घरी आल्याबरोबर आशनाने दप्तर भिरकावून दिलं, बूट तसेच बाहेर टाकले, युनिफॉर्म तसाच उलटा गादीवर टाकला. ती सतत कशा ना कशावर चिडत होती, ओरडत होती. ही सगळी लक्षणं होती सपाटून भूक लागल्याची आणि अर्थात कशाचा तरी राग आल्याची. पण तिच्या पोटात काहीतरी गेल्याशिवाय ही काही नीट बोलणार नाही हे आईला माहीत होतं. ‘‘हे बघ आशू, पटकन खाऊन घे आणि मग मला सांग तुझं आणि आर्णाचं आज कशावरून वाजलं?’’
भरल्या तोंडाने तिनं विचारलं, ‘‘पण तुला कसं कळल मी आणि आर्णा भांडलो ते.’’
‘‘तोंडात घास असताना बोलायचं नाही सांगितलं आहे ना मी. आधी खाऊ संपव, मग आपण बोलूया, आणि हो ते सगळं पुराण सांगायच्या आधी बूट, दप्तर, ड्रेस जागेवर ठेवशीलच ना. ’’ आईने तिच्या हुकमी आवाजात सांगितलं.
आईला जरा मस्का लावायचा प्रयत्न करत ताटातले बीन्स, गाजर बाजूला काढत ती म्हणाली, ‘‘आई, तू या नुडल्समध्ये हा सगळा कचरा का घालतेस?’’
‘‘आशना त्या भाज्या आहेत, कचरा नाही आणि त्या खाल्ल्या तर सारखं सारखं डॉक्टरकाकांकडे जावं लागणार नाही. ’’ आशनाचा पसारा सोडून बाकीचं आवरत असताना आई आशनाकडे न बघताच म्हणाली. जरा पोट भरल्यानंतर आशनाचा मूड जागेवर येत होता. मग तिने बूट जागेवर ठेवून दिले. ड्रेसची घडी घालून ठेवली. गुड गर्लसारखी आईच्या शेजारी जाऊन बसत म्हणाली, ‘आज आर्णाने काय केलं माहितीये तुला? ऐकून घे आधी नीट मम्मा, कारण गायत्री मावशीचा आणि तुझा नक्की फोन होईल, मग तुला माझी बाजू माहित असायला हवी.’’ ‘‘तू सांग, मी ऐकते आहे, पण मी आणि गायत्री काही तुझ्या आणि आर्णासारख्या भांडत बसत नाही बरं का.’’
‘अगं तुला तर माहिती आहे, आज आम्हांला एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटी ठरवायची होती. आपलं ठरलं पण होतं आम्ही दोघी डान्सला जाणार म्हणून. म्हणून मी आमच्या दोघींची नावं त्यासाठी दिली, तर हिने जाऊन सांगितलं की, डान्स नकोय, मला म्युझिक हवंय. मी कित्ती समजावलं तिला, पण नाही ऐकलं तिने माझं. आणि मलाच म्हणाली, तुला डान्स आवडतो म्हणून मी का यायचं डान्स क्लासला? आता तिला आवडतं म्हणून मी तिच्यासोबत कराटेला नाही का जात? मग काय हरकत होती तिने डान्सची अॅक्टिव्हिटी घ्यायला? ती सान्वी आहे ना, ती आता आर्णाची बेस्ट फ्रेंड झालीये, सान्वी म्युझिकला जाणार म्हणून ही पण म्युझिकला जातेय. मी तिच्याशी बोलणारच नाही आता. I don’t want to be her friend.’’ आशनाचं डोकं मांडीवर कुरवाळत मग आई म्हणाली, ‘‘अच्छा तर, असं झालंय. जाऊ देत, नकोच बोलूस तू तिच्याशी. आपली एक गोष्ट न ऐकणाऱ्या मुलीशी थोडीच मैत्री करायची असते? नकोच बोलूस तू तिच्याशी दोन दिवस, बघू काय होतं. आणि हो, कराटे क्लासला पण नको जाऊस उद्यापासून बरं का.. उगाच आर्णा म्हणते म्हणून कशाला जायचं? तुला आवडत नसेल तर ते करण्यात काय अर्थ ना? पण मग उद्यापासून गायत्री मावशीने पण आर्णाला ड्रॉइंगच्या क्लासला पाठवलं नाही तर? कारण तुला सोबत म्हणून आर्णा तिथे येते ना. आता तू तर आर्णाशी बोलणार नाहीस, मग संध्याकाळी खाली जाऊन कोणाबरोबर खेळणार?’’ ‘‘आत्ता जाऊन आधी होमवर्क करते, मग बघेन खाली जाऊन कोणाशी खेळायचं.’’
