Menu

वाचा किशोरवयीन मुलांचा मासिकातली गोष्ट - खोटी गोष्ट

image By Wayam Magazine 11 November 2022

इंट्रो- दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच! का, कशासाठी? ते नाही सांगता येणार! पण दोन्ही वेळेला मला काय वाटलं ते मात्र तुम्हाला मनापासून माझ्या मनातलं खरं खरं सांगणारी ही गोष्ट! ‘लक्ष आहे का वेळेकडे?’ बाबा म्हणाले, तेव्हा मी पुस्तकातून वर पाहिलं. पावणेदहा झाले होते. शाळा पावणेअकराची असायची, त्यामुळे आंघोळ स्किप केली, तर अजून पंधराएक मिनिटं वाचत बसणं शक्य होतं. पण ते बाबांना कसं सांगणार? “अं, हो, उठतोच”, मी पुटपुटलो आणि वाचत राहिलो. मला आशा होती, की सल्ला देऊन ते पटकन उठतील आणि बाहेर पडतील. ड्रायव्हर मघाशीच येऊन थांबलेला होता आणि त्यांची नेहमीची निघायची वेळ होऊन आता अर्धा तास तरी झाला होता. पण ते उठले नाहीत. पलीकडेच पडलेला ‘इंडीअन एक्स्प्रेस’ त्यांनी उचलला, उघडला, मग पुन्हा बंद केला. मग म्हणाले, “आंघोळ तरी झालीय का तुझी?” आता काही सुटका दिसत नव्हती. मी मधे बोट घालून पुस्तक मिटलं आणि म्हणालो, “नाही, पण हे वाचायला लागणार. शाळेमध्ये लास्ट पिरीअडला इन्स्पेक्शन आहे, तेव्हा मला सगळ्यांसमोर एक स्टोरी सांगायचीय. म्हणून काहीतरी वाचतोय !” वाक्य तोंडातून बाहेर येईपर्यंत, ते तसं येणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. खरं म्हणजे त्या दिवशी इन्स्पेक्शन बिन्स्पेक्शन काही नव्हतं आणि असतं, तरी इन्स्पेक्शनला मुलांना गोष्टी सांगायला कशाला लावतील? अगदी चौथीचा वर्ग असला म्हणून काय झालं! दोन सेकंद बाबा तसेच माझ्याकडे बघत राहिले. त्यांना तसं बघताना पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आपण खोटं बोललो. माझ्या आठवणीत मी याआधी कधीही खोटं बोललेलो नव्हतो. हं, आता माझ्या क्लासमेट्सकडून त्यांनी कुणाला कशा थापा मारल्या याच्या गमती ऐकायला मिळायच्या आणि गोष्टीच्या पुस्तकांमधूनही खोटं बोलणारी कॅरेक्टर्स भेटायचीच. सिनेमातही. आता ती काही सगळी वाईट नसायची. बरेचदा हिरो मंडळीही थापाथापी करायची. पण ते वेगळं, आणि स्वत: खोटं बोलणं वेगळं. तेही असं सोप्पेपणाने, जराही न अडखळता. हे टॅलेंट माझ्यात असल्याचं माझ्या आजपर्यंत लक्षातच आलं नव्हतं आणि खोटं तरी मी का बोललो होतो? फक्त आणखी पाच-दहा मिनिटं वाचत बसता यावं म्हणून? एवढं कारण पुरेसं होतं? हा सगळा विचार माझ्या डोक्यात चालला होता, तोवर बाबा माझ्याकडे पाहातच होते. ‘मी सफाईने खोटं बोलल्याबद्दल स्वत:ला थोड्या घाईनेच कॉन्ग्रॅच्युलेट केलं का?’ असं मला वाटून गेलं. मी सहज खोटं बोललो असं मला स्वत:ला वाटलं असेल, पण त्यांना ते पटलंय का नाही हे आपल्याला कुठे कळलंय? त्यांना तसं बघताना पाहून पुढे काय करायचं, हे माझं ठरेना. आधीचं खरं वाटावं म्हणून थोडं जास्त बोलण्याची गरज होती का? पण जास्त बोलण्यामुळेच खोटं बोलतोय असं वाटायला लागलं तर काय करणार? मग मी गप्पच राहिलो. ते उठले, माझ्या जवळ आले, माझ्या हातातलं पुस्तक काढून घेतलं. आता मला जोरदार धपाटा पडणार अशी माझ्या मनाची खात्री झाली. मी डोळे मिटून घेतले. बाबा तसे मला मारत नसत. तसे म्हणजे नाहीच. मला तर त्यांनी कधी ओरडल्याचंही आठवत नव्हतं. पण आजवर ओरडलं, मारलं नाही, म्हणजे यानंतरही ओरडणार, मारणार नाहीत असं थोडंच आहे? असल्या हॉरर स्टोरीजही मी मित्रांकडून ऐकलेल्या होत्याच. पण बाबांचा काहीच आवाज आला नाही आणि पाठीवर धपकाही बसला नाही. मी डोळे उघडून पाहिलं, तर बाबा माझ्या हातातलं पुस्तक चाळत बसले होते. ‘नील गायमन?’ त्यांनी चष्मा काढून हातात घेतला. ‘याची गोष्ट सांगणार तू सगळ्यांसमोर उभा राहून? कॉम्प्लिकेटेड असतात त्याच्या गोष्टी. सांगायला सोप्या नाहीत आणि लांबीनेही मोठ्या असतात.’ मी काहीतरी पुटपुटलो. त्यांनी नीटसं ऐकलं की नाही कुणास ठाऊक. आणि खरं म्हणजे मलाही मी काय बोललो हे नक्की कळलं नाही. ते म्हणत होते ते बरोबरच होतं. मी गायमनचं पुस्तक वाचत होतो, कारण तो लेखक मला आवडायचा म्हणून. शाळेच्या लायब्ररीतून पुस्तक नुकतंच घेऊन आलो होतो म्हणून, गोष्ट सांगायचीय म्हणून नाही. मी विचार करून आणखी काहीतरी बोलणार इतक्यात बाबा उठले आणि त्यांनी वरच्या शेल्फवरून दुसरं एक पुस्तक काढलं. रे ब्रॅडबरी नावाच्या लेखकाचं, ‘ऑक्टोबर कन्ट्री’ नावाचं. लेखकाचं नाव माझ्यासाठी नवीन होतं. बाबांनी फरफर पानं उलटली आणि इंडेक्स बघून अमुक गोष्ट वाच असं सांगितलं. गोष्ट लहानशी होती. पाच मिन्टात वाचून होण्यातली. मी बरं म्हंटलं. मग म्हणाले, “आता आधी अंघोळ कर आणि पळ शाळेत . गोष्ट मधल्या सुटीत वाच”, मी मान डोलावली, आणि ते गेले. मी चूपचाप उठलो, अंघोळीला गेलो, आणि मग शाळेत. इन्स्पेक्शन अर्थातच नव्हतं. त्यामुळे पुस्तक वाचायचीही घाई नव्हती. पण थोडी भीती होती, की संध्याकाळी बाबा गोष्ट कशी सांगितली हे विचारतील, आणि आपल्याला काहीतरी रचून सांगायला लागेल. सकाळी बोललो तेव्हा पटकन तोंडातून बाहेर पडलं, विचारसुद्धा करायला लागला नाही, पण आता आपल्याला खोटं बोलावं लागणार हे माहीत आहे, तर वेळ आल्यावर आपण ते बोलू शकू का ? आणि समजा म्हणाले, कशी सांगितलीस ते करून दाखव, मग? मग काय करायचं? शाळेचा पहिला पिरीअड मॅथ्सचा होता, पाटील सरांचा. गणित हा एरवी माझा आवडीचा विषय, पण आज काहीतर झालंच होतं. माझं बिलकूल लक्ष लागेना. वर्गात काही प्रश्न विचारला, की पाटील सर हटकून माझ्याकडे बघत, माझा हात वरच असायचा. पण आज दोन- तीनदा असं झालं, की त्यांनी काय विचारलं, हेच माझ्या डोक्यात शिरेना. त्यांनी पाहिलं, की मी नजर चुकवायचो. खाली पाहायचो, किंवा कंपास बॉक्समधून काहीतरी काढल्या-ठेवल्याचं नाटक करायचो. क्लास संपला तेव्हा मला वाटलं, त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना सांगावं की पुन्हा असं होणार नाही. आज माझं लक्ष नव्हतं, कारण ....