Menu

जिद्दी येसबा एका जिद्दी मुलांची गोष्ट - लहान मुलांसाठी

image By Wayam Magazine 11 November 2022

By Wayam Magazine,  On 19th February 2021, Children Magazine

छत्रपती शिवरायांनी गनिमांच्या विळख्यातून मराठी मुलूख सोडवून स्वराज्य स्थापन केलं. आणि त्याचं सुराज्य करण्यासाठी रयतेने त्यांना साथ दिली. त्यात केवळ वयानं मोठी माणसेच नव्हती, तर येसबासारखी जिद्दी मुलंही होती. मन अभिमानाने भरून यावं अशी ही इतिहासातील एका चिमुकल्याची जिद्दगाथा! मराठीत अगदी प्रथमच आणली आहे- प्रवीण दवणे यांनी... खास ''वयम्''च्या वाचक मित्र-मैत्रिणींसाठी.

सह्यगिरीचा एक-एक कातळ, कणखर मावळा होऊन स्वराज्याच्या बांधणीसाठी सज्ज होता. मुलखातलं एक-एक रत्न शिवरायांनी आपल्या रत्नपारखी नजरेनं वेचलं होतं. त्याच बुद्धिमान आणि मायाळू दृष्टीनं टिपला एक उत्साही, सळसळता, पराक्रमी मुलगा- येसबा. येसबा पाटील-कामथे. खेड-शिवापूरच्या भेटीत महाराजांनी त्याला मायेनं टिपलं-

“कोण तू?”
“मी- येसबा!”
“काय काम करतोस?”

“महाराज, रानावनातून गुरं राखतो; बकऱ्या-मेंढरांना पाणी पाजतो, शेतात माय-बाला मदत करतो... आणि..!”

“..आणि काय येसबा?”

“लाडक्या राजाच्या आज्ञेची वाट पाहतो..!”
“पण आपण अजून वयानं...!”

“राजे, मनगटातलं वय जाणतं झालंय.. आता वयानं आहे बारका, त्याला आम्ही काय करावं-?”

महाराजांनी तर स्मित केलंच; पण बरोबरचेही लाह्या फुटल्यागत हसले.

येसबानं बघताक्षणीच शिवरायांची मर्जी संपादन केली होती.

जमलेल्या साऱ्या गावकऱ्यांवरून, एक-एक ओळख टिपत शिवराय येसबावर येऊन थांबले-
“येसबा, साऱ्या मुलखासाठी आमराई आणि इतर वृक्षराजी इथं लावायचा मनसुबा योजलाय, पण..”

मशालीच्या हळदी उजेडात चमकत्या नजरांना आता शिवराय काय म्हणतात त्याची आतुरता होती.

“बोला राजे, कुठल्या धोंड्यानं काम अडवलंय?”

..तलवारीचं पातं चमकावं, तसा येसबा उद्गारला.

शिवरायांनी त्याला डोळ्यांनीच जवळ बोलावलं.

“येसबा, मनकवडे दिसता...”

येसबा थोडा बेचैन झाला.

“समजलं नाही राजे..”

“धरण बांधायचंय, पण आमराईला पाणी साठवण्याच्या कामात एक मोठी धोंडच आडवी येतेय. एकदा का ती खोल रुतलेली शिळा दूर झाली की, आमराई अधिक फुलेल नि सारा मुलुख मोहोरेल. रयतेला फुला-फळांची, धनधान्याची कमी पडणार नाही. येसबा, घ्याल आपण याची जिम्मेदारी?”

सह्यगिरीचा तो मर्दानी छावा झपकन पुढे झाला नि म्हणाला, “घेतली राजे! आपण फिरून या मुलखात याल तेव्हा धरणाच्या कामातली ती धोंड दूर झालेली असंल.” कौतुकाची शाल पांघरावी तसे राजे प्रसन्न होऊन हसले. “व्वा रे माझा मर्दानी छावा!”

शिवराय नि त्यांच्या बरोबरच्या मंडळींच्या घोड्यांच्या टापांचा मन थरारून टाकणारा ध्वनी दूरदूर गेला.
गावकरी आपापसात गप्पांची चुंबळ करून बोलू लागले.. येसबानं जिम्मेदारी घेतलेय खरी, पण निभावेल का?
“पण काही म्हणा- येसबा दिसतोय लहान, पण जिगर पहा!”

“राजे प्रसन्न दिसत होते येसबावर!”
एक पिकल्या केसांचा, दणकट मिशांचा गावकरी उसासला- “कामथेंचं रक्त आहे. येसबाचा थोरला भाऊ दगाफटक्यात गनिमानं मारला. गड राखता-राखता एक बुलंद चिरा ढासळला गड्या.”

येसबाच्या काळजात वीज-वादळाचा संचारच झाला जणू. हुरूप वाढवणारे सवंगडी येसबानं गोळा केलं. जी धोंड आड येत होती, त्यावरच चढून साऱ्या मित्रांना शिवरायांचा मनसुबा सांगितला नि म्हटलं-

“अरे, आता नुसतं ऐकायचं न्हाय; कामाला लागायचं. राजे स्वराज्य आणतायत, आपण आपल्या रयतेच्या राज्याला आंब्याचं तोरण बांधूया!”

