Menu

पर्यावरणाशी जडले नाते

image By Wayam Magazine 05 June 2023

 पर्यावरण हा शब्द आणि विषय सुद्धा आम्हाला आवडत नाही, जमलेली टोळी म्हणाली. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या आणि स्नेह सोसायटीतली ही टोळी दिवसभर धुमाकूळ घालत होती. या टोळीत सोसायटीत राहणारी शाळकरी मुले होती, काही कॉलेजवाले पण! खूप धमाल ग्रुप होता. सदैव कानाला बुचे, हातात मोबाईल आणि चेहेरे गोंधळलेले ! त्यांना नेमका रविकाका भेटला. आणि आली आफत! तो काका तर प्रचंड पकवतो. प्रत्येक गोष्ट म्हणे विचारपूर्वकच करायची. चकचकीत वेष्टनातले वेफर्स, कुरकुरे असा खाऊ पण खायला द्यायचा नाही. ही मुले जरा कुठे जाताना रिक्षाचा हट्ट धरायची, त्यावरून त्यांना बोलायचा. तो  स्वतः सायकलवरून कॉलेजला शिकवायला जायचा. खांद्याला झोळी आणि त्यात बकरीचा पाला! म्हणजे टोळीचे सदस्य त्याच्या पिशवीला असे म्हणायचे. रविकाका रोज खूप पालेभाज्या आणि फळे घेऊन यायचा. ते पण कापडी झोळीत. सोसायटीतल्या कोणी मावश्यांनी प्लास्टिक पिशवी हातात जरी घेतली तरी तो ओरडायचा, स्वतःकडची कापडी पिशवी त्यांना द्यायचा. शेजारचे अनिलकाका तर रावीकाकाला ‘“अतिरेकी’” अशा नावानेच हाक मारायचे.

 छोट्या सागरला मात्र रविकाकाच्या घरीच मुक्काम ठोकायला आवडायचा. सागर   तिसरीतलात्याला रविकाकाच्या घरी खूप मजा यायची  कारण रविकाकाच्या घरी खूप रोपटी होती. त्यांना रंगीबेरंगी फुले यायची. त्याच्या बाल्कनीच्या कठड्यावर इवले इवले सनबर्डस  यायचे. चिमण्या यायच्या. सागर त्याच्या घरी सनबर्डशी खेळायचा. त्याच्या बाल्कनीच्या कोपऱ्यात मॅगीची शाळा होती. मॅगी म्हणजे गांडुळे. ती खूप कचरा खायची. रविकाका त्यांना भाज्यांची देठे, फळ्यांच्या साली असा खाऊ कापून कापून टाकायचा. मग ती चराचरा खाऊ खायची. सागरला ही विळविळणारी गम्मत बघायला आवडायचे. तो तासनतास गांडूळ बाळांना बघत राहायचा

अशा अजब घरातले रविकाका या गँगला एक दिवस म्हणाले , ``चला आपण जूनचा काही छान कार्यक्रम करूया. जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन.’’  “पण या गंगमधले सगळे एका सुरात बोलले- “पर्यावरण हा शब्द आणि विषय सुद्धा आम्हाला आवडत नाहीत्यांचा दिवाळीत रविकाकाबरोबर चांगलाच पंगा पण झाला होता; फटाक्यावरून, तो पण राग होताच. म्हणजे काय झाले होते, टोळीवाल्यांनी खूप सारे फटाके आणले. मोठ्या मोठ्या आवाजाचे. खूप धूर होणारे. सगळ्या सोसायटीत दणाणून आवाज काढत राहिले . रविकाकाने त्यांना खूप समजावयाचा प्रयत्न केला. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, फटाक्याच्या कागदाच्या कपट्यामुळे होणारा कचरा, प्राणीमात्रांना होणारा आवाजाचा त्रास, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना आणि छोट्या बाळांवर होणारे परिणाम , शिवकाशीचे चिमुकले बाल मजूर, फटके बनवतांना त्यांचे जळणारे इवलेशे हात असे सगळे काही रविकाका त्यांना सांगायचा प्रयत्न करत होता. पण त्यांना हे सारे बोअरिंग वाटत होते

``हे गायीज, लूक लेट्स सिलेब्रेट वर्ल्ड एन्वरोन्मेट डे”.’’ रविकाकाने पर्यावरण शब्द टाळून त्यांच्या भाषेतच बोलायला सुरुवात केली. या स्नेह सोसायटीत जुनचा कार्यक्रम करायचा हे रविकाकाने पक्के ठरवले होते. त्याच्यासोबत पाच सहा समविचारी मोठे लोक तयार झाले, शिवाय कॉलेजचे विद्यार्थी रोव्हीन, समता, प्रज्ञा, आकाश, मोना असे काही ताई-दादा पण आले

सर्वांची सभा चालू झाली

जूनच का ? सागरच्या प्रश्नावर रविकाका सांगू लागला-

युनायटेड नेशन्स हे जगभरातल्या देशाचं मंडळ आहे. त्याच्या सर्वसाधारण सभेत १९७२ साली एक पर्यावरण परिषद झाली होती. त्यात ठरले की जून हा  जागतिक पर्यावरण दिन साजरा करायचा. १९७३ साली पहील्यांदा हा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवसाचे नियोजन केले जाते”.

