रश्न असतो. अशा शारीरिक क्षमतेसाठी विविध मानकं असतात आणि त्यामुळेच लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून कमिशनिंग मिळेपर्यंतचा काळ खूपच जिकिरीचा असतो. मुळातच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरांची जडणघडण भिन्न असते, हे तुम्ही जीवशास्त्रात शिकताच. भिन्न म्हणजे कमी नव्हे. परंतु त्यासाठी स्त्रीला विविध पातळ्यांवर प्रशिक्षित तर करावं लागणार होतंच. त्याचप्रमाणे प्रसूती-गर्भारपण या काळात शरीरात होणारे बदल, त्यामुळे कार्यकाळात खंड पडल्यास त्याचा करिअरशी आणि खासकरून हवाई दलातील वैमानिकांच्या तुकडीच्या सुसज्जतेशी काही संबंध येईल का, अशा अनेक पातळ्यांवर सैन्यदलांना विचार करावा लागतो. क्रिकेटमध्ये जशी तुमची मैदानावर खेळण्याची कारकीर्द वयाशी निगडित असते, त्याचप्रमाणे वैमानिकांची कारकीर्दही वय तसंच शारीरिक आणि मानसिक फिटनेस म्हणजेच तंदुरुस्तीशी निगडित असते.

महिलांना हवाई दलात लढाऊ विमानांची कामगिरी सोपविण्यापूर्वी आणखी एका गंभीर मुद्द्याचा विचार करणं गरजेचं होतं. लढाऊ विमानांना युध्दाच्या काळात प्रसंगी भारतीय सीमा ओलांडून शत्रूच्या प्रदेशात मुसंडी मारावी लागते. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्य टिपण्याची कामगिरीच त्यांच्यावर सोपवलेली असते. अशा वेळी शत्रूच्या माऱ्याचा आपण बळी ठरलो आणि आपलं विमान त्यांनी पाडलं, तर वैमानिक त्या शत्रूराष्ट्राचा युध्दबंदी होण्याचा धोका असतो. आपलं शत्रूराष्ट्र युध्दबंदींना कसं वागवेल, त्यांच्यावर अत्याचार करील का, त्यांच्या जिवाशी खेळेल का, या धोक्याचाही विचार करावा लागतो. एकदा तुम्ही सैनिक किंवा वैमानिक बनलात, तर मग या धोक्यांपासून तुम्ही मागे हटू शकत नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करून, थोडंसं उशिराने परंतु भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकांना लढाऊ विमानांवर स्वार होण्याची संधी मिळाली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अर्थातच या संधीस पात्र ठरलेल्या पहिल्या फळीतल्या तिघी तरुणींविषयी तुम्हाला सांगायलाच हवं.

यातली मोहना सिंग ही राजस्थानच्या झुनजुनू गावची असून ती आपल्या कुटुंबाचा सैन्यवारसा पुढे चालवत आहे. तिचे वडील भारतीय हवाई दलातले अधिकारी, तर आजोबा एव्हिएशन रिसर्च सेन्टरमध्ये होते. तिची आई शालेय शिक्षिका आहे. मोहना सिंगने अमृतसरच्या जीएमआयईटी संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात बी.टेक.ची पदवी घेतली. आपण मोठेपणी विमान उडवायचं, हा ध्यास तिने वडिल-आजोबा यांच्याकडे पाहत लहानपणापासूनच घेतला होता. त्यानुसार बी.टेक.नंतर तिची हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.

भावना कांत या दुसऱ्या तरुणीला मात्र संरक्षण दलाची थेट कौटुंबिक पार्श्वभूमी काही नाही. ती बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बेगुसराई या रिफायनरी नगरीत वाढलेली. तिचे वडील इंडियन ऑइल या तेलशुध्दीकरण कंपनीत इंजिनीअर आणि आई गृहिणी. तिने बंगळुरूमधील बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई पदवी घेतली आणि हवाई दलात वैमानिक होण्याचं आपलं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण करण्याकडे तिची पावलं वळली. हवाई दलात प्रवेश केल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण झाला, तेव्हा कुठे तिला असं वाटलं की आता आपलं स्वप्न आपल्या मुठीत थोडं थोडं येऊ लागलंय.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील अवनी चतुर्वेदीलाही सैन्यदलाची थेट कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण तिच्या नातलगांमधून तिच्यावर हवाई दलातील करिअरचा प्रभाव पडला होता. तिचे वडील राज्य सरकारमध्ये इंजिनीअर आहेत. तिने जयपूरच्या बनस्थळी विद्यापीठातून संगणक विज्ञानातून बी. टेक. ची पदवी घेतली. कॉलेजात असतानाच तिने फ्लाइंग क्लबमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर जय्यत तयारीनिशी हवाई दलात.

