Menu

भटका, मजा करा आणि शिका

image By Wayam Magazine 27 September 2023

एकदा आम्ही केरळला जायची तयारी करत होतो. मुन्नार, पेरियार, अलेप्पी, तिरूअनंतपुरम अशा ठिकाणांचे प्लानिंग करत असताना माझी मुलगी अचानक म्हणाली, 'तिरूअनंतपुरमहून थुंबाचे सॅटेलाइट (कृत्रिम उपग्रह) लाँचिंग-स्टेशन जवळ आहे. तिथे जाऊ या?’ ती तेव्हा सहावीच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची तयारी करत होती. तिने 'इस्रो’च्या थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरबद्दल वाचले होते. केरळला जायचे म्हटल्यावर तिला 'थुंबा’ आठवले. तिने इंटरनेटवर बरीच माहिती शोधली. आम्हांला काही हे ठिकाण माहीत नव्हते. पण तिने सुचवल्यामुळे आम्ही नकाशा पहिला. इस्रोची वेबसाइट पाहिली. ते ठिकाण तिरूअनंतपुरमच्या जवळच होते, पण तिथे कुणालाही सहज प्रवेश नव्हता. पण इच्छा असेल तर मार्ग सापडतो, याची प्रचिती आली. त्यावेळी रा. सु. गवई हे मराठी नेते केरळचे राज्यपाल होते. आणि त्यांचे सचिव होते सुहास सोनावणे हे मोठे लेखक. ते माझ्या चांगल्या ओळखीचे होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानी आम्हांला 'इस्रो’चे थुंबा केंद्र बघायला आनंदाने परवानगी दिली. त्या केंद्रातून भारताचे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. तिथे कृत्रिम उपग्रहाचे अत्यंत माहितीपूर्ण म्युझियम आहे. तेथील वैज्ञानिकांनी आम्हांला खूप छान माहिती दिली. कृत्रिम उपग्रह उड्डाणाच्या तंत्रज्ञानात भारत अग्रेसर आहे, अनेक देश आपली मदत घेतात, हे ऐकून तर आपल्या देशाचा फार अभिमान वाटला. तिथे डॉ. अब्दुल कलाम यांची खोली होती. आपले माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक... त्यांची खोली किती साधीशी होती! आणि ती म्हणे त्यांची अतिशय आवडती जागा आहे. हे उपग्रह उड्डाणकेंद्र उभारले गेले, त्या टीममध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्याबरोबर डॉ.वसंत गोवारीकर, डॉ.अब्दुल कलाम हेही होते. आम्हांला तेथे पृथ्वीवरील उपग्रह अंतराळात कसे सोडले जातात, हे समजावणारा माहितीपट दाखवला गेला होता. केरळच्या सहलीतली सगळीच ठिकाणे आम्हांला मनापासून आवडली, त्या ट्रीपमध्ये आम्ही फार मजा केली, पण कायम स्मरणात राहील, ती थुंबा सॅटेलाइट लाँचिंग-स्टेशनची अपूर्व भेट! आणि ती घडू शकली सहावीतल्या आमच्या मुलीने आग्रह धरला, म्हणून!!

मित्रांनो, असे हट्ट जरूर करा. आणि हट्ट पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करा. ट्रीप प्लान करणे हा मस्त अनुभव असतो. नकाशा पसरून ठिकाणे ठरवा, वाहतुकीच्या सोयी बघा, हॉटेल निश्चित करा, सगळी नीट आखणी करा, यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते, समाधान मिळते. इंटरनेटमुळे तर हे काम सोपे झाले आहे. मोठ्यांच्या मदतीने किंवा माहीतगारांच्या मदतीने तुम्ही एखादी ट्रीप प्लान करण्यात सहभागी होऊन बघा!

पर्यटन म्हटले की काही गोष्टी नीट प्लान केल्यामुळे आणि काही गोष्टी अचानक अनुभवायला मिळाल्यामुळेही मजा वाटते. काश्मीरच्या ट्रीपमध्ये आम्हांला एका हायवेवर, अचानक क्रिकेटच्या बॅटची मोठाली दुकाने लागली. आणि त्यावर 'फॅक्टरी’ असे उल्लेख होते. कुतूहल म्हणून आम्ही तिथे थांबलो. तर तिथे खरोखरच क्रिकेटच्या बॅट तयार केल्या जात होत्या. विलो झाडाचे ओंडके ठेवले होते. ते तासून, आकारात कापून, त्याच्या बॅट्स करण्याचे काम चालू होते. त्या अचानक घडलेल्या फॅक्टरी-भेटीने आम्हांला आनंद  दिला.

एखादे देऊळ बघायला जावे, आणि त्या देवळाच्या पाठीमागे एखादा खळाळता ओढा किंवा हिरवीगार टेकडी दिसावी, मग तिथे रमावे, असे खूपदा होते.

प्रवास करत असतानाही आपल्याला पुष्कळ शिकायला मिळते. लांबच्या आगगाडीतून जाताना त्यांची Pantry किंवा रसोईघर तुम्ही पाहिले आहे? जरूर पाहा. छोट्याशा जागेत दीड-दोन हजार प्रवाशांची खाण्या-पिण्याची सेवा कशी काय करतात, हे पाहण्यासारखे असते. लांबच्या गाड्या मधल्या एखाद्या स्थानकावर धुतल्या जातात. दहा मिनिटांत गाडी ज्या वेगाने धुतली जाते, ते बघायला मजा वाटते. मागे एकदा विमान प्रवासात आम्ही कॉकपिटमध्ये बसून विमान-उड्डाणाची यंत्रणा पाहिली होती. लांबड्या, अरुंद रॅकमध्ये खाण्या-पिण्याच्या चीजा कशा मस्त अरेंज केल्या जातात, ते पाहून आम्हांला नवल वाटले होते.

एकंदर काय, तर प्रवास म्हणजे नव्या अनुभवांची पोतडी. प्रवासात आपले नाक, कान, डोळे आणि मेंदू उत्सुक ठेवला की, अनेक अनुभव घेत आपण शहाणे होऊ शकतो. प्रवासविषयक एक कोटेशन मी वाचले होते- 'आपण जेवढे प्रवास करू ना, तेवढे नम्र होतो, कारण विविधतेने नटलेल्या मोठ्या जगात आपण  किती छोटे आहोत, हे आपल्याला समजते.’

विज्ञान, भूगोल हे विषय पाठ्यपुस्तकात शिकताना अनेक स्थळांचा उल्लेख येतो. यांतील काही ठिकाणांची रंजक माहिती तुम्हांला 'वयम्’मध्ये वाचायला मिळेल. प्रवासवर्णन वाचायला तुम्हांला आवडते का? आणि लिहायला? तुम्ही लिहिणार एखादे प्रवासवर्णन? कुठे पर्यटनाला जाऊन आलात ना, की घरी आल्यावर त्याचे एखादे मेमरी-बुक करण्याची सवय लावून घ्या. त्या मेमरी-बुकमध्ये तुमच्या ट्रिपची कार्यक्रम-पत्रिका, भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती व फोटो, तिथे काही खास खजिना जमवला असेल (म्हणजे रंगीत दगड, माती, पिसे, पाने, इ.) तर त्याची झलक चिकटवणे- अशी वही किंवा कम्प्युटर फाईल तयार करा. या आठवणी अशा जतन केल्या ना, तर त्या तुम्हांला कायम आनंद देत राहतात.

-शुभदा चौकर

                                                                      ***

My Cart
Empty Cart

Loading...