““म्हणजे  हे युनायटेड नेशन्स चे लोक इथे आले आपल्या सोसायटीत की आम्हाला शहाणपणा शिकवतील का? त्यांना नको बोलावू इथे पाकावायला..’’, जय आगऊपणे बोलला

बाकीच्यानी त्याला जरा दटावले. रावीकाका सांगू लागला- ``पर्यावरणाकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची वेळ आली आहे. “मी एकटा किवा एकटी काय करणारअसा विचार करणे चुकीचे आहे. एकेक एकेक मिळूनच सारा समाज बनतो. २०१५ सालचे जागतिक पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य आहे"Seven Billion Dreams. One Planet. Consume with Care."  म्हणजेच सात अब्ज स्वप्नेएकच आपली पृथ्वी, सांभाळून वापरा

सध्या तरी आपला निसर्ग आपल्याला जितके पुरवतो आहे, त्या पेक्षा कित्येक पटीने जास्त  आपण  सारेच ओरबाडत आहोत. या हावरेपणामुळे शाश्वतता संपुष्टात येत आहे. २०५० सालापर्यंत आपल्याला एका पृथ्वीच्या ऐवजी तीन पृथ्व्या लागतील कारण आपण तेव्हा . अब्ज लोकसंख्येला पोहोचलो असू आणि आपल्या गरजा अजूनच जास्त झालेल्या असतील. हे सारे लक्षात घेतल्यास आपण आपसूकच नैसर्गिक साधन-संपदेचा सुयोग्य वापर करू! आपली भरभराट होत असतांना  पृथ्वीची वाट लागत नाही हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. याची जाणीव म्हणून जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा.’’ 

``Every Action Counts, असेच तुझे म्हणणे आहे ना!”’ यश म्हणाला

 `` बरोबर यश. WED is the opportunity for everyone to realize the responsibility to care for the Earth and to become agents of change. WED वेड म्हणजेच World Environment Day!  हे निसर्गाचे, पर्यावरणाचे वेड लावून घेतले नाही तर आपल्याला वेडे व्हायची पाळी येईल”. यु. एन चे सचिव बन कि- मून  म्हणतात, “Although individual decisions may seem small in the face of global threats and trends, when billions of people join forces in common purpose, we can make a tremendous difference."

म्हणजे छोटे- छोटे निर्णय हजारो-लाखो लोकांनी घेतले तर खूप मोठा आणि चांगला परिणाम होईल

अजून एक गम्मत ऐका

जून २०१३ साली श्री. अभय कुमार या आपल्या भारतीय कवी आणि विचारवंताने पृथ्वीचे राष्ट्रगीत लिहिले. या कवितेला Earth Anthem असे म्हणतात

Our cosmic oasis, cosmic blue pearl
the most beautiful planet in the universe
all the continents and the oceans of the world
united we stand as flora and fauna
united we stand as species of one earth
black, brown, white, different colours
we are -black, brown, white, different colours
we are humans, the earth is our home.

 या राष्ट्रगीताचे आठ भाषात भाषांतर झाले. यापैकी  अरेबिक , चायनीज, फ्रेंच, इंग्लिश, रशियन आणि स्पानिश त्याशिवाय हिदी आणि नेपाळी भाषांतही त्याचे रुपांतर झाले.’’

 `` काका, चल आपण या गाण्याला चाल लावून घेऊ कैलासकडून तो गिटारवर मस्त वाजवेल आणि मग मी ते गाईन”. “गुड, चांगले प्लान्स बच्चा, पण आधी आपल्याला टोळीशी बोलायला लागणार आहे. ते मोठे काम आहे, आपल्या ठिकाणापासून सुरू करायचे काम नाही का!” मोठ्या मंडळीतली मेधामावशी आणि उमाकाकू पण तयार झाल्या

सागरचे बाबा म्हणाले, फक्त जूनच का आपण रोजच्यासाठी पर्यावरणाशी इमान राखून वागूया की

काय काय बरे करावे ?

यादी तयार होऊ लागली...

() कचरा व्यवस्थापन . Three ‘R’ mantras --- Reuse, reduce, recycle.  

म्हणजेच पुनर्वापर, कपात आणि पुनर्चक्रीकरण. जो कचरा विघटीत होतो त्यापासून सोसायटीतच खत तयार करणे. रविकाकाला कचऱ्याबाबत अजून खूप बोलायचे होते. आपण कचऱ्यात कागद, पुठ्ठे, काचा, प्लास्टिकच्या वस्तू अशा गोष्टी नाही टाकायच्या, या सगळ्या वेगळ्या ठेवून पुनर्चक्रीकरण करण्यासाठी भंगारवाल्याला देऊ शकतो ना. आपण कसलाही विचार करता सगळे काही सरळ कचऱ्यात फेकतो ते थांबवले पाहिजे. 

