Menu

खमंग सुगंध मातीचा!

image By Wayam Magazine 16 November 2022

By Dr. Sharad Kale,  On 17th July 2020, Children Magazine

गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत.

पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो.

दोन्ही नाकपुड्या फुलवून जेवढा हा मृद्गंध शरीरात घेता येईल तेवढा घ्या. हा मृद्गंध फक्त पहिल्या पावसानंतरच कां येतो, माहितीये? या मृद्गंधाची निर्मिती नेमकी कशी होते? जर आपण माळरानावर किंवा शेतावर अ सलो तर तिथे हा मृद्गंध शहरापेक्षा अधिक जाणवतो. असे कां? हा मृद्गंध साठवून ठेवता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मनोरंजक आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हांला निसर्गात घडत असलेल्या विविध बाबी समजू शकतील.

तुम्हांला माहितीये, मृद्गंधाची निर्मिती जीवाणू व कवके करीत असतात. जेव्हा माती उन्हाळ्यात अगदी कोरडी असते, तेव्हा देखील जीवाणू व कवके या दोन सजीव वर्गातील मंडळी त्यांचा जीवनक्रम जगत असतात. हे करताना त्यांच्या उत्सर्जक क्रियांमधून `जिओस्मिन’ नावाचा रासायनिक पदार्थ निर्माण होत असतो. पण ह्या जीवाणू पेशींमध्ये किंवा कवकांमध्ये वेगळी उत्सर्जक प्रणाली नसल्यामुळे ते पेशींमध्ये साठून राहते. उन्हाळा जसा कडक होत जातो, तसतसे जमिनीतील पाणी कमी होऊ लागते आणि मग हे असंख्य जीव पाण्याअभावी मरतात. पहिला पाऊस पडला की मातीमधील त्यांच्या मृत पेशीचे विघटन होते. त्यावेळी हे जिओस्मिन रसायन मुक्त होते.

मानवी नाक वासासाठी अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे हा गंध लगेच आपल्याला जाणवतो. मानवी नाक किती संवेदनशील असते, माहीत आहे? जर एक लक्ष कोटी हवेच्या रेणूंमध्ये या रसायनाचा एक रेणू असला, तरी आपले नाक तो गंध ओळखू शकतो! रासायनिक दृष्ट्या पाहिले तर जिओस्मिन म्हणजे द्विचक्रीय अल्कोहोल असते. त्यात बेन्झीनच्या दोन रेणूंची साखळी असते व त्यात एक अल्कोहोलिक गुणधर्मासाठी आवश्यक असलेला -OH हा क्रियाशील घटक असतो. ज्या गावचा पाणीपुरवठा नदी किंवा तलावावर अवलंबून असतो, तिथे उन्हाळ्यात पाणी आटू लागते, तेव्हा त्यातील सूक्ष्म जीवांच्या मृत पेशींमधून हे रसायन मुक्त होते व पाण्याला मातकट वास येतो.

पहिल्या पावसाबरोबरच धरतीच्या कुशीतून उगवणारी छोटी छोटी असंख्य तृणपाने मातीतून तरारून वर येताना दिसू लागतात. किती छान दिसतात ना ही चिमुकली पाने! यांच्या बिया कोण पेरत असेल? यांचे आयुष्य ते कितीसे? ते कोणाच्या उपयोगी पडतात? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील.

पहिला पाऊस पडून गेला की, आपल्या सभोवती हेलिकॉप्टरसारखे दिसणारे व तसाच आवाज करणारे कीटक फिरू लागतात. पानांमध्ये त्यांच्या रंगात मिसळून गेलेले हिरव्या रंगाचे नाकतोडे जेव्हा उडी मारून हालतात, तेव्हा कुठे लक्षात येतात! कालपर्यंत न दिसणारी रंगीबेरंगी फुलपाखरेदेखील मुक्त विहार करू लागतात. कुठे तरी मुंग्यांची रांग लागते. रस्त्यावर व विशेषत: तळ मजल्यावर राहाणा-या मंडळींच्या घरात देखील गांडुळे फिरू लागतात. पर्यावरणाच्या साखळीत या सर्व छोटया छोटया मंडळींचे नेमके स्थान असते.

