Menu

कलाकार प्राणी

image By Wayam Magazine 03 October 2023

शिल्पकला, चित्रकला, नृत्य, संगीत या सगळ्या कला जगात फक्त माणसाजवळ आहेत अशी आपली समजूत असते. पाखरं गातात, मोर नाचतात हे आपल्याला माहीत असतं. मात्र असा एखाददुसरा अपवाद सोडला तर प्राण्यांचा कलेशी काही संबंध असेल असं आपल्याला चुकूनही वाटत नाही. पण पृथ्वीच्या पाठीवर असेही प्राणी आहेत, जे स्वतःचं पोर्ट्रेट बनवतात, स्वतःच्या घराला सुंदर रंग देतात, वाळूचा सुबक किल्ला बांधतात, गाण्याच्या तालावर नाचतात, इतकंच काय, गाण्याच्या क्लासमध्ये शिकल्यासारखं गाणंसुद्धा म्हणतात, हे तुम्हांला माहीत आहे का?

दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पेरू नावाचा एक देश आहे. तिथल्या अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट जंगल आहे. फिल टोरेस नावाचा एक प्राणिशास्त्रज्ञ काही वर्षांपूर्वी त्या जंगलात फिरत होता. त्याला तिथे एक कोळ्याचं जाळं दिसलं. त्यात एक कोळी लटकत होता. हा कोळी नेहमीपेक्षा मोठा आणि थोडासा वेगळा दिसत होता, म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आश्चर्य म्हणजे तो कोळी नव्हताच. कोळ्याचा तो एक ओबडधोबड पुतळा किंवा बाहुला होता. वाळलेली फुलं, काटक्या आणि मेलेले कीटक हे वापरून तो बनवलेला होता. ज्या कोळ्याने तो बनवला होता, त्या कोळ्यापेक्षा त्याने बनवलेला तो पुतळा चौपट-पाचपट तरी मोठा होता. पण बाकी सर्व दृष्टींनी मात्र तो अगदी त्या लहानशा कोळ्यासारखाच दिसत होता. भलंमोठं पोट आणि पाचसहा लांबलचक पाय, असा हा पुतळा कोळ्याच्या त्या जाळ्यात लटकत होता. मेलेला ऑक्टोपस टांगून ठेवला असावा, तसा तो वाटत होता. प्रत्यक्ष कोळी मात्र त्या पुतळ्याच्या वर बसलेला होता.

हा पुतळा किंवा बाहुला त्या लहानशा कोळ्याने कशासाठी बनवला असेल याचा शोध घ्यायचा प्रयत्न टोरेसनं केला. त्याच्या लक्षात आलं की, त्या छोट्या कोळ्याला खायला येणारे लहान-सहान पक्षी कोळ्याच्या या भल्याथोरल्या पुतळ्याला घाबरून त्याच्याजवळ येत नाहीत. हा कोळी सायक्लोसा (Cyclosa) नावाच्या प्रजातीचा कोळी होता. हे कोळी आपल्या जाळ्यात वेडेवाकडे आकार बनवून टांगून ठेवतात. दृष्ट लागू नये म्हणून काहीजण घराच्या दारावर काळी बाहुली टांगून ठेवतात, तसं! पण स्वतःचं पोर्ट्रेट बनवावं तसं आपल्यासारखाच दिसणारा पुतळा बनवून तो टांगून ठेवलेला मात्र प्रथमच पाहण्यात आला. टोरेसला या परिसरात आणखी पंचवीस-तीस कोळ्यांची जाळी आणि त्याला लटकणारे कोळ्यांचे पुतळे सापडले. 

गंमत म्हणजे असाच स्वतःचा पुतळा बनवणारा आणखी एका प्रजातीचा कोळी फिलिपाइन्समध्ये नंतर दोन वर्षांनी सापडला.  पेरूपासून खूप दूर, जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या देशात. फिलिपाइन्समध्ये सापडलेला हा कोळीसुद्धा जरी स्वतःचा पुतळा बनवत असला तरी त्याचा स्वतःचा आकार आणि अर्थातच पुतळ्याचा आकार मात्र पेरूमधल्या कोळ्यापेक्षा वेगळा आहे. हा जाळ्यातून खाली लटकत नसून आपले आठ पाय आठ दिशांना पसरून जाळ्यामध्ये झोके घेत असलेला पुतळा आहे. या पुतळ्याचा आकारसुद्धा तो बनवणाऱ्या कोळ्यापेक्षा पाच पट मोठा असतो. म्हणजे मूळ कोळी कुंकवाच्या टिकलीइतका लहान, तर त्यानं बनवलेला पुतळा मात्र रुपयाच्या नाण्याएवढा!

