शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात 'काळ' या शब्दाची नातीगोती जाणून घेऊया.
दर महिन्याला नवनव्या शब्दांचा गोफ विणता विणता आपण नववर्षांत पदार्पण केलंसुद्धा. आणि या वर्षी आणखी नवे शब्द आणि त्यांच्या वेगवेगûया कथा घेऊन आपली शब्दयात्रा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. वर्ष म्हणजे १२ महिन्यांचा काळ, ३६५ दिवस, ८,७६० तास आणि ५,२५,००० मिनिटं. ३,१५००,००० सेकंद. एवढा मोठा काळ. दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं आणि त्या वर्षांत मात्र एकंदर ३६६ दिवस असतात. मित्रमैत्रिणींनो, आपलं हे सन २०१६ चं वर्षं लीप वर्षं आहे. कारण लीप वर्षांत फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात, हे तर तुम्हांला ठाऊकच आहे. पाहा बरं, नवं कॅलेंडर उघडून. काय? आहेत ना, फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस?
आपल्याला माहितीच आहे की, वर्षाचे महिने असतात बारा. हे बारा महिन्यांचं जे कॅलेंडर आहे, त्याला ग्रेगोरिअन कॅलेंडर म्हणतात. यालाच आपण पाश्चात्य कॅलेंडर म्हणतो. खरंतर एकंदर १२ महिन्यांचं हे कॅलेंडर रोमन सम्राट ज्युलिअस सीझर याने तयार केलं. म्हणूनच त्यातील महिन्यांची नावंही रोमन किंवा लॅटिन शब्दांवरून सिद्ध झालेली आहेत. परंतु या कॅलेंडरमध्येच थोडासा कालमानाचा फरक करून आठवा पोप ग्रेगरी याने आज वापरात असलेलं हे पाश्चात्य कॅलेंडर तयार केलं. म्हणूनच या कॅलेंडरला नाव आहे, ग्रेगोरिअन कॅलेंडर. १५८२पासून तेच वापरलं जातंय. ग्रेगोरिअन कॅलेंडरमध्ये मूळ ज्युलिअन कॅलेंडरमधील १२ महिने आणि त्यांची नावं तीच ठेवली आहेत. आणि मुलांनो, गंमत अशी की, या महिन्यांच्या नावांच्याही जन्मकथा आहेत. रोमन देव जानुस याच्यावरून पहिल्या महिन्याला जानेवारी हे नाव दिलं गेलं. दरवाजे, सीमारेषा यांचं संरक्षण करणारा हा रोमन देव. त्याला दोन मुखं आहेत. त्याचं एक मुख भूतकाळात पाहणारं असून दुसरं मुख भविष्यकाळाकडे निर्देश करणारं आहे. तेव्हा दोन्ही काळांचा हात धरून जानेवारी महिन्यात नववर्ष धूमधडाक्यात सुरू होतं. 'फेब्रुवा’ नावाचा शुद्धीकरणाचा उत्सव, ज्या महिन्यात येतो, तो फेब्रुवारी महिना होय. मार्च महिन्याला, मार्स नावाच्या युद्धाचा स्वामी असलेल्या लढवय्या देवावरून त्याचं नाव मिळालं. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात युरोपात कडाक्याची थंडी असे. मग थंडी ओसरू लागे आणि लष्करभरती सुरू होई. ही लष्करांची उभारणी या मार्च महिन्यात होत असे. म्हणून मार्चिंग करत लष्करी शिक्षणाची देवघेव करणारा महिना म्हणजे मार्च महिना.
एप्रिल हे नाव 'अपेरिओ’ म्हणजे उमलणे या शब्दावरून तयार झालं आहे. वसंत ऋतूची सुरुवात या काळात होते. हळूहळू फुलंपानं उमलू लागतात. मे हे नाव माइआ या सुपीकतेशी संबंध असलेल्या देवतेवरून दिलं गेलं आहे. ती रोपांची काळजी घेते. वसंत ऋतू फुलवते. हा काळ लग्नसराईचा असतो. नववधू सासरी जातात आणि जून महिन्यात जुनो ही देवता; जी स्त्रियांची-मुलींची काळजी घेणारी देवता आहे, ती त्यांची काळजी घेते. जुलै हे नाव रोमन सम्राट ज्युलिअस सीझर याच्यावरून पडलं आहे. तर ऑगस्ट हे नाव दुसरा प्रसिद्ध रोमन सम्राट ऑगस्टस सीझर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलं गेलं आहे.