आईच्या प्रश्नांना उत्तरच नव्हती म्हणून पटकन होमवर्कची ढाल पुढे करून आशना अभ्यासाला पळाली. तेवढ्या वेळात आशना आणि आर्णाच्या आईचे whats app मेसेजेस झाले. दोन्हीकडे साधारणपणे तशीच परिस्थिती होती. दोघींनाही अशी युद्धसदृश परिस्थिती सांभाळायचा आता सराव झाला होता. थोड्याथोडक्या नाही गेल्या १२ वर्षांपासूनच्या मैत्रिणी होत्या त्या दोघी आणि त्यांच्या मुली. असा एक आठवडा जायचा नाही की, त्या दोघी भांडायच्या नाहीत. एकमेकींसोबत खेळणार नाही असं म्हणायच्या आणि दोन तासांत सारं विसरून जाऊन खेळात गुंगून जायच्या. कधी कधी तर रात्री झोपायलासुद्धा एकमेकींच्याच घरी असायच्या. दोन बिल्डींग सोडून तर घरं होती, एकाच शाळेत, एकाच बसमध्ये. सगळं काही बरोबर. मग भांडण तरी त्या दुसऱ्या कोणाबरोबर करणार. दोन्ही आयांनी मिळून काहीतरी काहीतरी फोनवर ठरवलं.
होमवर्क झाला. साडेसहा वाजले होते. खालून खेळण्याचे आवाज येत होते, पण कसं जायचं खाली, आपण मघाशीच आईला सांगितलं ना मला नाही खेळायचं आर्णासोबत. सॉलिड प्रश्न पडले होते आशनाला. पण मग आता करायचं तरी काय.
‘‘मम्मा काही काम असलं तर सांग ना.’’ ‘‘बरं झालं अगदी वेळेत विचारलंस तू. जरा ही पालक पनीरची भाजी गायत्रीकडे नेऊन देतेस, आर्णाला खूप आवडते ही भाजी.’’ ‘‘दुसरं काही काम नाही का गं. मला नाही जायचं आर्णाकडे.’’ ‘‘अगं पण तूच म्हणालीस ना काही काम आहे का? आणि आत्ता फक्त हे एकच काम आहे तू करण्यासारखं. नाहीतर तू पोळ्या कर, मी जाऊन देऊन येते. आणि हो, मावशीने सांगितलंय की तिने पास्ता केलाय, आता तूच ठरव जाते आहेस की थांबते आहेस.’’
गायत्री मावशीच्या हातचा पास्ता खायला तर आशना जेवण झाल्यावरसुद्धा गेली असती. शिवाय, तिचं भांडण आर्णाशी होतं, गायत्री मावशी तर मस्तच आहे. असा विचार करत आशनाने झटकन आईच्या हातचा डबा घेतला आणि पळत सुटली. तिची गाडी थेट मावशीच्या घरी जाऊनच थांबली.
दार उघडायला आर्णाच होती. तिने आपलं सगळं विसरून आशनाला मिठी मारायचा प्रयत्न केला, पण आशना पास्ता खायला डायरेक्ट डायनिंग टेबलवर जाऊन बसली होती. मग मावशीनी दोघींसाठीही पास्ता आणला. ‘‘मग आशना, कसा झाला आजचा डान्सचा क्लास?’’ मावशीने विचारलं. टेबलवर बसल्या बसल्या अंग हलवत आशना दाखवायला लागली होती, ते बघून आर्णा एकदम हसली, ‘‘अगं यडू आधी खा तर, मग बघू आपण तुझा डान्स.’’
‘‘तू गप गं बंबी.’’ अशी दोघींची जुगलबंदी सुरू झाली की समजायचं पारा खाली आलाय. मग काय पास्ता संपता संपता दोघींचे हात परत हातात आले होते. आशना आर्णाला डान्सच्या स्टेप्स शिकवत होती आणि आर्णा तिला शिकवलेलं गाणं. ‘बघ, यासाठी मी म्युझिक क्लासला जात होते, म्हणजे आपण दोघी दोन्ही शिकू शकतो.’’
‘‘हे माझ्या लक्षातच आलं नाही गं.’’ आणि मग कट्टीची बट्टी करत त्या दोघी हातात हात घालून खाली खेळायला गेल्या. गायत्रीनं लगेचच आशनाच्या आईला मेसेज केला- `मिटलं बाई आजचं भांडण, आता पुढचे दोन-तीन दिवस तरी आघाडीवर शांतता असेल.’