स्वतःच आपला पुतळा बनवणार्‍या या कोळ्यांना तुम्ही शिल्पकार म्हणायला तयार नसलात, तर दुसरं उदाहरण घेऊया. समुद्राच्या वाळूमध्ये स्वतःच्या वीसपट आकाराचं सुबक लेणं कोरणार्‍या एका माशाचं. मग तुम्ही मान्य कराल की, प्राण्यांमध्येही शिल्पकार असतात.

1995 मध्ये जपानमधल्या अमामी-ओशिमा नावाच्या एका बेटाजवळच्या समुद्रात २५ ते ३० मीटर खोलीवर काहीजण स्कूबा डायव्हिंग करत होते. समुद्राच्या तळावरच्या वाळूत त्यांना एक चक्राकार आकृती काढलेली दिसली. कुणीतरी वाळूचा छोटासा किल्ला बांधावा तसा हा प्रकार होता. चारी बाजूला डोंगरदर्‍या आणि मधोमध सपाट मैदान असा हा छोटेखानी किल्ला होता. सुमारे दोन मीटर व्यासाचा. लहान असली तरी ही रचना अतिशय प्रमाणबद्ध होती. सगळ्या टेकड्या एकसारख्या उंचीच्या आणि सगळ्या दर्‍यांची खोलीही सारखीच. मधोमध असलेल्या सपाट मैदानात चक्रव्यूहासारख्या वेड्यावाकड्या, पण कलापूर्ण रेषा. इतकी सुरेख आणि सुबक गोलाकार आकृती कुणी काढली आणि कशासाठी? त्यावर शास्त्रज्ञांत बराच वाद-विवाद, चर्चा वगैरे झाली. पण ती कशी निर्माण झाली असेल ते कुणीच सांगू शकलं नाही. पुढं 1913 साली असं आढळून आलं की, अंगावर पांढरे ठिपके असलेले पफर फिश नावाचे एका प्रकारचे मासे हे छोटेखानी वाळूचे किल्ले समुद्राच्या तळाशी बांधतात. ते त्यांचं घरटंच असतं म्हणाना. 

पफर फिश हा मासा साधारणपणे दहा सेंटीमीटर, म्हणजे वीतभर लांब असतो. तपकिरी रंगाचा. अंगावर पांढर्‍या ठिपक्यांची नाजूक रांगोळी. काही पक्ष्यांच्या जातीमध्ये नर घरटी बांधतात आणि ते पसंत पडलं तर मादी त्यात अंडी घालते. हीच प्रथा या माशांच्या जातीत असते.

हा मासा प्रथम वाळूवर आपलं पोट घासून एक वर्तुळ रेखतो. सुमारे दोन मीटर व्यासाचं. मग त्या वर्तुळाच्या बाहेरून वर्तुळाच्या मध्याकडे सरळ रेषेत अनेक वेळा पोहत येऊन छोट्या छोट्या दर्‍या निर्माण करतो. नंतर आपल्या कल्ल्यांच्या मदतीनं वाळू ढकलून लहान टेकड्या तयार करतो. त्याच्या या हालचालीमुळे बारीक वाळू त्या गोलाच्या मध्यभागात ढकलली जाते आणि जाड वाळू बाहेरच्या वर्तुळाजवळ येते. शेवटी वर्तुळाच्या मध्यापाशी असलेल्या सपाट भागातल्या बारीक वाळूवर आपल्या कल्ल्यांच्या साहाय्यानं तो, चक्रव्यूहासारख्या दिसणार्‍या रेघोट्या काढतो. या चिमुकल्या माशाला हा छोटा किल्ला बनवायला आठ ते दहा दिवस लागतात. 