पण कारण काय सांगणार ? आणि कारण होतं तरी काय ? मी खोटं बोललो हे माझ्या डोक्यात अडकून बसलं होतं, की मी पकडला जाईन हे ? आणि दोन्हीमधे अधिक वाईट काय ? खोटं बोलणं, की पकडलं जाणं ? मधली सुट्टी झाली, तेव्हा मी पुस्तक काढलं, आणि बाबांनी सांगितलेली गोष्ट वाचून काढली. गोष्ट काही मुलांची नव्हती, मोठ्यांचीच होती. पण मी तसा अलीकडे मोठ्यांच्या बऱ्याच गोष्टी वाचत असे, त्यामुळे मला सवय होती. क्लासमधले बाकीचे फार कुणी काहीच वाचत नसत. म्हणजे अगदी सिलॅबसमधे लावल्यासारखी असणारी हॅरी पॉटर टाईप पुस्तकं सोडून. काहीजण त्याचेही फक्त पिक्चर बघून नॉव्हेल्स वाचल्याचं दडपूनच सांगायची असा मला संशय होता. पण ते राहू दे. मला सांगा, सगळ्यांनीच काय हॅरी पॉटर, नाहीतर मेझ रनर वाचायचं ? त्यापेक्षा ही गोष्ट छान होती, आणि कुणाला कळायला फार कठीण गेली असती असंही मला वाटलं नाही. ती गोष्ट मला आवडली या आनंदात मी शाळा सुटेपर्यंत होतो. पण शाळा सुटली आणि मला टेन्शनच आलं. बाबा मला समोर उभं करून विचारणार आणि मला खरंखुरं सांगून टाकायला लागणार अशी माझी खात्रीच पटली. मी घरी पोचलो, आणि चहा पिऊन तडक खाली खेळायला जाण्याऐवजी ती गोष्टच काढून बसलो. समजा मला ही सांगायची असती तर मी कशी सांगितली असती ? इंग्लिशमधून का मराठीतून, सगळीच सांगितली असती का काही भाग गाळला असता, नावं मनाची घातली असती का तीच ठेवली असती, ब्रॅडबरीचं नाव सांगितलं असतं, का अशीच मी कधीतरी वाचलेली गोष्ट असं सांगितलं असतं, एक ना दोन, आता मला खूपच प्रश्न पडायला लागले. मग मी सगळ्यांची उत्तरं काळजीपूर्वक शोधायला लागलो. बाबांनी विचारल्यावर मला हे सगळं माहीत असावंच लागलं असतं. बोलताना जरा काही गोंधळ झाला असता तर मी खोटं बोललो हे त्यांना कळलं असतं. आता हेही शक्य होतं की त्यांनी माझ्या खोटं बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तशीही मोठी माणसं चिकार खोटं बोलतात असं मी वाचलेली पुस्तकं, पाहिलेला टीव्ही आणि सिनेमा यावरून सांगू शकतो, शिवाय मी काही एवढा लहान नव्हतो, की खोटं बोलणं मला माहीतच असू नये, किंवा जमूच नये, तरीही, त्यांना काय वाटेल हे मला कसं सांगता येणार ? त्या दिवशी बाबांना यायला बराच उशीर झाला. नेहमी मी साडेनऊ-दहालाच झोपायचो, पण त्या दिवशी झोप येतंही नव्हती म्हणून मी आपला जागाच होतो. अकरा वाजले, साडेअकरा, बारा... आईही झोपून गेली असावी. शेवटी जेव्हा लॅचकीचा आवाज आला, तेव्हा एक वाजून गेला होता. आणि मी जागाच. त्यातल्या त्यात एक बरं झालं, की त्यांना मी झोपलोयसं वाटल्याने काही बोलणच झालं नाही. पण मग