() इंधन बचत. शक्यतो चारचाकी आणि दुचाकी वाहने वापरणे टाळणे. सायकल वापरायची. विजेचा वापर कमी करायचा. रोषणाई करून विजेची उधळपट्टी करायची नाही.

() पाणी तापवायसाठी सौरतापक लावून घेणे. सोसायटीतले दिवे सौरऊर्जेवर चालणारे असावेत, सोसायटीचे सेक्रेटरी प्रवीणकाका म्हणाले

() प्लास्टिकचा वापर कमीत कमी. प्लास्टिक पिशव्या कचऱ्यात फेकायच्या नाहीत. मुळात त्यांचा वापर टाळायचा. जे प्लास्टिक इथे तिथे फेकतील त्यांना आपण अरेस्ट करू, सागरचे बाबा डोळा मारत म्हणाले.  

() सण-समारंभ निसर्गपूरक साजरे करायचे. दिवाळीत फटाके लावण्याऐवजी, ते  पैसे, झाडे, रोपे अशासाठी वापरून सोसायटीत बाग करायची. आणि हो

वटपौर्णिमेला वडाची रोपे तयार करू. त्या वनस्पतीशास्त्रवाल्या स्मिताताई करून देतात ना? –मेधामावशीची आयडिया!


एकेकाला निरनिराळे सुचू लागले... यादी वाढू लागली... 

तितक्यात रोव्हीनने ‘The inconvenient Truth’ या सिनेमाची सी. डी. पिशवीतून बाहेर काढली. या सी. डी. चा शो करूया. त्यामुळे हवामान बदलाचे संकट किती वेगाने येते आहे, ते सर्वांना समजेल आणि सर्वांचा दृष्टीकोन attitude बदलेल. मोनाताईने ध्वनी प्रदूषण आणि त्याचे गंभीर परिणाम याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली


कैलासची गिटार झंकारायला लागली आणि गाण्याला चाल लागली...

We are black, brown, white, different colours

We are humans, the earth is our home.

“ 

टोळीतील सिमरन, अंकूर, मनाली म्हणाले, ‘“आमची शाळा आताच परत सुरू झालीये. रविकाका, आई-बाबा आम्हाला शाळेत सोडतात तेव्हा आम्ही सगळे निरनिराळ्या कार्स मधून शाळेत जातो, त्या ऐवजी पाच-सहाजण एकत्र जाऊ शकतो की ! ‘’

“’’हो यालाच कार पुलिंग म्हणतात.’’ 

“’’सोसायटीत कचरा व्यवस्थापन करणार तसे शाळेत पण करता येईल. शाळेच्या कॅन्टीन मधून केवढाला कचरा तयार होत असतो ” !’’

 “’’कागदाचा वापर पण कमी करायला पाहिजे. अभ्यासासाठी खूपच वह्या आणि पुस्तके लागतात, होम वर्क दिले नाही पाहिजे, ‘’ अंकूर उवाच!

“’’अहाहा रे वेड चंबू, कागद तर लागणारच. पण तो काटकसरीने वापरला पाहिजे. वहीच्या दोन्ही बाजूंनी लिहिले पाहिजे, शिवाय रफ लेखनासाठी, आकडेमोड करायला पाटी वापरायला सुरुवात केली पाहिजे.’’ 

पुण्याच्या एका शाळेत तर कार्यानुभवाच्या तासाला मुलांना भाज्या लावण्याचे प्रशिक्षण देतात. शाळेत तयार होणारी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता मुले विकतात सुद्धा! तुम्हाला पण अश्याच पद्धतीत  रिकाम्या जागेत वाफे करून भाज्या लावता येतील ना.’’ 


“’’शाळेतले सगळे नळ पण चेक करा. कित्येक ठिकाणी गळक्या नळांतून खूप पाणी वाहून जाते. पाण्याची बचत करणे हे आपल्या सगळ्यांनी खूप जबाबदारीने पाळले पाहिजे. शाळेत पुश बटनचे नळ हवेत. म्हणजे तुम्ही भसाभस पाणी वाया जाऊ नये म्हणून”! 

“’’पण शाळेत  जर भाज्या लावल्या तर पाणी पण लागेल ना आणखीन शिंपायला?’’ ...मनाली ची शंका!

“’’अरे, बेसिनचे पाणी बागेसाठी वळवता येईल . ‘’ 

“’’पण हे सगळे करायला प्रिन्सिपॉल मादामनी परवानगी द्यायला पाहिजे ?

“’’त्या का नाही देणार. ही सर्व चांगली कामे आहेत. केवळ शाळेसाठीच नाही तर संपूर्ण पृथ्वीचेच त्यामुळे भले होते नाही का !’’  


ही गोष्ट आहे गेल्या जूनची! स्नेह सोसायटी आता पर्यावरणस्नेही बनत चाललीयतुमचे काय काय प्लान्स आहेत?  


-डॉ. नंदिनी वि. देशमुख


My Cart
Empty Cart

Loading...