हा सारा खटाटोप तो कशासाठी करतो? आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी! जेव्हा हा किल्ला पूर्ण होतो तेव्हा मादी येऊन त्या किल्ल्याचं बारकाईनं निरीक्षण करते. जर तिला हे घर पसंत पडलं तर ती नराला वरते, नाहीतर त्याला सरळ नकार देऊन चालती होते. त्या आकृतीत ती नक्की काय बघते ते अजून कळलेलं नाहीये. पण त्या घराच्या दर्‍या किती खोल आहेत आणि टेकड्या किती उंच आहेत यावरून तिला तो नर किती सशक्त आहे याचा अंदाज येत असावा.  (कदाचित मध्यभागी असलेल्या वेड्यावाकड्या रेषा म्हणजे सांकेतिक भाषेत लिहिलेलं प्रेमपत्र असू शकेल!)

घर आवडलं तर ती मादी त्या गोलाकार आकृतीच्या मधोमध असलेल्या मऊशार वाळूवर अंडी घालते आणि नराला ‘बाय, बाय’ करून निघून जाते. नर मात्र तिथेच राहतो. त्या अंड्यांचा सांभाळ करतो. अंडी खाण्यासाठी एखादा मासा आला तर त्याच्याशी मारामारी करून त्याला पळवून लावतो. सभोवतालच्या तटबंदीमुळे मध्ये ठेवलेल्या अंड्यांना समुद्राच्या तळातल्या प्रवाहांपासून संरक्षण मिळतं. साधारणपणे ही अंडी पाच दिवसांत उबून त्यातून माशांची पिल्लं बाहेर येतात. पिल्लं बाहेर आली की, मग नरही तिथून निघून जातो. त्या वर्तुळाकार घराचं काम संपतं. ते पुन्हा कधीही उपयोगात येत नाही. दुसऱ्या मादीला भुलवण्यासाठी नर पुन्हा नवीन घर बनवतो. जुन्या घराची डागडुजी करून नव्या नवरीला आकर्षित करायला ते वापरत नाही. प्रत्येक खेपेला नवीन घर बांधायचं असं तो का ठरवतो, हे कोडं मात्र अजून सुटलेलं नाही. 

हे झालं शिल्पकलेबद्दल. चित्रकलेचं काय? चित्र काढणारे प्राणी असतात का? 

तुम्ही थायलंडला भेट दिली असली, तर तिथल्या एका प्राणिसंग्रहालयातल्या हत्तीला तोंडात ब्रश धरून चित्र काढताना नक्कीच पहिलं असेल. इंटरनेटवर तर गोरीला, सील, डॉल्फिन्स एवढंच काय पण कुत्रा, मांजर आणि गाय हे प्राणीही चित्रं काढत असल्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. पण ह्या प्राण्यांना चित्रकार म्हणता येणार नाही. कारण ते काढत असलेली चित्रं ही एकतर त्यांच्याकडून घटवून घेतलेली असतात किंवा त्यांनी तोंडात ब्रश धरून मारलेल्या वेड्यावाकड्या रेघोट्यांना आपण चित्रं समजत असतो. त्या दृष्टीने पाहिलं तर प्राण्यांमध्ये चित्रकार नाहीतच. पण चित्रकार नसले तरी घराला सुंदर रंग देणारे रंगारी मात्र आहेत. प्राण्यांमधले हे ‘रंगकर्मी’ म्हणजे कुंभारमाशीच्या जातीतली ओस्मिया (Osima avoseta) या प्रजातीतली माशी. ती तुर्कस्तान आणि इराण या देशांमध्ये सापडते. 

तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं. 

