चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाचे जंगल भुरळ पाडणारं आहे. एकदा
बघितलं की वारंवार आपल्याला साद घालत राहतं. जंगलात गेलं की भल्या पहाटे उठून
जंगलाचा ताजागंध भरभरून घेताना, पाणवठ्यावरचे पक्षी बघताना, शिंगं ऐटीत इकडे तिकडे
करत फिरणारी हरणं बघताना, अचानक पूर्ण पिसारा फुलवून आपल्याच भोवती गिरकी घेणारा
मोर पाहताना तृप्ती म्हणजे काय याचा अनुभव येतो!
...ताडोबा हा भारतातील एक मुख्य
व्याघ्रप्रकल्प. त्यामुळे तिथे फिरताना कानोसा घेतला जातो तो जंगलाचा राजा दिसणार
का याचा! झाडामागे सतर्क उभी नीलगाय, हरीण, झाडावरून संदेश देणारी माकडं असा
चित्रपट सुरू असतो त्या वनात. आपली जिप्सी मध्येच थांबते, मागोवा घेते आणि पुन्हा
सुरू होते. त्यावेळी तिचा होणारा आवाज पाखरांना झाडावरून उडायला, हरणांना दचकवायला
आणि सगळ्या जंगलाचीच समाधी भंग करायला पुरेसाच नाही, तर नकोसा असतो... प्रचंड
अपराधी वाटायला लागतं आपल्याला. असं का आपण कोणाच्या घरात न विचारता फिरतोय आणि
त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करतोय, असं वाटू लागतं. त्या आवाजाला घाबरून
एखादं गोंडस पाडस आईला बिलगून उभं राहतं. त्यांच्यापासून थोडे लांब बहुधा त्याचे
बाबा उभे असतात. ते त्याच्या रक्षणासाठी पुढे सरसावतात. तेव्हा तर परतीच्या वाटेला
लागावं असंच वाटायला लागतं! नियमभंग करणाऱ्या या सगळ्यांना जंगलाच्या राजाने अद्दल
घडवावी, असं ‘छोटाभीम’ टाईप वाटायला लागतं!!
आणि.... काही समजण्याच्या आत विचारांच्या
भेंडोळ्यांना छेद देत थंडगार वारा अंगावरून वाहतो आणि सगळं जंगल चिडीचूप होतं.
गाईड खुणेनेच सांगतो, अगदी चूप राहा, हलू नका. विस्फारल्या डोळ्यांनी आपण समोर बघत
राहतो... आणि बांबूच्या वनातून ऐटीत, दमदार पावलं टाकत, रुबाबात जंगलच्या राजाचा
प्रवेश होतो. कोवळ्या उन्हात काळे पिवळे पट्टे चकाकत असतात! अगदी हाताच्या अंतरावर
असणारा हा देखणा, चकचकीत कांतीचा, जबरदस्त शक्तिशाली आणि उंचापुरा वाघ आपल्यासमोर
उभा राहून रोखून रुबाबाने बघतो, तेव्हा नेमकं काय वाटतं हे प्रत्येकाने एकदा तरी
अनुभवायलाच हवं! मग तो आपल्या जिप्सीसमोर ऐटीत उभा राहतो. कपाळावर आधी
प्रश्नचिन्हाच्या रेषा आणि मग नुसतं रोखून बघणं!
संथपणे पावलं टाकत हा जंगलचा राजा, 'ठीक आहे,
जा, निसर्गाशी एकरूप व्हा, शांत-प्रसन्न व्हा' असं जणू सांगत, पलीकडच्या दाट
जंगलाच्या दिशेने निघतो. आपण अनिमिष नजरेने तो पूर्ण दूरवर दिसेनासा
होईस्तोवर बघत राहतो! कोणीच कोणाशी बोलत नसतं, कोणी बोलूही नये, असं भारलेलं
वातावरण असतं तेव्हा!