मला वाटायला लागलं की मी जागा आहे हे त्यांना कळलं असतं, आणि तरीही त्यांनी मला विचारलच नसतं तर? अधिक वाईट काय ? मला त्यांना उत्तर द्यायला लागणं, की त्यांनी मला विचारायचंच विसरून जाणं ? पण शेवटी तेच झालं. त्यांनी मला काही विचारलं नाही, आणि मी त्यांना काही सांगितलं नाही. दिवस जायला लागले आणि आधी मला जी भीती वाटायची ती नंतर नंतर कमी होत गेली. मग वाटायला लागलं, की त्यात काय झालं, आपणच त्यांना सांगून टाकूया. असं सांगून टाकणं, आता फार कठीण वाटेना. मला वाटतं गोष्ट जशी जुनी होते, तशी ती सोपी व्हायला लागते. नव्या टीचरबद्दल वाटणारी भीती तो सवयीचा झाल्यावर पुसली जायला लागते तसं बाकी गोष्टींचंही होतच असणार. याचंही तसच झालं. बाकी खोटं बोलता येतं हे लक्षात आल्यावर आता मी इतरही बारीकसारीक गोष्टीत खोटं बोलायला लागलो, म्हणजे गंमत म्हणून. आपण खोटं बोललो, बोलू शकतो हा धक्काही कमी व्हायला लागला. त्यातून त्यांच्याशीही मी काही फार गंभीर गोष्टीबद्दल खोटं बोललो नव्हतो. मला पुस्तक वाचायचं होतं म्हणून तर बोललो ना? आता पुस्तक वाचायला आवडण्यात एवढं काय वाईट होतं? पण डोक्यात तो विचार आला आणि त्यातून एक नवा प्रश्नही तयार झाला. एखादी गोष्ट चुकीची हे खरोखर कशामुळे ठरेल ? मुळातच ती गोष्ट बरोबर किंवा चूक असेल, का ती करण्यामागचा हेतू ती चुकीची आहे का नाही ( किंवा असलीच तर किती चुकीची ) हे ठरवेल? अशीच दोनेक वर्ष गेली. मी झाला प्रकार हळूहळू विसरूनही जायला लागलो, आणि सहावीला असताना अचानक मला ती गोष्ट क्लासमधे सांगायची संधी मिळाली. तोवर माझ्या डोक्यातही ती गोष्ट पुसट व्हायला लागली होती. नाही म्हणायला आता रे ब्रॅडबरी मला लेखक म्हणून आवडायला लागला होता आणि त्याची हाताला लागतील ती पुस्तकं मी वाचून काढली होती. चार-पाच तर बाबांच्या कलेक्शनमधे आधीपासूनच होती. पण मला ब्रॅडबरी आवडतोय म्हटल्यावर त्यांनी इतर काही पुस्तकंही आणून दिली. त्यांचा तो आवडता लेखक होताच. गंमत म्हणजे हे करताना त्यांना त्या दिवशी मला काढून दिलेलं पुस्तक अजिबातच लक्षात नव्हतं. मीही त्यांना ती आठवण करून देणार नव्हतो. पण कुठेतरी माझ्या डोक्यात तो दिवस अडकून राहिला होताच. सहावीच्या वर्गामधेही त्या दिवशी इन्स्पेक्शन वगैरे काही नव्हतं. जस्ट आपला रेग्युलर क्लास. पण हिस्ट्री शिकवणाऱ्या मेहता मॅमचा घसा बसला होता, आणि त्यांना अजिबातच बोलता येत नव्हतं. फायनल्सही जवळ आल्याने पोर्शनही संपलेलाच होता. मग मॅमनी आम्हांला फ्री पिरीअड देऊन टाकला. आवाज न करता काहीही करा असं सांगितलं. माझ्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक; मी म्हणालो, “मॅम, मी एक स्टोरी सांगू ?” “स्टोरी ? कसली ?” “अशीच. मी वाचली होती मागे. इन्टरेस्टींग आहे.” एव्हाना बाकीच्यांनी स्टोरी..स्टोरी..