सप्टेंबर हे नाव सेप्टेम या लॅटिन शब्दावरून तयार झालं आहे. सेप्टेम म्हणजे सप्त-सात. पण सप्टेंबर हा तर कॅलेंडरमधील नववा महिना आहे. तर त्याची कथा अशी की, ज्युलिअस सीझरपूर्वी वर्षात दहाच महिने होते. जानेवारी-फेब्रुवारी या कालखंडात युरोपात सर्वत्र बर्फच बर्फ असल्याने हा निष्क्रिय काळ किंवा मृत काळ म्हणून ओळखला जाई आणि वर्षं मार्चपासून सुरू होई. आश्चर्य असं की, आपल्या वर्षांची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि चैत्र महिना हा मार्च-एप्रिल महिन्यातच येतो. आता मार्च महिन्यापासून सप्टेंबर हा सातवा महिना. ऑक्टोबर हा आठवा, कारण ऑक्टो म्हणजे अष्ट-आठ. नोव्हेंबर हा नववा, कारण नोवेम म्हणजे नव-नऊ आणि डिसेंबर म्हणजे दहावा महिना, कारण डिसेम् म्हणजे दश-दहा. काय दोस्तांनो, आपली गेल्या लेखांपासून चर्चेत असलेली भारोपीय भाषांची माहिती आठवते, ना? पाहा, सेप्टेम-सप्त-सात-सेवन या शब्दांमध्ये किती साम्य आहे ते. तसंच साम्य कॅलेंडरआणि कालदर्शिका या शब्दांमध्येही आहे.
आपल्याकडे रविवार ते शनिवार ही सात वारांची नावं वेगवेगûया ग्रहांवरून दिलेली आहेत. अश्विनी, भरणी, इत्यादी २७ नक्षत्रं भारतीय कालगणनेत निर्देशलेली आहेत. भारतीय कालगणना ही चांद्र पद्धतीची आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे त्यांतील बारा महिने. या नावांचा जन्म अर्थातच नक्षत्रांच्या नावापासून झाला आहे. ज्या महिन्यात पूर्ण चंद्र चित्रा नक्षत्रात किंवा चित्रा नक्षत्राच्या जवळपास असतो, तो महिना चैत्र होय. विशाखा नक्षत्रात किंवा त्याच्या अगदी जवळ पौर्णिमेचा चंद्र असेल, तो महिना वैशाख होय. भारतीय कालगणनेतही २४ तासांचा एक दिवस असतो. एका दिवसाच्या ६० घटिका असतात. २४ मिनिटांची एक घटिका असते आणि तीन तासांचा एक प्रहर. घटिका आणि प्रहर या नावांच्याही जन्मकथा आहेत. फार पूर्वी विशिष्ट वेळेनंतर घंटेचे टोल दिले जात असत. तेव्हा घटिका शब्दाचा घंटेशी संबंध असावा. पूर्वी पहारेकरी पहारा देत असत. पहारा बदलण्याची वेळ तीन तासांनंतर असे आणि प्रहराचेही तीन तास. तर पहारा आणि प्रहर हे शब्द असे एकमेकांशी निगडित असावेत. काळाच्या अगदी छोट्या भागाला निमिषार्ध असं म्हटलं जातं. पापणी लवण्याचा जो कालखंड तो म्हणजे निमिष आणि त्याचाही अर्धा भाग म्हणजे निमिषार्ध. भारतीय कालगणनेनुसार महिन्यात दोन पक्ष असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. भारतीय कालगणना चांद्रपद्धतीनुसार केलेली आहे, हे मघाशी सांगितलंच आहे. तेव्हा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या ज्या काळात चंद्राच्या कला उत्तरोत्तर वाढतात, तो शुक्ल पक्ष. कारण शुक्ल म्हणजे शुभ्र. म्हणजे प्रकाश. जेव्हा रात्री उत्तरोत्तर चंद्रप्रकाशाने उजळून निघतात, तो पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष. कृष्ण म्हणजे काळा. चंद्र कलेकलेने कमी होत अमावस्येला लुप्त होतो. त्या उत्तरोत्तर काळोख्या होत जाणा:या रात्रींचा कालखंड म्हणजे कृष्ण पक्ष होय. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतूही आहेत. सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकतो आणि नंतर कर्कवृत्तापासून दक्षिणेकडे सरकतो. हा काळ सहा-सहा महिन्यांचा असतो. म्हणून भारतीय कालगणनेत उत्तरायण व दक्षिणायन अशा दोन सहा-सहा महिन्यांच्या विभागांत वर्ष विभागलं आहे. आश्चर्य म्हणजे अमेरिकेच्या अनेक भागांत ग्रेगोरिअन कॅलेंडरपेक्षा भारतात प्रचलित असलेली चांद्र कालगणनापद्धती अधिक स्वीकारार्ह मानतात. खासकरून तिथल्या पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी हीच चांद्र कालगणना पद्धती वापरतात.