ही ओस्मिया माशी मधमाशांसारखी समूहानं राहणारी नाही, ती एकटीच राहते. तिनं बांधलेलं तिचं घर अगदी जमिनीलगत असतं. कधीकधी जमिनीच्या आत बोटभर खोल असतं. फुलांच्या पाकळ्या जमा करुन ती त्या घर बांधायचं सामान म्हणून वापरते. पहिल्यांदा एक पाकळी जमिनीवर ठेवते आणि त्याच्यावर दुसरी पाकळी ठेवून मध्ये चिखल भरते आणि पुन्हा त्याच्यावर थोडीशी बाजूला तिसरी पाकळी. असे एकावर एक थर बनवत जाते आणि दोन थरांमध्ये चिखल घालून त्या पाकळ्या नीट घट्ट बसवते. मग आणखी पाकळ्या रचते. असं करत करत गोलाकार घर तयार होतं. साधारणपणे दोन सेंटीमीटर लांब असतं ते.  घर बांधून झालं की त्याच्या आत ती फुलांचे परागकण आणि थोडा मध ठेवून देते. मग त्यात ती अंडं घालते आणि घर बंद करून निघून जाते. काही दिवसांनी ते अंडं उबतं. त्यातून एक अळी बाहेर येते. माशीने शेजारी ठेवलेल्या परागकणांवर आणि मधावर ताव मारून ती मोठी होते. 

गमतीची गोष्ट म्हणजे आपण एवढ्या सुंदर घरात राहतोय याचा तिला पत्ताच नसतो. कारण त्या अळीला डोळेच नसतात. बिचारी!

‘“नाच रे मोरा आंब्याच्या वनात”’ हे गाणं ऐकत आपण मोठे झालो असल्यामुळे, मोर नाचतो, हे आपल्या मनात पक्कं बसलेलं असतं. पण मोराचं नाचणं हे नुसतंच दोन पायांवर थिरकणं असतं. त्यात भांगड्याचा जोश कुठे असतो?  तांबड्या समुद्रात सापडणारे एका जातीचे खेकडे मात्र दोन हातात दोन रुमाल घेऊन ‘बल्ले-बल्ले’ करत भांगडा करणार्‍या सरदारजीच्या थाटात नाच करतात.

लिबिया (Lybia Ieptochelis) या प्रजातीचे हे खेकडे आकाराने अगदी लहान असतात. जेमतेम दोन-अडीच सेंटीमीटर व्यासाचे. कॅरमच्या स्ट्रायकरच्या आकाराचे. समुद्रतळाच्या दगडांच्या खाली लपलेले असतात. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी सदैव आपल्या पुढच्या नांग्यांमधे ‘सी अॅनेमॉन’ या समुद्रात आढळणार्‍या जीवांचे पुंजके पकडून धरलेले असतात. पपनस या फळात जशा गुलाबी रंगाच्या हजारो पाकळ्या असतात तसे हे ‘सी अॅनेमॉन’ दिसतात. नांग्यांमध्ये हे धरल्यामुळे हे खेकडे बॉक्सिंग ग्लोव्ज घातलेल्या मुष्टीयोद्ध्यासारखे दिसतात. त्यावरून त्यांना ‘बॉक्सिंग क्रब्स’ असं नाव मिळालं आहे. पण खरं तर ते मुष्टीयोद्ध्यापेक्षा जास्त क्रिकेट मॅचमध्ये, खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी हातात रंगीबेरंगी झिरमिळ्या घेऊन नाचणार्‍या चिअरगर्ल्ससारखे दिसतात. ते असा नाच का करतात, याचं कोडं शास्त्रज्ञांना अनेक दिवस उलगडत नव्हतं. अजूनही नीटसं उलगडलेलं नाही. पण आपल्या शत्रूंना घाबरवून पळवून लावण्यासाठी ते ही युक्ती योजतात, असं काही इस्राइलच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधून काढलं आहे. त्यांच्या असं लक्षात आलंय की, त्यांनी नांग्यात धरलेले सी अॅनेमॉन हे विषारी असतात. ह्या खेकड्यांना खायला येणारे मासे त्यांना घाबरतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात. 