जगात एकूण कीटक किती असावेत? आजपर्यंत कीटकांच्या दहा लक्ष जाती पुस्तकांमध्ये नोंदल्या गेल्या आहेत. कीटकतज्ज्ञांच्या मते ही संख्या ८० लाखांच्या आसपास असली पाहिजे. पृथ्वीवरील सस्तन प्राण्यांच्या एकूण चार ते पाच हजार जाती आहेत. यावरून कीटक किती मोठ्या संख्येने आपल्या पर्यावरणात आहेत, याची कल्पना येईल. प्रत्येक जातीचे लक्षावधी किंवा कोट्यवधी कीटक असू शकतात. पर्यावरणात अनेक महत्त्वाची कामे ह्यातील असंख्य कीटक इमाने इतबारे करीत असतात. प्रसिद्ध कीटकतज्ज्ञ डॉक्टर एडवर्ड विल्सन यांच्या मते- जर पृथ्वीवरचे सारे कीटक नाहीसे झाले, तर फक्त काही महिन्यांत मानवजात नष्ट होईल. शीत कटिबंधात कीटकांची संख्या बरीच कमी असते. मात्र भारतीय वातावरण हे समशीतोष्ण स्वरूपाचे असल्यामुळे आपल्या पर्यावरणात कीटकांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. फळझाडांचे परागीभवन घडवून आणण्यात कीटक महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. एका फुलावरून दुस-या फुलावर क्षणार्धात बसणारा कीटक ही जगातील अतिजलद कुरियर सेवा म्हणावी लागेल!

गांडुळे आपल्या शेतजमिनी भुसभुशीत ठेवण्याचे कार्य करीत असतात. कोणत्याही प्रकारची जीवाश्म इंधने न वापरता हे निसर्गाचे नांगर शेतांमधून विनातक्रार फिरत असतात, म्हणून आपल्या पिकांच्या मुळांना आवश्यक त्या प्रमाणात हवेचा पुरवठा होत असतो व त्यांची निरोगी वाढ होऊ शकते. पर्जन्यराजाची हजेरी लागली की,गांडुळे नव्या जोमाने आपले नेमून दिलेले काम करू लागतात.


निसर्गात असणारे काही कीटक हे पिकांवर ताव मारणाऱ्या परोपजीवी कीटकांना आपले भक्ष्य बनवितात व त्यामुळे पिकांची हानी टळते. या कीटकांना आपण मित्र-कीटक म्हणू शकतो. जर आपल्या परीसंस्थेमध्ये अशा मित्र कीटकांना आपण प्रोत्साहित करू शकलो, तर आपल्याला कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादनवाढ मिळू शकते. म्हणजे "परस्परां करू सहकार्य, अवघे धरू सुपंथ" या उक्तीप्रमाणे आपला तर फायदा होईल, शिवाय पर्यावरणपूरक शेती केल्यामुळे निसर्गातही कमी ढवळाढवळ केल्याचे पुण्यदेखील पदरात पडेल. पावसाळा आला की या मित्र-कीटकांनाही उत्साह येतो. बागकाम करणारा माळी देखील जर त्याच्या बागेत मोठया मोठया डोळ्यांचे कीटक असतील तर खूश असतो, कारण त्यामुळे वनस्पतींची पानेच्या पाने फस्त करणाऱ्या अळ्यांची त्याला अजिबात फिकीर वाटत नाही. निसर्गातील आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे- जीवनावश्यक मूलतत्त्वांचे योग्य पद्धतीने पुनर्चक्रांकन. त्यातही वाळवीसारख्या कीटकांचा फार मोठा सहभाग असतो. जे काम करायला जीवाणूंना महिनोन् महिने लागतात, ते काम वाळवी चुटकीसरशी करून टाकते. एकदा वाळवी लागली की हाती काही उरत नाही! वाळवी लागू नये म्हणून आपण जालीम कीटकनाशकांचा वापर करीत असतो. पण वाळवीच निसर्गातील `लिग्निन’सारख्या कठीण पदार्थांचे विघटन घडवून आणून त्याचे जलद पुनर्चक्रांकन करीत असते. म्हणजेच पर्यायाने आपल्या अस्तित्वासाठी वाळवीचे असणेही गरजेचे असते. पहिला पाऊस पडला की जमीन भुसभुशीत होते व वाळवीच्या वाढीसाठी आवश्यक ते वातावरण निर्माण होते.

पर्यावरण साखळीमध्ये हे छोटे कीटक व तृणांकुर यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तृणांकुर हे अन्न्साखळीतील प्राथमिक उत्पादक आहेत. तर कीटक प्राथमिक भक्ष्य असतात. हे निसर्गचक्र फिरते ठेवण्यासाठी या साखळीतील प्रत्येक आरा महत्वाचा आहे. तृणांकुरांच्या व कीटकांच्या जीवनाशी पर्जन्यधारा जोडल्या गेल्या आहेत.

म्हणूनच पहिल्या पर्जन्यधारा बरसल्यानंतर जमिनीतून वर डोकावणाऱ्या तृणांकुराला पाहून बालकवी लिहितात-

पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार ...

त्यांच्या या काव्यात केवढे विज्ञान भरलेले आहे! खरं ना?

-डॉ. शरद काळे
sharadkale@gmail.com


जुलै २०२० ‘वयम्’


My Cart
Empty Cart

Loading...