काळ आणि वेळ असा शब्दप्रयोग आपण अनेकदा एकत्रपणे करतो. ही वेळही फार मोलाची असते. मित्रांनो, या वेळेचं नीट नियोजन केलं, तर तुम्हांला यशाचे अनेक मार्ग खुले होतात आणि अनेकदा वेळेचं महत्त्व समजून न घेतल्याने संधी हातच्या जातात. त्या हरीने हातातली संधी अशीच गमावली, त्याची ही कथा, पाहा हं. आवडेल तुम्हांलाही.
हरी आणि मगधाचा राजपुत्र शूरसेन गुरुकुलापासूनचे मित्र होते. हरीला वेळेचं महत्त्व कधीच समजलं नाही. तो दरिद्रीच राहिला. शूरसेन प्रगती करीत पुढे राजा झाला. राजा झाल्यावर मित्रप्रेमामुळे शूरसेनाने हरीला बोलावलं आणि त्याला समजावलं. 'हरी, अरे काहीतरी कामधंदा कर.’ पण हरी म्हणाला, 'कोणीच मला काम देत नाही.’ कारण सगळे म्हणतात, मी काम वेळेत पूर्ण करीत नाही. राजा म्हणाला, 'ठीक आहे. मग आजचा दिवस तुझा. तू घरून थैल्या आण आणि सूर्यास्तापर्यंत माझ्या खजिन्यातील जितकी नाणी तू भरून घेऊ शकशील, तितकी घे.’ हरी आनंदाने घरी आला. घरच्यांना त्याने सगळं सांगितलं. त्याची आई म्हणाली, 'लगेच जा, तर मग.’ पण हरी म्हणाला, 'नाही, आधी मला खायला दे.’ मग खाऊन तो थोडा वेळ झोपला. वामकुक्षीनंतर थैल्या घेऊन रमतगमत निघाला. उन्हाच्या तापाने पोळून निघाला. वाटेत शेतातल्या विहिरीवर पाणी प्यायला. मग झाडाच्या सावलीत थोडा टेकला. उन्हं थोडी सरल्यावर पुन्हा निघाला. तेवढ्यात वाटेत एक डोंबारी दिसला. त्याचा खेळ पाहण्यासाठी थोडा थांबला. नंतर त्याला राजाच्या सांगण्याची आठवण झाली. तो धावतच निघाला. पण कसलं काय! तोपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि धन मिळविण्याची हरीची एकमेव संधी कायमची हुकली होती.
तेव्हा मुलांनो, आता या नववर्षात तुम्हांला मिळालेल्या ३६५ दिवसांचा पूर्ण उपयोग करा.
‘वयम्’ मासिकाचा सदस्य होण्यासाठी कृपया वरच्या उजव्या कोपर्यातील सभासद व्हा बटनावर या क्लिक करून व ऑनलाइन पेमेंट करून तुम्ही सभासद होऊ शकता. धन्यवाद!