या खेकड्यांवर या शास्त्रज्ञांनी काही गमतीचे प्रयोग केले. एका लहानशा पिंजर्‍यात एक खेकडा ठेवून त्याच्याकडच्या सी अॅनेमॉनच्या दोन पुंजक्यांपैकी एक पुंजका काढून घेतला. तेव्हा त्याने आसपास कुठे सी अॅनेमॉन मिळतं का त्याचा शोध घेतला. जेव्हा ते सापडलं नाही, तेव्हा उरलेल्या सी अॅनेमॉनच्या पुंजक्याचे दोन भाग करून प्रत्येक नांगीत एकेक पुंजका पकडला. दोन-तीन दिवसांत ते अर्धे केलेले पुंजके वाढून, पूर्वी होते त्या आकाराचे दोन मोठे पुंजके तयार झाले. ते दोन रंगीबेरंगी रुमाल पुन्हा दोन नांग्यांत पकडून त्याने आपला नाच पूर्वीच्याच उत्साहाने चालू केला. दुसर्‍या एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी एका पिंजर्‍यात दोन खेकडे ठेवले. त्यातल्या एका खेकड्याकडचे दोन्ही सी अॅनेमॉन काढून घेतले. तेव्हा ज्याचे सी अॅनेमॉन काढून घेतले होते, तो दुसर्‍या खेकड्याच्या अंगावर धावून गेला आणि मारामारी करून त्याने त्याच्याकडच्या दोन सी अॅनेमॉनपैकी एक हिसकावून घेतला. मग दोघांनीही शांतपणे आपल्याजवळ असलेल्या सी अॅनेमॉनच्या पुंजक्याचे दोन भाग केले आणि प्रत्येक नांगीत एकेक पुंजका पकडला. यथावकाश ते पुंजके वाढून दोघांकडेही मूळ आकाराचे दोन पुंजके तयार झाले. तेव्हा पुन्हा एकदा ते दोन पुंजके दोन नांग्यांत पकडून दोघांनीही आपला नाच आनंदाने पुढे सुरू केला.

तुम्ही म्हणाल, ह्या खेकड्यांचा नाच जरी वरकरणी भांगड्यासारखा दिसत असला तरी त्याला नृत्य म्हणता येणार नाही. खरं आहे. अमेरिकेतला स्नोबॉल नावाचा एक पोपट मात्र खरोखरच नृत्य करतो असं डॉ. अनिरुद्ध पटेल या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने नुकतंच सिद्ध केलं आहे. डॉ. पटेल हे अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. गेली दहा वर्षं ते या पोपटावर संशोधन करताहेत. हा पोपट पांढऱ्या रंगाचा कोकॅटू (cockatoo) प्रजातीचा पोपट आहे. तो सहा वर्षाचा होता, तेव्हापासूनच तो गाण्यावर नाच करू शकतो हे लोकांच्या लक्षात आलं होतं. जेव्हा तो तेरा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मालकानं त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला आणि काही दिवसांतच तो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तो ‘एव्हरीबडी’ या प्रसिद्ध गाण्यावर नाच करताना आपल्याला दिसतो. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे झुकून, कधी एक पाय वर करून तर कधी दुसरा पाय उचलून, कधी मान तिरपी करून तर कधी गिरकी घेऊन तो नाचतो आहे. आणि विशेष म्हणजे तो वेडावाकडा, कसाही नाचत नाहीये तर संगीताच्या ठेक्यात नाचताना दिसतो. डॉक्टर पटेलांच्या कानावर त्याची ही कीर्ती गेली, तोपर्यंत हा व्हिडिओ तब्बल सहासष्ट लाख लोकांनी पाहिला होता. तो खरोखरच गाण्याच्या तालावर नाचतोय, की तो त्याच्या मालकाने त्याला शिकवल्याप्रमाणे मान आणि पाय हलवतो आहे हे बघण्यासाठी डॉक्टर पटेल त्याच्या मालकाला जाऊन भेटले. 