थरारक संध्याकाळ
सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी कांतीची,
धीम्या गतीने पावले टाकणारी वाघीण झाडामागून आली. रस्ता ओलांडून पुन्हा घनगर्द
जंगलात दिसेनाशी झाली. मोठाल्या दुर्बिणी सरसावून परदेशी पाहुणे त्या दिशेने
आतुरतेने पाहत होते. तितक्यात बांबूच्या वनातून ऐटीत पावले टाकत 'बाबा' वाघ बाहेर
आला. दुसरीकडून रस्ता ओलांडून वाघीण आली आणि इकडे तिकडे बघत कधी धावत तर कधी
मध्येच जमिनीवर लोळण घेत चार बछडी कोवळ्या उन्हात खेळायला लागली. चौघेही मजेत खेळत
होते. उभे राहण्याचा प्रयत्न करत एकमेकांच्या गळ्यात हात टाक, मागे धाव, शिवाशिवी
खेळ, मध्येच आईजवळ जाऊन लाड करून घे, मग दुसऱ्या पिल्लाने पहिल्या भावंडाला ढुशी
मारून आईपासून बाजूला करत स्वतःचे लाड करून घ्यायला सुरुवात केली. असे त्यांचे खेळ
अनिमिष नजरेने सगळे बघत होते. बाबा-वाघोबा जरा लांबून हा खेळ बघत, उन्हाचा आनंद
लुटत होता.
तिथे जिप्सींची रांग लागली होती. जीप्सींमधले
पर्यटक हे अभूतपूर्व दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत होते. शेवटी ऊन वाढू लागलं आणि मग
‘खेळू द्या पिल्लांना मनसोक्त, त्यांच्या ब्रेकफास्टची वेळ होण्यापूर्वी आपण इथून
पळ काढलेला बरा..’ अशी मिश्किल टिपणी कोणीतरी केली आणि आम्ही मार्गस्थ झालो!
परतीच्या वाटेवर एक पाणवठा लागला. गाईडने हळू
आवाजात ड्रायव्हरला काहीतरी सांगितलं. पाणवठ्यावर दोन तगडे वाघोबा निवांत पाणी पीत
होते. झाडामागून एक तिसरा सवंगडी आला त्यांचा. आता तिघेहीजण अगदी खेटून बसून पाणी
पीत होते... यारी दोस्ती जिगरी असावी किंवा ती आते, मामे, चुलत भावंडं असावीत. ते
तिघेही हळूच पाण्यात उतरले आणि मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेऊ लागले. आज जंगलातील
सगळ्या वाघांनी जणू आम्हांला भेटायचं ठरवलं होतं.
तो अवर्णनीय आनंद खूप वेळ उपभोगल्यानंतर
आम्हांला भूक लागली आणि त्या दृश्यावरची नजर हटवून निघू लागलो. काही तासांपूर्वी
वाघाला बघायला अधीर झालेलो आम्ही आता चक्क भेटलेल्या वाघांना गुडबाय करत परतीच्या
वाटेने निघालो.
आमची जिप्सी एका माळरानाच्या बाजूने जाऊ लागली.
अचानक गाईडने आमची गाडी मोकळ्या मैदानात घुसवायला सांगितली. त्याने डोळे विस्फारून
तोंडावर बोट ठेवून आम्हांला ‘शांत राहा’ असं खुणावलं आणि झाडाकडे बोट दाखवलं!
कुठे, काय, असं करत सगळ्यांनी बघितलं आणि धक्काच बसला. चक्क झाडाला पाय रोवून वाघ
उभा होता. मध्येच झाडाला अंग घासत होता. मध्येच झाडावर समोरचे दोन पाय रोवून
त्याने आम्हांला पोझ दिली! आम्ही अवाक् झालो. पाच मिनिटांनी वाघोबा हळूहळू
जंगलाच्या दिशेने निघायला लागले. आणि आम्ही श्वास रोखून धरला, कारण आमच्या
जिप्सीच्या बाजूला सायकल आणि काठी हातात घेतलेला गार्ड उभा होता. वाघ जर या दिशेने
वळला तर? आम्ही तर गाडी सुसाट नेऊ, पण हा काय करेल? त्याला हळू खुणेने सांगायचा
प्रयत्न करत होतो की, ये, गाडीत बस! पण तो बिनधास्त होता. म्हणाला, वाघ विनाकारण
काही करत नाही. उलट त्यालाच आपली भीती वाटते! मनात आलं, खरंय, आपल्या घरात अचानक
कोणी घुसलं तर आपल्यालाच भीती वाटेल ना? घुसणाऱ्याला कशी वाटेल?