स्टोरी.. म्हणून डेस्क्स वाजवायला सुरुवात केली आणि त्यांना गप्प करायला मॅमनी चटकन होही म्हणून टाकलं. समोर उभा राहिलो तेव्हा मी स्वत:शीच इमॅजिन केलं, की क्लासवर कुणीतरी गेस्ट आले आहेत, क्लास इन्स्पेक्ट करायला. समोरचे स्टुडन्ट्स आपसात न बोलता शांत बसले आहेत. आणि हा क्लास सहावीचा नसून चौथीचा आहे. दोन वर्षांपूर्वीचा. वीसेक मिन्टांनी स्टोरी सागून संपली. सगळ्यांनी रीतसर टाळ्याबिळ्या वाजवल्या. मेहता मॅमनाही स्टोरी आवडली. खरं सांगायचं, तर मलाही तिचा शोध नव्यानेच लागल्यासारखा झाला. जुना मित्र पुन्हा भेटावा तसं काहीतरी झालं. त्या संध्याकाळी बाबा साडेसातच्या सुमाराला आले तेव्हा मी त्यांची वाटच बघत होतो. म्हंटलं, “तुम्हांला आठवतय, तुम्ही मला क्लासमधे सांगायला एक स्टोरी सजेस्ट केली होतीत ?” आधी त्यांचा चेहरा ब्लॅन्क झाला. पण मग त्यांना हळूहळू आठवलं. “ब्रॅडबरी, राईट? बट दॅट वॉज अ लॉन्ग टाईम अगो”, ते म्हणाले. “राईट. पण त्या दिवशी मी स्टोरी कशी सांगितली हे विचारलं नाहीत तुम्ही.” ते विचारात पडले. बहुधा हे मी इतक्या दिवसांनी काढतोय याचंही त्यांना आश्चर्यच वाटलं असणार. पण तसं ते बोलले नाहीत. “कशी सांगितलीस?” एवढंच म्हणाले. मग मी बोलतच सुटलो. आमचा वर्ग, इन्स्पेक्शनला आलेले काल्पनिक पाहुणे, मी कशी सुरुवात केली, कसा पिनड्रॉप सायलेन्स होता, मग शेवटी टाळ्या, शाबासकी वगैरे वगैरे. बाबा म्हणाले, “वा ! बरंच लक्षात आहे रे तुझ्या. अगदी आजच झाल्यासारखं. या सगळ्याला दोन वर्षं झाली असं वाटलंच नाही ऐकताना !” मी थोडा चपापलो. पण बाबांना कळण्याची काय शक्यता होती? “हो ना. एकदम फ्रेश आहे डोक्यात. मी तुम्हांला करून दाखवू, कशी सांगितली गोष्ट ते ?” एकदा त्यांनी मला न कळेलसं घड्याळाकडे पाहिलं, पण तरी मला ते कळलंच. मी काहीच बोललो नाही. मग म्हणाले, “हो, दाखव की.” मी लगेच समोर उभा राहिलो आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाबांनी हातातला सेलफोन बाजूला ठेवला आणि ऐकायला लागले. आवाज ऐकून आईही हॉलच्या दारात येऊन उभी राहिली. मग बाबांच्या शेजारी सोफ्यावर बसली. गोष्ट छान रंगत गेली. कदाचित वर्गामधे रंगली त्याहून थोडी अधिकच. नंतर मी विचार केला, की दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच. आधी होणार नसलेली गोष्ट होणार आहेच असं सांगितलं, तर नंतर न झालेली ( किंवा निदान मी म्हणालो त्यावेळी न झालेली, आणि जशी होईलसं म्हणालो अगदी तशीही न झालेली) गोष्ट झाली असंही सांगितलं. मग आधी सांगितलेल्या खोट्याचा मला त्रास का झाला, आणि नंतर सांगितलेल्या खोट्याचा का झाला नाही ? कोण जाणे. मला काही याचं उत्तर सांगता नाही येणार. एकच सांगता येईल. की त्या रात्री मला छान झोप लागली. कदाचित दोन वर्षात पहिल्यांदाच.

My Cart
Empty Cart

Loading...