झालं, रात्रीचा दिवस करीत ही चिमुकली, तरुण मनगटं मिळेल त्या हत्यारासह कामाला लागली. सकाळी शेतात राबावं, दुपारी गुरा-वासरांना पाणी पाजावं, चरायला सोडावं, मध्ये चटणी-भाकरीचा घास घेतला की ‘हर हर महादेव’ म्हणत, या सावळ्या शिवरामाच्या झुंझार वानरसेनेनं, भली मोठी कातळ धोंड फोडायला लागावं, असं दिवस-रात्र सुरू होतं.

शिंपलेल्या घामानं नि श्रद्धेच्या बोटानं शिवरायांची आज्ञा आता पूर्ण होत आली... पाणी वाहतं झालं..!

धरणीचं मन सुखावलं... नव्या स्वप्नांचं बीज-आता तरारून आलं!

येसबाला दिवसाही स्वप्न पडे- कवा येतील राजं?
..आणि एका दुपारी खेड-शिवपूरच्या घराघरांत बातमी आली... “राजं आलं! आपल्या गावात आपलं देव पुन्हा आलं!”

बहरलेली शेती-वाडी नि आता मोहोर धरू लागलेली आमराई पाहून शिवराय उद्गारले- “माझा तर माझ्याच दृष्टीवर विश्वास बसत नाही. पाण्याच्या वाटेतली, प्रवाह थोपवणारी ती भली मोठी शिळा गेली कुठं? कसा घडला हा चमत्कार?”

वयानं पिकलेला अंताजी म्हणाला, “राजे, आपण सारे जिथं उभं आहोत, तिथूनच ती धोंड दिसायची ना? आता तिथून ते पाणी वाहातंय, तिथंच होती. होत्याची नव्हती केली- आपल्या या जिगरबाज छाव्यानं... ये रे-ये येसबा!” थोरांच्या गर्दीत दबकलेला येसबा थबकला. त्याच्या चिमण्या डोळ्यांतून आसवं वाहात होती.

“येसबा? ये माझ्या वाघाच्या बच्च्या! ये!”
येसबा आता छत्रपतींच्या अगदी जवळ होता.

त्यानं आपल्या मित्रांना साद दिली-
“या रं मावळ्यांनो, आपल्या लाडक्या राजाचं आवतन हाय!”

“येसबा, सारी धोंड भुईसपाट करून पाणी खेळवणाऱ्या या गुणवान हातांना काय इनाम देऊ? अरे, जे जिद्दी हात, वाटेवरचा दगड दूर करून पाणी खेळवतात, ते हात आडवाटेवरचा गनीम संपवून स्वराज्याचं सुराज्यही करतील. हा तर आरंभ आहे येसबा! बोल काय इनाम हवं? मागशील तेवढ्या मोहरा...”

गाव थबकलं. येसबाच्या बापाच्या उरात अभिमानाचं आणि थोड्याफार काळजीचंही तुफान घोंगावलं. त्याला वाटून गेलं, आपला येसबा काय बरं मागंल राजांकडं? पण येसबाची वाढलेली उमज पाहून सारं गाव हबचक् झालं.

मुजरा करून येसबानं शिवरायांना म्हटलं, “राजे, सोन्याच्या मोहरा आज हायेत, पण उद्या सरतील. पण आपली रयतेवरची किरपा (कृपा) अशीच राहू द्या. डोईवर स्वराज्याची आभाळागत माया नि या जमिनीवरचं प्रेम ते तेवढं कायम राहूद्या!”

रयतेच्या लाडक्या राजानं प्रसन्न स्मित केलं, नजरेनंच त्यांनी येसबाला आणखी जवळ बोलावलं. त्याला “शाब्बास माझ्या येसबा!” म्हणत ते उद्गारले, “तुझ्या जिद्दीची आम्ही कदर करू! स्वराज्य-सुराज्य होणार आहे ते तुझ्यासारख्याच गुणी, मेहनती मुलांमुळे!”

निरोप घेऊन राजे रायगडावर पोहोचले. जुन्या जाणत्या माहितगारांकडून येसबा पाटील-कामथे याची माहिती काढली, तेव्हा त्यांना कळलं की, कोंढाण्याच्या मोहिमेत येसबाचाच थोरला बंधू दगा-फटक्यानं कामी आला होता. आणि त्याचाच हा धाकटा भाऊ तेवढ्याच तडफेचा, धिटुकला येसबा!

लवकरच शिवापूरला सांगावा आला, “येसबाच्या नावे काळ्या कसदार जमिनीचा खूप मोठा तुकडा इनाम म्हणून दिला!”

असे इमानी मावळे नि त्यांच्या जिद्दीची कदर करणारे छत्रपती शिवराय!

आजही इतिहासातील या पराक्रमाची गाणी तिथली पाखरं गुणगुणतात.. आजच्या येसबांसाठी जिद्दीचा नि निष्ठेचा मंत्र देतात!

(आभार - इतिहास अभ्यासक: गणेश धालपे)
-प्रवीण दवणे
dilkhulas@rediffmail.com
(नामवंत साहित्यिक)
My Cart
Empty Cart

Loading...