उन्हाळ्याचे दिवस आपणाला निश्चितपणे घामेघूम करायला लावतात. केवळ एवढ्यावरच न थांबता पाणी...पाणी करायलासुद्धा लावतात. दुष्काळी भागाच्या समस्या अत्यंत उग्ररूप धारण करतात. जवळपास पाणी मिळाले नाही, तर त्यासाठी माणसाला दाही दिशा भटकंती केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच अती पुरातन काळापासून मानवी संस्कृती पाण्याच्या काठाकाठाने फुलल्या आणि बहरल्या. भूपृष्ठावरील पाणी मिळण्याचे सर्व उपाय खुंटले की, माणूस भूपृष्ठाखालील पाणी शोधून काढण्याच्या नानाविध क्लृप्त्या लढवतो. त्यातील काही शास्त्रीय अंदाजावर आधारित असतात; तर काही निव्वळ मंत्रतंत्रावर, म्हणजे पाणाड्यावर.
भूपृष्ठाखालील पाण्याचा साठा शोधून काढण्यासाठी ध्वनिलहरींचा उपयोग करता येतो. ध्वनीचा हवेतील वेग सेकंदाला ३३० मीटर आहे. घन किंवा द्रव माध्यमात हा वेग कित्येक पट जास्त असतो. ध्वनीचा पाण्यामधील वेग सेकंदाला १४८२ मीटर, तर खडकांमध्ये ६००० मीटर आहे. ध्वनीचा धातूमधील वेग तर सर्वांत जास्त असतो. अॅल्युमिनियममधून ६४२० मीटर प्रती सेकंद या वेगाने ध्वनी प्रवास करतो. ध्वनीचा विविध माध्यमांतील वेगवेगळा आहे.
त्यामुळे माहीत नसलेल्या माध्यमातून जर आपण ध्वनी पाठवला आणि त्या ध्वनीचा वेग मोजला तर त्या ठिकाणी कोणते माध्यम असेल याची खूणगाठ बांधता येते. याच तत्त्वाचा उपयोग आपल्याला भूपृष्ठाखालील थरांचा अभ्यास करण्यासाठी करता येतो. प्रकाशकिरणांच्या बाबतीत असलेले परावर्तन, अपवर्तन हे नियम, ध्वनिलहरींना सुद्धा लागू पडतात. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना प्रकाशाप्रमाणेच ध्वनिलहरी परावर्तित व अपवर्तित होतात.
भूपृष्ठाखालील पाण्याचा स्रोत शोधण्यासाठी सुरुवातीला ध्वनिलहरी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्फोटकांच्या साहाय्याने भूपृष्ठावर ध्वनिलहरी निर्माण केल्या जातात. त्यातील काही लहरी भूपृष्ठावरून प्रवास करतात, तर काही भूपृष्ठामध्ये शिरतात. ध्वनिलहरींची नोंद करण्यासाठी एक अतिशय संवेदन शील यंत्र वापरावे लागते. अशी अनेक यंत्रे स्फोटबिंदूपासून निरनिराळ्या अंतरावर ठेवण्यात येतात. स्फोटामुळे निर्माण झालेल्या ध्वनिलहरी प्रथमत: मातीच्या थरातून प्रवास करतात आणि भूपृष्ठाखाली पाण्याचा किंवा तेलाचा साठा लागला की, तेथून परावर्तित होतात. मातीच्या थरात आणि त्याखालील माध्यमात ध्वनीची गती जास्त असल्यामुळे भूपृष्ठावरील विशिष्ट यंत्रापाशी या लहरी प्रथम येऊन पोहोचतात.
स्फोटबिंदूपासून त्या विशिष्ट यंत्रापर्यंत येण्यासाठी भूपृष्ठावरील लहरींना अधिकचा वेळ लागतो. अशा प्रकारे नोंद घेणाऱ्या विशिष्ट यंत्रापर्यंत पोहोचण्यासाठी भूपृष्ठावरून येणाऱ्या लहरी व भूपृष्ठाखालून येणाऱ्या लहरी यांच्यामध्ये कालावधी निर्माण होतो. हा कालावधी अगदी अचूक मोजता येतो. त्यावरून पाणी, तेल किंवा विशिष्ट माध्यमं भूपृष्ठाच्या किती खाली आहेत, याचा अंदाज बांधता येतो. त्यासाठी अर्थातच गणिती सूत्राचा उपयोग करावा लागतो .
अनेकजण भूगर्भातील पाण्याचा अंदाज वर्तवण्यासाठी पाणाड्यांचा वापर करतात. काही पाणाडी नारळावर बसतात. पाणी असेल तर नारळ फिरतो, असे अफलातून अनुमान पाणाडी काढतात. या अंदाजाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. काहीजण तार हातात घेऊन फिरतात. हातातील तार जर फिरली तर पाणी आहे, असं समजलं जातं. भूगर्भातील पाण्याने हातातील तार अथवा नारळ फिरण्याची सुतराम शक्यता नाही. ज्याच्या हातात तार आहे त्याच्याच हातचलाखीने तार फिरू शकेल. जो नारळावर बसलेला आहे, त्याच्याच पायाच्या चलाखीने नारळ फिरू शकेल. एवढे तारतम्य ज्याला कळेल, त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे निर्विवाद.
-नितीन शिंदे