डॉक्टर पटेलांनी त्याच्यावर अनेक प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग असा होता की, त्यात तो ज्या गाण्यावर नाचतोय त्या गाण्याची लय कमीजास्त करून तो त्या लयीत नाचतो की नाही ते बघायचं. स्नोबॉल या परीक्षेत उत्तीर्ण झाला. इतकंच नाही तर त्याने डिस्टिंक्शन मिळवलं. जशी गाण्याची लय बदलली तशी त्याची नाचायची गतीही बदलत होती. मग तो फक्त त्या विशिष्ट, ओळखीच्याच गाण्यावर नाचतो की आणखीनही काही गाण्यांवरही योग्य प्रकारे नाचतो ते पाहण्यात आलं. पटेल यांना दिसून आलं की, नवीन गाण्यावर तो केवळ नाचतो एवढंच नव्हे, तर तो नवीन गाण्यांवर वेगळ्या प्रकारे, अभिनव पद्धतीने नाचतो. नव्या स्टेप्स घेऊन नाचतो. आज स्नोबॉल तेवीस वर्षांचा आहे आणि त्याला आता १४ वेगवेगळ्या प्रकारचे पदन्यास म्हणजे स्टेप्स येतात. हे पदन्यास त्याने स्वतः शोधून काढले आहेत. हत्ती, माकड यासारखे हुशार प्राणी तर सोडाच, पण ज्यांना आपण बुद्धिमान समजतो असे चिपॅन्झीसुद्धा अशा प्रकारे नाचू शकत नाहीत. २०१३ मध्ये ‘रोनान’ नावाची एक सी लायनची मादी गाण्याच्या तालावर मान हलवून ‘नाचते’ असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात तिला नाचायला शिकवण्यात आलं होतं आणि त्याबरहुकूम ती नाचत असे. स्नोबॉल हा नकलाकार नाही, प्रतिभावंत नर्तक आहे. त्याला खाऊची लालूच दाखवून किंवा सक्तीने त्याच्याकडून नाच करून घेतला जात नाही. तो स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी नाचतो. त्यामुळे त्याला ‘जगातला खरोखरीच नृत्य करणारा एकमेव प्राणी’ हे बिरुद मिळालं आहे. ते अर्थातच सार्थ आहे. 

आणि आता गायनकलेकडे वळूया. संगीत अवगत असलेले प्राणी कोणते? रानात पक्षी गातात. ते आपल्या कानाला गोड लागतं. पण त्याला काही संगीत म्हणता येणार नाही. काही पक्षी मोझार्ट किंवा बीथोवेनच्या सुरावटी हुबेहूब गातात, असा दावा करणारे अनेक व्हिडिओज नेटवर उपलब्ध आहेत. त्यात ते पक्षी बर्‍यापैकी ते सूर आळवत असले तरी ती नक्कल असते. स्वयंस्फूर्तीने केलेले गायन नाही. मात्र स्वतःचं गाणं उत्स्फूर्तपणे गाणारेही काही प्राणी आहेत. ते आहेत व्हेल्स.

सागरी प्राण्यामध्ये व्हेल्स हे अतिशय बुद्धिमान असतात. व्हेलला मराठीत देवमासा म्हणत असले तरी ते मासे नाहीत, सस्तन प्राणी आहेत. देवमाशांची हम्पबॅक व्हेल नावाची एक जात आहे. या जातीचे व्हेल्स केवळ बुद्धिमान नसतात, तर उच्च दर्जाचे कलाकारही असतात. मादीला आकर्षून घेण्यासाठी या जातीचे नर चक्क गायन करतात. त्यांचं हे गायन म्हणजे अर्थातच आपल्या हिन्दी चित्रपटातले नायक-नायिका म्हणतात तसं द्वंदगीत नसतं. तो डुरकल्यासारखा किंवा हंबरल्यासारखा आवाज असतो. पण त्यांचं ते गायन तालासुरात असतं. आपल्या कानाला जरी ते डुरकणं किंवा हंबरणं वाटत असलं तरी त्याच्या प्रियेच्या कानाला मात्र ते सुरेल प्रेमगीत वाटत असणार हे उघड आहे. गंमत म्हणजे त्या कळपातला प्रत्येक व्हेल तेच गाणं, त्याच सुरांत, त्याच तालात, अगदी तस्संच म्हणतो. तेच डुरकणं, तसंच हंबरणं, तसाच स्वर लांबवणं. जणू काही गाण्याच्या क्लासमध्ये जाऊन गाणं घोटून घेतल्यासारखं! अर्थातच कळपातला प्रत्येक व्हेल दुसर्‍याचं ऐकून शिकत असणार. पण तरी काय झालं? 

पण एक सवाल उरतो. सगळे व्हेल्स जर अगदी तस्संच गात असले तर त्यांच्या त्यांच्या प्रियेला त्या कळपातला ‘अपना दीवाना’ कसा ओळखू येतो? याचा मात्र शास्त्रज्ञांना अजून पत्ता लागलेला नाही!

- सुबोध जावडेकर

***

My Cart
Empty Cart

Loading...