या तिघींचीही कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी, त्यांचे प्रांत निरनिराळे, त्यांचं शिक्षण त्यांच्या जन्मगावापासून दूर झालेलं. परंतु या सगळ्याचं ओझं किंवा पूर्वग्रह मनात न ठेवता त्यांनी हवाई दलातील करिअरसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला झोकून दिलं. त्यामुळेच तर वयाच्या विशीमध्येच त्या हवाई दलातील वैमानिकपदासाठीचं खडतर प्रशिक्षण पार करू शकल्या. फ्लाइट कॅडेट असतानाच त्यांच्यापाशी जवळपास दीडशे तासांच्या उड्डाणाचा अनुभव गाठीशी आला. आता फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्यांचं हवाई दलात समारंभपूर्वक कमिशनिंग झालं. त्यामुळे आता त्या ब्रिटिश बनावटीच्या हॉक जातीच्या प्रगत प्रशिक्षणार्थी जेट विमानावर पुढचे धडे घेणार आहेत. आता बिदर इथे लढाऊ विमानांच्या प्रशिक्षणासाठी त्या जातील. या प्रशिक्षणात त्यांना हवाई दलात बऱ्याच वर्षांपासून असलेल्या मिग 21 किंवा तुलनेने अलिकडेच दाखल झालेल्या सुपरसॉनिक सुखॉय 30 किंवा मिराज 2000 या लढाऊ विमानांवर विविध चित्तथरारक कवायती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. तुमच्यापैकी कुणी सुखॉय विमानांच्या कवायतींचे व्हिडिओ किंवा त्यांची दृश्य टीव्हीवर किंवा यूट्यूबवर बघितली असतील, तर तुम्हाला हा थरार काय असतो, त्याची कल्पना येईल. कल्पना करा, एक त्रिकोणी आकाराचं विमान एखाद्या धावपट्टीवरून आभाळ भेदून टाकणारा आवाज करीत हवेत झेपावतं आणि क्षणार्धात त्याची अक्षरशः टिकली होते, पुढच्या क्षणाला ते हवेत गिरकी घेतं आणि आता आलंच की काय आपल्या अंगावर असं वाटत असताना ते पुन्हा हवेत उसळतं. अशा सगळ्या कवायतींचा त्यांना सराव दिला जातो.

'ही संधी मिळणाऱ्या आम्ही पहिल्याच मुली आहोत, याचा आनंद नक्कीच आहे, परंतु ही संधी कुणालातरी मिळायचीच होती, ती आम्हाला मिळाली', इतके सहज शब्द होते मोहना सिंगचे कमिशनिंगनंतर. 'विमानात एकटीने उड्डाण करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास लागतो, एकटीने उड्डाण करण्यातली भावना खूपच स्पेशल असते आणि प्रशिक्षकासह आमचं भरपूर प्रशिक्षण झाल्यानंतरच आम्हाला एकटीने म्हणजेच सोलो फ्लाइंगची परवानगी मिळते', असं अवनी चतुर्वेदीने त्यावेळी सांगितलं होतं.

'मार्ग कितीही खडतर असो, मध्येच त्यातून पळ काढू नका, तुमच्या ध्येयपूर्तीपासून जराही ढळू नका, तुम्ही स्वतः फायटर बना, मग फायटर विमानाचं वैमानिक बनणंही कठीण नाही', असा संदेश मोहना सिंग तुम्हा पुढच्या पिढीच्या वैमानिकांसाठी देते.

भारतीय हवाई दलात महिला वैमानिक प्रथम रुजू झाल्या, अशा पहिल्या काही पिढ्यांपैकीच होत्या, स्क्वाड्रन लीडर (निवृत्त) शिवानी कुलकर्णी. जबलपूर आणि नागपूरमध्ये त्यांचं बालपणीचं शिक्षण झालं. हवाई दलात एएन 32 या सामग्रीवाहक विमानाचं सारथ्य त्यांनी केलं आणि कारगील युध्दापासून ते भूजचा भूकंप, दरभंगा जिल्ह्यातील पूर अशा संकटांमध्ये रसदपुरवठा करण्याच्या कामात त्यांनी अत्यंत कठीण कामात वैमानिक म्हणून धडाडीची कामगिरी बजावली होती. दहा वर्षांच्या सेवेनंतर आता इंडिगो कंपनीचं विमान उडविणाऱ्या स्क्वाड्रन लीडर शिवानी कुलकर्णी यांनी या नव्या पिढीच्या तीन महिला वैमानिक लढाऊ विमानांवर तैनात होणार असल्याचं खूप खूप कौतुक आणि स्वागतही केलं. मुली म्हणून तुम्हाला प्रशिक्षणात कोणतीही सवलत मिळत नाही आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिध्द केल्याशिवाय तुम्ही या टप्प्यापर्यंत येऊच शकत नाही, त्यामुळे या तिघींची लढाऊ विमानांसाठी  निवड झाली, याचाच अर्थ त्यांनी त्यांचं कसब आणि क्षमता सिध्द केली आहे, असं महत्त्वपूर्ण मत त्या नोंदवतात.

तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या भारताच्या हवाई दलासाठी आणि संपूर्ण भारतवर्षासाठी महिलांचा लढाऊ वैमानिक म्हणून सहभाग ही अभिमानाची गोष्ट आहे आणि या संधीमुळे नव्या पिढीच्या मुलींना करिअरचं आणखी एक नवं दालन खुलं झालं आहे. पहा की, या पहिल्या फळीच्या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारच्या. मग आपल्या संपन्न महाराष्ट्रातून तुम्हीही या तिघींचा कित्ता गिरवणार ना. 'राहमें काटे बिखरे मगर, उसपे तो फिरभी चलना ही है...ये हौसला कैसे रुके'...ही एका गाण्यातली ओळ लक्षात ठेवा. तुमच्याही महत्त्वाकांक्षेला मिळू शकतात गगनभरारीचे पंख आणि विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून तुम्हीही पेलू शकता आपल्या भारतमातेच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी.

-समीर कर्वे

***

My Cart
Empty Cart

Loading...