दुपारच्या जंगल-भ्रमंतीत हरणांचे अनेक
कळप पाहिले, विविध पक्षी तर डोळ्यांचे पारणे फेडत होते. उन्हं उतरणीला लागणार
होती.
जिप्सी निघाली होती आता थेट रिसॉर्टकडे. आता
कुठेही थांबता येणार नव्हतं, कारण परतीची वेळ अगदी जवळ येत होती. दोन्हीकडे झाडी
होती आणि मध्ये डांबरी रस्ता. जंगलातलाच, पण जरा मोठा! आणि गाडी पुन्हा हळू झाली.
काय झालं असेल असा विचार करत असताना, झाडांमागून चालत जाणारा पूर्ण वाढ झालेला
बिबट्या दिसला! काय चाललं आहे काय! आमचा गाईड तर आता तोंडात बोटंच घालायचा शिल्लक
होता! दोन दिवसांत आम्ही दहा वाघ बघितले होते आणि आता हा, गाईडच्या भाषेत,
'लंबालचक' बिबट्या आमच्या बाजूच्या झाडीत दिसत होता! त्याच्या
सांगण्यानुसार बिबट्या फार कमी वेळा दिसतो. हा पटकन बिचकतो आणि जास्त वेळ न थांबता
त्याला काही शंका आली तर सरळ हल्ला करतो! वाघासारखा विचार वगैरे करत नाही! म्हणून
तर जंगलचा राजा एकच : वाघच!
गाडी आता निघालीच, जंगलाचं भान ठेवत जायचं
असल्याने वेगावर नियंत्रण अत्यावश्यकच होतं! एक अस्वल रस्ता
ओलांडण्याच्या तयारीत उभं होतं तेव्हातर ट्रिप सार्थकी लागली वाटलं, कारण हेच फक्त
बघायचं राहिल होतं!!
अस्वलाला वाट करून द्यायला गाडी अगदी हळू झाली
आणि मग थांबली. थांबली ती सुरूच होईना!! बिबट्या मागे अगदीच हाकेच्या अंतरावर उभा
आणि गाडी सुरूच होईना! समोर नुकतंच रस्ता ओलांडून गेलेलं अस्वल, आणि संध्याकाळ
व्हायला सुरू झालेली. सगळेच आता घाबरले. दहा-पंधरा मिनिटे झाली खटपट करून पण
जिप्सी सुरू झाली नाही. आता सगळ्यांचाच धीर सुटत चालला होता. गाईड गेटवर संपर्क
साधण्याचा प्रयत्न करू लागला आणि तेव्हढ्यात मागून एक जिप्सी आली. त्यात परदेशी
पाहुणे मंडळी होती. आमच्या जिप्सीतील जेष्ठ नागरिक आणि लहान पिल्लाला त्यांनी लगेच
आपल्या जिप्सीत बसवून घेतले. बारा वर्षांपूर्वी फोन पण म्हणावे तितके
'स्मार्ट' नव्हते! माणसंच एकमेकांना मदत करत होती तेव्हा! अंधार पडायला सुरुवात
होत होती. गेटवरून देखील मदतीचे हात सरसावले. उगीचच सतत पाठीमागे वळून बिबट्याचा
अंदाज घेत आम्ही परदेशी पाहुण्यांसकट रिसॉर्टच्या दिशेने जात होतो. रिसॉर्ट आले.
अर्ध्या तासाने आमची जिप्सी आमच्या माणसांसकट रिसॉर्टवर पोहोचली तेव्हा मिट्ट
काळोख पसरला होता. हसऱ्या चेहऱ्याने गाडीतून उतरत गाईड म्हणाला, धन्यवाद! आज
तुम्हीच मला जंगल सफारी घडवली! परदेशी मंडळींसोबत गप्पा रंगल्या आणि त्यांना
गाईडने सांगितले की आपण वाघाला बघायला जातो, पण आज वाघच यांना भेटायला आले होते
तेव्हा त्यांचे 'धक्कोद्गार' पुन्हा वाघोबांना निमंत्रण देणारे होते!!
तृप्त या शब्दाची अनुभूती घेत आम्ही ताडोबाचा
निरोप घेतला!
-सोनाली कोलारकर-सोनार
***